युध्दस्य कथा : ६. गालबोट

Submitted by ललिता-प्रीति on 3 November, 2009 - 03:59

रात्रीचे साधारण दोन वाजत आलेले होते...
‘बत्ती बुझाव’चा आदेश येऊन जवळजवळ तीस-चाळीस सेकंद होऊन गेले होते. सगळीकडे पुन्हा एकदा मिट्ट काळोख पसरला होता. मात्र माझ्या डावीकडचा पन्नास फुटांवरचा एक टेंभा अजूनही जळत होता. असं व्हायला नको होतं खरं... केवढा धोका होता असा टेंभा जळत ठेवण्यात! तिथे जाऊन पहावं की पुन्हा आपल्या खंदकात जाऊन लपावं? काय करावं??...
खंदकात लपल्यामुळे मला मिळणार्‍या सुरक्षेपेक्षा तो एक टेंभा जळत राहील्यामुळे आमच्या आख्ख्या एअरफोर्स स्टेशनला असणारा संभाव्य धोका टाळणं जास्त महत्त्वाचं होतं. क्षणार्धात मी निर्णय घेतला आणि त्या टेंभ्याच्या दिशेनं पळायला सुरूवात केली. काही सेकंदांतच मी तिथे पोहोचलो. तिथे कुणीच नव्हतं. मी तसाच अजून थोडा पुढे पळत गेलो आणि...

---------------

ऑगस्ट, १९६५.

१९६२ साली वायूदलात भरती झाल्यापासून प्रथमच मला दोन महिन्यांची सलग रजा मिळाली होती. घरी सगळे नातेवाईक, अनेक दिवसांनी भेटलेली मित्रमंडळी यांच्यासोबत सुट्टीचा एक महीना कधी संपला कळलंच नाही.
ते ऑगस्ट महिन्याचे अखेरचे दिवस होते. घरात गणेशचतुर्थीची लगबग सुरू होती. मात्र गणपतीबाप्पा आपल्यासोबत रजा रद्द झाल्याची आणि ताबडतोब कामावर रुजू व्हावे असा आदेश देणारी तार घेऊनच आले. पाकिस्ताननं भारताविरुध्द युध्द छेडलं होतं. घरोघरी विघ्नहर्त्याच्या स्वागताची तयारी सुरू असताना देशावर आलेल्या या संकटाचा सामना करण्याचा आम्हाला आदेश मिळाला होता.
ठरलेल्या मुहूर्तावर घरात आम्ही शांत चित्तानं श्रींची स्थापना केली आणि दुपारनंतर सर्व आप्तेष्टांचा निरोप घेऊन मी निघालो.
आधी बैलगाडी, मग एस.टी.बस, नंतर मीटर गेज रेल्वे आणि तिथून पुढे मेन लाईन रेल्वे अशी मजल दरमजल करत, दोन-अडीच दिवसांच्या प्रवासानंतर मी ५ सप्टेंबरला अंबाला एअरफोर्स स्टेशनवर पोहोचलो. मी तेव्हा तिथल्या भारतीय वायूदलाच्या १८व्या स्क्वॉड्रनमध्ये ‘लीडिंग एअरक्राफ्ट्स्‌मन (एल.ए.सी.)’ या पदावर कार्यरत होतो. कुठे हरियाणातलं अंबाला आणि कुठे उस्मानाबाद जिल्ह्यातलं छोटंसं चार-पाच हजार लोकवस्तीचं आमचं पारा गाव! पण आता ते मागे पडलं होतं. घरच्या आठवणी दारात ठेवून सगळे आपल्या कर्मभूमीवर पुन्हा जमले होते.

