कस्टर्ड ड्रॅगन / बालकविता

Submitted by सामो on 23 September, 2019 - 10:28

रुपांतर - https://www.poemhunter.com/poem/the-tale-of-custard-the-dragon/comments/
.

.
इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात
लहान बेला रहात असे सुखात आनंदात
तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा
लहानशी लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा
.
मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक
करड्याशा उंदराला हाक मारे ब्लिंक
पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़
त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रॅगनचे कस्टर्ड
.
कस्टर्ड दिसे भयंकर फारच खूंखार
अंगावरती खवले त्याची नखे धारदार
मुख त्याचे आग ओके, नाक धूर फेके
त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे
.
बेलाच्या शौर्याला नव्हता पारावार
इंक-ब्लिंकही सिंहास पळविती पार
मस्टर्ड होता शूर त्याची वाघास वाटे भीती
कस्टर्डच्या मागे ब्रह्मराक्षस भीतीपोटी
.
बेला कस्टर्डला गुदगुल्या करून करुन छळे
इंक-ब्लिंक-मस्टर्ड त्याची खोडी काढून पळे
मग सगळे हसत खो-खो, बसून लाल गाडीत
कस्टर्ड रडवा होई, नसे समजूत कोणी काढीत
.
बेलाचे हसून हसून पोट लागे दुखू
ब्लिंकला लोळण घेता आवरत नसे हसू
इंक अन मस्टर्ड त्याला टप्पल मारून पळत
बिच्चार्या ड्रॅगनला सगळे मिळून छळत
.
असेच दिवस चालले होते आले एकदा संकट
अचानक लाल गाडीवर झाली जोरात खटखट
इंक म्हटली म्याऊँ जेव्हा मस्टर्ड गुरगुरला
बेला हादरली समुद्री चाचा घरात शिरला.

डाव्या हातात पिस्तूल, उजव्या हातात पिस्तूल
दातात धरुन सुरा तो आला रागात चालून
दाढ़ी त्याची काळी अन एक लाकडाचा पाय
विद्रूप किती ध्यान! त्याच्या मनात दडले काय?
.
बेलाने केला मनात धावा ईश्वराचा
मस्टर्डने गुपचूप पाय काढता घेतला होता
इंक मांजर घाबरून बघत बसली सोफ़्याखालून
ब्लिंक उंदीर केव्हाचा बसला बिळात शिरून
.
कस्टर्ड मात्र उठला आता, झेप त्याने घेतली,
खवलेदार मजबूत शेपूट आवेशात आपटली
खाँण आवाज झाला त्याचा आवेश होता मोठा
चाचाला एका झेंपेत त्याने झोपवला होता
.
चाचाला वाटले नव्हते होईल असे काही,
तोंडाला बाटली लावून औषध तो पीई.
गोळ्या त्याने झाडल्या केला प्रतिकार
पण ताबडतोब झाला तो कस्टर्ड चा आहार
.
बेलाने मारली मिठी आले तिला भरुन
मस्टर्डने आनंद व्यक्त केला शेपूट हलवून
इंक ब्लिंक बाहेर आले, ते होते थरथरत
कसेबसे कस्टर्डला म्हटले 'धन्यवाद' कापत
.
अजूनही गेलात तुम्ही त्या लहानशा खेड्यात
दिसेल लाल लाल गाड़ी उभी मोठ्या झोकात
आजही बेला गुदगुल्या करुन छळते
अजून इंक-ब्लिंक-मस्टर्ड खोड़ी काढून पळते
.
अजूनही भित्रा कस्टर्ड रडवेला होतो
अजूनही ब्लिंक हसत हसत लोळण घेतो
अशी आहे गंमत आपल्या भित्र्या ड्रॅगन ची
बिचार्याच्या मागे ब्रह्मराक्षस भीतीपोटी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users