मी वाचलेलं पुस्तक : थ्री डॉटर्स ऑफ चायना

Submitted by अनया on 5 November, 2019 - 17:12

पुस्तकाचं नाव Wild Swans : Three daughters of China
लेखिका Jung Chang
प्रकाशक Publisher: Simon & Schuster; ISBN-10: 0743246985 ISBN-13: 978-0743246989

भारत हा शेतीप्रधान देश आहे, हे वाक्य वाचत-ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. पण आता ते वाक्य ‘भारत हा निवडणूकप्रधान देश आहे’ असं बदलायला हवं, असं वाटायला लागलं आहे. एक झाली की दुसरी, इथली झाली की तिथली. निवडणुका काही थांबत नाहीत. सभा, भाषणं, मिरवणुका, आश्वासनं, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असतो. ह्या वातावरणात एकतर राजकारण निष्णात होतात, नाहीतर 'मला नाही राजकारणात इंटरेस्ट. सगळे इथूनतिथून सारखेच. कोणीही निवडून आलं तरी आपल्या रोजच्या आयुष्यात काही फरक पडत नाही' असं ठाम मत मांडतात. पण राजकारणाचा, राज्यकर्त्यांच्या धोरणांचा अत्यंत दूरगामी परिणाम समाजावर आणि समाजाचा घटक असणाऱ्या कुटुंबांवर होतो. ह्याचीच चित्तरकथा 'वाईल्ड स्वान्स' ह्या पुस्तकात वाचायला मिळते. १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाला आजही चीनमध्ये बंदी आहे.

'वाईल्ड स्वान्स' ही चीनमधील तीन पिढ्यांमधील स्थित्यंतराची कहाणी आहे. आजी, आई आणि मुलगी अशा तीन पिढ्या. त्यांना जोडणारा नात्याचा बंध तर असतोच. पण ह्या तिघींना जोडणारा एक धागा त्यांच्या नावातही असतो. त्या तिघींच्याही नावात 'स्वान' म्हणजे 'हंस' असतो. म्हणूनच ह्या पुस्तकाचं नाव 'वाईल्ड स्वान्स' आहे.

कुठल्याही तीन पिढ्यांच्या आयुष्यात खूप फरक असतोच. राहणीमान, कपडे, सवयी, संधींची उपलब्धतता, समाजाचे बदलते दृष्टिकोन, विचार करायची पद्धत, धार्मिक आचार-विचार असंख्य पातळ्यांवर हा बदल घडतो. ह्या पुस्तकातल्या तीन पिढ्यांच्या बाबतीत हे सगळं घडतंच. पण पार्श्वभूमीला देशात घडणारी स्थित्यंतरेही बरंच काही घडवतात. पुस्तकातल्या गोष्टीची सुरवात १९०९ साली जन्मलेल्या आजीपासून होते. १९५२ साली जन्मलेली लेखिका १९७८ साली शिक्षणासाठी ब्रिटनला जाते तिथपर्यंत म्हणजे साधारण सत्तर वर्षांमध्ये कुटुंबात आणि देशात घडणाऱ्या घटनांचा पट ह्या पुस्तकातून आपल्या डोळ्यासमोर उलगडतो.

चीनमधील राजसत्ता, जपानचा अंमल, कम्युनिस्ट राजवट, माओ ह्या अत्यंत प्रभावशाली नेत्याची राजवट आणि चीनची पोलादी दारे बाहेरच्या जगासाठी किलकिली होण्यापर्यंतचा प्रवास ह्या कुटुंबातील तीन पिढ्यांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर ठळकपणे घडत राहतो.

आजीच्या पिढीत मुलींनी शिकण्याची प्रथा नव्हती. मुलीला घरकाम, शिवण-टिपण येणं महत्त्वाचं होतं. दोन वर्षांच्या कोवळ्या मुलींचे पाय बांधायची अघोरी पद्धत शाबूत होती. समाजातील वरच्या स्तरातील मुलींचे पाय लहान, म्हणजे चार इंचाचे असणं गरजेचं मानलं जात असे. पाय मोठे असणे, हे कष्टकरी वर्गाचे, समाजाच्या उतरंडीत खालच्या पायरीवर असल्याचे लक्षण मानले जात असे. हे पाय बांधायचे वर्णन वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. त्या लहानशा लेकराच्या पावलांना कापडाने घट्ट बांधून त्यावर मोठा दगड ठेवला जात असे. पायाचा अंगठा सोडून बाकी हाडांची वाढ जबरदस्तीने थांबवली जायची. पावलं सतत घट्ट लोखंडी बुटात अडकलेली असायची. पायांची हाडं वेडीवाकडी वाढत. वेदना, जखमा होत असत. पण पाऊल मात्र चार इंचाचंच राहात असे.

मुलीला चांगले सासर मिळावे, तिला समाजात चांगले स्थान मिळावे म्हणून आईने करायचे ते एक राक्षसी कर्तव्य होते. ह्या सगळ्या प्रकारानंतर मुलीला आधाराशिवाय चालणेही शक्य व्हायचे नाही. मग धावणे, खेळणे लांबच. पुरुषांना ह्या चार इंच लांबीच्या पावलांचं आणि त्या पावलांमुळे अडखळत चालणाऱ्या स्त्रियांचं कामुक आकर्षण वाटायचं.

चार इंची पावलांच्या सौंदर्याच्या भांडवलावर आजीचं लग्न एका मोठ्या अंमलदाराशी लावून दिलं जातं. तेव्हा ती असते सोळा वर्षांची आणि तिचे पती चाळिशीच्या पुढचे. त्यांची आधीची पत्नी असतेच. ही अनेक अंगवस्त्रांपैकी एक होते. पत्नीपेक्षा तिचा दर्जा कमी. मात्र ह्या संबंधांमुळे तिच्या वडिलांचा खूप फायदा होतो. आर्थिक परिस्थिती सुधारते आणि मोठ्या लोकांशी संबंध जुळल्यामुळे सामाजिक स्तरही उंचावला जातो. ही अजाण मुलगी नोकरचाकरांनी भरलेल्या एकाकी हवेलीत त्यांच्या नजरेखाली राहू लागते. कधी कुठला नोकर काय चुगली करेल, ह्याचा भरवसा नाही. प्रत्येक क्षण ह्या दडपणाखाली जगायचं आणि आपल्या धन्याची अंतहीन वाट बघायची.

सहा- सात वर्षांनी तिचे यजमान अचानक तिच्याकडे येतात. त्यानंतर काही दिवसातच हिला आपण आई होणार असल्याची चाहूल लागते. ती आनंदाने अक्षरशः वेडी होते! तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमाचं, हक्काचं कोणीतरी सोबतीला येणार असतं. शेवटपर्यंत ही मुलगी आजीच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होते.

आजीची किंमत खेटराइतकीच असली, तरी तिची मुलगी मात्र मोठ्या घराण्याची वारस असते. तिच्या यजमानाकडून वारंवार मुलीला घेऊन येण्यासाठी निरोप येतात. पण तिथे गेल्यावर आपण कुठेतरी कोपऱ्यात पडू आणि मुलीचं नखही पुन्हा दृष्टीला पडणार नाही, ह्या भीतीने ती वेगवेगळी कारणे काढून जायचं टाळते. पण यजमान मृत्युशय्येवर आहेत, हे कळल्यावर मात्र तिला पर्याय उरत नाही. तिथे तिला ज्याची भीती असते, तेच पुढ्यात येतं. मुलीला तिच्यापासून तोडलं जातं. कशीबशी ती लेकीला घेऊन तिथून पळून जाते. थोड्याच दिवसात यजमानांचा मृत्यू होतो. पण त्याआधी तिला ते तिच्या गुलामीतून मुक्त करतात. पुढे ती तिच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या एका डॉक्टरशी लग्न करते. अतिशय प्रेमळ आणि दयाळू माणसाच्या संसारात तिला सुख आणि लेकीला वडिलांचं मायेचं छत्र मिळतं.

लेखिकेची आई (डी हॉंग) जात्याच हुशार, बंडखोर असते. शाळेत असल्यापासूनच निरनिराळ्या चळवळीत भाग घेत असते. तिच्यात असलेल्या उपजत नेतृत्वगुणांमुळे विद्यार्थ्यांचं नेतृत्व आपोआपच तिच्याकडे येतं. सोळा - सतरा वर्षांची झाल्यामुळे तिच्या लग्नासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या असतात. ती मात्र जमेल त्या पद्धतीने कम्युनिस्ट पक्षाचं काम करण्यात मग्न असते.

