सिझन- २ लोकल डायरी -२

Submitted by मिलिंद महांगडे on 4 November, 2019 - 03:07

अवंतीच्या मिठीमुळे मी माझा राहिलो नाही. एका वेगळ्याच धुंदीत होतो मी दिवसभर . तो सुगंधाचा दरवळ अजूनही माझ्या श्वासात होता . ऑफिसमध्ये असूनही मी तिथे नव्हतो , मी होतो त्या इराण्याच्या कॅफेत , जिथे सर्वांसमक्ष तिने बिनधास्त मला मिठी मारली होती. दिवसभर काय काम केलं हेही मला आठवत नाही . रात्रीही झोप आली नाही . सारखा तिचाच चेहरा डोळ्यासमोर दिसत होता . आजकाल सकाळी लवकर उठू लागलो असल्याने घरच्यांनाही तो सुखद धक्का होता . लवकर आटोपून मी स्टेशनवर आलो तेव्हा सावंत पाय ओढत येताना दिसले .
" काय सावंत ? कसल्या विचारात आहात ? घरी ओक्के ना सगळं ? " मी मजेत त्यांना विचारलं .
" तसं ओक्केच म्हणायचं ... दोन बायका आणि फजिती ऐका अशी गत झालीय " तेही गमतीदार चेहरा करून म्हणाले .
" म्हणजे ? काय झालं असं ? "
" तसं खूप काही झालं नाही रे , नेहमीचंच . आमच्या घरात दोन गट पडलेत ."
" काय ? म्हणजे भांडणं सुरू झाली की काय ? "
" नाही रे , दोन गट म्हणजे माझी बायको आणि शकुंतला एका गटात आणि दुसऱ्या गटात मला टाकून दिलंय त्यांनी . माझी मस्करी करत असतात दोघी , आणि शॉपिंग पण फार वाढलंय . एकीला दोघी जणी आहेत , चालू आहे धिंगाणा ! " मला त्यांच्या बोलण्यावर हसू आलं .
" आता बायको आणि प्रेयसी बरोबर एकत्र राहायचं म्हणजे तेवढं तर आता तुम्हाला सहन करावंच लागेल "
" हो , ते तर आहेच . पण दोघी खुश असतात . आणि शकुंतलेच्या डोळ्यांत समाधान दिसतं , आणि बायकोच्या डोळ्यांत विश्वास ! दोघींच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला , आणखी काय पाहिजे ? "
" खरं आहे , नशीबवान आहात "
" कोण नशीबवान आहे ? आम्हाला तरी सांगा .... " शरदने येता येता विचारलं .
" शंभर वर्षे आयुष्य तुला .... तुझाच विषय चालू होता .... " मी बिनधास्त ठोकून दिलं . सावंत माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले .
" माझा ? कशाबद्दल …? " त्याने न समजून विचारलं .
" अरे , म्हणजे तुला तुझं प्रेम मिळालं ... लवकरच तुझं तिच्याशी लग्न होणार, सर्व जण असे नशिबवान नसतात " मी गाडी वेगळ्याच ट्रॅकवर नेली आणि मुख्य म्हणजे शरदला ते पटलंही . सावंत गमतीदार चेहरा करून आमच्याकडे बघत होते .
" हो यार , ते तर आहेच ! पण तुम्ही सगळे होतात म्हणून हे शक्य झालं . " शरद म्हणाला .
" हे तू मान्य करतोस ना , मग आता आमच्या पार्टीचं काय ? " सावंतांनी विचारलं .
" अरे , गाडी आली , मी पळतो पुढे " म्हणत तो तिथून निसटला .
