अश्वत्थाम्याची जखम आणि ग्रेस...

Submitted by १८तन्वी on 30 September, 2019 - 09:28

लिहावंसं वाटलं म्हणून...
थोडंसं मनातलं...

आज खूप दिवसांनी एका विषयावर लिहावंसं वाटलं.. विषय कसा म्हणू? एक आठवण... छे...फक्त आठवण? की माझ्या आयुष्यातलं एक आयुष्य.. हरवलेलं... की ज्या क्षणी ते आयुष्य हरवलं तो क्षण...

असं वाटतं जगातला प्रत्येकजण कुठे न कुठे तरी अश्वत्थामा असतो...स्वतःचं असं एक दुःख, एक जखम घेऊन जगणारा... अर्थात प्रत्येकाची ती जखम दिसून येत नाही... ती मनाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवलेली असते. ठेवणीतल्या साडीसारखी... शक्यतो इतर कोणाला दिसणार नाही, हात लावता येणार नाही अशी... पण कधीकधी त्या कप्प्याचं दार उघडतं. हळुवारपणे जखमेवरची खपली निघते आणि बाहेर पडतात असंख्य आठवणी...

असंच काहीसं झालं माझ्या ठेवणीतल्या जखमेचं... निमित्त होतं कवी ग्रेस यांच्या कवितेचं... एका काव्यप्रेमी मित्राबरोबर बोलताना विषय निघाला ग्रेस यांच्या कवितांचा, आणि माझी आवडती कविता, गाणं आठवलं.

' ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...'

आणि तिच्या जाण्याचा क्षण डोळ्यांसमोर उभा राहिला....

माझ्यासाठी ती म्हणजे माझी आजी...तिचं जाणं आठवलं...आणि मनाचं आभाळ आठवणींच्या सरींनी भरून गेलं... हॉस्पिटल मधली रात्र आठवली... त्या रात्रीचा पाऊस आठवला...बाहेरचा...डोळ्यातला...आणि मनातला...

मी अडीच महिन्यांची असल्यापासून आजी माझी आई झाली होती... आईला कामानिमित्त दूर गावी जावं लागलं.. आई आणि आजी अशी दुहेरी माया केली तिने... दुधावरच्या सायीसारखी...घट्ट...शिकलेली नसून सुद्धा शिकलेल्या माणसांपेक्षा हुशार,अत्यंत कणखर,व्यवहारी, समजदार होती ती.. पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत. उत्तम सुगरण... तिचं एकच तत्व होतं. 'आपण जगाशी जसे वागू, तसंच जग आपल्याशी वागतं'....असो...तिच्याविषयी बोलायचं ठरवलं तर एक पुस्तक लिहावं लागेल...
असंच होतं लिहिताना... विचार करताना.. एका आठवणीत शिरलं की त्यातून असंख्य आठवणींचं धुकं पसरतं... आणि आपण शोधात राहतो स्वतःला... हरवलेल्या क्षणांना... माणसांना...असो...

लहान असताना दूरदर्शनवर एकदा हि कविता, कवितेचं गाणं ऐकलं होतं... पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजात. का आठवत नाही पण ऐकता क्षणी खूप आवडलं होतं. शाळेत मराठीच्या बाईंनी अर्थ सांगितला. तसं थोडं वाईट वाटलं. दुःखी गाणं आहे इतकच वाटलं. पण आवडलं होतं. त्यातल्या त्यात 'घनव्याकूळ' शब्द... त्यावेळी कल्पनाही न्हवती की कधीतरी या कवितेतले क्षण मी स्वतः जगेन...

जसजशी मोठी होतं गेले तसं त्या गाण्यातला खोलपणा, आर्तता जाणवत गेली. आणि अजूनच आवडत गेलं हे ग्रेसांच्या कवितेचं गाणं... किती साध्या सरळ शब्दामध्ये आभाळाएव्हढं दुःख व्यक्त केलं होतं ग्रेस यांनी... खरंतर ग्रेस कळायला अवघड. पण ही कविता तशी साधी. अर्थात शब्द साधे. अर्थ...आयुष्य पुरून उरेल इतका...

आजी गेली त्या रात्री असाच पाऊस होता. ती ICU मध्ये होती. मी आजोबा waiting रूम मध्ये. रात्री डॉक्टरांनी बोलावून अगम्य भाषेत काहीतरी सांगितलं. मला शब्द कळले नाही. त्यांचा पडलेला चेहरा आणि पडलेला आवाज मात्र कळाला.अजूनही तो क्षण लक्ख आठवतो. I asked 'Is she dying'?... अनपेक्षित प्रश्न होता त्यांच्यासाठी. ज्याचं उत्तर त्यांनी आधीच दिलं होतं... "She is sinking ..." he said . त्या क्षणी sinking शब्दाचा वेगळा अर्थ कळाला... आजीच्या चेहऱ्याकडे बघितलं.. आणि सुन्न मनाने बाहेर आले. भयानक काहीतरी होणार आहे या जाणिवेने गुदमरायला झालं. आजोबांना चहा आणते सांगून खाली टपरीवर गेले... प्रत्येक पावलागणिक वाटत होतं पुढे काहीच घडू नये... कोणीही बोलावू नये. कोणीही काहीही सांगू नये...
टपरीतल्या रेडिओवर गाणं चालू होतं... ' ती गेली तेव्हा, रिमझिम’.....
प्रचंड राग आला त्या गाण्याचा...पावसाचा...त्या हतबल क्षणांचा... भीती वाटली...वाटलं या गाण्यासारखंच घडतंय. नको ते होतंय...श्वास गुदमरतोय... घनव्याकुळता काय असते याचा अर्थ किती भलत्या वेळेस कळतोय....संपले बालपण माझे.... किती भयानक आहे ही जाणीव...
टपरीवाल्या पोराला प्लीज गाणं बंद कर म्हंटलं... त्यालाही कदाचित अर्थ कळाला असावा...

त्या रात्री आजी गेली...आणि मी मोठी झाले...बालपण खऱ्या अर्थाने संपले.. लग्न होऊन वर्ष झालेली मी त्या दिवशी खरोखरीच मोठी झाले.... ती होती तोपर्यंत लहानच तर होते मी....

आजही हे गाणं माझं अत्यंत आवडीचं आहे.पण आता ते पूर्ण कधीच ऐकणं होत नाही.पहिल्या दोन ओळींमध्येच डोळ्यातला पाऊस भरून येतो... आठवणींचा महापूर येतो... डोळ्यांसमोर धुकं दाटतं...वर्तमानकाळ धूसर होतो... आणि मी शोधत राहते स्वतःला...जुन्या दिवसांना...तिला.... पण ती सापडत नाही...आणि ती गेल्याची, माझ्या आयुष्यात नसल्याची ओली जखम ठसठसत राहते....अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी......

-- तन्वी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__