कुटुंबात हे सगळं घडत असताना चीनच्या राजकीय पटलावर खूप घडामोडी घडत असतात. राजसत्ता उलथली जाते आणि जपानचा अंमल सुरू होतो. काही ठिकाणी कम्युनिस्ट सेना जिंकत असते. सगळीकडे अंधाधुंद गोंधळ असतो. नक्की आपले मित्र कोण आणि शत्रू कोण? ह्याचा हिशेब सामान्य माणसाला लागत नसतो. काही काळातच कम्युनिस्ट आपला अंमल सगळीकडे प्रस्थापित करतात. जपानी सैन्याचा पराभव होतो. लेखिकेच्या आई - वडिलांची ह्या दरम्यान भेट होते आणि ते प्रेमात पडतात. दोघांचीही राजकीय मते सारखीच असतात. देशासाठी, पक्षासाठी त्याग करायची तयारी असते. दोघं लग्न करतात. संसार थाटतात. कम्युनिस्ट पक्षात वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, मालमत्ता ह्याला जागा नाही. नवरा-बायकोने आठवड्यात किती वेळा भेटायचं, एकमेकांबरोबर किती वेळ घालवायचा, घरात कोणकोणत्या वस्तू असू शकतात ह्या सगळ्या तपशिलांवर पक्षाचं नियंत्रण होतं.

वडिलांना नेहमीच त्यांची तत्त्वं कुटुंबापेक्षा, नात्यांपेक्षा जास्त महत्त्वाची वाटतात. त्याचे चटके लेखिकेच्या आजीपासून लेखिकेपर्यंत सगळ्यांनाच बसतात. लग्नानंतर थोड्याच दिवसात वडिलांची बदली 'यीबीन' प्रांतात होते. खूप लांबचा, अवघड प्रवास असतो. वडील वरच्या दर्जाचे अधिकारी असल्याने ते जीपमधून जातात, पण आईच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला जीपची परवानगी नसल्याने ती चालत जाते. त्या प्रवासामुळे आणि नंतरच्या सैनिकी प्रशिक्षणामुळे तिचा गर्भपात होतो. त्यांच्या संसारात पुढे खूप काही चांगलं - वाईट घडतं. पण आपल्या जोडीदाराच्या तत्त्वांमुळे किंवा हट्टामुळे आपलं पहिलं बाळ जगात येण्याआधीच गेलं, हे दुःख आई कधीच विसरू शकत नाही. पुढे त्यांचा संसार मुलाबाळांनी बहरतो. आयुष्यात स्थैर्य येतं. मानमरातब मिळतो. ह्या दरम्यान पक्षावर माओचं नेतृत्त्व प्रस्थापित होऊन स्थिरावलेलं असतं. माओचा प्रचंड प्रभाव देशावर, पक्षावर होता.

माओच्या राजवटीत निरनिराळ्या कल्पना पुढे आल्या आणि भूल पडल्याप्रमाणे सगळ्यांनी त्या कल्पना राबवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. १९५८ मध्ये माओने सगळ्या चिमण्या मारून टाकायचे आदेश दिले. चिमण्या खूप धान्य खातात त्यामुळे चीनच्या आर्थिक प्रगतीला अडथळा येतो, अशी कल्पना मांडली. राष्ट्रकार्य असल्यासारखं सगळ्यांनी त्या कामाला वाहून घेतलं. ढोल-ताशा वाजवून चिमण्यांना उडायला लावायचे आणि उडून थकल्या, की चिमण्या मारून पडायच्या. चिमण्यांची घरटी जाळणे, गोळ्या मारणे असे प्रकार देशभर सुरू झाले. थोड्याच दिवसात चीनमधल्या चिमण्या संपल्या.

पण चिमण्या फक्त धान्य खात नाहीत, त्या किडे-अळ्याही खातात. चिमण्या नाहीशा झाल्यानंतर टोळांची संख्या भयानक प्रमाणात वाढली. सगळीकडे टोळधाडींनी हैदोस मांडला. धान्य उत्पादन वाढण्याऐवजी भयानक दुष्काळ पडला. सरकारी आकडेवारीप्रमाणे पुढच्या तीन वर्षात जवळपास दीड कोटी नागरिक मृत्युमुखी पडले.

राजवटीच्या सुरवातीच्या काळात खेड्यातील ३०-४० कुटुंबाचं मिळून एक, अशी कम्यून्स संपूर्ण देशभरात स्थापन केली गेली. कम्युनची जबाबदारी कम्युनिस्ट पार्टीच्या अनुभवी सदस्याकडे असायची. जमीनदारांची मालकी असलेली जमीन ताब्यात घेऊन ती ह्या कम्युनच्या सदस्यांना वाटली गेली. शेती उत्पादन वाढवण्यासाठीची उद्दिष्टे ठरवण्यात आली. ती उद्दिष्टे पूर्ण करण्याची जबाबदारी आणि पूर्ण न झाल्यास त्याची शिक्षा भोगण्याचे दडपण कम्यून-प्रमुखांवर होते.

