गणेश चतुर्थी व्रत (स्थापना, नित्य पूजा आणि उत्तरपूजा संक्षिप्त)

Submitted by शेखर खांडाळेकर on 25 August, 2019 - 10:04

गणेश चतुर्थी पूजा ( सामान्य मंत्र सहित)
गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाट. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या , पळी , पंचपात्र , २ तुपाची निरंजने, २ ताम्हण , समई, जानवे, फुले, पत्री, एकवीस दुर्वांची जुडी वेगळी निवडलेली, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक , मिठाई , पेढे , गोड पदार्थ
गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रात:स्नान पूजादी नित्यविधी करावेत. घरातील देवाला नमस्कार करावा. कुटुंबातील मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घ्यावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ करून त्यावर रंगीत पाट मांडून , अक्षता पसराव्यात. नंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर आसनावर पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे सम्मुख होऊन बसावे.

आचमन :
पळी पंचपात्र आणि ताम्हण समोर ठेवा. पंचपात्रात थोडे पाणी घ्या. पळीने थोडे पाणी उजव्या हातावर घेऊन ते तीन वेळा प्यावे. त्यावेळी खालील एक एक मंत्र म्हणावा.
केशवाय नमः | (पाणी प्यावे)
नारायणाय नमः | (पाणी प्यावे)
माधवाय नमः स्वाहा | (पाणी प्यावे)
गोविंदाय नमः|
असे म्हणून हातावरून पाणी ताम्हणात सोडावे आणि पुनः हीच कृती करावी आणि हात धुवून घ्यावा.
आता ताम्हण बाजूला ठेवा आणि पाणी शिंपडून ती जागा हाताने स्वच्छ करा. हात ताम्हणात धुवून घ्या. हे ताम्हण हात धुण्यासाठी वगैरे वापरावे.
स्वतःला कुंकू आणि अक्षता लावून घ्या आणि समई पेटवा.

संकल्प ( पूजा करण्याचा हेतू) :
आता दुसरे ताम्हण समोर ठेवा. हे ताम्हण देवास्ताहीच वापरायचे आहे. हातात पाणी आणि अक्षता घेऊन खालील संकल्प करा
श्रीमन् महागणाधिपतये नमः | इष्टदेवताभ्यो नमः| कुलदेवताभ्यो नमः | ग्रामदेवताभ्यो नमः| स्थानदेवताभ्यो नमः | वास्तुदेवताभ्यो नमः | आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः| सर्वेभ्यो देवेभ्यो नमः| सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः |
तिथिर्विष्णु: तथा वार: नक्षत्रं विष्णुरेव च |
योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ||
मम श्रीगणपतिकृपाप्रसादलाभार्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं प्रति-वार्षिक-विहितं पार्थिव-सिद्धिविनायक- पूजनं करिष्ये| प्राणप्रतिष्ठां करिष्ये |

पाणी ताम्हणात सोडा. (रोजच्या संकल्पात प्रति-वार्षिक-विहितं हा शब्द आणि प्राणप्रतिष्ठां करिष्ये म्हणायचे नाही.)

पुन्हा पळीभर पाणी घ्या आणि म्हणा -
आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम् महागणपति स्मरणं सद्गुरुपादुका स्मरणं करिष्ये |

पूजा निर्विघ्न पार पडावी या साठी गणपतीचे ध्यान करावे.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मी देव सर्वकार्येषु सर्वथा ||
श्रीमन् महागणाधिपतये नमः | निर्विघ्नं कुरु |

आता गुरूंचे ध्यान करा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः|
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||
श्री गुरु परमगुरु परमेष्ठिगुरु सद्गुरूपादुकाभ्यो नमः |

आसनविधी :
भूमीला स्पर्श करून नमस्कार करा.

ह्रीं आधारशक्ति-कमलासनायै नमः|

कलश पूजन :
पूजेसाठी पाणी असल्येल्या कलशावर हात पालथा ठेवावा आणि गंगेचे स्मरण करावे

गंगादि सर्व-तीर्थेभ्यो नमः आवाहयामि | पूजयामि|

एक फुल गंध आणि नंतर अक्षतांमध्ये बुडवून कलशाला बाहेरून वाहावे.

घंटा पूजन
घण्टिकायै नमः | पूजयामि| असे म्हणावे.
एक फुल गंध आणि नंतर अक्षतांमध्ये बुडवून घंटेला वाहावे.

