काहीतरी ढासळलंय !

Submitted by चैत्रपालवी on 10 October, 2019 - 10:49

...आईनं विस्तवावर पळी चांगली कडक तापवली, अन बाहेरचं दार अर्धवट उघडत मुसळधार पावसाला चांगला सणसणीत चटका दिला ! "मेल्या, आता तरी तोंड काळं कर तुझं !" चिडचिड करतच तिनं धाडकन दार लावून घेतलं.
आजचा सलग पाचवा दिवस ! अंगात यावं तसं पिसाळून कोसळतोय हा वरून. खाली ती भुई तरी कुठवर सोसणार ? शेवटी तिनं पण हात टेकले. तसा हिरव्याकंच माळाला पायदळी तुडवत पाण्याचे लोटच्या लोट घराभोवतीनं दंगल करू लागले, आणि पावलाइतकं पाणी गुडघाभर कधी झालं कळलंच नाही.
आज तर जणू माजावर आल्यासारखा कोसळतोय पाऊस. दिवसभर बिचारी पन्हाळ उर फाटेस्तोवर पाणी ओकत होती. बाहेर कुत्री आडोशाला पार मुटकुळ करून गप पडून होती. अधूनमधून अंगावरचं पाणी झटकण्यापुरती काय ती आंग हलवायची. पाखरांचे तर हाल बघवत नव्हते. कोवळ्या झाडावरची कोवळी घरटी केव्हाच जमिनीनं झेलली होती. वळचणीला चार दोन साळुंक्या भेदरून बसल्या होत्या. परसात बांधलेल्या आडव्या बांबूवर एकच कावळा जमिनीकडे गोठून गेल्यागत बघत बसला होता. वर पत्र्यावर जणू ताश्याची टिप्पर घुमावी तसा थर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज लय धरून सुरूच होता.
दुपार कलंडली तसा पावसानं उजेडाला पार कंबरेत लाथ घालून हाकलूनच दिला. लगोलग माजघरात पहिले शिरला तो अंधार ! आईनं तोवर घाईघाईनं जेवणं, भांडी उरकून घेतलं होतं. आम्हा पोरांना सक्त ताकीद दिली होती की खबरदार खाटेवरून खाली उतराल तर ! तेवढ्यात पोतराजानं आभाळाच्या पाठीवर जणू कडाडकन आसूड ओढला. आई म्हणाली, "नक्की जवळपास कुठंतरी वीज पडलेली दिसतेय. ह्यांची घरी यायची वेळ होईल आता, तेवढा तरी जरा थांबू दे रे पाऊस !"
घराला अंधारानं अजूनच मिठी मारली. आईनं देवापाशी दिवा लावायला घेतला. फडफडत ज्योत कशीतरी उजेड फेकत राहिली. उग्रट वासाच्या उदबत्तीसमोर देवाला मिटल्या डोळ्यांनी नमस्कार करत आमचं शुभंकरोती सुरू झालं. मला आवडायचं असं बसून सगळं म्हणायला. फक्त ते तेराच्या पुढचे पाढे म्हणजे अंगावर काटा यायचा. बाहेर धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजातही आईचं लक्ष आमच्याकडे बरोबर होतं. 'तेरी साती किती म्हणालास ?' मग परत तेरा एके तेरा पासून सुरू ! पाऊस कोसळतच होता. आतापर्यंत घरातले ते चाळीसचे पिवळे बल्ब मरगळलेला प्रकाश घरभर शिंपडायला लागले होते. दाराशी आईनी पेला उपडा करून ठेवला. बाहेर गेलेलं माणूस लवकर घरी येतं म्हणे !
पाऊस आता रंगात आला होता. तोच दार वाजलं. ओल्या कंच भिंतीत पाणी पिऊन फुगलेलं लाकडी दार भेसूरपणे किरकिरत उघडलं, दारात नखशिखांत भिजलेले वडील उभे ! हातातल्या छत्रीची पार दैना झालेली दिसत होती. आईने आधी जाऊन टॉवेल आणला न म्हणाली, "आधी कपडे बदला, डोकं कोरडं करा, मी तोवर चहा ठेवते." नेमके तेव्हाच लाईट गेले. वडिलांचा दरारा आणि बाहेरचा मिट्ट काळोख, एकदमच घरात शिरले. आईने पुढचं मागचं दार घट्ट लावून घेतलं. दोन्ही दारात एक एक चिमणी पेटवून ठेवली. प्रकाशामुळे 'जनावर' घरात शिरत नाही, त्यासाठी हा खटाटोप. वडिलांनी तोवर कपडे बदलून कंदील खाली काढला, अंगठ्याने वरची कडी उचलून अलगद काच बाहेर काढली. कपड्याने सगळी काजळी स्वच्छ पुसली. मग ते गोल बटण फिरवून वात थोडी वर घेतली. पेटवली, आणि परत सावकाश काच लावून कंदील स्वयंपाकघरात आणून ठेवला. हे काम दुसऱ्या कोणी केलेलं त्यांना मुळीच खपायचं नाही. काचेवर इतकी सुद्धा काजळी त्यांना चालत नसे. भोवतीभोवतीनं फिरणारे आम्ही मग कंदीलाभोवती जेवायला बसलो. जेवताना वाटेत कसं सगळीकडे पाणी भरलंय ते वडिलांनी अगदी रंगवून सांगितलं. आईचा चेहेरा अजूनच काळवंडला काळजीनं ! जेवता जेवता ती मधूनच ओल धरलेल्या भिंतीकडे आणि तग धरलेल्या कौलांकडे पहात होती.
