आध्यात्मिक आणि धार्मिक पुस्तकांची लायब्ररी आहे का?

Submitted by कोहंसोहं१० on 11 October, 2019 - 11:00

आजच्या जगात सर्वच विषयांवर विपुल साहित्य पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. अध्यात्मिक किंवा धार्मिक विषय त्याला अपवाद नाहीत. आज मराठीतून किंवा हिंदी आणि इंग्रजीतून अध्यात्मिक विषयांवर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत (फक्त बुकगंगा वर या विषयाची ९००० च्या आसपास पुस्तके आहेत). अध्यात्मिक आणि धार्मिक पुस्तके वाचण्याचा छंद असल्यास (खास करून जेष्ठ नागरिकांसाठी) आवडीच्या विषयातील पुस्तक निवडण्यापासून ते विकत घेऊन वाचण्यापर्यंतचा प्रवास खुप मोठा असतो. तसेच आर्थिक मर्यादांमुळे सर्वच पुस्तके विकत घेऊन वाचता येत नाहीत. लायब्ररीत अनेक पुस्तके असतात परंतु अध्यात्मिक विषयांवरील पुस्तके इतर पुस्तकांच्या मानाने अत्यंत कमी असतात.
माझा प्रश्न असा आहे की अशी कोणती लायब्ररी आहे का जिथे केवळ अथवा प्रामुख्याने अध्यात्मिक, धार्मिक विषयांवरील पुस्तके वाचावयास मिळतील? पुण्यात किंवा पुण्याहून जवळच असल्यास उत्तम.
माहिती असल्यास कृपया सांगावे.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो-१७ वर्षांपूर्वी, घाटकोपर (पू) ला सार्वजनिक ग्रंथालय होते ज्यात खच्चून जुनी जुनी धार्मिक पुस्तके होती ब्वॉ!!
_______________
अवांतर - घाटकोपरला, रस्त्यावरती पथारी पसरुन एक फाटका उ. प्रदेशीय माणुस काही लहान लहान देवी प्रेस वगैरे ची पुस्तके विकत होता. त्याच्याकडे हनुमान चालीसा विकत घेतलेली. काहीतरी अडीच रुपयात. पण अगदीच फाटका, गरीब होता, बिचारा सचोटीने व्यवसाय करत होता. अजुनही आठवलं की गळ्यात, आवंढा येतो. कुठुन कुठुन येतात, धडपडतात.

पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित भया न कोए |
ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होए ||

खरच कशाला पुस्तके वाचता वा शोधता. सर्मथांचे मना-सज्जना घ्या व त्यावर अंमलबजावनी करायला सुरवात करा.

आई ग्ग!!! मनाचे श्लोक फार छान आहेत. शेवट शेवटचे , श्लोक मात्र जड जातात पण पहीले १५०-१७० पर्यंत नीट समजतात. एक दासबोध वाचलेला नाही तो वाचला पाहीजे.

दासबोध खूपच मस्त आहे. समर्थांचे सर्वच साहित्य अप्रतिम. मला सर्वात जास्त आवडलेले म्हणजे आत्माराम. त्यांचे कदाचित एकमेव अद्वैतवादी साहित्य.

बाकी पुस्तकांचे म्हणाल तर धार्मिक पुस्तके ही अध्यात्मिक वाटचालीचे स्फुल्लिंग धगधगत ठेवण्यास मदत करतात. नाहीतर या संसाररूपी पावसामध्ये आध्यात्मिक वाटचालीची पेटलेली काडी कधी विझून जाईल हे कळतसुद्धा नाही. शास्त्रामध्ये सांगितलेल्या श्रवण, मनन, आणि निदिध्यास यापैकी गुरुचरणी बसून श्रवण करणे हे आजच्या काळात खूप अवघड आहे. परंतु पुस्तके ते काम चोखपणे बजावतात. त्यामुळे साधनेबरोबर पुस्तके पण हवीतच.

आत्माराम? पहाते कुठे मिळाले तर.
>>>>>>>>> संसाररूपी पावसामध्ये आध्यात्मिक वाटचालीची पेटलेली काडी कधी विझून जाईल हे कळतसुद्धा नाही. >>>>>>>> सत्य!!
___________
मिळालं- https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A...(%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4)

>> संसाररूपी पावसामध्ये आध्यात्मिक वाटचालीची पेटलेली काडी कधी विझून जाईल हे कळतसुद्धा नाही.
मान्य . बरोबर बोललात. हा मुद्दा माझ्या लक्षात नाही आला.

पावसाळ्यात काडेपेटी सर्द होते माहीत आहे. काडी ठुस्स आवाज करून पेटत नाही हे आता अध्यात्मिक उदाहरण नवीन आहे. म्हणूनच संपूर्ण चातुर्मास पुस्तक पारायण करत असावेत.
उसगावात राहणाऱ्या लेखकाच्या पुण्यातल्या नातेवाईकासाठी हे वाचनालय हवे असणार. महानगरपालिकेच्या वाचनालयात अशी पुस्तके मिळण्याची शक्यता अधिक.
( दादर, ठाणे, गिरगाव,नाशिक इथे राहणाऱ्यांना असा प्रश्न कधीच पडत नव्हता.))

