एक इंजिन- गंजलेलं अन् गांजलेलं

Submitted by टोच्या on 22 September, 2019 - 07:48

एक होतं इंजिन. होतं म्हणजे आहे, पण नसल्यासारखे. सध्या ते गलितगात्र अवस्थेत दादरच्या यार्डात पार्क आहे. जेथे खोऱ्याने प्रवासी वाहून नेले, तेथे आज मागे एक डबाही उरला नाही याची खंत मनी 'मनसे' बाळगत यार्डात निपचित उभे आहे.
एक काळ होता, जेव्हा या इंजिनाची एक झलक पाहण्यासाठी लोक जिवाचं रान करीत. हे इंजिन सुरुवातीपासून जरा वेगळंच... राजेशाही थाटाचं...रुबाबदार. रुळांवरून धाड धाड धावू लागलं की भल्या भल्यांच्या उरात धडकी भरायची. सामान्य इंजिनं आपला ट्रॅक सोडत नसत, पण हे इंजिन कोणत्या ट्रॅकवर भस्सकन घुसेल, हे सांगता येत नसायचं. इतर इंजिनांचा आवाज साधारणपणे 'झुकझुक' असा ध्वनित होतो, पण 'झुकणे' या इंजिनाला मान्यच नसल्याने ते 'झुक झुक' ऐवजी 'खळ्ळ खट्याक... खळ्ळ खट्याक' अशी हिंसक ध्वनिनिर्मिती करीत ऐटीत रुळांवरून धावायचे.
त्याचा धावण्याचा वेगच इतका होता की आजूबाजूच्या इमारतींच्या काचा खळ्ळकन फुटायच्या. इंजिनाचा जन्म दादरच्या कारखान्यातला. पूर्वीच्या भगव्या यार्डात अनेक नवी, जुनी इंजिने असल्याने हे इंजिन यार्डातच उभे करून ठेवलेले असायचे. त्याला परफॉर्मन्स दाखवायला संधीच मिळायची नाही. आपण पाहुणे आले की घरातील मुलांना त्यांच्यापुढे कविता, पाढे म्हणून दाखवायला सांगतो, तसंच फक्त काही कार्यक्रमाच्या वेळीच इतरांना प्रभावित करण्यासाठी ते बाहेर काढलं जायचं. त्यामुळे नाराज असलेल्या या इंजिनाने अचानक तेथून बाहेर पडायचा निर्णय घेतला. क्षमता सिद्ध करीत स्वतःचा ट्रॅक शोधला. त्यानंतरच्या पहिल्याच पंचवार्षिक स्पर्धेत या इंजिनाने चांगलाच जोर लावला. इंजिन हरले खरे, मात्र त्याच्या उत्साहाची दखल इतरांना घ्यावी लागली. पुढच्या स्पर्धेत चार अवजड डबे ओढून नेत त्याने आपलं स्पर्धेतलं स्थान पक्कं केलं. नंतरच्या स्पर्धेत आणखी जोर लावत नाशिक, मुंबई, पुण्यातून तब्बल १३ डबे या इंजिनाने यशस्वीपणे ओढून नेले. सगळ्यांनी टाळ्या पिटल्या, शिट्ट्या मारल्या. प्रवासी खूश झाले. असंच इंजिन हवं म्हणून वाहवा करू लागले. इंजिनाची छाती फुगली. पुढे नाशिकला झालेल्या लहानशा स्पर्धेत इंजिनानं हलके हलके ४० डबे ओढून नेले. प्रवासी म्हणू लागले, 'झाले बहु, होतील बहु, पण यासम हा'. आता आपल्याशिवाय पर्याय नाही असा त्याचा समज दृढ झाला. प्रवाशांना गृहीत धरत, अति आत्मविश्वासात ते गाफील राहिले. त्यामुळे सुरुवातीला नियमित धावणार्या या इंजिनाच्या फेऱ्या हळू हळू कमी होऊ लागल्या. प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. पण इंजिन स्वतःतच मश्गूल. आत्मविश्वास इतका की प्रवाशांना काही बोलायची सोयच नव्हती. झालं, प्रवासी नाराज होऊ लागले. पण नाराजी सांगायची कुणाला? प्रवाशांनी पर्यायी गाड्यांचा वापर सुरू केला. हळू हळू इंजिनाचे चाहते कमी होऊ लागले. धावणे वीतभर आणि शिट्टी हातभर, अशी इंजिनाची अवस्था झाली. कालांतराने प्रवासीच मिळेनात. इंजिन बिथरले. ज्यांच्याबरोबर आतापर्यंत ते धावत होते, त्याच्या विरुद्ध ट्रॅकवर ते धावू लागले. अनेकदा तर एकाच ट्रॅकवर दोन इंजिने समोरासमोर आल्याने अपघातही घडले. पण, इंजिन बदलले नाही. त्याचा तोरा कायम होता. हळू हळू त्याला कोणी विचारेनासे झाले. शेवटी इंजिनाची धाव यार्डापर्यंतच. ते सतत यार्डात राहू लागले. त्याने आतापर्यंत वाहून नेलेले डबेही इतर इंजिनांमागे निघून गेले. तेलही गेले, तूपही गेले. हाती धुपाटणे उरले. आता ना डबे होते ना प्रवासी, ना इंधन. पूर्वीच्या यार्डात असताना झालेल्या अपघाताचीही आता चौकशी लागली होती. त्यामुळे त्याच्या अंगात धावण्याचं त्राणच उरलं नव्हतं. आता पुन्हा पंचवार्षिक स्पर्धा भरणार होती. पण, आता मागे ना डबे होते ना प्रवाशांचा उत्साह. स्पर्धेत उतरावे की नाही, या विचारात इंजिन अद्याप यार्डात थांबलेले आहे. इंजिनाचे काही जुने चाहते इंजिन बाहेर निघण्याची वाट पाहत आहेत. चाहत्यांच्या आग्रहाखातर इंजिनानेही आता बाहेर निघण्याची तयारी केली आहे. बघूया त्याची धाव कुठपर्यंत जाते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओव्हरहॉलिंग झाले की भकभक धूर सोडत निघेल शर्यतीत भाग घेण्यासाठी. नाहीतर भाडे तत्त्वावर दुसरी कंपनी घेईल की.

धन्यवाद मी मधुरा, प्राचीन

अमर ९९ <ओव्हरहॉलिंग झाले की भकभक धूर सोडत निघेल शर्यतीत भाग घेण्यासाठी. नाहीतर भाडे तत्त्वावर दुसरी कंपनी घेईल की.>
शक्यता कमी वाटते.

सध्या तेलपाण्याची व्यवस्था बिल्डिंग क्षेत्रातून. पण तिथे मंदी आलीय. मध्यम पगारदार नाहीत. धनाढ्य घरं घेऊनघेऊन थकलेत.

छान लेख!
इंजिन जर नीट धावलं असतं, तर राज महाराष्ट्राचे NTR, MGR झाले असते.
पण इंजिन प्रवासी सोडून दुसऱ्याच गोष्टींच्या मागे लागलं, आणि घात झाला.

<मस्त खुसखुशीत लिहिलयं !!! >प्रसन्न हरणखेडकर धन्यवाद
<टोच्या, असाच एक लेख रा.गा.वर येऊन जाऊ दे ना.
पप्पूवर वाचायला जाम मजा येईल. >मी मधुरा, नक्की प्रयत्न करीन

<आस बरुबर नाय. ते लाकड आणुन पाणी तापवतील अन वाफेचं इंजीन चालवतील.>रॉनी, तसंही इंजिन वाफेवरच चालत होतं.. तोंडाच्या

<छान लेख!
इंजिन जर नीट धावलं असतं, तर राज महाराष्ट्राचे NTR, MGR झाले असते.
पण इंजिन प्रवासी सोडून दुसऱ्याच गोष्टींच्या मागे लागलं, आणि घात झाला.>
अज्ञातवासी, अगदी खरंय. त्यांनी संधी घालवली. प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद

ग्रामीण भागाच्या शांत वातावरणात ह्या इंजिन चा आवाज नकोसा वाटत आहे .
आणि ग्रामीण जनतेची प्रवासाची साधने वेगळी असल्या मुळे इंजिन चे महत्व सुधा त्यांना नाही .
पण शहरी गोंगाटात आवाज मोठा असेल तरच ऐकायला येतो त्या मुळे ह्या आवाज करणाऱ्या इंजिन ची गरज शहरात आहे .
आवाज नसेल तर दखल सुद्धा कोण्ही घेत नाही .
आता लोकांनीच ह्या इंजिनची मरमत करून ड्रायव्हर ला ते रुळावरून पळवायला मदत केली पाहिजे

<आता लोकांनीच ह्या इंजिनची मरमत करून ड्रायव्हर ला ते रुळावरून पळवायला मदत केली पाहिजे>
गरज आहे खरी. पण स्वभाव आड येतो

लेख अजून थोडा असा वाढवता येईल>>> >>>
मध्यंतरी घड्याळाच्या काट्याच्या हुकुमानुसार पळून पळून इंजिन पार थकून गेलं ! त्यामुळे इंजिनाने विश्रांती घ्यायचं ठरवलं ! ते दादरच्या यार्डात गपचूप पडून राहिलं ! पुढे पावसाळा आला आणि यार्डमध्ये भरपूर पाणी साचलं. बराच काळ पाण्‍यात राहिल्‍याने इंजिनाचा बॉयलर पार गंजून गेला ! बॉयलर मध्ये वाफ साठवणे अशक्य होऊन गेलं ! कर्कश्य शिट्टी वाजवायची यंत्रणाही कोलमडली ! इंजिन बराच काळ पाण्यामध्ये राहिल्यामुळे यार्डाच्या अधिकाऱ्यांनी, इंजिन डिसमेंटल ( ED ) करावं असं ठरवलं ! त्यामुळे इंजिनाला इडी चा धोका वाटू लागला ; इंजिन चांगलंच टरकलं आणि गपगार पडलं !

इंजिनाची वेळ ऐकदंम अचूक असायची ज्या ठिकाणी प्रवाशी जास्त तिथे ते एकदम अचूक शिट्टी वाजवत पोचायचे .
त्या मुळे प्रवासी सुद्धा खुश होते त्यांनी इंजिनला १३ रत्ने अवॉर्ड पण देवू केला होता .
हे इंजिन आपल्याला १४ वें रत्न दाखवू नये म्हणून बाकी सर्व इंजिन धास्ताव ली होती .
मग रुळा वर दगड ठेव ,लाकड ठेव असले उपाय करून बघितले पण इंजिन काही थांबायचे नावच घेत नव्हतं .
योग्य वेळी rula वर आणि योग्य वेळी यार्डात असायचे .
पण काय झाले ते माहीत नाही हे इंजिन बाजूच्या काकांच्या घड्याळ त बघून फेरफटका मारताना दिसू लागले त्या त्याची योग्य वेळ चुकू लागली नवीन प्रवासी मिळाले नाहीत पण आहे ते पण उतरले .
बाजूच्या काकांच्या बिघडले ल्या घड्याळ मुळे हे इंजिन फेरफटका
मारायला अयोग्य वेळी निघाल आणि पावसात अडकल .
आणि गाळात रुतून बसले तिथे असलेल्या गाळात कमळाची शेती करायची योजना आहे .