मासेमारीचा छंद - तीन पिढ्या

Submitted by सामो on 21 September, 2019 - 14:12

"Harvest Moon: A Wisconsin Outdoor Anthology" या पुस्तकातील - "First Fish - of Fathers & their Children" या ललित लेखाचा स्वैर अनुवाद -
.

.
हा पाहीलात, माझ्या मुलीचा जेसिकाचा फोटो - जेसिका उणीपुरी ४ वर्षाची सुद्धा असेल-नसेल जेव्हा हा फोटो काढलेला आहे. फोटोत तिचे सोनेरी केस जुलै च्या लख्ख उन्हात चमकतायत अन हिरव्या डोळ्यात अभिमानाची स्पष्ट झांक दिसते आहे पण एक विसंगतीही आहे, ज्या पकडलेल्या sunfish बद्दल तिला अभिमान वाटतो आहे त्याच्या स्वतःच्या हातातील चिमटीत धरलेल्या माळेपासून ती भीतीने, किंचीत दूरच उभी आहे. मला हा दिवस आठवतो जेव्हा याच sunfish वरती आम्ही बटाट्याच्या काचर्‍यांबरोबर ताव मारला होता.
हां तिला काही तो दिवस आठवत नाही मात्र जेसिका, मासेमारी करण्याइतकी मोठी झाली अन तोपावेतो, अहिंसेचे भूत तिच्यावर स्वार झाले होते. यावरुन आमचे वाद होत असत नाही असे नाही कारण मी मासेमारी करुन, ते खातो हे तिच्या पचनीच पडत नसे. माझे म्हणणे असे की प्राणी हे माणसाला खाण्याकरताच निसर्गाने निर्माण केलेले आहेत, अर्थात गाय म्हणजे चालतेब्फिरते बर्गर, याउलट जेसिकाचे म्हणणे असे की "माशांनाही भाव-भावना असतात.". अनेकानेक वाद होत, तासंतास एकमेकांना आपापला मुद्दा पटवून देण्याचा निष्फळ प्रयत्न होई. पण जेसिका ऐकत नसे ना मी ऐके. अर्थातच, बाप-मुलीचे जे नाते होते. माझ्यातील हटवादीपणा तिने बरोब्बर उचलला होता.
एकदा मात्र आम्ही जेव्हा सर्वजण मित्रांच्या बरोबर विस्कॉन्सिनच्या Boundary waters canoe area मध्ये सहलीला गेलो होतो तेव्हा या वादविवादाने, या मतमतांतराने एकदा अगदी परमोच्च सीमाच गाठली . जेसिका असेल १२ वर्षाची तेव्हा. कधी नव्हे ते मोठ्ठा ४-४१/२ पौंडाचा smallmouth मासा माझ्या गळास लागला होता. जेसिका वगळता, आम्ही सर्वजण कधी एकदा, तो मासा तळून मनसुबे आखू लागलो होतो.. जेसिका म्हणू लागली, "बाबा त्या माशाला सोडा, त्याची कच्चीबच्ची त्याची घरी वाट पहात असतील." आता मात्र माझा धीर सुटू लागला होता. मी तिला खूप समजविण्याचा प्रयत्न केला की "अगं मुली ही मोठेठी मासोळी मी जर सोडली तरी ती पिलांना कुशीत घेऊन झोपण्याऐवजी, त्यांचा चट्टामट्टा उडविण्याचीच शक्यता जास्त आहे." पण ऐकेल तर ती जेसिका कुठची. तिने आता शेवटचे अन अमोघ बालास्त्रच उगारले - रडणे. मग मात्र मी माघार घेतली, तो मासा परत पाण्यात सोडून दिला.
काही प्रसंगच असे असतात जेव्हा जिंकणं हे हरण्यापेक्षा महाग पडू शकते. अन हा प्रसंग त्याच पठडीतला होता हे माझ्यातील बापाने जाणले.
अर्थात बाप-मुलीचे नाते काय और असते हे मी तुम्हाला सांगायले हवे अशातील भाग नाही. अर्थातच पुढे, जेसिकाला माझा छंद ही माझी गरज आहे हे पटू शकले, मात्र मत्स्यशेती, शिकार आदि काही गोष्टींबद्दल तिच्या मनात तिडीक कायमची राहीली. अन अर्थातच तिची खात्री होती की तिला सग्गळं कळतं. अन का नाही तिच्या वयाचा असताना तिच्या बापालाही तोच दांडगा आत्मविश्वास होता की आपल्याला सग्गळं कळतं.
मला आत्ता ४० व्या वर्षी जे माहीत आहे त्यापेक्षा अनेक गोष्टी १६ व्या वर्षी माहीत होत्या. उदा - १६ व्या वर्षी माझी ही खात्री होती की आपला बाप मारे सद्गुणांचा पुतळा का असेना, आपल्याला , आपल्या बापासारखे व्हायचे नाही. त्याच्या पावलावरती पाऊल टाकायचे नाही. जग जिंकायचे ते आपल्या बाहूबळावर, आपल्या कर्तुत्वावर!
........ अन तरीही, तरीही कुठेतरी मित्रांनो माझ्या आयुष्याचा अमोल छंद- मासेमारीचा , त्याचे मूळ कुठेतरी माझ्या बालपणाच्या वडील-मुलगा या नात्यातच दडले आहे. असे नाते जे तेव्हा संदीग्ध होते, अजुनही आहे अन आता पुढेही राहील. एक क्लिष्ट, संदीग्ध, emotionally charged नाते. माझ्या वडीलांचे अन माझे नाते. एका पीढीचे पुढच्या पीढीबरोबरचे नाते.
मी पकडलेला पहीला मासा होता "bullhead" मासा. ती नीरव जादूभरली, संध्याकाळलीजणु भारावलेली संध्याकाळच म्हणा ना. शुभ्र चंद्रप्रकाशात, विस्कॉनसिनच्या तळ्यावर जादू झाली होती - मी माझा पहीला मासा पकडला होता. बाबा तळ्याकाठी माझ्यावर व माझ्या धाकट्या भावावर स्टीव्ह वरती नजर ठेऊन होते. आम्ही खोल पाण्यात शिरु नये म्हणून मध्ये मध्ये सूचना देत होते. त्यांच्या सिगरेटचे लाल टोक अन गूढ चंद्रप्रकाशात न्हायलेली त्यांची धूसर आकृती मला अजुनही लख्ख आठवते. आमच्या गळांना आमच्याच बाळमुठीएवढे बॉबलर्स लावून बाबा, त्या बॉबलर्स्ना गांडूळ लाऊन देत होते. अन आम्ही हेच बॉबलर्स पाण्यात टाकून शांतपणे मासा पकडण्याची तपःश्चर्या करत होते. बॉबलर्स तर अक्षरक्षः चाच्यांच्या खजिन्यातील सोने-चांदी-रत्न-माणकांप्रमाणे त्या चांदण्यात चमकत होते, वरखाली, वरखाली डुचमळत होते. मासा गळाला लागला की गळ जड होऊन खाली जाई अन आम्ही तो बाबांच्या मदतीने सरसर वर खेचत उत्सुकतेने काय आले ते पहात असू. असे एकामागे एक bullhead मासे आम्ही पकडत गेलो अन बाबा आमच्या गळाला गांडुळे लावून, गळाची फेक आम्हाला शिकवत गेले. ती संध्याकाळ मी विसरु शकत नाही कारण त्या संध्याकाळी मी पहील्यांदा थरार अन थ्रिल अनुभवले, जोश अन यशाची चव चाखली, जादू जादू होती. त्या संध्याकाळी मासेमारी माझ्याकरता छंद बनून गेला, एक पॅशन बनून गेला. असा छंद जो माझ्या बापाने मला सुपूर्त केला होता, पुढच्या आयुष्यात ज्याने मी झपाटून जाणार होतो अशी passion मला दाखवली होती.
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही अंडी-बेकन अन अर्थात माशांचा नाश्ता केला. सर्वात चविष्ट असा नाश्ता.
मला वाटतं बाबा, पुढे अनेकदा आम्हाला घेऊन मासेमारीला गेले. मासेमारी हा बाबांनी देऊ केलेला छंदच नव्हता तर तो माझ्या कुमारवयातील स्वप्नांचा , कल्पनाराज्याचा अविभाज्य भाग होता. माझ्या कुमारवयीन कालखंडाचा हा छंद साक्षी होता. इतक्या उत्कट माझ्या भावना आहेत. या छंदामुळे मला अनेक गुप्त खजीने सापडले जसे Sandusky नदी, रेल्वेचा ढासळलेला भग्न लाकडी पूल्,अंधारी चुनखडी वाली गुहा, माझे आवडते धबधबे, ओहळ,ओढे अन कितीतरी.
त्या वयात, भलेही Ohio नदीमधून , उत्तरस्थित Erie तळ्यात येणारे अनेक प्रसिद्ध मासे जसे - Walleye, Smallmouth, White Bass हे माझ्या गळाला कधीच लागले नाहीत एवढेच काय साधा Carp मासाही मी कधीच पकडू शकलो नाही. पण त्या Carp माशाच्या तळ्याकाठी वहात आलेल्या चंदेरी वर्खाच्या मढ्यांशी खेळायला मला फार आवडे. मी या माशांच्या कुजलेल्या पोटामध्ये pussywillow च्या काड्या खुपसून मजा पहात असे. काडी खुपसली रे खुपसली की अनेक अळ्या वळवळत बाहेर पडत अन हिरव्या चकचकीत पंखाच्या गोमाशांचा तर थवाच उडे. थोडा वेळ घोंगावून माशा परत त्या पोटाच्या खळगीत स्थिरावत अन मी परत परत काडी खुपसे. काय मजेचे दिवस होते ते. ते दिवस जेव्हा Carp सुंदर होता....आणि मृत्यु मोहमयी होता!
मी Sandusky नदीच्या ओढ्या-ओहोळातही मासेमारी करत असे. या ओढ्याच्या काठी एक Tiffany State Hospital म्हणून वेड्यांचे इस्पितळ होते. ज्याला मनोरुग्णालय असे पॉश नाव दिलेले होते. नाव बदलले म्हणून काय झाले, वेड्यांचे इस्पितळ ते वेड्यांचे इस्पितळच. मोठी माणसे त्याला वेड्यांचे इस्पितळ म्हणूनच ओळखत असत. जसे आम्हा लहान मुलांच्या कानावर बातमी उडत उडत येत असे - "गेल्या महीन्यात सोफीला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले" , अमक्याला दाखल केलं. पण तेव्हा कुठले गांभीर्य कळायला, आम्हा मुलांकरता हे इस्पितळ विशेष आकर्षण राखून होते. त्या दवाखान्याच्या आवारात अनेकानेक लहान झरे व त्यातून निर्माण झालेली डबकी होती. या डबक्यांमध्ये सुरेख रंगीबेरंगी sunfish सापडत असत. हे मासे पकडणे किती मजेचे होते. कधी मासे पकडायचे त्याचे आडाखे अन मनसुबे, ३ दिवसापासून रचले जात. मग आदल्या रात्री परसातली भुसभुशीत माती खोदून त्यातून गांडुळे काढली जात. नंतर ती गांडुळे गळाला लावून आम्ही मुले जय्यत मासेमारी करण्यास निघत असू. ते धुकट , कुंद वातावरण अन तो ओल्या दगडांचा कुंद वास मला अजुनही आठवतो. मासा गळाला लागला की त्याची नाजूक धडपड, गळाला लागलेली ओढ अन आमच्या हृदयात कोणता मासा लागला हे पहाण्याची धडधड हे मी विसरु म्हटलो तरी विसरु शकत नाही.
एका आरामाच्या दिवशी तर मला बादलीभर पॅनफिश सापडले. मी सर्वच्या सर्व घरी नेले. किती लहान असतात पॅनफिश. त्याच्यामध्ये walleye च्या कल्ल्यांएवढेही मांस नसते पण तरीही बाबांनी कौतुकाने या माशांचे लिपते केले व मासे तळले.
Breeder's Association Pond मध्ये तर विपुल प्रमाणात bullhead मासे सापडत. पण ती राखीव जागा होती अन अन्य लोकांना तिथे मासेमारी करण्यास बंदी होती. पण आम्हा मुलांना मात्र तिथे चोरुन मासे पकडण्यात अतिशय थ्रिल वाटत असे. कारण त्यात एक धाडस, थरार असे की कोणी आता पकडेल...मग पकडेल. शिवाय तारांच्या कुंपणामागे बैल चरत असत. हे बैल कधी उधळून आपल्या अंगावर येतील याचीही भीती असेच. बाबा नेहमी सांगत की तिथे जाऊ नका, कोणीतरी पकडून आत टाकेल. पण बाबांनी कधी शिक्षा मात्र केली नाही. अर्थात ते शिक्षा करतच नसत असे नाही जसे मी जेव्हा अँन्जी च्या नव्या कोर्‍या सायकलच्या सीटाला रंग फासला तेव्हा बाबांनी बेदम शिक्षा केलेली होती. पण या मासेमारीच्या साहसाचे कदाचित त्यांनाही सुप्त आकर्षण होते. धंद्याच्या व्यापात अतिशय ओढाताण, कष्ट करणार्‍या माझ्या बाबांना कदाचित आमचे थरार कळत असत. का शिक्षा केली नाही ते शेवटपर्यंत संदीग्ध्/अनाकलनियच राहीले. मी जसजसा मोठा होत गेलो तसतशी मासेमारी मागे पडली. खरं तर बालपणीच्या अनेक गोष्टी जसे दगडगोट्यांचा खजिना, बेसबॉल, ट्रेनचे आकर्षण, मॉडेल विमाने बनविण्याची हौस अशा अनेक गोष्टी मागे पडल्या अन त्या गोष्टींबरोबरच माझी स्वप्ने, श्रद्धा, आसुसलेपण आणि आशा ही. पण या सर्वांबरोबर बाबांच्या अन माझ्यातला जिव्हाळा, सामीप्य देखील ओसरत होते काय? हे आठवून आता पोटात खड्डा पडतो. असो.!

.
मुलाला मिसरुड फुटले की अमेरीकन बाप-मुलाचे नात्यात फार फारकत येते. पारंपारीक वडील-मुलगा नात्याच्या तुलनेत, या नव्या नात्याचे डायनॅमिक्स बदलतात. त्यातील प्रदर्शनिय प्रेमाचा भाग कटाक्षाने टाळला जातो. कधी मुलाकडून तर कधी बापाकडून. फार थोडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके बाप-मुलगा माझ्या परिचयात आहेत, ज्यांनी प्रेमाचे जाहीर प्रदर्शन, मायेचे उघड वर्तन पुढेही चालू ठेवले. अशा प्रदर्शनाबद्दल मला हेवा वाटतो की तिरस्कार की एकाच वेळी दोन्ही हे मला ठरवता येत नाही. इतकं सरळ समीकरण नाही ते. हेवा ही वाटतो कारण बाबा व माझ्यात तशा प्रकारचा मोकळेपणा उरला नाही पण सूक्ष्म तिरस्कारही वाटतो. तारुण्यात मुलाकडून घेतल्या गेलेल्या प्रत्येक बंडखोर निर्णयाची एक एक वीट रचत जाते अन बाप-मुलात एक अदृष्य भिंत तयार होते असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अन या वास्तवाला, मी तरी कसा अपवाद असेन? खेद-खंत हीच की ही भिंत ओलांडणं मला नंतरच्या आयुष्यात कधीच जमले नाही. बाबा मला उमगत गेले, माझ्या काही वर्तनाचा पश्चात्तापही झाला पण ही भिंत ओलांडून बाबांच्या कुशीत काही शिरता आले नाही तिथे इगो आड येत राहीला. अन समजा हे अंतर मी ओलांडले असतेही तरी काय मला पूर्वीची, बालपणीची जवळीक साधता आली असती? हेच घुसमटलेपण आमच्या नात्याचा श्वास बनून राहीला. मी परत जेसिकाचा माझ्या मुलीचा फोटो पहातो अन माझ्या डोक्यात चक्र फिरु लागतात... जेसिका पुढे काय बनेल, तिचे व्यक्तीमत्व कसे घडेल, ती आयुष्यातील प्रसंग कसे हाताळेल अन मुख्य म्हणजे आमचे बाप-मुलीचे नाते कसे असेल? त्याला ओहोटी लागेल की ते अधिक घट्ट होइल. आत्ता तरी मी तिच्याकरता, provider आहे, तिला एक मजबूत आधार आहे, तिचे विश्व बर्‍याच मोठ्या प्रमाणात माझ्या अवतीभवती फिरते. पण पुढे असेच राहील की आत्ताची १६ वर्षाची माझी जेसिका, मला दुरावेल, बंडखोर बनेल, मला दुखावेल? पण ....... मी कधी विचार केला होता बाबा दुखावतील का याचा? माझ्या मनात गुन्हेगारी भावनांची एक लाट येऊन जाते.
