निनावी कथा

Submitted by मी मधुरा on 11 October, 2019 - 02:27

सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग निवांतपणे ती टिव्ही लावून बसली. बातम्यांवर नेहमीचे राजकारणी पडसाद उमटत होते. या अश्या बातम्या सुरु झाल्या की तिला जबरदस्त कंटाळा येत असे. काही तरी सोबत राहिलं म्हणून तिने रेडिओ असल्यासारखा बाजूला टीव्ही चालूच राहू दिला आणि मघाशीच्या शोधाशोध सत्रात पसरलेले घर आवरण्याचा प्रपंच सुरू केला. सर्दीकरता काढलेल्या टॅब्लेटसची स्ट्रीप आवरताना तिला माईची आठवण आली. आज माई इथे असती तर नक्की म्हणाली असती, 'अगं शिंकल्यावर माणसाने घराबाहेर पडू नये. सांग सुशांताला.... आज बुट्टी मारायला.' आणि मगं महाराजही दिवसभर घरात गेम खेळत बसले असते. अनुराधा स्वतःशीच हसली.
किचन मध्ये जाऊन तिने ओटा आवरला. कढई घासायला टाकताना तिला सुशांतची आठवण आली. आज त्याच्या आवडीची भाजी केलीये..... काही वेळात फोन वाजेल..... 'मॉमा, यु आर ग्रेट!' ती विचारांनीच आनंदली.
दोन वादळांनी विस्कटलेले घर तिने पुर्ववत केले आणि दमून घड्याळाकडे नजर टाकली. नेहमी प्रमाणे १ वाजला होता.
तिने चहा बनवला आणि पुन्हा टीव्ही पुढे येऊन बसली.
ही खरतर जेवणाची वेळ, पण दमल्यावर रिफ्रेश व्हायला चहाच हवा.
तिने दोन घुटके घेतले असतील-नसतील, टिव्हीतल्या बातम्यांनी एकदम आक्रमक पवित्रा घेतला. ब्रेकिंग न्युज नाव आलं आणि तिने चॅनल बदलला. उठ सुट राजकारणी लोकांनी काय खाल्ले, काय प्यायले, कशाचे उद्घाटन केले ते ब्रेकिंग न्युज म्हणून दाखवणार.... दुसरं काय? सिरियल बऱ्या त्यापेक्षा!
हे काय सुशांत त्याची कोकम सरबताची बाटली घरीच विसरून गेला होता.
"हॅलो, सुशांत."
"मॉमा? मी कॅंटीन मध्ये आहे. नंतर बोलतो."
"ऐक सुशांत...."
"बिप.... बिप.. बिप"
______________
गावातल्या कौलारू घरात अनुच्या सासूबाई मात्र बातम्यांचा चॅनल लावून बसल्या होत्या. बातम्या राजकारणी असोत वा अजून कसल्या, त्यांना कडेला बडबडणारा टीव्ही असला की कामाला बळ मिळत असे.
'ब्रेकिंग न्युज! ब्रेकिंग न्युज! ब्रेकिंग न्युज! आत्ताचं सुत्रांकडून मिळालेल्या बातमी नुसार D.L.P पब्लिक स्कूल ॲंड कॉलेजच्या मुख्य इमारती मध्ये काही आतंकवादी घुसलेले असून लहान विद्यार्थ्यांपासून कॉलेज वयीन तरूण आणि त्यांचे टीचर्स सुद्धा आतच असल्याचे कळलेले आहे........'
मीटिंग करता निरज क्लाएंट ऑफिस कडे निघाला आणि निरजचा फोन वाजला.
"हा आई बोल."
"निरज.... हॅलो... हॅलो..."
"हा बोल ना मी ऐकतोय."
"निरज, अरे... बातमी..... न्युज चॅनल..... सुशांत...."
"काय झालंय आई? जरा नीट सांगशील का?"
"अरे, सुशांतच्या कॉलेज मध्ये आतंकवादी घुसलेत."
"काहीही काय आई? ही असली थट्टा करण्याची वेळ आहे का?"
"निरज, थट्टा करत नाहीये मी." ती किंचाळलीच जवळ जवळ.
"काय? एकं-एकं मिनिटं."
त्याने लगबगीने कारमधला रेडिओ ऑन केला.
'आतंकवाद्यांनी DLP वर कब्जा केलेला असून बाहेरचा संपर्क पूर्णत: तोडलेला आहे. आणि आत्ताच मिळालेल्या अपडेट नुसार सिक्युरिटी गार्डस् च्या डेडबॉडिज मेन गेटवर टांगल्याचे हृदयाचा थरकाप उडवणारे फोटो तिथे बाहेर जमलेल्या लोकांकडून मिळालेले आहेत. DLP च्या आसपासचा एरिया मोकळा करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आलेली आहे. आतंकवादी गन्सपेक्षाही भयावह वेपन्ससह आलेले असण्याची दाट शक्यता नोंदवली जात आहे. सरकारने आतंकवाद्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची तयारी दाखवलेली असतानाही अद्याप आतंकवाद्यांकडून काहीही उत्तर आलेले नाहीये.'
"आई... मी नंतर बोलतो....... मी लगेच.... आत्ताच जातोय तिकडे.... मी... मी.... जाताना म्हात्रेलाही कॉल करतो."
"बिप.... बिप.... बिप..."
_______________
"म्हात्रे.... लगेच आत्ताच्या आत्ता सुशांतच्या कॉलेजवर जा आणि ऐक, निघताना अख्ख पोलिसदल घे सोबत. लगेच.... लगेच पोच तिकडे."
"ऐक निरज, कूल डाऊन."
"अरे कुल डाऊन काय! तुला माहितीये टेरिरिस्ट....."
"हो, माहितीये मला. पण रेस्क्यु करता सैन्यही पोचलंय तिकडे."
"मला सांग, तू कुठे आहेस? मी पिक करतो तुला."
"अरे, आमची ड्युटी नाकाबंदी वर आहे."
"आत्ता तुझा पुतण्या महत्वाचा आहे की ड्युटी?"
"तू चिडू नकोस, निरज.....प्लिज ट्राय टू अंडरस्टॅंड. मलाही सुशांतची चिंता आहे. पण तिथे आम्ही काहीही करू शकत नाही. सैन्याच्या हाती दिलंय ना सगळं. विश्वास ठेव. ते सगळं काम नीट करतील."
"आणि तुझं सरकार करू देणारेय सैन्याला काम?"
"हे बघ, निरज.....हॅलो.... हॅलो निरज.... हॅलो?"
"बिप... बिप... बिप"
_____________
अनुराधाचे मोबाईल कडे लक्ष गेले तेव्हा तो व्हायब्रेट होत होता.
"हॅलो सुशांत."
"मॉमा...."
"बोला.... कशी वाटली भाजी? आवडली ना?"
"हो मॉमा, खूप आवडली..... तू खूप छान बनवतेस स्वयपाक. U R really great!"
"हम्म..... मग ? कोणाची मॉमा आहे मी..... सुशांतची! ग्रेट असणारचं ना? पण तू एव्हड्या कुजबुजत्या आवाजात का बोलतो आहेस? लेक्चर तर सुरु नाहीये ना? किती वेळा सांगितलंय रे.... लेक्चर सुरू असताना...."
"मी वॉशरूममध्ये आहे."
"काय? कसला विक्षिप्त आहेस. तिथून का केलायस फोन? घाणेरडा कुठला!"
"नाही.... म्हणजे मी लपायला आलो होतो इकडे."
"का रे? पुन्हा निकी मागे लागली की काय?"
"नाही. आता कधीच मागे नाही लागणार ती."
"मग कोणापासून लपलायंस?"
"मॉमा, माझं ऐक ना..... "
"बोल....."
"आय लव यू सो मच, मॉमा!"
"सुशांत? काय झालंय शोन्या? मधेच काय....."
"मॉमा, तुला मला एक सांगायचं होतं..... पण प्रोमिस करं तू बाबाला ओरडणार नाहीस."
"असं काय सांगणारेस?"
"ती फ्रीजमध्ये बाटली आहे ना....."
"हो.... कोकम सरबताची ना? विसरून गेला होतास तू आज."
"ती माझी नाही बाबाची आहे. आणि...... ते कोकम सरबत नाहीये."
"मग रे?"
"आधी प्रॉमिस करं."
"नाही रे ओरडत तुझ्या बाबाला. बोल आता."
"त्या बाटलीत रेड वाईन आहे."
"अरे देवा! तरीच म्हणलं हे असं तयार कोकम सरबत अश्या विचित्र बाटलीत विकायला कधीपासून आलं बाजारात! या तुम्ही दोघं घरी. बघतेच एकेकाला!"
"आय विश मॉमा.... आय विश तसं होऊ शकेल......"
"व्हाट? आर यु मेकिंग फन ऑफ मी?"
"नो मॉमा..... नॉट ॲट ऑल!"
___________________
'मिळालेल्या ताज्या बातमी नुसार कुख्यात पाकिस्तानी टेररिस्ट इम्तियाजला सोडवण्याची मागणी आतंकवाद्यांनी केली असून, D.L.P कॉलेज त्याचकरता ओलिस ठेवलेले आहे.
यावर आपण xyz पक्षाचे मंत्री ताळेंचे मत ऐकणार आहोत. नमस्कार ताळे साहेब.... तुम्हाला काय वाटते?
मला वाटते की एका विशिष्ट धर्मावर आतंकवाद नावाची शिक्केबाजी नाही झाली पाहिजे. आपण सर्व धर्म समान मानतो आणि म्हणून हा देश सेक्युलर आहे. त्यामुळे सतत पाकिस्तानी वगैरे उल्लेख करून आपण आपल्या देशातल्याच त्या विशिष्ट समाजाकडे बोट दाखवून त्यांना दुखावतो आहोत का, याचा विचार झाला पाहिजे. आणि आपापसातले वैर वाढवायला नको याची काळजी घेतली गेली पाहिजे.'
निरजने चिडून रेडिओ बंद केला. तितक्यात पुढे नाकाबंदी दिसली. गाडी थांबवली गेली. निरजने म्हात्रेला पाहून हाक दिली.
"म्हात्रे!"
"निरज...."
"म्हात्रे माझी गाडी लवकर सोडायला सांग."
"निरज, काही वेळापुर्वीच खबर आलीये की बंदुक चालवण्याचे आवाज आलेत तिथून."
"काय? सोड लवकर माझी गाडी म्हात्रे."
"आय ॲम सॉरी निरज. आय कान्ट."
"व्हॉट? व्हॉट द हेल आर यू टॉकिंग? स्वतः जात नाहीयेस तिकडे आणि आता मलाही जाऊ देत नाहीयेस?"
"निरज, त्या जागेवर जाणारे सगळे रस्ते बंद करण्याच्या ऑर्डरस् आल्यायत वरून आत्ताच. ॲंड इट्स टू मच रिस्की अल्सो. आय कान्ट लेट यू गो."
"म्हात्रे...."
"निरज, ओरडून काही फायदा होणार नाहीये. मी नाही सोडू शकत तुला."
"मी बघतोच कसा अडवतोस तू मला ते!" नीरज कार मधून उतरला आणि बॅरियर मधून वाट काढत कॉलेजच्या दिशेने धावू लागला.
"कॅच हिम."
निरजला पकडून हवालदारांनी म्हात्रेसमोर आणून धरून ठेवले.
"म्हात्रे..... प्लिज. आय नो आपलं ब्लड रिलेशन नाही. पण मित्र आहेस ना तू माझा?" निरज ने हवालदारांच्या हाताला हिसके देत सुटण्याचा प्रयत्न केला.
"हो मित्रा आणि म्हणूनच मला काळजी आहे तुझी."
"आणि माझ्या मुलाची?"
म्हात्रेने काहीही न बोलता निरजकडे असहाय्यपणे पाहिले.
"म्हात्रे, हे बघ.... मी नंतर जेल मध्ये गेलो तरी बेहत्तर. पण आत्ता कायदा महत्त्वाचा नाहीये. माझा सुशांत अडकलाय तिकडे. त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. सोड मला. मला जायचंय तिकडे."
