व्यसन

Submitted by मिलिंद जोशी on 31 August, 2019 - 05:44

मला एक विचित्र व्यसन लागलेले आहे. बरे व्यसन म्हटले की बऱ्याच वेळेस लोकांना ते लगेच लक्षात येते, काही वेळेस लोकं टीव्ही वरील विविध व्यसनमुक्तीचे प्रोडक्ट वापरायला लावतात, काही वेळेस त्या व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखलही केलं जातं. पण जी व्यसने दिसत नाहीत त्याला कोण काय करणार? या एका व्यसनामुळे अजून पर्यंत माझे लग्न ठरू शकलेले नाही. माझी आई माझ्या या व्यसनापायी सूनमुख न पाहता देवाघरी गेली. पण अजूनही माझ्या या व्यसनावर मला काही उपाय करता आलेला नाही. खूप इच्छा आहे हो माझी... पण...

तो दिवस रविवारचा होता. त्या दिवशी नेहमीप्रमाणे परत एकदा माझ्यासाठी मुलगी पाहण्याचा प्रोग्राम आखला गेला होता. मुलगी बाहेरगावची असल्या कारणाने आणि आम्हाला तिकडे जायला जमणार नसल्याने पाहण्याचा कार्यक्रम आमच्याच घरी ठेवायचे ठरले होते. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, लवकर अंघोळ करणे या सगळ्या नं आवडणाऱ्या गोष्टी मला मनाविरुद्ध कराव्या लागत होत्या. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम माझ्या घरी ठेवलेला मला कधीच आवडले नाही... कारण जर त्या दिवशी माझी बहिण आली नाही, तर माझी आई मलाच चहा करायला सांगायची. एरवी मी चहा खूप चांगला करतो हो... पण अशा वेळी कधी साखरच जास्त, कधी चहा पावडरचं जास्त, तर कधी दुध अगदीच कमी असे होते. साला आपलं नशीबच पांडू त्याला कोण काय करणार? त्या दिवशीही बहिण ट्रीपला गेल्यामुळे येणार नव्हती. म्हणजे परत चहा माझ्याकडेच हे ठरलेलंच.

थोड्याच वेळात मुलगी, तिचा लहान भाऊ आणि आईवडील असे चौघेजण घरात दाखल झाले. मुलगी दिसायला खरंच खूप छान होती... मनातल्या मनात मी ठरवून टाकलं... किमान आपण तरी तिला नकार द्यायचा नाही. ती जरी माझ्याकडे जास्त पहात नव्हती तरी माझे लक्ष मात्र फक्त तिच्याकडेच होते... आईशप्पथ सांगतो... कोण काय बोलत होतं याकडे माझं बिलकुल लक्ष नव्हतं. त्या धूम चित्रपटात उदय चोप्रा जसा कोणतीही पोरगी दिसली की प्रेम चोप्रा बनतो आणि त्या पोरीबरोबर संसार थाटून मोकळा होतो, तशीच काहीशी माझी गत झाली... मनातल्या मनात मी लग्न करून मोकळाही झालो. तितक्यात आईचा आवाज कानावर पडला...

“आता मिलिंद आपल्याला मस्त चहा करून आणेल...”

“अहो कशाला त्यांना सांगताय... आमची ही करेल की चहा...” मुलीची आई तितक्यात बोलली... मनात म्हटले... चला... आपलं काम वाचलं... पण कसचं काय... साला नशीबच पांडू...

“नाही अहो... मिलिंद खूप छान चहा बनवतो... आणि दुसरे म्हणजे मुलांना आतापासूनच कामे सांगितली की त्यांच्यात पुरुषी अहंकार येत नाही आणि मुलीला नंतर त्रास होत नाही.” आई माझ्याकडे पाहात म्हणाली. बहुतेक माझ्या चेहऱ्यावर कोणते भाव उमटतात हे तिला पहायचं असावं... पण मला आईचा स्वभाव माहित होता... तिला जर माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसली असती तर नंतरच्या कपबश्याही मला विसळायला लावल्या असत्या... गुमान उठलो आणि चहा करायला गेलो... त्या दिवशी चहा मात्र खरंच मस्त केला होता... सगळ्यांचे कप भरले आणि बाहेर घेऊन आलो. मुलीच्या वडिलांना, आईला, भावाला चहाचा कप दिला... मुलगी कोणत्या विचारात होती माहित नाही... म्हणून म्हटले...

“ताई... चहा घ्या...”

मी फक्त बोलायचा अवकाश आणि मुलीच्या आईला ठसका लागला... मुलीने एकदम चमकून माझ्याकडे पाहिले आणि मला माझी चूक लक्षात आली...

“सॉरी... सॉरी... चहा घ्या...” मी जरा ओशाळल्या नजरेनेचं म्हटले...

“हं...” तिने ट्रे मधील चहाचा कप हाती घेतला... त्यानंतर इतर गप्पा चालू झाल्या. तेवढ्यात मुलीचे वडील म्हणाले, ‘तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा...’ आता हे प्रश्न विचारणं मला खूप अवघड जात असतं... मुलीचं नांव माहित असतं, शिक्षण माहित असतं, तिची आवड निवडही आधीच बायोडाटा मध्ये सांगितलेली असते. मग विचारणार काय? पण तरीही काहीतरी विचारावंचं लागतं... अशावेळी माझा खूप गोंधळ उडतो.

“आपलं नांव ताई?” मी निरागसपणे प्रश्न केला आणि घट्ट डोळे मिटले गेले, चेहऱ्यावर परत घोटाळा केल्याचे भाव आले. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडेच वळल्या होत्या.

“मिलिंद... हे काय चालवले आहे तू?” आईने जरा रागातच विचारले...

“सॉरी... सॉरी... अगं ते....” पुढचे वाक्य मात्र अर्धवटचं सोडलं... कारण बोलायला काही नव्हतंच... मग आईनंच तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मुलीनेही त्या प्रश्नांची आईला पटतील अशी उत्तरे दिली. काही वेळाने ते जायला उठले तेंव्हा आईने त्यांना घर पहायला बोलावले... मी सगळ्यांचे कप गोळा करत होतो इतक्यात मुलीने माझ्या हातातून ट्रे घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या तोंडून परत एकदा शब्द बाहेर पडले...

“नाही नाही ताई... राहू द्या... मी नेतो की...” आणि परत माझी चूक माझ्या लक्षात आली. ती मुलगी मात्र यांवर मनसोक्त हसली. सगळे घरातून बाहेर पडत असताना आईनं म्हटलं... “कळवा हं...” मुलीच्या आईने होकारार्थी मान हलवली. मुलगी मात्र... “चला... येते मावशी... आणि हो... येते हं दादा...” म्हणून हसतच बाहेर पडली...

तिच्या शेवटच्या वाक्याने त्यांचा काय निर्णय असणार हे आम्ही सगळेच समजलो होतो. शेवटी त्यांची पाठ वळताच आईनं चांगलंच फैलावर घेतलं...

“तुला जर लग्न करायचं नसेल तर तसं सांग... पण असा घरी आलेल्या लोकांचा अपमान करू नकोस...”

“अगं आई... मी मुद्दाम नाही गं काही केलं... मला तर ती मुलगी पसंतही होती. मग मी असं कशाला करेल?”

खरं तर माझ्या बोलण्यावर तिचा मुळीच विश्वास बसला नाही.

“मला वाटतं, तुझ्या या अशा वागण्यामुळं एखादया दिवशी मी सुनेचं तोंड न पाहताच या जगाचा निरोप घेईल आणि मग तुला कुणी लग्न कर म्हणून आग्रहही करणार नाही...” खरं तर ती त्या वेळेस पोटतिडकीनं बोलली होती आणि काळाने तिचे बोलणे खरे करायचा प्रण केला असावा. आईने म्हटल्याप्रमाणेच सुनेचं तोंड न पाहताच या जगाचा निरोप घेतला. ती तर नाही आता राहिली, पण तुम्हाला खरंच सांगतो... मी मुद्दाम असं नव्हतं काही केलं. माझ्या या‘ताई व्यसनाने’ मात्र तिची आणि त्यावेळेस असलेली माझी इच्छा काही पूर्ण होऊ दिली नाही. आता कितीही वाईट वाटले तरी त्याचा काहीच उपयोग नाही हेही मी जाणतो. या व्यसनावर कंट्रोल आणण्याचाही मी कसोशीने प्रयत्न करतो आहे, पण एक गोष्ट तितकीच खरी की व्यसन कोणतंही असो... माणसाचा घात करतचं करतं...

--- मिलिंद जोशी, नाशिक...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणून तुझ लग्न झालं नाहीय हे आत्ता कळालं... पण भारी आहे हे >>>>> आयला... नको त्या ठिकाणी नको ती पोस्ट टाकली की काय??? हेहेहे....