तुम्ही कधी जीवघेण्या प्रसंगातुन वाचला आहात का..??

Submitted by DJ.. on 2 September, 2019 - 07:35

कधी कधी एखादा प्रसंग आपल्या जीवावर बेततो.. पण त्याची जाणीव तेव्हा न होता प्रसंग घडुन गेल्यानंतर होते.. ज्यावेळेस आपण तो जीवघेणा प्रसंग पुन्हा-पुन्हा आठवुन बघतो तेव्हा मात्र आपण आत्ता खरेच जिवंत आहोत का हे चिमटा काढुन पहावेसे वाटते.

१. मला अजुनही आठवते, मी ३रीच्या उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी गेलेलो. आई आणि लहान बहीण सोबत होतेच. तिथे मामा सर्व भाचेकंपनीला विहिरीमधे पोहायला शिकवत होते. ३-४ ट्युब्स होत्या. आम्ही नवशिके कमरेला बांधुन पाण्यात पोहत असु. ज्या नवशिक्यांची पाण्याची भिती कमी झाली त्यांना ट्युब्स सोडुन कमरेला दावे बांधुन मामा पोहायला शिकवत होते. ३-४ दिवस ट्युब्स लावुन पोहल्यावर ५ व्या दिवशी अचानक माझी ट्युब सटकली आणि मी विहिरीत बुडालो. मला मात्र मी बुडतोय हेच लक्षात आले नाही. बुडता-बुडता मी "आई... आई.." असे ओरडायचा प्रयत्न केला पण तोंडातुन आवाज येण्याऐवजी फक्त बुडबुडेच आले. मला पोहणार्‍यांचे पाय दिसु लागले. एवढ्यात कोणीतरी मला हाताला धरुन वर काढले. तो भयंकारी प्रसंग आठवला तरी माझा अजुन थरकाप होतो. त्यानंतर मी कधिही ट्युब बांधली नाही. एकाच वेळेस ३-४ जणांना पोहण्यास शिकवु नये हा परिपाठ देखील मला पोहणे शिकायच्या आधीच मिळाला. बुडण्याच्या भितीमुळे मी नंतर तब्बल ३ वर्षं विहिरीत पाय ठेवला नाही. नंतर माझ्या वडिलांनी आम्हा सर्व भावंडांना अतिशय योग्य रित्या पोहायला शिकवले.

२. मी सहावीत असताना सकाळी ७ वाजता दूध आणायला सायकलने १ किलोमीटरवर असणार्‍या वितरकाकडे जायचो. त्याकाळी पिशव्यांमधे मिळणारे दूध वितरक फार कमी. त्यामुळे दुधाची गाडी येण्याआधीच ३०-४० जण वितरकाच्या दुकानापुढे लाईन लाऊन उभे असायचे. लवकर जाऊन लाईनमधे उभे राहता यावे म्हणुन मी वेगात सायकल चालवुन तिथे लवकरात लवकर पोहचण्याचा प्रयत्न करायचो. त्या दिवशी मी सकाळी असाच तुफानी वेगात पॅडल मारत रस्त्याने जात होतो. एके ठिकाणी २-३ बस, ट्रक्स, ३-४ कार आणि ५-६ टु व्हीलर्स एकामागोमाग एक थांबलेले दिसले. ते का थांबलेत हे माझ्या लक्षातच आले नाही.. मी माझी सायकल उजवीकडुन तशीच दामटली. तर विरुद्ध बाजुलाही वाहनांची रांग लागलेली दिसली. एवढ्या सकाळी हे सर्व का उभे आहेत हे कळण्या-आधीच एक माणुस जोरात ओरडला.. "थांबव..थांबव.." आणि एक पाठमोरा डंपर माझ्या अगदी जवळ येऊन करकचुन ब्रेक लावुन थांबला... एवढ्यात ४-५ जण माझ्याकडे बघत "मरायचंय का रे.." असं म्हणाले. तेव्हा मला कळाले की ते सर्वजण रस्तारुंदीकरणाच्या कामासाठी खडी ओतायला आलेल्या डंपरसाठी थांबले होते. आणि तो डंपर खडी ओतण्यासाठी रिव्हर्स गीअर मधे असताना मी त्याच्या मागुन निघालो होतो.. हे सर्व मला तिथुन फार पुढे गेल्यावर लक्षात आले आणि तिथुन पुढे सायकल असो वा टु व्हील्र अथवा फोर व्हीलर.. पण गाडी चालवताना चारीठाव लक्ष ठेवण्याची सवय आपोआप लागली.

तुम्हाला कुणाला असे अनुभव आले आहेत का..? धागा काढण्याचा हेतु हाच की अशा अनुभवांनी एक शहाणपण येते आणि आपण त्या चुका करणे टाळतो.. आपल्या आसपासच्यांना पण हे अनुभव सांगितले की ते देखील 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे शहाणे होतात. आपण त्यांचे अनुभव ऐकले तर आपणही शहाणे होऊन वेळीच सावध होतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. मी रस्ता क्रॉस करताना सगळ्या गाड्या थांबल्यावरच करते. पण सगळ्या गाड्या थांबलेल्या असुनही त्यादिवशी एक टॅक्सी डाव्या बाजुने भरधाव आली. खुप्पच स्पीडमधे. मी अगदी सेकंदासाठी पुढे झाले जोरात. नाहीतर मला उडवलंच असतं. सगळेजण त्याला ओरडत होते पण तो तसाच सुसाट गेला. नंतर बराच वेळ माझे हातपाय थरथरत होते.
२. मी लहान असताना (१६-१७) आम्ही घरातील सगळ्या बायका भाजी वैगेरे निवडत बसलो होतो. माझ्या भावाचं लग्न होतं. सगळ्या आत्या आल्या होत्या. सगळे जमलो की आम्ही खुपच गप्पा मारतो आणि हसतो तर खुपच. तर भाजी निवडताना मी हाजमोलाची गोळी खात होते आणि हसणं गप्पा चालुच होत्या. ती गोळी चुपुन अजुनच पातळ झाली होती. हसता हसता ती गोळी माझ्या घश्यात / श्वासनलिकेत जाउन अडकली. मी अगदी तडफडले होते तेव्हा. श्वास जोरात घ्यायचा प्रयत्न करत होते. सगळे घाबरले. एखादं मिनिट पण जास्त वाटलेला तेव्हा. मग ताईला सुचलं आणी माझ्या पाठीत मारायला लागली तेव्हा गोळी बाहेर पडली. तेव्हापासुन मी हाजमोलाची गोळी खात आही. मुलांनाही कधी घेउ देत नाही Happy

अमेरिकेत मैत्रिणीच्या गाडीतून कार पूल मार्गिकेतून ७० mph स्पीडने जात होतो. माझा शहर जवळ आलं म्हणून एक्झिट रंप वर जायचा विचार चालू होता. मला काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. पण इतर कुणालाच काही ऐकू आले नव्हते. लेन बदलताना मैत्रिणीला काहीतरी बिघडलंय जाणवलं. इंजिन ओईल वार्निंग दिवा लागला. ४ लेन ओलांडेपर्यंत अचानक इंजिन बंदच पडलं. सुदैवाने एक्झिट रंप उताराचा होता. मोमेंटम मुळे कडेच्या आपत्कालीन लेनपर्यंत पोचलो आणि गाडी थांबवली. इंजिन ओईल आणून घातलं तर सगळा गाडीखाली वाहून गेलं. दुसऱ्या मित्रांच्या गाडीतून सगळे माझ्या घरी आले आणि एक दोघांनी गाडी टो करून सर्विस सेंटरला न्हेली. नंतर कळाले मैत्रिणीने १-१.५ महिन्यापूर्वी सर्विस केलेली, तेव्हा इंजिन ओईल फिल्टर बरोबर बसवलेला न्हवता. इतक्या दिवसात फार फार तर ४-५ मैल सलग चालवलेले त्यामुळे लक्षात आले न्हवते. ह्या वेळेस सलग ३-४०० मैल चालवली गेली आणि कंपनामुळे फिल्टर निघून आला. पुरे इंजिन ओवरहॉल करावे लागले.
सुदैवाने शहरात शिरण्यासाठी गाडी हळू करत कडेच्या मार्गिकेत आणत होतो. सुदैवाने एक्झिट रंप उताराचा होता म्हणून ७० mph वरून वेळेत आणि सुखरूप थांबलो. कारपूल लेनमध्ये एरवी सगळे ७०-८० च्या वेगाने जातात. त्या लेनमधेच बंद पडली असती मग? Sad

मी एकदा शेतावर झाडाची फांदी तोडत होतो. झाडावर असतानाच फांदी अर्धवट तुटून तिचा काही भाग थ्री पेजच्या तारांमध्ये अडकला. मी कुर्हाडीचा शेवटचा टोला मारला व डायरेक्ट खाली उडी मारली. फांदी खाली आली व मोठा विजेचा लोळ उठला पण मला विजेचा धक्का बसला नाही.
एकदा घाटामध्ये कार मोठ्या ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून अचानक मोठा डंपर आला. मी नेमका ट्रकच्या बाजूला व समोरचा डंपरवाला सरळ अंगावर आला. काही सेंटीमीटर जवळून डंपर पास झाला. कसा वाचलो यावर विश्वास बसत नाही. कारमधील नातेवाईक " आई गं" स्स स्स असे ओरडले होते. समोर अक्षरशः मृत्यू दिसत होता .

२००१ सालची गोष्ट. माझ्या ऑफिसात पाणी पिण्याच्या कुलरजवळ काचेचे ग्लास ठेवलेले असायचे. मी पाणी पिण्यास जाण्याआधी ज्याने कुणी पाणी प्यायले, त्याने तो ग्लास कदाचित जोरात आपटला असावा. त्या ग्लासच्या कडेचा एक टवका अगदी भाल्याच्या टोकाच्या आकारात निघाला. मग मी पाणी पिताना काहीतरी कठीण वस्तु पाण्यात असल्याची मला पुसटशी जाणीव झाली व केवळ प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन ते पाणी मी थुंकलो. तर त्यात तो काचेचा तुकडा. तेव्हापासुन काचेचा ग्लास दिसला की मी त्याच्या कडा आधी तपसुन पाहतो....

माझे माबोवरील स्नेही माऊताई व कान्दामुळा आज असते तर यांनी त्यान्च्याबाबतीतले काही किस्से नक्किच सन्गितले असते व धागालेखकाला आणखी प्रतिसाद मिळाले असते. अर्थात त्यांच्या किस्स्यांत सत्य किती असते तो भाग वेगळा.

कांदा मुळा मी उपटून टाकला याचं मला वाईट वाटतं. राहून राहून अंधार जोशी, हनुमंत मारणे, आपटे, म्याऊ यांची आठवण येते. आज असते तर बरेच किस्से तिखट मीठ लावून लिहिले असते.