आमच्या पिढीचं अर्धवट राहिलेलं (लैंगिक) शिक्षण.

Submitted by Charudutt Ramti... on 8 October, 2019 - 14:36

साधारण अर्धा पाऊण किलो शेंगदाणे सहज मावतील एवढ्या आकाराची एक काचेची बरणी आहे. त्यात एक रसरशीत लाल चुटुक कांतीचा पूर्ण पिकलेला टोमॅटो टाकला जात आहे. मग त्या बरणी वर फिरकीचे झाकण घट्ट लावून बरणी बंद केली जाते. परंतु झाकण बंद केल्यानंतर विशेष असे काहीही घडत नाही. मध्ये दोन क्षणांचा अवधी. मग आणखी एक दुसरा लालचुटुक टोमॅटो बरणीत टाकला जातो. आणि बरणी चे फिरकी लावून बसवण्याचे झाकण पुन्हा एकदा फिरवून बरणी परत घट्ट बंद केली जाते. परंतु तरीही उल्लेखनीय असे काहीच घडत नाही. परत ते बंद केलेले फिरकीचे झाकण उघडून तिसरा टोमॅटो बरणीत टाकला जातो. आणि मग परत एकदा फिरकीचे झाकण फिरवून ती बरणी बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या वेळी मात्र मधल्या टोमॅटोचे भरीत होते आणि दोन टोमॅटोच्या बरोब्बर मधला टोमॅटो - तो टोमॅटो मात्र पिचला जातो. सुरुवातीला प्लँचेट सारखी काहीतरी ब्लॅक मॅजिक असावी असं वाटणारी ही समाज कल्याण खात्याची एक जाहिरात आहे.

आणि पिचलेल्या टोमॅटो च्या दृष्या नंतर मात्र अमीन सयानीचा जसा अगदी खर्ज खोल आणि धीर गंभीर असा आवाज आहे तश्या तश्याच खोल आणि खर्ज आवाजात एक पंचलाईन म्हंटली जाते - 'एक या - दो - बस्स्स ! ' .

आमच्या पिढीला (आमच्या पिढीला म्हणजे, सत्तरी च्या दशकात जन्माला आलेल्या आणि सध्या साधारण चाळीशीत असलेल्या पिढीला) उभ्या आयुष्यात काही औपचारिक रित्या असं लैंगिक शिक्षण जर काही मिळालं असेल तर ते ह्या समाज कल्याण खात्याच्या दूरदर्शन वाहिनीवर मोफत दाखवल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजनाच्या ह्या व तत्सम अश्या इतर जाहिरातीतूनच. दुर्दैवानं माझं वय त्यावेळी जेमतेम दहा ते अकरा वर्षे असेल. त्यामुळे, मला ‘ही’ जाहिरात पाहताना, त्या माझ्या अपरिपक्व वयानुसार काहीसे निरागस परंतु तरीही अगदी मूलभूत असे प्रश्न पडायचे. पुढे सुद्धा जेंव्हा केंव्हा ही वैशिष्ट्यपूर्ण जाहिरात माझ्या डोळ्यासमोर आली तरी आज सुद्धा (वयांनुसार) काही पोक्त प्रश्न अजूनही मला आवर्जून ह्या अर्ध्या मिनिटाच्या जाहिराती विषयी पडतात. उदाहरणार्थ :

१. लोणचे , भरल्या मिरच्या , हळद, तिखटाची पावडर वगैरे ठीक आहे पण काचेच्या बरणीत टोमॅटो ठेवून वरती झाकण घट्ट फिरवून बसवण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत , भारतातील नक्की कोणत्या आर्थिक आणि सामाजिक स्तरात अस्तित्वात होती ?

२. त्या जाहिरातीत, विशेष करून “मधला” टोमॅटो पार पिचून जायचा. जाहिरातीतील टोमॅटोचे बारिणीतले अस्तित्व हे जरी केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचे असले तरी, फक्त मधलाच टोमॅटो अधिक पिचलेला दाखवण्या मागे सुद्धा काही सूचकता होती काय ?

३. पंढरपुरी चुरमुरे किंवा भडंग वगैरे असते तर मऊ पडेल म्हणून एकवेळ समजू शकते पण समजा इच्छा असो नसो जर एखाद्याच्या पदरात तिसरा टोमॅटो पडलाच, तर मग बरणीचे झाकण “घट्ट” लावायचा “हट्ट” कशासाठी ? बरणी तशीच राहू दिली असती तर काही बिघडले असते काय ?

४. दोनंच (पोरं) पुरे हा संदेश देणारी बरणी आणि टोमॅटोच्या सरकारी जाहिराती विरोधात कुणी , भाजी ठेवण्यासाठी साठी बाजारात “बोरं” विकत मिळतात तसली लाल तांबूस रंगाची जाळीची नायलॉन ची प्रसरण पावणारी जाळी वापरण्याचा सल्ला सरकार जनतेस का नाही देत? असा प्रतिप्रश्न उत्तरप्रदेशातील लालू प्रसाद यादव वगैरेंच्या च्या एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याने का नाही केला?

५. देशात त्या वेळी कुटुंब नियोजना बरोबरंच आणखी एक प्रचंड विस्तार असलेलं प्रौढ साक्षरता अभियान चालवलं जायचं. जर आपल्या समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणावर निरक्षरता पसरली असेल तर टोमॅटो बरणी वगैरे एवढी दर्जेदार वाङ्मयीन सूचकता ( रिडींग बिटवीन द लाईन्स म्हणतात तसली ) निरक्षर समाजापर्यंत पोहोचली असेल काय ?

ह्या जाहिराती विषयी माझ्या मनात असे अजूनही बरेच गंभीर प्रश्न आहेत. परंतु आजच्या लेखाचा विषय तो नाही. आजच्या लेखाचा मूळ विषय आहे "लैंगिक शिक्षणा अभावी झालेली आमच्या पिढीची फरफट" ह्या विषयाच्या अनुषंगाने ही जाहिरात आठवली. कारण आज माझ्यासकट चाळीशीत पदार्पण केलेलली पिढी जी सुखं सध्या गृहस्थाश्रमात 'उपभोगत' (किंवा जे दुःख भोगत) आहे, त्या पिढीला लैंगिक शिक्षण मिळण्याचा ( किंवा मिळवण्याचा ) एकमेव मार्ग म्हणजे ह्या अश्या कुटुंब नियोजनाच्या सरकारी जाहिराती. पण दुर्दैवानं आमचं वय तेंव्हा अवघे दहा अकरा असल्यामुळं त्या जाहिरातींचा गर्भितार्थच आम्हाला समजत नसे आणि आम्ही बापुडे निरागस पणे त्या जाहिरातींचे "शब्दश:" अर्थ घेत असू. म्हणजेच साहेबाच्या भाषेत “कॉन्टेस्ट ऍट देअर फेस व्हॅल्यू”.

पण जशी जशी एक दोन वर्ष पुढं गेली आणि वय दहा अकरा जाऊन तेरा चौदा च्या घरात आलं तेंव्हा आम्हाला आमच्या अर्धवट वयानुसार ह्या कुटुंब नियोजनाच्या जाहिरातींचे (अर्धवट) अर्थ समजू लागले. दुर्दवाने त्याच वेळी ह्या टोमॅटोतल्या बरणी आणि " अरी पगली, ये माला डी तेरी गोली नही सहेली है । " ह्या असल्या सूचक आणि सौम्य जाहिरातींच्या बरोबरंच नेमका दूरदर्शन वर 'कबीर बेदी' नावाचा एक अतीरेकी मनोवृत्तीचा बिनधोक (आणि आमच्या घरातील गृहिणींच्या मते - निर्लज्ज ) असा दूरदर्शन वर एक समाज सुधारक होऊन गेला. तो समोर बसलेल्या आया बहिणींची वगैरे कुणाचीही तमा न बाळगता सूचकता वगैरे गोष्टींना बगलदेऊन ह्या विषयीच्या जाहिरात “डायरेक्ट” पद्धतीने करू लागला.

आणि मग आमची म्हणजे पौगंडावस्थेत नुकतेच पदार्पण केलेल्या पिढीची पंचाईत व्हायला लागली. त्यावेळी टीव्ही हा आजच्या मोबाईल सारखा करमणुकीचे वैयक्तिक असे माध्यम अजिबात नव्हते. उलट ते घरात सहकुटुंब आणि इष्ट मित्र मैत्रिणींच्या समवेत एकत्र बसून पाहायचे शिक्षणाचे आणि समाज प्रबोधनाचे साधन होते. घरातल्या बाया, हा दाढीवाला कबीर बेदी काळा जोधपुरी घालून निर्लज्ज पणे जाहिरात करायला पुढे सरसावला की "आग्ग्गो बाई दूध उतू गेलं वाटतं , असं काहीतरी खोट्ट् नाट्ट् कारण शोधून स्वयंपाक घरात पळायच्या". घरातील एक दोन पुरुष मंडळी सुद्धा ही कबीर बेदीची समाज कल्याण ची जाहिरात सुरु झाली की आपल्या स्वतःच्या "चेहऱ्याच्या" आणि "टीव्हीच्या पडद्यामध्ये" (लग्नात मुलीच्या मामानं वधू वरांच्या मधोमध अंतरपाट धरावा त्या पद्धतीने) हातातला घडी केलेल्या 'सकाळ', 'लोकमत', अथवा 'पुढारी' इत्यादी वर्तमान पत्राचं संपादकीय पान समोर दिसतंय ते दिसू नये ह्यासाठी 'डोळ्यावर कातडं ओढव' तसं डोळ्यासमोर धरत आणि "मी तर टीव्ही पहातंच नाहीये" असं भासवायचा प्रयत्न ही घरातली ज्येष्ठ पुरुष मंडळी करत असंत.

त्यामुळे घरात अश्या वेळी खरी पंचाईत व्हायची ती आमच्या सारख्या पौगंडावस्थेतील बापुडवाण्या मुलांची. आजच्या सारखे एकतर टीव्ही ला रिमोट नव्हते बसल्या जागी पटकन चॅनेल बदलायला. अहो रिमोटच काय चॅनेलच नव्हते बदलायला. एकमेव चॅनेल दूरदर्शन - सोमवारी संध्याकाळी सहा वाजता हमखास लागणाऱ्या ‘किलबिल’ पासून ते कधीही कुठल्याही वेळी अचानक धूमकेतू सारख्या टपकणाऱ्या कबीर बेदी च्या जाहिराती पर्यंतपर्यंत, सगळे एकाच चॅनेल वर पाहायला लागायचे , तुम्हाला आवडो न आवडो. अशी अगदी मोनोपॉली होती ह्या दूरदर्शन ची आणि प्रेक्षकांची मात्र दुर्दशा !. मग ही पोरं दूरदर्शन वर ह्या (संत) कबीर बेदीची ही अश्लील जाहिरात (खरं तर त्या जाहिरातीत अश्लील असं काहीच नव्हतं , नव्हतं म्हणजे नसावं) डोळ्याची पापणीसुद्धा न लवता एक टक पाहताहेत असं दिसल्यावर कुणी तरी घरातील ज्येष्ठ आणि खाष्ट चुलत आत्या आज्जी यायची आणि एखाद्याच्या पाठीत रप्प किन धप्पाटा घालायची , "मेल्यांनो अभ्यासाला बसा , नुसता टीव्ही बघताय दोन तास झाले उठा जरा देवासमोर म्हणणं म्हणा तिन्ही सांजेचं आणि पाढे पाठ करायला घ्या , कार्टी सोकावलीत नुसती " असं म्हणत एकाच्या पाठीत पडलेल्या धपाट्याच्या जोरदार आवाजानं आजूबाजूला बसलेले बारा ते सोळा ह्या वयोगटातले कबीर बेदीचे सात आठ अनुयायी अर्ध्या मिनिटात हॉल मधून गायब व्हायचे. नंतर मग सगळ्यांना एकंच प्रश्न पडायचा " पण कबीर बेदीच्या ह्या ‘निरोध’ ला ह्या आत्या आजीचा एवढा ‘विरोध’ का ? " पण आत्या आज्जीचं हे असं आमच्या पौगंडावस्थेतील मुलांशी असं फटकळ वागणं सुद्धा काही चुकीचं होतं असं नाही. ती तरी काय करणार. आमच्या आत्या आज्जीचे मिस्टर तिच्या पदरात आठ अपत्य टाकून स्वतः वयाच्या पन्नाशीत वैकुंठ वासी झाले होते. कबीर बेदींवर तिचा राग ह्या ‘पोटी’ असावा, पण तिच्या पोटी आठ अपत्य आली ह्यात त्या बिचाऱ्या कबीर बेदींचा काय दोष ? पण वाईटातून चांगलं हे की , आत्या आज्जीचे मिस्टर ऐन पन्नाशीत का होईना पण गेले. नाहीतर त्यांनी आठव्याच्या पाठीवर अजून किमान दोन तीन बालगणेश तरी नक्की आणले असते ह्या धर्तीवर आत्याच्या उदरातून.

आम्हाला नागरिक शास्त्रात लोकशाहीचा महाविस्फोट नावाचा एक परिच्छेद होता, पाच मार्कांना सोडवायला प्रश्न यायचा वार्षिक परीक्षेला. आणि जीव शास्त्रात लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन ह्यावर एक नोट होती तीन मार्कांची. ह्या दोन विषयांच्या व्यतिरिक्त आमचा आणि लैंगिक शिक्षणाचा अगदी दुरापास्तही संबंध नाही. त्यातही परीक्षेला हमखास येणारा प्रश्न म्हणजे 'धोतऱ्याच्या फुलातलं लैंगिक (की अलैंगिक) प्रजनन आकृती सह स्पष्ट करा असा प्रश्न. फुल सुद्धा केवडा , जाई , जुई , सायली , मोगरा वगैरे नाही... फुल सुद्धा कुठलं तर "धोतरा". एवढी आमच्या लैंगिक शिक्षणा विषयी शासनाच्या शिक्षण खात्याला सुद्धा अनास्था होती.

परवा एक मित्र भेटला , खूप जुना आणि खूप वर्षांनी - त्रिंबक देशपांडे (तिंब्या). तिंब्या म्हणजे जुना दोस्त. इतका जुना की ती खाष्ट आत्या आज्जी पाठीत जोरात धपाटे घालत असे तेंव्हा एक धपाटा त्याने सुद्धा खाल्ला असेल माझ्या बरोबर. आम्ही दोघांनी घरात टीव्ही वर कबीर बेदीची जाहिरात पाहू देत नाहीत म्हंटल्यावर बंडखोरी म्हणून एका पेपर स्टॉल वरून पूजा बेदीचे ( पूजा बेदी : समाज सुधारक कबीर बेदी ह्यांचं कन्यारत्न, म्हटलंच आहे ना, शुद्ध बीजापोटी फळे गोमटी रसाळ ) आणि मधू सप्रे , वगैरे ची उत्तान छायाचित्र असलेली मायापुरी किंवा तत्सम एक तीन महिन्यापूर्वीची जुनी मासिकं दुकान दारानं रद्दीच्या भावात घेऊन आम्हाला मात्र छापील किमतीच्या निम्म्या भावात विकली. आम्ही दोघांनी तशी एक सात आठ मासिकं विकत आणली होती. (अर्थात तिंब्या आणि मी आम्ही दोघांनी काँट्रीब्युशन काढून) आणि आम्ही दोघे त्या मासिकांचे एक भूमिगत पद्धतीचे एक वाचनालयचालवत असू. सहा महिने ती रोटेटिंग लायब्ररी चांगली चालली. जशी इस्त्रायल ची मोसाद ही गुप्तचर संघटना अस्तित्वात आहे हेच कित्येक वर्षं जगाला ठाऊक नव्हतं तशीच आमची अशी एक भूमिगत लायब्ररी अस्तित्वात आहे हेच कित्येक महिने (लायब्ररीचे सदस्य वगळता) कुणालाच माहित नव्हतं. ह्या भूमिगत वाचनालयाच्या यशस्वी प्रयोगानंतर , तिंब्याच्या मनात ह्या विषयाला वाहून घेणारी एक भूमिगत प्रकाशन संस्था काढायचा पण मानस होता. पण पुढे ती मासिकं कशी काय कुणास ठाऊक पण आमच्या गल्लीतील प्रौढांच्या हाती लागली आणि मग मात्र ती भूमिगत वाचनालयाची अभिनव अशी चळवळ आम्हाला नाईलाजास्तव बंद करावी लागली. आमच्या भूमिगत वाचनालयाच्या सदस्यांची धरपकड झाली आणि आमचे सगळेच मानस संपुष्टात आले. परंतु ह्या संबध चळवळीत आम्हा वाचनालयाच्या संचालकांना आणि काही आजीव सदस्यांना चक्क माळ्यावरच्या खोलीत एक संबंध दिवस अन्न पाण्यावाचून डांबून ठेवण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. आमच्या सदस्यांवर खटला भरताना आणि आम्हाला ही कडक ही शिक्षा ठोठावताना आमच्याच संस्थेच्या काही सदस्यां पैकी काहींचे थोरले बंधू, गल्लीतील काहीं नवोदित स्वयंघोषित तरुण समाज सुधारक वगैरेंनी न्यायमूर्तींचे काम पाहिले. गंमत म्हणजे काही महिन्यानंतर आमच्या लायब्ररीतील बरीच मासिके आम्हाला शिक्षा ठोठावणाऱ्या त्रिसदस्यीय न्यायमूर्तीं पैकी एका न्यायमूर्तींच्या कक्षात एका फडताळात उंच ठिकाणी सापडली.

एकंदर आमच्या पिढीचं हे लैंगिक शिक्षण वगैरे प्रकरण अत्यंत खडतर पद्धतीने गेलं. म्हणजे आई जेवू घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशी काहीशी गत ! पण सगळ्या गदारोळात आमच्या पिढीचं काही बिघडलं? की अजिबात काहीच नाही बिघडलं नाही,सगळं कसं एकदम सुरळीत पार पडलं? मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर एवढा उहापोह झाला तरी सरळ साध्या व एका शब्दात "हो" किंवा "नाही" असं सांगता येण कठीण आहे. मात्र माझ्या आणि तिंब्या सकट आमच्या हॉल मध्ये टीव्ही पाहायला बसणाऱ्या कबीर बेदिंच्या सर्व अनुयायींची रीतसर पत्रिका जुळवून लग्न झाली. त्यांना पुढं चांगली अगदी तीन नसली तरी दोन दोन बाळं (पोरं) झाली. त्या झालेल्या बाळांचे चे गाल ही अगदी टोमॅटोसारखे तुकतुकीत गुलाबी लालचुटुक होते. आणि वर काचेच्या बरणीचं फिरकी वालं झाकण बऱ्यापैकी घट्ट बसलं सुद्धा !

चारुदत्त रामतीर्थकर.
८ ऑक्टो २०१९ पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा ..... जुने दिवस आठवलेत Happy च्रप्स कश्याला हवी आहे तुला ती अ‍ॅड Lol

हा हा! अगदी मस्त लिहिलंय ! बऱ्याच ठिकाणी अगदी अगदी होत होतं . विशेषतः ते प्रश्न वाचताना . Lol
आमच्यावेळी "बलबीर पाशा को एडस हुआ क्या " कि असच कायतरी टॅगलाईन असेलली ऍड फेमस होती ..
छान लेख आवडला ! Happy

Proud मस्त खुसखुशीत लेख. आता मुलं आईला आणि मावशीला GOT बघ, खूप भारी आहेत सांगतात. तेव्हा दूरदर्शनच्या दिवसात हिरो हिरोईनने मिठी मारली तरी कानकोंड व्हायला व्हायचं.

छानेय लेख Lol Lol
पण मलादेखील कबीर बेदीची झैरात काही आठवत नाहीय. टमाट्याची आठवतेय. <१० वर्षांची होते. त्याच वेळी प्यार हुआ इकरार हुआ गाणे वाजणारी निरोधची झैरात यायची असे वाटते. त्यात होता का कबीर बेदी? दृश्य आठवत नाहीयत. पण माणूस योग्य निवडला होता म्हणायला हवं Proud

आमच्या लैंगिक शिक्षणाची जबाबदारी गृहशोभिका मासिकाने घेतल्याने आम्हाला फारसा त्रास झाला नाही.

एक माला डी ची जाहिरात होती . मग एक कोहिनूरची यायची Happy
एक कपल लहान मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करता करता स्वतः दमून झोपी जायचं , पण बाळ काही झोपायच नाही .
(मग खरतर "कोहीनूर" ची गरज च काय म्हणा??? )

Happy Happy मस्त लिहीलय! मी एकदा अति-लहानपणी एका, तीन मुलं असणार्या काकांना, त्यांच्याच घरात ते आरामात पहुडले असताना, पलंगावरून शब्दशः बसतं केलं होतं. साधारण संवाद असा होता:

मी: काका, तुमचं सुखी कुटुंब नाहीये का?
काका: का रे बाळा! असं का विचारतोस?
मी: टीव्ही वर दाखवतात ना, छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. तुम्ही तर पाच जण आहात. Happy

नंतर ते काका बरीच वर्षं माझ्याशी नीट बोलल्याचं आठवत नाही.

माझ्या लेकीची (वय ७) "आईचे डायपर" अशी सॅनिटरी नॅपकिनशी ओळख झाली आहे. पण त्या समाज सुधारक "रवी सिहींणी" ताई (पक्षी सन्नी ताई) ज्या ऐवजाची डोळे भरून जाहीरात करतात त्या विषयी प्रश्र्न कधीही उपस्थित होऊ शकतो.
या जाहिराती बाल चॅनल सोडून कधिही कोठेही लागतात. त्यामुळे सीमेवरील सैनिकापेक्षा जास्त सजगतेने डोळ्यात तेल घालून रिमोट सज्जता ठेवावी लागते.
जाणकारांनी/ भोगलेल्या समदुःखींनी काय,उपाय केलेत, कृपया प्रकाश टाकावा.

लेख आवडल्याची अभिप्रायाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

@च्रप्स : ही कबीर बेदी ची जाहिरात मी "युट्यूब" वर सापडते आहे का ते शोधून पाहिलं , पण नाही मिळाली. त्या ऍड मध्ये कबीर बेदी फक्त एका निवेदकाचे काम करत आणि STD ( सेक्सशुअली ट्रान्समीटेबल डिसीज ) च्या संदर्भात घेता येणाऱ्या सुरक्षे विषयी सल्ला देत. पण भाषा खूप 'स्पष्ट' होती एवढंच. बाकी त्या ऍड मध्ये विशेष असं आक्षेपार्ह्य काही नव्हतं. अजून जर मला ती ऍड कुठे सापडली तर मी त्याची लिंक पाठवेन.

छान लिहिलंय.
माला डी, काचेच्या बरणीत चिरडणारे टोमॅटो आणि एक निरोधची यायची ह्या अ‍ॅड आठवताहेत. कबीर बेदीची नाही आठवत.
नंतर मग बलबीर पाशा फेमस झालेला.

लेख छान खुसखुशीत झालाय. तुम्ही विनोदी अंगाने लिहिलेला असला तरी खरोखर त्या काळी असं शिक्षण मिळणं अवघड होतं त्या पिढीला.

बाकी ह्याच विषया संदर्भातील एक गंभीर घटना. परवा एक मित्र भेटला , खूप जुना आणि खूप वर्षांनी - त्रिंबक देशपांडे (तिंब्या). हे वाचून वर्तमानकाळातली काहीतरी गंभीर घटना पुढे लिहायची होती पण प्रत्यक्षात जुन्या आठवणींच्या नादात वाहवत जाऊन आत्ता चालू वर्तमानकाळातली घटना लिहायचीच राहून गेली असं काहीतरी वाटलं मला. (की ते वाचनालय आणि ते बंद पडणे हीच गंभीर घटना होती?) कदाचित माबुदो असेल. पण मला अचानक संपल्यासारखा वाटला लेख.

राज कपूरच्या गाण्यावर छत्रीत दोघे जातानाची जाहिरात यायची, पण ती कशाची हे कळायचंच नाही. साबणाच्या जाहिरातीतही विनोद खन्ना वगैरे आणि ब्रँड काय तर लाइफबॉय, सिंथॉल असे रांगडे. लिरीलमध्ये प्रीती झिंटा आली तेव्हा अगदी कुठे तोंड लपवावं, असं होऊन जायचं टीव्हीसमोरच्या सर्वांना… संपूर्ण लेख रिलेट झाला… आमच्या वर्गात मागील बाकावरची मुले चालू तासाला काही पुस्तके आणायची आणि ती एखाद्या बोअरिंग तासाला संपूर्ण वर्गभर फिरायची… कानोकान कुणाला खबर व्हायची नाही.

@पियू >>> पण मला अचानक संपल्यासारखा वाटला लेख. <<<

हो तुमचं निरीक्षण अगदी योग्य आहे. त्यामुळे मी एफबी वर टाकताना थोडा किंचित शेवट थोडा राऊंड ऑफ केलाय. माबो वर पण आता तोच कॉपी पेस्ट केलाय. कदाचित आता तो थोडा समर्पक वाटेल.
" बाकी ह्याच विषया संदर्भातील एक गंभीर घटना." हे वाक्य सुद्धा मी वगळलंय.

हे हे. मस्त लिहिलंय. ती टोमॅटो ची जाहिरात आठवते. आणि एक कहो ना प्यार है च टायटल साँग वाली पण आठवते. मला लख्ख आठवतंय, आम्ही भावंडे मूळातच साधं गरीब स्वभाव, नासमझ असल्याने मुकाट्याने बघत असू अन् त्याविषयी काही प्रश्न ही पडायचे नाहीत Lol . अन् त्यामुळे कधी ऑकवर्ड ही झालो नाही Lol Lol .

मस्त लिहिलंय! मलाही सगळ्यांसारखी कबीर बेदीची जाहिरात आठवत नाही. माला-डी, प्यार हुआ इकरार हुआ टोमॅटो या जाहिराती आठवल्या.
आणि रेणुका शहाणेची विस्परची. 'आपसे एक बात कहनी है. कैसे कहूं?... 'वगैरे वगैरे.. तोपर्यंत napkin म्हणजे छोटा टॉवेल हाच अर्थ माहिती होता. मला सीरियसली कळायचं नाही की त्यासाठी ही एवढी मागेपुढे का करतेय? Lol

भारी लिहिलंय Lol
या संदर्भात एक गमतीशीर घटना आठवली. माझी मुलगी २.५-३ वर्षाची असताना एकदा सा बा आणि ती दोघीच टीव्ही बघत होत्या आणि निरोधची जाहिरात लागली. नातीच्या पृच्छेला साबांनी ते मोठ्या माणसांचे चाॅकलेट (हाय रे दैवा!) असते. लहान मुले खात नाहीत असे सांगितले.
पुढे कधी तरी एकदा रात्रीच्या जेवणानंतर बाबा, आजी आणि नात दिवाणखान्यात टीव्ही पहात असताना ही जाहिरात लागल्यावर लेकीने बाबाकडे उद्या हे चाॅकलेट माझ्यासाठी आण असे निरागसपणे सांगितले. सा बा आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहायला मिळाले नाहीत पण स्वैपाकघरात माझी हसून हसून मुरकुंडी वळली.

ती hiv ची उघड्या पाठीवरून लाल भडक नेलपेंट वाले हात फिरत असणारी जाहिरात आठवते का?
आणि त्या एक बाई बिझनेस निगॉसिएशन्स असल्यासारख्या टेबल खुर्चीवर बसून कोणालातरी 'इसे आजमाओ, ये लूब्रिकेटेड है" सांगत असायच्या ते पण आठवतं.या जाहिरातींनी मनावर इतका परिणाम केला की लुब्रिकेशन हा शब्द अमुक एक संदर्भापुरताच मर्यादित झाला.

Pages