शेती उत्पादन वाढवण्यासाठी अवजारे लागणार. मग मोठ्या मोठ्या भट्ट्या तयार करून त्यात दिसेल तो पत्रा, लोखंड, घरातील भांडी वितळवली गेली. ह्या दरम्यान ही लेखिका शाळकरी मुलगी होती. तिने लिहिले आहे, की शाळेत जाताना कुठे खिळा, पत्र्याचा तुकडा मिळवण्यासाठी मुलांमध्ये चढाओढ असे. शाळेतले शिक्षक भट्टी पेटती ठेवण्यात अडकलेले असायचे. अभ्यासापेक्षा राष्ट्रकार्य महत्त्वाचं होतं. उत्तम अवजारं तयार करायला हे सगळं पुढे निरुपयोगी ठरलं, हे सांगायलाच नको. शेतात रोपं जवळजवळ लावली, तर दर एकरी उत्पन्न वाढेल, ह्या कल्पनेने रोपं अत्यंत जवळ लावायची स्पर्धा सुरू झाली. पुरेसं पोषण न मिळाल्यामुळे उत्पन्न वाढण्याऐवजी कमी झालं.

आता सगळं ठीक चालू आहे, असं वाटत असत, तोवर सांस्कृतिक क्रांतीची वावटळ आली. सांस्कृतिक क्रांती म्हणजे माओच्या तत्त्वांशी एकनिष्ठ नसलेल्यांना एकनिष्ठ असल्याचे सिद्ध करायला लावायचे किंवा त्यांची उचलबांगडी करायची. कोण एकनिष्ठ आहे आणि कोण नाही, हे ठरवायचे अधिकार माओ आणि समर्थकांकडे होते. माओ समर्थक युवक संघटना रेड गार्ड ह्यामध्ये आघाडीवर होती.

सगळी तरुण मंडळी ह्या कामात गुंतल्यामुळे चीनमधील शैक्षणिक संस्था बंद पडल्या. ऐतिहासिक इमारती, जुनी संस्कृती, जुनी पुस्तके हे सगळे प्रतिगामी ठरवले गेले. पुस्तकांच्या होळ्या केल्या गेल्या. उच्च पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना क्रांतीविरोधी ठरवून त्यांची भर चौकात बेअब्रू केली गेली. त्यांना सुधारण्यासाठी, कष्टकरी जीवनाचे महत्त्व ठसवण्यासाठी त्यांची रवानगी खेड्यात करण्यात आली.

सगळ्या देशात इतकी उलथापालथ होत असताना लेखिकेचं कुटुंबही त्या आगीत होरपळत होतं. आईचं रक्ताचं नातं राजघराण्याशी असल्याचा तिला वर्षानुवर्षे त्रास होत असतो. आईला तिचे वडील आठवतही नसतात. पण कागदोपत्री तशीच नोंद असते, त्यामुळे तिला क्रांतीविरोधी ठरवून आधी तुरुंगवास आणि नंतर भातशेतीत राबण्यासाठी पाठवलं जातं. लेखिकेच्या वडिलांनी सुरवातीपासून कम्युनिस्ट पार्टीसाठी झीज सोसलेली असते. पण त्यांनी देशाच्या सुधारणांसाठी माओच्या विचारांना विरोध केलेला असतो. हा तर फारच मोठा गुन्हा. कवितेची, उत्तम साहित्याची आवड असलेल्या ह्या माणसाला आपल्या हाताने ही सगळी पुस्तकं जाळावी लागतात. त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांची जाहीर छीः-थूः करण्यासाठी उत्तेजन दिलं जातं आणि शेवटी अत्यंत दुर्गम भागातल्या एका दगडाच्या खाणीत काम करायला पाठवलं जातं.

सगळं कुटुंब पाचोळ्यासारखं इतस्ततः विखुरलं जातं. पण त्यांच्यातला प्रेमाचा, मायेचा चिवट धागा शाबूत राहतो. कुटुंबातल्या प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर भयानक परिणाम करून सांस्कृतिक क्रांती संपते. सांस्कृतिक क्रांती संपल्यावर ते पुन्हा एकत्र येतात. वेडीवाकडी वळणे घेऊन आयुष्याचा प्रवाह पुढे वाहत राहतो.