दीप पूजन (समईची पूजा)
दीप-देवतायै नमः| पूजयामि| असे म्हणावे.
एक फुल गंध आणि नंतर अक्षतांमध्ये बुडवून समईला वाहावे.

पंचपात्री मधील पाणी टाकून द्या आणि नवीन पाणी भरून घ्या.

शुद्धिकरण :

पळीत पाणी घ्या. पुंडरीकाक्षाय नमः | असे म्हणून फुलाने ते पाणी पूजा साहित्यावर आणि स्वतःवर शिंपडा . पाणी ताम्हणात टाका.

प्राणप्रतिष्ठा :
मूतीर्च्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या करंगळी आधीच्या दोन बोटांनी स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचा पुढील मंत्र म्हणावा.
अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वमचार्यै मामहेति च कश्चन।।

पराप्राणशक्त्यै नमः| आवाहयामि| स्थापयामि| पूजयामि|
नंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व लगेच त्याच्या डोळ्यासमोर समोर थोडे गूळ खोबरे अथवा दूध धरावे.
नैवेद्य खाली ठेऊन, एक फुल घेऊन, गंध आणि नंतर अक्षतांमध्ये बुडवून गणपतीला वाहावे. उदबत्ती ओवाळावी, हात जोडावे.
मगासच्या नैवेद्याखाली पाण्याने चौकोन काढावा. सभोवती गोलाकार पाणी फिरवावे. डावा हात आपल्या छातीवर ठेऊन उजव्या हाताने नैवेद्याच्या पत्राला स्पर्श करावा आणि खालील मंत्र म्हणावेत.
पराप्राणशक्त्यै नमः नैवेद्यं समर्पयामि |
प्राणाय नमः| अपानाय नमः| व्यानाय नमः| उदानाय नमः| समानाय नमः| ब्रह्मणे नमः|
ताम्हणात चार वेळा पळीने पाणी सोडावे.
आपोषणं, हस्त-मुख-प्रक्षालनं, आचमनीयं च समर्पयामि|
अनेन पूजनेन परा-प्राणशक्ति: प्रीयताम् |

असे म्हणून ताम्हणात पाणी सोडावे.प्राणप्रतिष्ठेचा प्रसाद कोणीही खाऊ नये. झाडात घालावा अथवा पशु पक्ष्यांना द्यावा.
ध्यान:
अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर नमस्कार करावा. गणपतीचे ध्यान करावे
एकदंतं शूर्पकर्णम् गजवक्त्रं चतुर्भुजम्।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ||

आवाहन : (हे केवळ पहिल्या दिवशी करावे)
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।
असे म्हणून मूर्तीला आवाहन सूचक अक्षता अर्पण कराव्यात.

इथपासून पुढील सर्व क्रम रोजच्या पूजेसाही चालेल

आसन :
पुढील मंत्र म्हणून श्रीगणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि।।

पाद्य : पुढील मंत्र म्हणून श्रीगणेशांच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पादयो: पाद्यं समर्पयामि।।

अर्घ्य : पुढील मंत्र म्हणून पळीभर पाण्यात गंध , अक्षता , पुष्प घालून त्यातले पाणी फुलाने , अर्घ्य म्हणून श्रीगणेशांना अर्पण करावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।

आचमन : पुढील मंत्र म्हणून श्रीगणेशावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आचमनीयं समर्पयामि।।

स्नान : पुढील मंत्र म्हणून श्रीगणेशावर फुलाने स्नानासाठी पाणी अर्पण करावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। स्नानम् समर्पयामि।।

पंचामृत स्नान : पुढील मंत्र म्हणून श्रीगणेशावर दूर्वांनी पाच वेळा पंचामृत अर्पण करावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।

पुन्हा स्नान :
नंतर चार वेळा पाणी शिंपडावे.
शुद्धोदक स्नानं , आचमनीयं च समर्पयामि|

वस्त्र :

पुढील मंत्र म्हणून श्रीगणेशांना कापसाचे वस्त्र अर्पण करावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। वस्त्रम् समर्पयामि।।

जानवे घालणे : श्रीगणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली जाणारे जानवे अर्पण करावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।

गंध लावावे :
फुलाला गंध लावून गणेशाच्या पायाजवळ वाहावे. शेंदूर, हळद, कुंकू, अष्टगंध, बुक्का इत्यादी वाहावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। चंदनम् समर्पयामि तथा परिमल द्रव्याणि समर्पयामि|

अक्षता वाहणे:
श्रीसिद्धिविनायकाय नम:। अक्षतान् समर्पयामि।।

फुले, पत्री इत्यादी वाहणे:

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पत्र - पुष्पाणि समर्पयामि।।

असे म्हणून अनेक प्रकारची फुले , दुर्वा , शमी व अन्य पत्री श्रीगणेशांना अर्पण कराव्यात. या दिवशी गणेशाला तुळस वाहावी.
देवासमोर पाण्याने चौकोन काढून त्यावर नैवेद्य ठेवावा. गं गणपतये नमः| असे म्हणून तुळशीपत्राने नैवेद्यावर थोडे पाणी शिंपडावे आणि तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवावे.

धूप: डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।

तुपाचे निरांजन ओवाळणे :
श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।

नैवेद्य :
नैवेद्या सभोवती गोलाकार पाणी फिरवावे. डावा हात आपल्या छातीवर ठेऊन उजव्या हाताने नैवेद्याच्या पत्राला स्पर्श करावा आणि खालील मंत्र म्हणावेत.
श्रीसिद्धिविनायकाय नमः नैवेद्यं समर्पयामि |
प्राणाय नमः| अपानाय नमः | व्यानाय नमः| उदानाय नमः | समानाय नमः| ब्रह्मणे नमः|

मध्ये एकदा पळीने ताम्हणात पाणी सोडावी आणि मंत्र पुन्हा म्हणून नैवेद्य परत दाखवावा.
ताम्हणात चार वेळा पळीने पाणी सोडावे.
आपोषणं, हस्त-मुख-प्रक्षालनं, आचमनीयं च समर्पयामि|

देवासमोर विडा आणि सुपारी ठेवावी त्यावर दक्षिणा ठेवावी. तीच तीच सुकलेली पाने वापरू नयेत. त्या पेक्षा विड्या साठी नमस्कार करावा.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पूगीफल-तांबुलं समर्पयामि।।

एकवीस दूर्वा अर्पण :
पुढील मंत्र म्हणून २१ दूर्वांची जुडी श्रीगणेशांना अर्पण करावी.
गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।
एकदंतेभवक्त्रेति तथा मूषकवाहन।।
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।
कुमारगुरवे नित्यं पूजनीयं प्रयत्नत:।।

प्रदक्षिणा : स्वत:भोवती उजवीकडून डावीकडे ३ वेळा गोल फिरावे.
सिद्धीविनायाकाय नमः | प्रदाक्षिणाः समर्पयामि |

नमस्कार : श्रीगणेशांसमोर साष्टांग नमस्कार घालावा.
सिद्धीविनायाकाय नमः | नमस्कारं समर्पयामि |

मंत्रपुष्प : गणेशांना ओंजळीने फुले वाहावीत
विनायकेशपुत्र त्वं गणराज सुरोत्तम।
देहि मे सकलान् कामान् वंदे सिद्धिविनायक।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। मंत्रपुष्पम् समर्पयामि।।

प्रार्थना : हात जोडून पुढील प्रार्थना करावी.

यन्मयाचरितं देव व्रतमेतत् सुदुर्लभम्।
गणेश त्वं प्रसन्न: सन् सफलं कुरु सर्वदा।।

विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत।
पार्वतिप्रिय विघ्नेश मम विघ्नान् निवारय।।

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर।।

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तितहीनं सुरेश्वर।
यत्पूजितं मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम।
तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।।

पूजन-सांगता-हेतवे विष्णु-स्मरणं करिष्ये असे म्हणून विष्णूचे ध्यान करावे आणि तीन वेळा “ विष्णवे नमः” असे म्हणावे
मग पळीभर पाणी हातात घेऊन खालील वाक्य म्हणावे
अनेन कृतेन पूजनेन श्रीसिद्धीविनायक: प्रीयताम् | पाणी ताम्हणात सोडावे.

आचमन करावे .
पळीने थोडे पाणी उजव्या हातावर घेऊन ते तीन वेळा प्यावे. त्यावेळी खालील एक एक मंत्र म्हणावा.
केशवाय नमः | (पाणी प्यावे)
नारायणाय नमः | (पाणी प्यावे)
माधवाय नमः स्वाहा | (पाणी प्यावे)
गोविंदाय नमः|
असे म्हणून हातावरून पाणी ताम्हणात सोडावे आणि पुनः हीच कृती करावी आणि हात धुवून घ्यावा.

आरती करावी. त्यानंतर सदा सर्वदा, मोरया मोरया वगैरे श्लोक म्हणून पुष्पांजली वाहावी.
।। इति पूजाविधी ।।

रात्रीची पूजा
गणपतीचे ध्यान करून
गंध, पुष्प, धूप, दीप नैवेद्य दाखवून आरती करावी.

उत्तरपूजा

गणपती विसर्जन करायच्या वेळी ही पूजा करावी.

आचमन :
पळी पंचपात्र आणि ताम्हण समोर ठेवा. पंचपात्रात थोडे पाणी घ्या. पळीने थोडे पाणी उजव्या हातावर घेऊन ते तीन वेळा प्यावे. त्यावेळी खालील एक एक मंत्र म्हणावा.
केशवाय नमः | (पाणी प्यावे)
नारायणाय नमः | (पाणी प्यावे)
माधवाय नमः स्वाहा | (पाणी प्यावे)
गोविंदाय नमः|
असे म्हणून हातावरून पाणी ताम्हणात सोडावे आणि पुनः हीच कृती करावी आणि हात धुवून घ्यावा.
आता ताम्हण बाजूला ठेवा आणि पाणी शिंपडून ती जागा हाताने स्वच्छ करा. हात ताम्हणात धुवून घ्या. हे ताम्हण हात धुण्यासाठी वगैरे वापरावे.
स्वतःला कुंकू आणि अक्षता लावून घ्या.

संकल्प ( पूजा करण्याचा हेतू) : आता दुसरे ताम्हण समोर ठेवा. हे ताम्हण देवास्ताहीच वापरायचे आहे. हातात पाणी आणि अक्षता घेऊन खालील संकल्प करा
श्रीमन् महागणाधिपतये नमः | इष्टदेवताभ्यो नमः| कुलदेवताभ्यो नमः | ग्रामदेवताभ्यो नमः| स्थानदेवताभ्यो नमः | वास्तुदेवताभ्यो नमः | आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः| सर्वेभ्यो देवेभ्यो नमः| सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः |
तिथिर्विष्णु: तथा वार: नक्षत्रं विष्णुरेव च |
योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ||
मम श्रीगणपतिकृपाप्रसादलाभार्थं श्री सिद्धिविनायक प्रीत्यर्थं गंधादि-पंच-उपचारैः उत्तर पूजनं करिष्ये|

पुन्हा पळीभर पाणी घ्या आणि म्हणा -
आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम् महागणपति स्मरणं सद्गुरुपादुका स्मरणं करिष्ये |
पूजा निर्विघ्न पार पडावी या साठी गणपतीचे ध्यान करावे.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मी देव सर्वकार्येषु सर्वथा ||
श्रीमन् महागणाधिपतये नमः | निर्विघ्नं कुरु |

आता गुरूंचे ध्यान करा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः|
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||

श्री गुरु परमगुरु परमेष्ठिगुरु सद्गुरूपादुकाभ्यो नमः |

गणपतीचे ध्यान करावे
एकदंतं शूर्पकर्णम् गजवक्त्रं चतुर्भुजम्।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ||

गंध लावावे : फुलाला गंध लावून गणेशाच्या पायाजवळ वाहावे. शेंदूर, हळद, कुंकू, अष्टगंध, बुक्का इत्यादी वाहावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। चंदनम् समर्पयामि तथा परिमल द्रव्याणि समर्पयामि|
फुले वाहणे:
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।
असे म्हणून अनेक प्रकारची फुले , दुर्वा श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.
देवासमोर पाण्याने चौकोन काढून त्यावर नैवेद्य ठेवावा. गं गणपतये नमः| असे म्हणून तुळशीपत्राने नैवेद्यावर थोडे पाणी शिंपडावे आणि तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवावे.
धूप: डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावे.
श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।
तुपाचे निरांजन ओवाळणे :
श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।

नैवेद्य :
नैवेद्या सभोवती गोलाकार पाणी फिरवावे. डावा हात आपल्या छातीवर ठेऊन उजव्या हाताने नैवेद्याच्या पत्राला स्पर्श करावा आणि खालील मंत्र म्हणावेत.
श्रीसिद्धिविनायकाय नम:।नैवेद्यं समर्पयामि
प्राणाय नमः| अपानाय नमः | व्यानाय नमः| उदानाय नमः | समानाय नमः| ब्रह्मणे नमः|

मध्ये एकदा पळीने ताम्हणात पाणी सोडावी आणि मंत्र पुन्हा म्हणून नैवेद्य परत दाखवावा.
ताम्हणात चार वेळा पळीने पाणी सोडावे.
आपोषणं, हस्त-मुख-प्रक्षालनं, आचमनीयं च समर्पयामि|

देवासमोर विडा आणि सुपारी ठेवावी त्यावर दक्षिणा ठेवावी.

नंतर आरती करावी.

प्रदक्षिणा : स्वत:भोवती उजवीकडून डावीकडे ३ वेळा गोल फिरावे.
सिद्धीविनायाकाय नमः | प्रदाक्षिणाः समर्पयामि |

नमस्कार : श्रीगणेशांसमोर साष्टांग नमस्कार घालावा.
सिद्धीविनायाकाय नमः | नमस्कारं समर्पयामि |

मंत्रपुष्प : गणेशांना ओंजळीने फुले वाहावीत
विनायकेशपुत्र त्वं गणराज सुरोत्तम।
देहि मे सकलान् कामान् वंदे सिद्धिविनायक।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। मंत्रपुष्पम् समर्पयामि।।

प्रार्थना : हात जोडून पुढील प्रार्थना करावी.

यन्मयाचरितं देव व्रतमेतत् सुदुर्लभम्।
गणेश त्वं प्रसन्न: सन् सफलं कुरु सर्वदा।।

विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत।
पार्वतिप्रिय विघ्नेश मम विघ्नान् निवारय।।
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर।।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तितहीनं सुरेश्वर।
यत्पूजितं मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम।
तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।।

कर्म समर्पण :
पूजन-सांगता-हेतवे विष्णु-स्मरणं करिष्ये असे म्हणून विष्णूचे ध्यान करावे आणि तीन वेळा “ विष्णवे नमः” असे म्हणावे

मग पळीभर पाणी हातात घेऊन खालील वाक्य म्हणावे
अनेन कृतेन उत्तर-अराधानेन श्रीसिद्धीविनायक: सांगः सपरीवारः प्रीयताम् | तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु |
पाणी ताम्हणात सोडावे.
नंतर घरतील सगळ्या मंडळींनी देवास नमस्कार करावा.

आता खालील मंत्र म्हणून देवावर अक्षता टाकाव्या
यान्तु देवगणाः सर्वे पूजां आदाय पार्थिवीम्|
इष्टकाम-प्रसिद्धि-अर्थं पुनरागमनाय च ||

गणपती किंचित हलवावा.
आचमन करावे .
पळीने थोडे पाणी उजव्या हातावर घेऊन ते तीन वेळा प्यावे. त्यावेळी खालील एक एक मंत्र म्हणावा.
केशवाय नमः | (पाणी प्यावे)
नारायणाय नमः | (पाणी प्यावे)
माधवाय नमः स्वाहा | (पाणी प्यावे)
गोविंदाय नमः|
असे म्हणून हातावरून पाणी ताम्हणात सोडावे आणि पुनः हीच कृती करावी आणि हात धुवून घ्यावा.
|| शुभं भवतु||
चतुर्थी उत्सव संपल्यावर ब्राह्मणास किंवा धार्मिक संस्थेस अथवा विद्यार्थ्यास दक्षिणा द्यावी म्हंजी व्रत संपूर्ण होईल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खुप छान माहिती !
ह्या विधिचे आपल्या आवाजात रेकॉर्डींग करुन mp3 स्वरुपात दिल्यास इच्छुकांना लाभ घेता येईल,>>> +१

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
@प्रकाश घाटपांडे १००% पर्यावरणस्नेही आणि शास्त्रोक्त मूर्ती ही आपल्या गावच्या नदीकाठाच्या चिकटमातीतून घडवावी. तसे नसेल तर शेतातली, बागेतली माती चालेल. शाडू आणि पी ओ पी पर्यावरणस्नेही नसल्यामुळे त्यांचा
पुरस्कार करू शकत नाही.
हे व्रत पार्थिव गणपती चे असल्यामुळे मूर्ती मातीचीच हवी. धातूची मूर्ती सजावटीसाठी चालेल.
मूर्ती संबंधी विस्तृत विवेचन आणि चिंतन याच ग्रूपमध्ये २०१६ साली केले आहे.
पार्थिवगणेशपूजा - चिंता आणि चिंतन असे लेखाचे शीर्षाक आहे.

संस्कृत चा विसर पडल्या मुळे काही शब्दांची संधी समजत नाही आहे.
ओडियो असता तर उच्चार समजले असते निट. पण माहिती साठी धन्यवाद.