पुढे मी तारुण्यात प्रवेश केला, मला सहचारी मिळाली, जेसिका १ वर्षाची झाली, माझे शिक्षण पूर्ण झाले अन मला माझ्या बालपणीच्याच राज्यात विस्कॉन्सिन मध्ये नोकरी मिळाली. अन मासेमारी विसरलेल्या मला परत एकवार एक एकाकी पाऊलवाट लहानशा तळ्याकाठी घेऊन गेली. जिथे ऊन-सावलीचा खेळ चालला होता, हवा तशीच कुंद होती अन मासे पाण्यात उड्या घेत होते. मी लवकरच एक गळ परत खरेदी केला अन तळ्याकाठी जाऊ लागलो, निवांत वेळेत ब्लेकची "टायगर", यीटस ची "The lake isle of innisfree" गुणगुणत तळ्याकाठी मासेमारी करु लागलो. पुढे तर फ्लाय फिशींग करता एक नवा गळ घेतला अन फ्लाय फिशींग ची औरच मजा चाखली.
पण या सार्‍या धामधुमीत, माझे बाबा कुठे होते? ते तर दुसर्‍या राज्यात होते, स्टीव्ह तर तीसर्‍याच राज्यात होता. आम्ही सारेजण विखुरले होते - आहोत. मी आता वर्षाकाठी १-२ वेळा बाबांना भेटतो पण कसा उडत उडत अन त्या भेटीतही, म्हातारा हेच सांगतो की तो बरा आहे. मी म्हणतो मी बरा आहे. पण पुढे भरभरुन संवाद होत नाही, आमच्यातली भिंत पडत नाही. कधीतरी बाबांना घेऊन त्या तळ्याकाठी जायचे आहे, अन bullhead मासा पकडताना त्या संध्याकाळी बाबांच्या डोळ्यात जी चमक दिसली, ती मला परत पहायची आहे. परत बाबांच्या कुशीत शिरुन त्यांना सांगायचं आहे - तुम्ही बाप म्हणून यशस्वी ठरलात बाबा.... मला तुम्ही भरभरुन देऊ केलत. मला तुम्ही सारं काही दिलत. मी तुमचा ऋणी आहे, मी तुमच्यावर तितकच प्रेम करतो जितकं प्रेम विस्कॉनसिन तळ्याकाठच्या त्या चंदेरी रात्री करत होतो, जेव्हा तुमचा शब्द माझ्याकरता प्रमाण होता, मी तुमच्यावर अवलंबून होतो.
पण हे मला सांगता येत नाही ... आमच्यातलं अंतर मीटत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो, छान आहे गोष्ट आणि चित्रं.
मूळ कथेचा/लेखकाचा नामोल्लेख राहून गेला आहे का चुकून?
परिच्छेद अधिक स्पष्ट दिसले तर वाचन सोपे होईल. शीर्षकातला पीढ्या शब्द ‘पिढ्या’ असा हवा.

धन्यवाद निरु. पुस्तक परिचय नाही, निव्वळ एका कथेचे स्वैर रुपांतर आहे. पण पुस्तक फार छान आहे यात वादच नाही. एकेक कथा इतकी अर्थपूर्ण आहे.

मनोरंजनासाठी मासे मारतायत? जीव घेतायत करमणूकी साठी.
दया येते माशांची मला म्हणून मी फक्त चिकन आणि मटण च खातो.