" पार्टीचं नाव काढलं की पळाला बघ कसा , पण आज त्याला सोडायचा नाही " सावंत म्हणाले . तोपर्यंत भडकमकर , भरत आणि नायर अंकल आले . भरत जागा पकडण्यासाठी पुढे गेला . माझे डोळे अवंतीच्या वाटेवर लागले . ती अजून आली नव्हती . गाडी प्लॅटफॉर्मला येऊन लागली . जिग्नेस डाऊन करून आला होता . आजकाल तो नियमितपणे लवकर गाडीला येत होता , आणि इमाने इतबारे आमची जागा पकडत होता . नुकताच त्याचा त्याच्या बायकोशी घटस्फोट झाला होता , त्यामुळे तो काहीसा उदास उदास राहात असे . आम्ही आलो की त्याच्या चेहऱ्यावर एक औपचारिक हास्य येत असे , कधी कधी आमच्याशी शेकहँड करून काहीही न बोलता तो एअरफोन कानात घालून YouTube video किंवा Netflix वरच्या web series बघत असे. त्याची ही अवस्था बघून शरद , भरत सुद्धा त्याच्याशी जपून वागत . आधीसारखी दंगामस्ती बिलकुल बंद झाली होती . आम्ही आमच्या नेहमीच्या जागेवर बसलो . मी नायर अंकलना खिडकीची जागा दिली आणि शरदसोबत उभा राहिलो . पलीकडे लेडीज कंपार्टमेंटमधेही गर्दी होऊ लागली , पण अवंती काही दिसत नव्हती . गाडीने लगेचच हॉर्न दिला आणि हलकासा धक्का देऊन ती हळूहळू निघाली . अवंती आज आली नाही . मला एकदम कडकडीत दुपारी सूर्यग्रहण लागल्यासारखं वाटू लागलं . काय झालं असेल ? ती का आली नसेल आज ? फोन करूया का ? छे ! एवढ्या गोंधळात फोन कसा करणार ? मग whatsapp वरून एखादा मेसेज पाठवूया का ? हे जरा पटलं आणि मी तिला ' आज ट्रेन ला का आली नाहीस ? मी तुझी खूप वाट बघितली. लव यु . ' असा मेसेज टाईप करून पाठवून दिला आणि रिप्लायची वाट बघत बसलो. पाच सेकंदानंतर मला असं वाटलं की शेवटचं ते ' लव यु ' लिहायला नको होतं . मी तो मेसेज डिलीट करणार तेवढ्यात त्या मेसेजवर डबल टिक झाली आणि लगेच ती निळी सुद्धा झाली. म्हणजे तिने माझा मेसेज नक्कीच वाचला . आता तिचा रिप्लाय कधीही येऊ शकतो , म्हणून मी दर पाच सेकंदांनी मोबाईल पाहू लागलो .
" तू असा पळून कसा काय जाऊ शकतोस ? पार्टी का नाम लिया तो भाग गया ये शरद " सावंत नायर अंकलना सांगू लागले . त्यांनाही काहीतरी मुद्दा हवाच असल्यासारखे तेही इरेला पेटले , " बराबर है । शरद तुम बॅचलर्स पार्टी कब दे रहे ओ ?
" अरे अंकल आप खाली बोलो कब करने का है पार्टी ! " शरद म्हणाला .
" जैसा सबको कंव्हीनियंट लगेगा वैसा डीसाईड करो । " नायर अंकलनी बॉल आमच्या कोर्टात टाकला .
" ह्या शनिवारी ठेवूया . रात्री ? म्हणजे दुसऱ्या दिवशी टेन्शन नाय " भरत म्हणाला .
" कोणता शनिवार आहे ? दुसरा की तिसरा ? " भडकमकर
" तिसरा "
" अरे , मग चौथ्या शनिवारी ठेवा . मला सुट्टी असते " भडकमकर म्हणाले .
" फोर्थ सॅटर्डे चलेगा क्या तुमको ? " नायर अंकलनी शरदला विचारलं
" चलेगा ना , बाकी लोगोको पुछो , मेरेको सब लोग चाहीये पार्टीमें । " शरद म्हणाला .
" मधू तुझं काय ? " सावंत मला विचारत होते त्यावेळी मी whatsapp चेक करत होतो . तिचा रिप्लाय अजून आला नव्हता . भरतने माझ्या खांद्यावर थाप मारली तसा दचकलो .
" काय रे ? काही महत्वाचा मेसेज येणार आहे का ? " भरत गमतीत म्हणाला .
" नाय रे ... बोला ना काय झालं ? " म्हणत मी मोबाईल बंद करून खिशात टाकला.
" अरे , तुला चौथ्या शनिवारी जमणार आहे का ? शरदची पार्टी आहे ." भडकमकर मला विचारू लागले .
" चालेल की , पार्टीसाठी आपण कधी पण तयार असतो . " मी म्हणालो .
" ओक्के , मग आता कोण राहिला ? जिग्नेस ..." सावंत म्हणाले त्यावर त्याचं लक्ष नव्हतं , नव्हे त्याचं एकूणच काय चालू आहे ह्याकडेही लक्ष नव्हतं . तो कानात एअरफोन घालून व्हिडीओ बघत होता . कुछ कुछ होता है फिल्म मधलं " तुझे याद ना मेरी आई , किसिसे अब क्या केहेना ! " चालू होतं . त्यातली बॉबकट केलेली काजोल ढसा ढसा रडत होती . आजकाल तो असलीच रडकी गाणी बघत बसायचा . , " जिग्नेस ? ए जिग्नेस ! " सावंत त्याला म्हणाले .
" बोलो सावंतजी " डोळ्यांच्या कडा बेमालूमपणे पुसत जिग्नेस म्हणाला .
" अरे , तू चौथे शनिवार को क्या कर राहा है ? अपना शरद का पार्टी है । तू है ना ? "
" अरे , नहीं सावंतजी , मैं थोडा बाहर जा रहा हूँ । आप लोग मजे करिये । " जिग्नेस म्हणाला , पण त्याच्या बोलण्यावरून तो फक्त आम्हाला टाळत होता हे आमच्या लक्षात आलं .
" तो तू बता , तुझे कब टाईम है ? तब करते है पार्टी ... " मी त्याला विचारलं .
" अरे नहीं मधू भाय , ये टाईम जरा बिझी हूँ । आप करलो ना ... मैं बाद में पार्टी लुंगा शरदसे " तो नजर चोरत म्हणाला .
" जिग्नेस , यार बास क्या , थोडे टाईम के लिये आजा ... मेरेको अच्छा लगेगा " शरदनेही त्याला सांगून पाहिलं पण त्याचं उत्तर काही बदललं नाही . तो काहीही फालतू कारणं देत होता . " सावंत , जाऊद्या , आपण कॅन्सल करू पार्टी , मेरा भाई जिग्नेस येणार नसेल तर पार्टी करून काय फायदा ? " शरद वैतागून म्हणाला .
" अरे , ऐसा मत करो शरदभाय । बाकी लोगोंका खयाल करो । "
" तू मुझे मत बता , क्या करने का या क्या नही करनेका । तू नहीं तो पार्टी कॅन्सल " शरदही अडून बसला .
" क्या यार जिग्नेस , कितने दिन से अपुन लोगो ने पार्टी नहीं की , चल ना " भरत म्हणाला .
" अरे , ये शरद एक नंबर का कंजूस है , उसके जेब से पैसा नहीं निकलता कभी , अबी तुम नय आयेगा तो ये पार्टी कॅन्सल करेंगा । उसका तो पैसा बच गया ना ! यही उसकी चाल है , तुम जरा समझो जिग्नेस " नायर अंकलनी त्यांच्या गमतीदार शैलीत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
" मोठ्या मुश्किलीने शरद आपल्या तावडीत सापडलाय , त्याला असा सोडायचा नाही . हां बोलदे मेरे भाई जिग्नेस । " भडकमकर म्हणाले . नंतर सगळ्यांनीच एकदम जिग्नेसला घेरलं , आणि गोंधळ घालायला सुरुवात केली . आजूबाजूच्या ग्रुपचे लोक आमच्याकडे विस्मयाने पाहू लागले . पलीकडच्या लेडीजना आमच्या इथे भांडण झाल्यासारखं वाटून त्याही वाकून आमच्या गुपकडे बघू लागल्या . एवढं सगळं जिग्नेसला सहन झालं असतं तरच नवल होतं . त्याने लगेच हार पत्करली . " आता हूँ बाबा , आता हूँ " करत त्याने शेवटी हात जोडले आणि आम्ही पुन्हा एकदम गोंगाट केला . पार्टीचा दिनांक आणि वेळ ठरली . शरदचा आणखी एक फ्लॅट होता आणि तो सध्या बंद होता , तिथेच जायचं ठरलं . दारू आणि जेवण बाहेरून आणणार होतो, आणखी एक खास आकर्षण होतं ते म्हणजे आमच्या इथल्या गड्डी ढाब्याचे भेजा फ्राय आणि घावणे ! हे म्हणजे स्वर्गसुख ! शरदची पार्टी चांगलीच होणार ह्यात आम्हाला शंका नव्हती . मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या , जिग्नेस सुद्धा आज बऱ्याच दिवसांनी आमच्यात सामील झाला होता . त्यामुळे सगळ्यांनाच बरं वाटत होतं . आम्ही त्याला जास्तीत जास्त बोलण्यात गुंतवत होतो . वेळ कसा गेला काहीच कळलं नाही . भायखळयाला उतरलो आणि मला पुन्हा अवंतीची आठवण झाली , त्या पाठोपाठ तिला पाठवलेल्या मेसेजची . मी लगेच माझा मोबाईल काढून पाहिला . तिचा whatsapp वर मेसेज आला होता .
" message kashala kelas ... ata lagali waat ! "

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users