त्याने उसळी खात पुन्हा झटापट करत सोडवून घेण्याचा प्रयत्न केला.
"निरज.... तू काय करणारेस तिकडे जाऊन?"
"म्हणजे?"
"तिकडे गन्स आणि बॉंब असतात त्यांच्याकडे. तू आयुष्यात पाहिली नसतील इतकी भयानक वेपनअसतात. कळतंय का तुला?"
"......"
निरज कडे उत्तर नव्हतं. आपण असमर्थ, असहाय्य आहोत हे जाणले आणि तो पूर्णपणे खचला. त्याचा प्रतिकार थांबला. ढासळल्यासारखा तो रस्त्यावरच बसला.
"माझा सुशांत, म्हात्रे.... माझा सुशांत!" सगळं भान सोडून तो जोरजोरात रडू लागला. डोळे सुजून लाल होईपर्यंत तो रडतचं राहिला. म्हात्रे त्याला थोपटत होता. डोळे शुष्क बनले आणि त्याचा निष्प्राण चेहरा पाहून म्हात्रेला कसंनुसं झालं.
"वहिनींना कळवलंस हे?"
त्याने मानेनेच नकार दिला.
"मी कळवू? की..... तू कळवतोस?"
निरजचा घसा पार सुकून गेला होता. त्याने मोबाईल काढला आणि लास्ट डायल्ड लिस्ट मधून अनु नावावर क्लिक मारली.
"एंगेज येतोय...."
"नीरज, तू खंबीर रहा. ए दिन्या, जरा पिण्याचं पाणी दे रे इकडे!"
___________________
"सुशांत, तुझं नक्की काय सुरु आहे आज? मला कळेल का तू नक्की कोणापासून लपला आहेस आणि अश्या कुजबुजत्या आवाजात का बोलतो आहेस ते?"
"मॉमा, माझं तुझ्यावर आणि बाबावर खूप..... खूप जास्त प्रेम आहे. मी सांगितलं नसेल कदाचित.... पण कायम होतं. आधीपासूनच होतं. तुम्ही दोघे माझे एंजल आहात. तुम्ही कायम माझी खूप काळजी घेतलीत. आता एकमेकांची पण घ्यालं ना?"
"सुशांत.... सुशांत काय चालू आहे तिकडे? मला सांगशील का?"
"मॉमा..... मॉमा..... आय लव यू, मॉमा!"
मागून कसलेसे आवाज येऊ लागले. आधी दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मग अजून कसलासा आवाज येऊ आला. बुटांचा असावा. पावले जवळ आली तसा बुटांच्या टापांचा आवाज स्पष्टपणे कानावर पडला. आणि मग ऐकू आला एक कर्णकर्कश्श आवाज.... मनाचा थरकाप उडवणारा...... एक अस्फुटशी किंकाळी!
"हॅलो.... हॅलो सुशांत.... सुशांत.....काय सुरुये तिकडे? मला भिती वाटतेय हं आता..... काय सुरुये तिकडे सुशांत? हॅलो......"
"बिप.....बिप....बिप...."
_____________

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Oh god Sad

भारी लिहिलं आहे ... आतापर्यंत तुमचं सगळ्यात आवडलेलं लेखन .. ओरिजिनल शैली .. ते मॉमा ऐवजी ममा किंवा मॉम अधिक चांगलं वाटलं असतं ..

छान लिहिलीय ! पण नाव का नाही? बिपबिप हि चाललं असतं ... अश्यावेळी बिपबिप खूप जीवघेणा असतो.
मोठ्या कथा वाचायला वेळ नाही ... म्हणून वाचल्या नाहीत अजून...

धन्यवाद मानसी. Happy
मलाही 'बिप.... बिप.... बिप....' असेच काहीसे नाव द्यावे असे वाटत होते. पण का काय माहिती, याही कथेला नाव द्यावेसे वाटले नाही.

धन्यवाद पद्म! Happy

अंकु, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy