हास्यलहरी –सुलोचनाबाईंची चारीधाम यात्रा –जयश्री देशकुलकर्णी

Submitted by jayshree deshku... on 11 September, 2019 - 10:11

सुलोचनाबाईंची चारी धाम यात्रा

सुलोचनाबाईं चारी धाम यात्रेला जाण्याच्या तयारीला लागल्या. गेल्या वीस वर्षात त्या कधी घराच्या बाहेर पडल्या नव्हत्या.शेतीवाडी जमीन जुमला ह्या सगळ्या जंजाळात त्या पुऱ्या गुरफटलेल्या होत्या.तीन मुल, दोन सुना,दोन नातवंड, एक घरी परत आलेली नणंद,असा घरात मोठा खटला. घरात सगळ्यांवर त्यांचे कडक नियम अटी असत.अर्थात त्यामुळेच घरात एकोपा टिकून होता त्याचं यात्रेच बुकिंग झालं, तश्या दहा माणसांनी भरलेल्या त्यांच्या घरात सर्वाना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. साऱ्या घरावर सुलोचनाबाईंचा वचक.त्याचं व्यक्तिमत्व पण तसं भारदस्त.उंच्या- पुऱ्या, जाड्या, कपाळावर ठसठशीत मोठ कुंकू. त्यांच्या नजरेच्या धाकावर सगळ घर चालायचं. आणि बरोबरच आहे म्हणा, त्यांचे धारदार नजर असणारे, गोल गोल मोठे डोळे एकदा त्यांनी साऱ्या घरावर फिरवले की सगळ घर गप्पगार व्हायचच हो! तात्या म्हणजे सुलोचनाबाईंचे यजमान त्यांना आख्खा गाव टरकून राहणारा पण त्याचं सुध्दा सुलोचनाबाईं समोर काही चालायचं नाही. गावाच्या कुठल्या भानगडी ते कधी घरापर्यंत आणायचे नाही. घरी कुणी आलच तर, ‘रातच्याला चावडीवर या, तिथ बोलू की.’ असं म्हणून ते त्याला कटवायचे, दिवाणखान्यातून माजघरात हळूच डोकावत, दबक्या आवाजात म्हणायचे, “ते आमचं सरकार माहीत आहे नव्ह, एकदम कडक लक्ष्मी.” त्यांना कधी कधी वाटायचं आपल्या बायकोच नाव गटाणेबाई असायला हव होत. गरगर डोळे फिरवीत असते सारखी.पण हे आपलं त्यांच्या मनातलच, उघडपणे बोलण्याची त्यांची काय बिशाद होती! टिंग्या त्यांचा नातू तो सुध्दा तात्यांना सुलोचनाबाईंच्या नावाने घाबरवायचं काम करायचा. त्यात त्याला खुप मजा वाटायची, तो हळूच आजोबांना म्हणायचा,
“ काय आजोबा आजीला सांगू का, काल खळा मध्ये हातावर तंबाखू चोळून खात होता ते!”
तोंडावर बोट ठेवीत ते त्याला हळूच ‘चूप’ म्हणायचे. आणि दुसरे दिवशीचा चॉकलेटचा वायदा व्हायचा. टिंग्या पण भारीच गुपचूप चॉकलेट कस वसूल करायचं आणि ते आजीला नकळत गुपचूप कसं गट्टम करायचं ते त्याला चांगल माहित होत. तरी सुध्दा कधीतरी तो पकडला जायचा, मग काय बोलता!
त्या दिवशी असचं परसदारी बसून चॉकलेट गट्टम करणाऱ्या टिंग्याचा कान पकडून त्या त्याला दिवाणखान्यात घेऊन आल्या, घरातल्या सगळ्या माणसांकडे गरागरा डोळे फिरवून,खड्या आवाजात म्हणाल्या, “ह्या सिंच्याला कुणा बेण्यानी चॉकलेट दिल? कुणाची कुठली कागाळी लपवली ह्या टिंग्याने? काय हो तुम्ही काय केलसा?” ह्यावर तात्या गडबडून गेले, इकडे-तिकडे बघत चाचरत म्हणाले, “नाय बा, तसं काही नाही.” अस म्हणताना कधीमधी तात्यासाहेबांना रागाने गुद्दे घालणाऱ्या सुलोचनाबाईंच त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. आणि तोंडावर हात घेऊन ‘अग आये’ म्हणत कळवळणारे स्वत: त्यांच्यासमोर उभे राहिले. मग ह्यावर सुलोचनाबाईं त्यांच्या धाकट्या मुलाकडे तिरका कटाक्ष टाकीत म्हणाल्या, “काय र संभाजी, मेल्या चोरून सिगारेट ओढलीस की काय?” संभाजी समोर आख्या चावडी समोर आपल्याला काठीने बडवणारी आई उभी राहिली. करण काय तर शुल्लक मित्रांना सिगारेट पुरवल्याच. ह्यावर संभाजी घाबरत एकदम बोलून गेला, “नाय नाय तसं काय बी नाय आई, तात्यांनी दिलया त्याला चॉकलेट.”
त्यावर तात्या सुलोचनाबाईंची नजर चुकवत, डोक्याच्या टकलावर हात फिरवत गुळमुळीत बोलले. “म्या म्हणतो, जाऊ द्या की,कधीतरी बालहट्ट पुरवावा लागतो.” सुलोचनाबाईं दात-ओठ खात पुटपुटल्या, “म्या बघतेच आता, बालहट्ट की तुमचा हट्ट!(तेवढ्यात तात्या तिथून सटकले) मग सुनेवर त्या फिस्कारल्या,
“कुमे लेकाकडे लक्ष ठेवत जा गो, काय बी पोरांना वळण नाय. ती सोनी कवाबी बघावं तवा गळ्यात झिंज्या घेऊन सर्वांसमोर नाकातली मेकड काढत बसतीय, अन पुन्हा तीच बोट तोंडात घालतीया.” कुमुद खाली मान घालून म्हणाली, “ व्ह्य जी बघते म्या. बर आत्ताला किती भात टाकू म्हणता?” असा विषय बदलत कुमुद स्वयंपाकघरात निघून गेली. मनात चरफडत राहिली. मनातल्या मनात म्हणाली, पोर आहे ते, खाल्ल कधीमधी चॉकलेट तर कुठे बिघडल? लगेच थोडेच दात किडणार हायेत? अन त्या म्हणतात त्याप्रमाणे सुकामेवा बी देत असतेच की! पन न्हाय म्हातारी जिथ तिथ नाक खुपसणारच! अन ती सोनी बापावरच तर गेलीया. ह्यांना पण सारखी सर्दी होतीया. सारख नाक तर पुसत असतात. पण कोण बोलणार म्हातारीला? कांगावा करत झिंज्या उपटायला येईल. रोज उठून चहा किती करू पासून दिवस सुरु होतो तो रातच्याला आता झोपायला जाऊ का हे विचारून संपतो. कधी आपल्या मनानं काही करायचं नाय. अन ह्यांनी बी सांगून ठेवलय, आईला दुखवायचं नाय. तीच समद बरोबर असत. म्हणजे आमी येड म्हणायचं की काय? ह्या म्हणे चार बुक शिकून शान्या आणि आम्ही बारावी शिकून येड्या? आता पंधरा-वीस दिवस जाणार आहेत ते बर हाय. जरा तरी सुटका व्हईल. श्वास घेण बी ह्यांच्या इशाऱ्यावर चालल हाय. चांगली मजा करून घेऊ. अस मनात म्हणत असताना कुमुदला स्व:तशीच खुदकन हसू आलं. लग्न होऊन वर्ष झालेली नवी सून शालिनी ताट वाट्या घेण्यासाठी स्वयंपाकघरात आली. ती न बोलून भारी धूर्त. तिने कुमुद्च्या चेहऱ्यावरच हसू नकळत टिपलं, तशी हळूच तिच्या कानाला लागली,
“काय वहिनी सासूबाई चारीधाम यात्रेला जाणार म्हणून खुश ना?” कुमुद एकदम लाजली आणि मानेनेच हो म्हणाली. शालिनी म्हणाली, “वहिनी ह्या गेल्यावर आपण पण चार दिवस कोल्हापूरला जाऊन मजा करून येऊ या. अन त्या आल्यावर त्यांना सांगायचं, ‘देवीच्या दर्शनाला गेलो होतो म्हणून.’” कुमुद्च्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाची लहर उमटली. तिची कळी खुलली. ती म्हणाली,
“शाली तुझ बरय बाई तुला काही बाई सुचतया, आमच्या डोक्यात असल काही बाई कधी येत नाही. पण खरच आपण मज्जा करू या!” अस म्हणत भाकरीच्या हातानेच कुमुदने शालिनीला टाळी दिली. तेवढ्यात सुलोचनाबाईंनी आत डोकावल आणि खडा आवाज दिला,
“ आजच्या दिवसात जेवायला मिळतय नव्ह? का येऊ मी आत? शालिनीने दाताने जीभ चावली आणि मधाळ आवाजात मान वेळावून म्हणाली, “हं झालच पाच मिनिट फक्त”
सुलोचनाबाईं शालीनीच्या मधाळ बोलण्याला थोड्या पाघळल्याच, डोळ्याच्या कोनातून तिरका कटाक्ष टाकत बघणाऱ्या कुमुदचा थोडा जळफळाट झाला, तिच्या मनात आलं आपल्याला का कधी असं जमत नाही? ती बाहेर शिकायला व्हती नव्ह शहरात, म्हणून सुचतय सार.
इकडे तात्यांनी अप्पासाहेबां बरोबर खलबत करायला सुरुवात केली. आप्पासाहेबांच्या पाठीवर थाप मारत ते म्हणाले, “चला बर झालं, ह्या समद्या चार-पाच बायका चारी धामला जातील.मग आपली इकडे धामधूम सुरु होईल. गावातून व्हिस्कीच्या बाटल्या मागवल्या आहेत. त्या तेवढ्या तुझ्याकडे ठेवून घे बाबा. आमच्या राणी सरकारांपुढे साध नाव काढायची बी हिम्मत नाय. साला मुलासुना समोर आपली इज्जत काढून मोकळी व्ह्तीया.”
“साल झिंग येई पर्यंत झिंगाट प्यायचं. आमच्या घरी ये तू, मी एकलाच राहणार. तुझ्याकडे बाबा तुझा मोठा खटला हाय.” अप्पासाहेब तात्यांना म्हणाले. तात्यांनी मान डोलावली. तात्यांची सगळी जुळवाजुळव plan तयार झाले. कधी एकदा सुलोचनाबाईंचा पाय घराबाहेर पडतोय याची ते वाट पाहू लागले.
धाकट्या संभाजीने रोज एक नवीन मुव्ही बघण्याचे मनसुभे रचले. आणि हो त्याला आता राजरोस सिगारेटचे झुरके घेता येणार होते. त्यालाही थोडे मनाप्रमाणे जगून घ्यायचे होते.
दोन्ही मोठी मुलही खुशीत होती. त्यांना मोकळेपणे आपल्या बायकांशी वागता बोलता येणार होते. मागे सारखा आईचा धाक राहणार नव्हता. पण नातवंड निष्पापपणे आजीला विचारत होती, “आजी तू नसताना आम्ही शुभंकरोती म्हणायचं नाही का?” त्यावर सुलोचनाबाईंनी डोळे वटारले आणि म्हणाल्या, “अस नाही हं करायचं रोज नियमितपणे म्हणायचं, आईला संध्याकाळी देवापुढे दिवा लावायला आठवण करायची. म्या मग तुमासनी तिकडून येताना खाऊ आणि खेळणी घेऊन येणार आहे.” टाळ्या पिटत टिंग्या आणि सोनी म्हणाले,
“आजी तू विमानातून जाणार? विमानात बसलेला सेल्फी काढ आम्हाला दाखवायला.”
“व्ह्य बा तुमच्या पप्पान त्ये मोबाईल दिलाय नव्ह. त्यासनी मला तेवढ शिकव म्हणावं” टिंग्या सरसावून म्हणाला, “ आजी मी शिकवतो, आण तो मोबाईल.” ते पाहून सुलोचनाबाईं स्व:तशीच पुटपुटल्या, “च्या मारी त्या मोबाईलची, नाही ते फाजील लाड पोरांचे!” तिथ उभ्या असलेल्या शालिनीला फसकन हसायला आल. सुलोचनाबाईंची नजर जाताच ती तिथून सटकली.
घराचा कुठला तरी कोपरा धरून बसणारी, घरात आश्रीता सारखी वावरणारी नणंद, तिलाही थोड मोकळ वाटत होत.तिला माहित असणारी, पण सुलोचनाबाईंच्या पासून सुनांनी लपवून ठेवलेली गोष्ट होती. तो म्हणजे तिच्या हातातला हुकमी एक्का होता.मनातल्या मनात सांगू का नको अशी तिची चलबिचल चालू होती. शेवटी एकदा दात विचकत ती म्हणाली,
“ वहिनी अग परवा तू निघणार ना? इथली काही काळजी करू नकोस मी आहेच ना, मी सार निभावून नेईन.”
“ त्यात निभाऊन नेण्यासारख काय बी नाय. सर्व मार्गासनी लावलय म्या. कुंदा, शालिनी बघतील नव्ह सार. तुमी आपलं गप गुमान रहा.”
“तेच तर म्हणतीय मी, तुला कायपण ठाऊक नाही. शालिनी पोटुशी हाय. ते टेस्ट का काय करून आली परवा. पण तू चारीधामला जाणार म्हणून बोलली नाय. पण मी आहे. बघते मी”
एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली गेल्यामुळे सुलोचनाबाईंचा राग एकदम अनावर झाला. फणकारत त्यांनी शालिनीला हाक मारली, “ शाले म्या काय ऐकते ते खर हाय नव्ह?”
कळून न कळल्या सारख करत शालिनी नेहमीप्रमाणे मधाळ आवाजात म्हणाली,
“काय म्हणता जी सासूबाई?”
“सटवे पोटुशी हाय ते माझ्यापासून लपवून ठेवलस व्ह्य?” खाली मान घालत शालिनी म्हणाली, “नाही म्हणजे ते सर्वांचे तसे म्हणणे होते.”
“अस व्ह्य” म्हणत डरकाळी फोडल्या प्रमाणे सुलोचनाबाईंनी आपल्या दोन नंबरच्या मुलाला हाक मारली. “ सुन्या, म्या म्हणते इकडे ये आधी, माझ बुकिंग रद्द करायचं, आता इथच माझी काशी आणि इथच माझा विश्वेश्वर.”
पोरासोरांपासून मोठ्यापर्यंत भराभरा सगळी दिवाणखान्यात जमा झाली. सर्वाना झाल्या गोष्टीचा अंदाज आला. तरी कुमुद म्हणालीच, “काय हो आत्या? काय हे?”
आत्या थरथर कापत कोपऱ्यात उभी राहिली. सर्वांच्या मारक्या म्हशी सारख्या नजरा आत्यावर रोखल्या गेल्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults