कालचक्र : ३

Submitted by सोहनी सोहनी on 25 November, 2019 - 03:51

कालचक्र : ३

"आदनाचं पाहिलं बाळ होईपर्यंत तुम्हाला इथेच, म्हणजे ह्याच घरात राहावं लागेल"

अर्थातच मला ते मान्य नव्हतं, त्या असल्या वातावरणात, त्या सावटाखाली मी गुदमरून मरणार होतो हे निश्चित होतं,
मी खूप विनवणी केली त्यांची, पण त्या त्यांच्या अटीवर ठाम होत्या, आणि आदना तर त्यांच्या पुढे काहीच बोलू शकणार नव्हती,
ती बिचारी तर मुक्त व्हायचे स्वप्न पाहत होती आणि आता तिची स्थिती म्हणजे पिंजरा पूणर्पणे उघड आहे, डोळ्यांसमोर स्वातंत्र्य आहे पण ती मात्र पंख कापून ठेवल्या पक्ष्यासारखी होती.

सगळ्या अशा स्वप्न मावळली होती,
अर्थात मी नकार दिला,
मी नव्हतो राहणार तिथे, तरीही तुम्ही हवंतर आम्हा दोघांसोबत राहू शकता मनावर दगड ठेऊन मी शेवटचा पर्याय सांगितला, पण त्यांना माहित होतं मी आदनासाठी परत येणार होतो, नाहीतर त्या मला इथवर ओढून आणणार होत्याच ...

मी नकार दिला तसं त्यांनी आदनाकडे पाहून सांगितलं, २ दिवस आहेत तुझ्याकडे, तो परत आला तर तुमचं लग्न होणार नाहीतर . . .

त्या नाहीतर मध्ये काय होतं ते माझ्यापेक्षा आदनाला चांगलंच कळलं होतं, ती अक्षरशः रडकुंडीला आली,
ती मला विनंती करणार नव्हतीच कारण तिला स्वतःला ह्या घरात राहायचं नव्हतं, आणि आईला विनवणी करायची हिम्मत मला तिच्यात दिसतच नव्हती,

दोन दिवस विचार करून तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जर येणार असाल तर स्वतःच सामान वैगेरे घेऊनच या,
तुमचं ह्या घरात जावई म्हणून स्वागत करायला मी उत्सुक असेन. . . एवढं म्हणून त्यांनी मला जायला लावलं,

अर्थातच मी त्या दिवशी स्वतःच्या निर्णयावर पूर्णपणे ठाम होतो. अगदी घरी पोहोचे पर्यंत, आदना एकदा का ऑफिसला आली कि त्याच दिवशी मंदिरात लग्न करू, आणि आम्ही पुन्हा तिथे कधीच जाणार नाही असे माझे बाळबोध विचार होते,
कारण गेले दोन दिवस ती ऑफिसला आलीच नव्हती, आणि त्या तिला पाठवतील असा मूर्ख विचार मी केलाच कसा ह्यावर स्वतःलाच कोसत होतो,
दोन दिवस पूर्ण झाले होते, तिसऱ्या दिवशी मी जाणार नव्हतोच, कारण मला नव्हतंच राहायचं तिथे, मी काही करून आदनाला तिथून काढायच्या विचारात होतो, गरज पडलीच तर पोलिसांची मदत घेणार असे काहीबाही विचार मी करत होतो,
अजून एक दोन दिवस जाऊदेत, असं म्हणून मी त्या दिवशी शांत होतो ... पण . . .. . .

"
कसलेसे मंत्र कानावर पडत होते, त्यांची तीव्रता हळूहळू वाढत चालली होती, मधेच आगीच्या भडक्यांचा आवाज येत होता, अग्नीला आहुत्या दिल्या जात होत्या, ते मंत्र आता तार सप्तकात म्हटले जात होते, कानांचे पडदे हालतील इतका कर्कश आवाज, समोर फक्त आणि फक्त अंधार, मी चाचपडत पुढे चाललो होतो, मिट्ट अंधार, जणू काळा समुद्र ज्यात फक्त अंधार आहे फक्त अंधार,
अचानक जोरात कुणी तरी किंचाळलं, मी घाबरून त्या दिशेने धावलो, अचानक एका दारावर जोरात आदळलो आणि त्या खोलीत आत खाली जोरात आपटलो,
किती लागलं काय झालं हे समजायच्या आधीच मी समोरच दृश्य पाहून जागीच थिजलो, एका हवन कुंडासमोर आदना बसली होती, आणि बाजूला त्या, तेच मळवट तशीच नववारी, अस्थाव्यस्त केसं, आणि तीच विषारी नजर . . .

आदना तिला विनवणी करत होती, नको आई नको, मी पुन्हा नाही असं करणार, तू म्हणशील तसंच वागेन, मला नव्हतं माहित तो मला धोका देईल, गयावया करणाऱ्या आदनाकडे एकही वेळ न पाहता त्यांनी तीच कपाळ त्या माळवंटाने भरलं,
चुकीला शिक्षा हवीच, तुला शिक्षा सोसावी लागेल, तुम्ही माझा अपमान केलाय,
असं म्हणत त्यांनी तिचा हात अग्नी समोर धरला, आणि एका धारदार चाकू सारख्या शस्त्राला कसल्यातरी लाल रंगात बुडवून स्वतःच्या कपाळाला लावत काही क्षण मंत्र पुटपुटल्या,
आणि पुढच्याच क्षणी आदनाच्या हाताची दोन बोटं त्या हवनकुंडात आहुती म्हणून दिली गेली,
मी किंचाळलो पण माझ्या गळ्यातून आवाज निघाला कि नाही माहित नाही, पण आदनाची करुण किंचाळी माझे दोन तीन दिवसांचे सगळे विचार द्रवून गेली,
आणि कानात हळुवार आवाज आले, येतोयस ना???"

मी किंचाळून जागीच उभा राहिलो, पूर्णपणे घामाने भिजलेला आणि चेहऱ्यावर आयुष्यात कधी नव्हे इतकं भयानक पाहिल्याची भीती आणि हपापलेले श्वास, इतके जोरात कि ऑफिस मधले सगळे जण हादरून माझ्याकडे पाहत होते,
आणि मी खुळ्यागत त्यांना पाहत होतो,
सगळेजण कुजबुजत होते, असा काय वागतोय हा, काय झालं ह्याला,
मित्रांनी पाणी दिलं, म्हणजे ते स्वप्न होतं, कि असं खरंच तिच्यासोबत,
पण तो कानावर आलेला आवाज तो खरा होता, त्यांचा, आणि जर मी गेलो नाही तर खरंच आदनाला काही केलं असत मग, मी स्वतःला आयुष्यात कधीच माफ करू शकलो नसतो,
त्या काहीही करू शकत होत्या, मी आदनाला असं कस सोडू शकतो, जे आहे ते सोबत सहन करू, मी सोबत असलो कि दोघे मिळून काहीतरी मार्ग नक्कीच काढू, आणि मी भीतीमुळे असं काही अभद्र विचार करतोय,
असं काही नसेल हि तिथे, त्या दिसतात तश्या नसतील हि कदाचित किंवा माझं मन घाबरल्यामुळे असे विचार करतोय,
आदनासाठी मला तिथे जावंच लागेल, मी काहीही करुन तिला आणेल माझ्यासोबत बाहेर,
अशी वेडी, निव्वळ बाळबोध समजूत मी स्वतःची घातली,
आणि माझ्या पाठीशी तुझे आजोबा असताना देखील मी त्यांना ह्या बद्दल अवाक्षर न कळवून स्वतःच्या पायावर स्वतःच कुर्हाड घातली होती,
त्या कालचक्रात मी प्रवेश केला होता, त्या खेळात स्वतःचा वापर करवून घ्यायला मी स्वतः स्वतःला त्यात लोटलं,

मी ऑफिस मधून तसाच घरी आलो आणि ...

२ तासांत मी पुन्हा तिथे उभा होतो, त्याच दारासमोर, हातात स्वतःचे सामान कपडे घेऊन,
आणि माझ्यासमोर उभ्या होत्या त्या, विजयी मुद्रेने माझ्याकडे पाहत, हातात आरतीचं थाळ घेऊन त्यांच्या शक्ती पुढे मी किती तुच्छ आहे हि जाणीव नजरेनेच करुन देत . . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults