बग फिक्सिंग

Submitted by सामो on 2 October, 2019 - 10:02


.
'भगवान जब देता है तब गधे को भी छप्पर फाड के ही देता है' या उक्तीची विश्वासार्हता पटण्याची , हि काही दिनूची पहिलीच वेळ नव्हती. अनेकदा असे हृदयाला इंगळ्या डसणारे प्रसंग दिनूने अनुभवले होते, पचवले होते आणि त्यांचा स्वतः:वरती यत्किंचितही परिणाम होऊ ना देण्यात निदान तसे भासविण्यात दिनू एव्हाना वाकबगार झालेला होता. पण यावेळचा प्रसंग फारच जिव्हारी लागणारा होता. याबद्दल वाचकांना सविस्तरचं सांगितले पाहिजे.

त्याचे काय ना, दिनू टिपणीस, हा ऑफिसातील एकमेव 'वेळेवर येणारा, टापटीप राहाणारा, कोणतेही काम तत्परतेनेच नव्हे तर हसतमुखाने करून देणारा, कधीही चढ्या आवाजात न बोलणारा', इत्यादि इत्यादि एक आदर्श आय टी कारकून होता. निदान दिनूचा तरी आत्ताबद्दल हाच समज होता. उदाहरणार्थ 'डेली हडल मिटींग्स मध्ये जिथे प्रत्येकजण २ वा जास्तीत जास्त ४ ओळींचे पाट्या टाकल्यासारखे स्टेटस टाकत तिथे दिनू, आपण आदल्या दिवशी काय केले याचे अ पासून ज्ञ पर्यंत साग्रसंगीत वर्णन करत असे मग कोणाला उभ्या उभ्या झोप लागली तरी बेहत्तर. जिथे पहाटे पहाटे ८ च्या सोमवार च्या विकली मिटींग्स मध्ये अन्य कर्मचारी कसेबसे झोप आवरीत, चडफडत हजेरी लावत तिथे दिनू तत्परतेने ५ मिनिटे आधीपासूनच वेबेक्स वरती हजार राहून, 'वेटिंग म्युझिक' ऐकत असे. खरं तर त्याच्या फसफसून वाहणाऱ्या उत्साहाचे रहस्य जाणून घ्यायला अनेकजण उत्सुक होते - असा दिनूचा खात्रीशीर समज होता.

दिनू या कंपनीत लागल्यापासून १ वर्ष ९ महिने झाले होते. बरीच functionality व तिचे कंगोरे आतापर्यंत दिनूच्या हाताखालून गेलेले होते. बरं अन्य मोठ्या कंपनीज प्रमाणे ही काही फारशी डायनॅमिक, aggressive growth असलेली कंपनीही नव्हती पण ते जे प्रॉडक्ट विकीत त्याची बाजारपेठेत सातत्याने मागणी असे व त्या जोरावरच कंपनी चांगले clientale राखून होती. सांगायचा मुद्दा हा कि दिनू त्याच्या niche कामात पटाईत होता. दिनूचे ग्रह अनुकूल होण्यास व सरोज कारखानीस ऑफिसात जॉईन होण्यास एकाच गाठ पडली नसती तरच नवल होतं. दिनू सकाळी बरोबर ९ ची कॉफी घेऊन परत स्थानापन्न होण्यास आणि क्युबिकलच्या रुक्ष भींतीआडून सरोज कारखानिसचा सुरेख , तरतरीत, स्मार्ट चेहेरा नजरेस पडण्यास एकच समसमा संयोग झाला आणि दिनू अर्धा हवेत , अर्धा बसण्याच्या पोझिशनमध्येच स्टॅच्यू झाला. दिनूला , सरोज म्हणजे कोणी कुरङ्गनयना, आधुनिक अप्सरा असल्याचा भास झाला. सरोजनेच दिनूला हसून अभिवादन केले व स्वतः:ची ओळख करून दिली. दिनू प्रोग्रॅमर होता तर सरोज टेस्टिंग ग्रुप मध्ये जॉईन झालेली होती. म्हणजे दोघांचे विळी-भोपळ्याचे सख्य होते तर.

ते काही का असेना पण त्या दिवसापासून, दिनूच्या कामात अधिकच उत्साह व चैतन्य आले याबद्दल दुमत नव्हते. खरं तर त्याला ऑफिस चा नको तेवढा लळा लागू लागला. त्याची कामे पटापट होऊ लागली, code कधी नव्हे ते भराभर डीबग होऊ लागला. वीकेंडस एकदाचे कधी संपतात व सोमवार कधी उजाडतो अशी जगावेगळी अवलक्षणयुक्त घाई त्याला होऊ लागली. 'दिन दुने-रात चौगुने' रेटने, सरोजचे फक्त आणि फक्त चांगले गुणच त्याच्या लक्षात येऊ लागले. उदाहरणार्थ - वेळी अवेळी सरोजच्या क्युबिकलच्या दिशेने येणारा जिवघेण्या सुगंधाची झुळूक, तिची सजवलेली क्यूब, आणि कामातील तिचे कौशल्य तर वाखाणण्यासारखेच त्याला वाटू लागले. मग भलेही तिने त्याचा code चुटकीसरशी break करून दाखवो. त्याला त्या गोष्टीचे देखील कौतुक वाटू लागले. आफ्टरऑल तो एक स्पोर्ट्स प्रोग्रॅमर होता, अन्य कलिग्जसारखा डूख धरणारा नव्हता. एवढेच काय दिनूला क्वचित स्वतः:च्या किंवा अन्य लोकांच्या कोडमध्ये मुद्दाम डीफेक्टस पेरावेसेही वाटू लागले. अगदी त्या पातळीवरती जरी दिनूचे अध:पतन झाले नसले, तरी अधेमधे सरोजला jabber करून तो कामाविषयक तसेच इकडल्या तिकडल्या गप्पा मारू लागला. सरोजचाही मोकळा मैत्रीपूर्ण प्रतिसाद मिळाल्याने दोघांच्या jabber वरती वरचेवर गप्पा होऊ लागल्या. अन्य कोणाच्या लक्षातही न येता दोघांची मैत्री फुलू लागली - अर्थात दिनूच्या मते. IT क्षेत्रात गमतीने म्हटले जाते की - A tester has the heart of a developer......in a jar on the desk. पण इथे तर खरच दिनूचे हृदय सरोजपाशी गहाण पडले होते., अगदी हवे तसे डिसेक्ट करायला.

सरोज मात्र सर्वांशी संयत पण सलोख्याचे संबंध राखून होती. जिथे दिनू फक्त सरोजला jabber करत असे, तिथे, सरोज मात्र एकाचवेळी मल्टायटास्किंग करण्यात वाकबगार होती. ती एकाच वेळी टेस्ट केसेस लिहिताना, अनेकांना आळीपाळीने jabber वर कामाचे संदेश देणे, मध्येच ऑफशोअर टीमला ईमेल्स पाठविणे, स्वतः:ची ईमेल चेक करणे, QA मॅनेजर ला स्टेटस अपडेट पाठविणे आदि कामे करण्यात हुशार होती. तिला झळ पोहचता तर नव्हतीच पण आपण दिनूला आवडत असू हे तिच्या गावीही नव्हते. या वेळच्या ख्रिसमस पार्टीला दिनू ने काही प्लॅन आखले होते. पार्टीचा venue एक प्रशस्त व आरामदायक हॉटेल असून संगीत , खेळ, खाणे-पिणे यांची रेलचेल असल्यामुळे, त्यादिवशी दिनूने, सरोजला मनातील गुपित सांगायचे ठरविले. दिनू जरी शेखचिल्ली स्वप्ने रंगवीत असला, तरी त्याने नकार घेण्याचीही मनाची तयारी केलेलीच होती.

शेवटी एकदाचा २२ डिसेंबर उजाडला. ऑफिसमधून बरेचसे लोक लवकर निघून थेट पार्टीला येणार होते. सरोजही अपवाद नव्हती. निमंत्रण सर्वाना होतेच शिवाय अजून एक मित्र मैत्रीण आणण्यास परवानगी होती. तो दिवसचं दिनूकरता जादूमय होता. का कुणास ठाऊक आज सरोज अधिकच सुंदर व अधिकच कुरंगनयना भासत होती एवढेच काय दिनूला ती आपल्याकडे प्रेमळ पण सूचक कटाक्ष टाकत असल्याचाही मधे मधे भास होत होता. संध्याकाळी दिनू जामानिमा करून पार्टीला पोचला. अजून तर काही सरोज आली नव्हती. दिनू उगाच हाय-हॅलो करत वेळ घालवत होता खरा पण त्याचे संपूर्ण लक्ष दाराकडे लागलेले होते. इतक्यात सरोजाची एंट्री झाली खरी पण तिच्या समवेत एक तरुण होता. त्याला पहाताच दिनूच्या छातीत धस्स झालं. सरोज आणि तो तरुण वाटेत भेटणाऱ्या लोकांना हाय म्हणत येत येत दिनूपाशी येऊन ठाकले. दिनूचे खरं तर प्राण कंठाशी आलेले होते पण त्याने उसने अवसान आणून उगाचच हसून अभिवादन केले. आणि ...... सरोजाने ओळख करून दिली - हा माझा फियॉन्से, निखिल "टोळ." आणि दिनूचा चेहरा पडला. कारण आता सरोजने शोधून काढ्लेला, हा एवढा मोठ्ठा "बग" फिक्स करायला मात्र दिनूचे साऱ्याआयुष्यभराचे प्रोग्रामिंग चे कौशल्य अपुरे पडेलसे दिसत होते.

दिनूचा जिवलग, अगदी जिवश्च-कंठश्च मित्र ,म्हणजे बिट्ट्या' प्रधान. अशा आणीबाणीच्या प्रसंगात, जर दिनूने पहिली धाव बिट्ट्याकडे घेतली नसती तरच नवल होते. बिट्ट्या म्हणजे साक्षात -

गुरू उदार माऊली प्रशांतसौख्य साऊली|
जया नरास फावली तयास सिद्धी गावली|

असा दिनूचा गुरुतुल्य लंगोटीयार होता. त्यांची जानी दोस्ती आता आता गद्धेपंचविशीतली नसून, बालपणापासून होती. बिट्ट्याने अनेकदा, दिनुकरता, आपल्या ताटातील घास काढून ठेवलेला होता. लहानपणी शोले-शोले खेळताना, कोणासही 'ठाकूर' व्हायचे नसे कारण ठाकूर हात नसल्याने फक्त मार खाणार. असे असतानाही, बिट्ट्याने, दिनूवरती आलेलं 'ठाकूरचे राज्य' स्वतः:वर घेतलेले होते.

जेव्हा दिनू मटार घातलेल्या बटाटा पोह्यांना व चहाला हात लावेना तेव्हा बिट्ट्या प्रसंगाचे गांभीर्य कळून चुकला. तशाही प्रसंगात त्याचे डोके चाललेच. त्या भेटीतच बिट्ट्याने एक बेत आखला व दिनूस सांगितला. त्या बेताचा हायलाईट हा होता कि टोळ व सरोजच्या मधील कुरबुरींवर बिट्ट्या पाळत ठेवणार व त्याचा यथासांग वृत्तांत दिनूस देणार. पुढची खेळी दिनूने खेळायची. आणि या मोहिमेवरती बिट्ट्याची बहीण लतिका प्रधानही सामील होणार व तिच्या अफाट फेसबुक लिस्टमधून व जनसंपर्कांतून ती टोळाचे जर काही affair पूर्वी झाले असेल ते हुडकून काढणार.
हा बेत खरं तर अपेक्षेपेक्षा यशस्वी झाला. टोळाचे एक अफेअर शोधून काढण्यात लतिकेला यश प्राप्त झालेच पण बिट्ट्याला देखील सरोज - टोळच्या अनेक लहान सहान कुरबुरींमधून एक महत्वाचा मतभेद मिळाला, तो म्हणजे टोळाला नोकरी न करणारी बायको हवी होती तर सरोज तिच्या क्षेत्रात पार मश्गुल झालेली होती आणि तिला तिचे क्षेत्र अज्जीबात सोडायचे नव्हते. दिनू हळूहळू jabber वरती सरोजाला हे ठसवून देण्यात यशस्वी झाला की तो स्त्रीस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून वेळ पडली तर हाऊस-हजबंड होण्यासही मागेपुढे पहाणार नाही पण पत्नीस मतस्वातंत्र्य, आचार-विचार स्वातंत्र्य देईलच. पुरोगामीपणाचे , प्रोग्रेससिव्ह विचारांचे बाळकडू प्यालेल्या सरोजाला , दिनूचे विचार इम्प्रेससिव्ह वाटले नसते तरच नवल होते.

टोळ आणि सरोज चौपाटीवरती फिरत असताना, ठरल्या बेताप्रमाणे, लतिका अचानक समोर आली आणि टोळास पाहून डोळे विस्फारून उदगारली "निखिल ना तुम्ही. उषाचे मित्र. बरं झालं बाई भेटलात, उषा अजूनही तुमची वाट पाहते आहे, बिचारी वाळून वाळून अगदी काडी झालीये. whatsapp वरती तिला जरूर कॉन्टॅक्ट करा." यानंतर ती संध्याकाळ टोळास (वाईट दृष्ट्या) अविस्मरणीय गेली, भूतकाळाबद्दल, सरोजाला अंधारात ठेवण्याबद्दल टोळाची चांगली खरडपट्टी निघाली. सरोजने सुतावरून स्वर्ग गाठला की पुरुषांना हे असे पालथे धंदे करायचे असतात म्हणून स्त्रियांना घरात कोंडून ठेवले जाते. बरे झाले लवकर सर्व बिंग फुटले अन्यथा ...

आणि कालांतराने दिनूचे प्रोमोशन 'प्रोग्रॅमरवरून' 'प्रोग्रामिंग लीड' वरती झाले. म्हणजे बाहेरही आणि घरातही. डिसेंबर ते जुलै , जेमतेम हिवाळा संपून उन्हाळा सुरु झाला.ऑफिसात दोघांच्या प्रेमाचा गौप्यस्फोट लवकरच एका समर पॉटलकमध्ये केला गेला.दिनू व सरोजला लग्नात जोरदार आहेर मिळाले. व अशा रीतीने another bug bit the dust

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बरं झालं सुखान्त झाला. माझा जीव टांगणीला लागला होता. आयुष्यात बग फिक्स करता आलेच पाहिजे. बिट्ट्या जैसा दोस्त हर किसी को मिले. छान ओघवती शैली.

बिट्ट्या आणि लतिकाला लग्नात जोरदार आहेर मिळाले

बिट्ट्या आणि लतिका भाऊ बहीण आहेत ना? मग त्यांना आहेर कसे?

वीकेंडस एकदाचे कधी संपतात व सोमवार कधी उजाडतो अशी जगावेगळी अवलक्षणयुक्त घाई त्याला होऊ लागली
>>> lol .. been there..

अप्रतिम लिहिले आहे.

मस्तच.
कोणाला उभ्या उभ्या झोप लागली तरी बेहत्तर..
दिनू अर्धा हवेत , अर्धा बसण्याच्या पोझिशनमध्येच स्टॅच्यू झाला >> खिक्क..... Happy

दिनू सारखी लोक असतात .
पण बिचाऱ्या सर्वांच्या स्टोरी चा अंत गोड होत नाही .
तुमच्या कथेतील दिनू नशीबवान आहे