देशाच्या राजकीय पटलावर होणारे बदल एखाद्या कुटुंबात इतकी उलथापालथ घडवून आणू शकतात, हे खोटं वाटण्याइतकं खरं आहे. कम्युनिस्ट चळवळीचे विचार कागदोपत्री वाईट नव्हते. प्रत्येक नागरिकाला पोटापुरते अन्न, अंगभर वस्त्रे, हाताला काम, मुलांना शिक्षण, आजारी माणसाला औषधोपचार, कायद्याचा वचक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार. कुठलीही राजकीय सत्ता ह्यापेक्षा वेगळं काय देण्याचं आश्वासन देते? मग चुकतं काय, कुठे आणि कसं? सुरवातीच्या कम्युनिस्ट पक्षावर माओचा प्रभाव इतका वाढला, की चीनमधील राजवट कम्युनिस्ट राजवटीपेक्षा माओवादी राजवट झाली.

सगळ्या देशावर इतका प्रभाव असलेली व्यक्ती प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातला प्रत्येक लहानसहान तपशील ठरवते. केस कसे कापावे, वेण्या घालाव्या की नाही, घातल्या तर कशा घालाव्या, कपडे कुठले घालावे, कपड्यांचा रंग कसा असावा, बाह्या आखूड असाव्या की लांब. इथपासून विचार काय करावा, पुस्तकं कुठली वाचावी इथपर्यंत. नेत्याला महत्त्व देणे, त्याच्यावर प्रेम करणे आणि व्यक्ती पूजा करणे ह्यातील सीमारेषा फार धूसर आहे. एखादा धर्म, विचारसरणी, सत्ता किंवा नेता जेव्हा जीवनाच्या सर्व अंगांवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करते, सर्वंकष बनते तेव्हा ती जुलमी होण्याच्या दिशेने जातेच.

लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी सामान्य नागरिकांना आपलं म्हणणं मतपेटीतून गुप्तपणे मांडता येतं. राष्ट्र्पती, न्यायसंस्था, लोकनियुक्त सरकार आणि माध्यमं मिळून लोकशाहीचा तोल सावरून धरतात. त्यातला सामान्य माणसाचा अधिकार मतदानाचा. हा अधिकार, ही व्यवस्था किती ताकदीची आहे, ती आपण किती जबाबदारीने वापरली पाहिजे, ह्याची स्पष्ट जाणीव हे पुस्तक वाचून होते.

मिसळपाव.कॉम च्या दिवाळीअंक २०१९ येथे पूर्वप्रसिद्ध

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फार सुरेख परिचय, आवडला पुस्तक वाचावेसे वाटत आहे, वाचले की इथे कळवेनच. ह्या परीक्षण/ परिचयासाठी खूप धन्यवाद.

मला पुस्तकाबद्दल लिहीताना हा प्रश्र्न नेहमी पडतो की सगळ्या कथानकाचा गोषवारा द्यावा की काही भागाबाबत न लिहीता मूळ पुस्तक वाचायला उद्युक्त करावे?
प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार.

आवडले लिखाण !
पुस्तक वाचायला उद्युक्त करावे हेच योग्य

डे हाँग हे हेच पुस्तक आहे का? मी हे रिलिज झाले तेव्हा वाचले आहे. हार्ड कॉपी पेपर बॅक घेउन. फार जबरी पुस्तक. लेखिकेची शैली छान आहे. इंग्रजीतून वाचतानाही जाणवते. चीन मधल्या निसर्गाची व मनुष्य नाते संबंधांची वर्णने फार सुरेख व ह्रुद्य आहेत. आई मुलीला डबा का काय अन्न द्यायला धावत धावत जाते त्या सीन मध्ये रडू येतेच. स्त्रीवाद व मानववाद ह्यांच्या अभ्यासकांनी वाचावे असे आहे. लोकशा हीचा विजय असो.

उत्तम पुस्तक परिचय. नक्की वाचेन.

थोडी गुड अर्थ ची आठवण आली. अर्थात ती कादंबरी आहे आणि हे नॉन-फिक्शन. तसेच गुड अर्थ साधारण विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात घडते.

छान परिचय.

अंगावर आल्या काही गोष्टी रादर बऱ्याच गोष्टी. ते मुलींचे पाय बांधणे वगैरे डिस्कव्हरीवर दाखवलं होतं, वयस्क असलेल्या काही बायकांनी पाय उघडून दाखवले, बापरे काटा आला एकदम. पेहराव वेस्टर्न होता मात्र सर्वांचा, शेत वगैरे पण दाखवलेलं, त्या काम करताना.