पाऊस अजून तस्साच आदळतोय. कंदिलाच्या उजेडातच वडिलांनी अंथरुण घातलं. आईनं देवापुढचा दिवा शांत केला, देवाला नमस्कार केला अन येऊन आडवी झाली. तशी आम्ही पोरं तिच्या उजव्या डाव्या कुशीत जाऊन झोपलो. वडील उजवा हात डोक्याखाली घेऊन कुशीवर वळून झोपायचा प्रयत्न करत होते. पण पावसाचा कर्कश्श आवाज कोणालाच झोपू देत नव्हता.
साधारणतः तासभर असाच गेला असेल, तोच "धप्प" आवाज झाला. वडील लगेच उठले, कंदील मोठा केला आणि आवाजाच्या दिशेने स्वयंपाकघराकडे गेले आणि तसेच घाईघाई परत आले. आईला उठवलं, तिलाही दाखवलं, ...स्वयंपाकघराच्या भिंतीची एक वीट खाली पडली होती. दोघांच्याही अंगाचा थरकाप उडाला. सत्तर वर्षाच्या जुन्या भिंतींनी गेले पाच दिवस पावसाशी घेतलेली झुंज आज कुठेतरी डळमळली. भिंतीची एक वीट कोसळली. दोघांनीही आम्हाला मुलांना उठवलं. आणि मधल्या खोलीत घेऊन गेले. तिथे आम्हाला झोपवून दोघेही तसेच काळजीनं बसून राहिले. पाऊस काही ऐकायला तयार नव्हता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा काळोख घराभोवती घिरट्या घालत होता. आणि पुन्हा एकदा आवाज आला, "धप्प, धुडुं !" वडील उठले तसं आई काळजीनं म्हणाली, "काही कुठं जाऊ नका बघायला, काय व्हायचं ते होऊ दे पण तुम्ही तिकडे जाऊ नका हो !" पण वडिलांना कुठला धीर निघतोय. ते हळूहळू जवळ जाऊन बघून आलेच. खोल आवाजात त्यांनी सांगितलं, "अजून चार विटा पडल्यात ! दाराची वरची बाजू मोकळी झाली गं !" बहुदा दोघांनीही डोळ्याच्या कडा पुसल्या असाव्यात. पण काळोखात सगळं लपवलं गेलं. मग त्यानंतर पाच दहा मिनिटांच्या अंतराने आवाज येतच राहिले, एक एक वीट पडतच राहिली. आम्ही जीव मुठीत घेऊन एकमेकांच्या आधारानं तसेच बसून होतो.
हळूहळू रात्र पुढे सरकत होती. पावसाचा जोर थोडा ओसरला होता. पूर्वेला झुंजूमंजू व्हायला लागलं होतं. अंधार थोडा विस्कटायला लागला होता. रात्र तर सरली म्हणून आई वडील सुस्कारा सोडतायत तोवर एकच मोठ्ठा आवाज झाला आणि छपरासकट सगळं स्वयंपाकघर जमीनदोस्त झालं. एवढ्यावरच पावसाचं समाधान झालं नाही म्हणून आतापर्यंत शाबूत असलेला व्हरांडाही एकाएकी ढासळला. सुदैवाने आम्ही बसलो होतो ती मधली खोली तेवढी अजून तग धरून होती. पण केव्हा काय होईल सांगता येत नव्हतं.
एकदाचं फटफटलं ! बाहेर माणसांची जरा चाहूल जाणवायला लागली. पाऊस सुद्धा ओसरला. तसे भीत भीत आम्ही सगळे तो पडक्या भिंतींचा ढिगारा ओलांडून बाहेर मोकळ्या अंगणात आलो. एव्हाना आमचं घर पडल्याची बातमी आजूबाजूला पसरली. कोणीतरी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेलं. दिवस जरा वर आल्यावर आई वडील परत घराकडे गेले. घराच्या चारही बाजूच्या भिंती ढासळल्या होत्या. पण देवळीतला गणपती मात्र तसाच होता, सुरक्षित ! आईला त्याचंच खूप समाधान वाटलं.
त्यानंतर काही दिवस काकांच्या घरी राहिलो आम्ही. तोवर जुनं झालेलं हे पडकं घर पूर्णच पाडून सगळं पुन्हा नव्याने बांधायला घेतलं. ह्या सगळ्यात झालेलं कर्ज पुढचे अनेक पावसाळे पुरलं !
पण आज एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की त्या रात्री जर आम्ही आसरा घेतलेली खोली सुद्धा पडली असती तर ??? पण देवळीतला बाप्पा रात्रभर ती भिंत जणू धरून बसला होता आमच्यासाठी. रोज त्याच्यासमोर शुभंकरोती म्हणायचो न आम्ही, मग आमच्यासाठी तो एवढं तर नक्कीच करणार न !
आज इतक्या वर्षांनंतर बाहेर तस्साच पाऊस कोसळतोय ! लाईटही गेलेत. पण आता घरात इन्व्हर्टर आहे. काळोखाला इथे प्रवेशच नाही. भिंती मजबूत आहेत, ओल येतच नाही. फक्त शुभंकरोती तेवढी ऐकायला येत नाहीये. देवघरात इलेक्ट्रिकची समई चोवीस तास मिणमिणतेय, पण उदबत्ती मात्र लागतच नाही. धुराची ऍलर्जी आहे ! पूर्वीपेक्षा घर खूप भक्कम आहे आता, पण तरीसुद्धा काहीतरी ढासळलंय ! काहीतरी ढासळलंय !!

साभार : एका मित्राची डायरी
(इंटरनेट)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे काही लिहिलंय ते गुंतवून ठेवणारं आहे except last few lines of last para. त्या para मध्ये उपदेशावर गेल्याने आधीचा effect कमी होवून गेला.

माफ करा पण हे गरिबीच उदात्तीकरण होतंय का? कंदीला च्या काचे वरची काजळी सुद्धा ज्यांना खपत न्हवती, ते घर पडायला येईपर्यन्त का थांबले होते?
मला नेहमी वाटतं आपल्या ढिसाळ, un-enterprising मनोवृत्तीने मराठी समाज कायम मागे पडत राहिलाय!

<<< पण देवळीतला गणपती मात्र तसाच होता, सुरक्षित ! आईला त्याचंच खूप समाधान वाटलं. >>>
वा वा वा, जुने घर पडले त्याचे काय ते कौतुक.

<<< भिंती मजबूत आहेत, ओल येतच नाही. फक्त शुभंकरोती तेवढी ऐकायला येत नाहीये. >>>
घरात चोवीस तास गॅस आहे, पण आता आजीने चुलीवर केलेल्या भाकरीची चवच नाही, हे वाक्य राहिले मात्र.

असो, वर्णन मात्र खूप छान आहे, सगळे काही जणूकाही डोळ्यासमोर उभे राहिले.

पावसाचे, वादळाचे वर्णन, आईवडीलांची घालमेल छान मांडलेय! मात्र शेवटचा पॅरा सगळी मजा घालवतो.

समृद्धी, आधुनिक सुखसोयी आल्या आणि जुन्यातले चांगले गेले हे रडगाणे मलातरी झेपत नाही. पक्क्या घरात, इलेक्ट्रिक समईच्या प्रकाशात कृतज्ञतेने देवासमोर हात जोडणे होत नाही असे थोडेच आहे. चांगली मूल्यं ही गरीब घरात असतात आणि श्रीमंत घरात हरवतात हे गृहितकच हास्यास्पद ! श्रीमंती आल्यावर चांगली मूल्यं हरवत असतील तर मग दोष श्रीमंतीचा नाही तर ती पचवू न शकलेल्या व्यक्तीचा आहे. अजून एक म्हणजे चांगली मूल्यं महत्वाची, नुसती प्रतिकं नव्हे.

अश्विनी के आणि स्वाती२ यांच्याशी सहमत. शेवटचा परिच्छेद आधीचा सगळा प्रभाव घालवून टाकतोय.

काहीतरी ढासळलंय ! काहीतरी ढासळलंय !!>> उमर होगयी बाप तेरी. आपण हे स्थैर्य मेहनतीनेच मिळवलेले असते. उगीच गिल्टी वाटून घेउ नये.
अजूनहि कितीतरी कुटुंबे कधी पण पडू शकेल अश्या घरात राहात आहेत त्यांच्यासाठी काही करता आले तर बेस्ट.

मूळ लेखक/लेखिका कोण आहे? व्हाट्सप वर "संजीव सुळे" नाव आले आहे. प्रतिलिपी व इतर कुठे कुठे पण अनेकांनी पोष्ट केली आहे. असो ज्यांनी कुणी लिहिलेय खूप छान लिहिले आहे. शब्दांकन अप्रतिम लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. किंबहुना काळच तसा होता तो.

शाळेत असताना मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एखादा उतारा दिला जायचा आणि त्याखाली एक पश्न हमखास असायचा. उताऱ्यातले एखादे वाक्य देऊन "... असे लेखकाने का म्हटले आहे स्पष्ट करा" असे विचारले जायचे Happy इथे सुद्धा

"पूर्वीपेक्षा घर खूप भक्कम आहे आता, पण तरीसुद्धा काहीतरी ढासळलंय" असे लेखकाने का म्हटले आहे स्पष्ट करा.

असा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपले उत्तर शोधायचे आहे.

>>>> सामो जी आता नवीन घर पक्कं बांधलय पण जुनी नाती , जुनी माणसं हरवली आहेत ...>>> होय असेच वाटले मला पण अचानक ई नकारात्मकता का आली ते कळले नव्हते. शेवट बदलला तरी चालेल. वर्णन खूपच छान केलेले आहे मात्र.