आध्यात्मिक आणि धार्मिक पुस्तके लायब्ररीतून आणून वाचणं योग्य आहे का? ज्या कारणांसाठी ही पुस्तकं वाचली जातात त्यात पावित्र्याला विशेष महत्त्व असतं. (आमच्या ब्रह्मविद्येच्या क्लासांत तुमचे पाठ इतर कोणाला वाचायला देऊ नका असं सांगितलं होतं. त्याचं काहीतर आ ध्यात्मिक टाइप् कारणही सांगितलं होतं. व्यावहारिक कारण अधिकाधिक लोकांनी क्लासेस जॉइन करावेत, हे असू शकेल जे सांगितलं नव्हतं.)
शिवाय आध्यात्मिक धार्मिक पुस्तके काही कथा कादंबर्‍यांसारखी वाचायची नसतात, त्यामुळे भारंभार पुस्तकांची गरज असते का? एकावेळी अशी किती पुस्तके वाचली जाणार आहेत?

ही पुस्तके विरंगुळा, अभ्यास , कुतूहल म्हणून वाचायची असल्यास अर्थातच वरचा मजकूर लागू नाही.

आध्यात्मिक आणि धार्मिक पुस्तके लायब्ररीतून आणून वाचणं योग्य आहे का? ---> यात अयोग्य काय आहे हे नाही समजले. धार्मिक पुस्तके लायब्ररीतून आणून वाचू नये असे कोणी सांगितले आहे का?
ज्या कारणांसाठी ही पुस्तकं वाचली जातात त्यात पावित्र्याला विशेष महत्त्व असतं ---> पावित्र्य हे प्रामुख्याने मनाने पाळायचे असते त्यात पुस्तक कोठून आणले याला फारसे महत्व नसावे. उदाहरणार्थ नवरात्री मध्ये मला देवीचे व्रत करायचे असेल तर पावित्र्य व्रत पाळण्याचे असावे. ना की व्रताची माहिती देणारे पुस्तक कोठून आणले याचे.
आमच्या ब्रह्मविद्येच्या क्लासांत तुमचे पाठ इतर कोणाला वाचायला देऊ नका असं सांगितलं होतं---> हे मलाही मान्य आहे. पण हे फक्त साधनेच्या विशिष्ट पद्धतींबाबत लागू आहे. असे ज्ञान गुरूकडूनच घ्यावे असा प्रघात आहे. परंतु बर्याचश्या धार्मिक आणि अध्यात्मिक पुस्तकांमध्ये कोणतीही साधनपद्धती अतिशय डिटेल मध्ये दिलेली नसते. त्याऐवजी जे ज्ञान जनसामान्यात सहजपणे दिले जाऊ शकते अशी माहिती पुस्तकातून मिळते.
शिवाय आध्यात्मिक धार्मिक पुस्तके काही कथा कादंबर्‍यांसारखी वाचायची नसतात, त्यामुळे भारंभार पुस्तकांची गरज असते का?---> लायब्ररीची गरज हे भारंभार पुस्तके वाचण्यासाठी नसून विपुल अश्या उपलब्ध साहित्यामधून आपल्याला जे भावेल, आवडेल, किंवा माहिती करून घेण्याची इच्छा असेल ते निवडण्यासाठी आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास भग्वदगीतेचा अनुवाद असलेली शेकडो पुस्तके आज उपलब्ध आहेत. परंतु त्यातील कोणते वाचावे हे निवडण्याचे स्वातंत्र्य लायब्ररीमधून नक्की मिळेल. अनेकदा काही पुस्तके एका विशिष्ठ काळासाठीच लागणारी असतात त्यामुळे ती पुस्तके विकत घेण्याऐवजी लायब्ररीतुन आणली तर सोपे पडते. उदाहरणार्थ व्रते, अनुष्ठाने, होम, सत्यनारायण पूजा यांवरची पुस्तके.
आवडलेले एखादे पुस्तक संग्रही ठेवावे असे वाटल्यास विकत घेण्याचा पर्याय असतोच.

अध्यात्मिक म्हणजे तीन प्रकार वाटतात मला. पहिल्यात धार्मिक व्रत/पारायणाची पुस्तके येतात. दुसऱ्यात विविध संतांचे प्रसंग-त्यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांचे अनुभव उदा - योगानंदांचे योग्याचे आत्मचरित्र आणि तिसऱ्यात विविध अध्यात्मिक गोष्टींवर चिंतनात्मक पुस्तके उदा- Towards the Silver Crests of the Himalayas by G.K. Pradhan. मला वाटतं तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारची पुस्तके अभिप्रेत आहेत इथे. तिसऱ्या प्रकारची पुस्तके वाचायला बोजड असतात पण तीच जास्त कामाची असतात.
लायब्ररी विचारण्यापेक्षा तुम्ही अश्या पुस्तकांच्या नावाची शिफारस विचारली असती तर बरीच नावे देता आली असती.
तुम्ही अमेरिकेत असताना इथे काय उपयोग लायब्ररीचा?