अंबाल्याचा वायूदलाचा तळ तेव्हा सर्वात सुरक्षित मानला जायचा. मुळात हे ठिकाण अतिशय नियोजनबध्द होतं. शिवाय इथे ग्रीनफील्डमधे म्हणजेच थेट जंगलातच विमानं ठेवण्याची व्यवस्था होती. झाडीत पूर्ण लपल्याने शत्रूला विमानं सहजी दिसायची नाहीत. साहजिकच पाकिस्तानचा रोख अंबाला शहर आणि इथला सैनिकी तळ यांकडेच जास्त होता.
१९६५च्या युध्दात भारताकडच्या नॅट विमानांचा पाकिस्ताननं अतिशय धसका घेतला होता. आमच्या स्क्वॉड्रनला फक्त चारच नॅट विमानं मिळालेली होती. त्यामुळे सरहद्दीवर हल्ले करून परतलेल्या या विमानांची देखरेख करण्याचंच काम प्रामुख्यानं आम्हाला करावं लागायचं. कमीतकमी वेळेत विमानं पुन्हा जैसे थे करून पाठवावी लागायची. त्यासाठी सलग वीस दिवस आमचा मुक्काम ग्रीनफील्डमधेच होता.
सर्वात सुरक्षित असल्यामुळे अंबाल्याचा विमानतळ त्या भागातला सर्वात व्यस्त विमानतळही होता. शेकडो विमानांची रहदारी तिथे सुरू असायची. असं असूनही आश्चर्याची गोष्ट अशी की रात्रीच्या वेळी विमानाला उड्डाण करण्यासाठी किंवा उतरण्यासाठी तिथल्या धावपट्टीवर क्षणात उजळू शकणार्‍या किंवा क्षणात विझवताही येणार्‍या कायमस्वरुपी विजेच्या दिव्यांची व्यवस्था नव्हती. त्यामुळे धावपट्टीच्या दोन्ही बाजूला डीझेलचे जाड वातीचे शंभर ते सव्वाशे टेंभे ठेवलेले असायचे. इतरवेळी सूर्य मावळल्यावर ते लावले जायचे आणि सर्व विमानांची उड्डाणं आटोपली की विझवून उचलून आणले जायचे. पण युध्दकाळात ते शक्य नव्हतं. दिवस बुडाल्यावर संपूर्ण अंधार (ब्लॅक आऊट) ठेवावा लागे. त्यावर उपाय म्हणून रात्रीच्या वेळेला आम्हा सर्वांना एक अतिरिक्त काम दिलं गेलं होतं.
धावपट्टीच्या दोन्ही बाजूला सत्तर-पंच्याहत्तर मीटर अंतरावर एक मनुष्य आडवा झोपू शकेल असे एकापुढे एक खंदक तयार केले गेले. त्यात आम्ही लपून बसायचो. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून एखादं विमान उड्डाण करतानाची किंवा उतरण्याची सूचना मिळाली की एकजण ‘बत्ती जलाऽऽव, बत्ती जलाऽऽव’ असं ओरडत धावपट्टीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत धावत जायचा. ‘बत्ती जलाव’चा आदेश मिळाला की प्रत्येकानं आपापल्या खंदकातून बाहेर यायचं, पळत जाऊन हातातल्या काडेपेटीनं नेमून दिलेला टेंभा पेटवायचा आणि पुन्हा पळत येऊन खंदकात आश्रय घ्यायचा; विमान उडल्यावर किंवा उतरल्यावर ‘बत्ती बुझाऽऽव’चा पुकारा व्हायचा; तो ऐकताच पळत जाऊन जवळच्या खराब कापडाच्या आणि धाग्यांच्या पुंजक्यानं (कॉटन वेस्ट) टेंभा विझवायचा आणि पुन्हा पळत येऊन खंदकात लपायचं असे आदेश आम्हाला मिळाले होते. यादरम्यान आम्हाला धोका होता तो परिसरात अकस्मात उतरू शकणार्‍या शत्रूच्या पॅराटृपर्स्‌ पासून. म्हणून स्वसंरक्षणार्थ आम्हाला प्रत्येकी ३०३ची एक एक रायफल आणि दहा गोळ्यांचं एकएक मॅगेझिन दिलेलं होतं.
दिवसभर ज्याची त्याची नेमून दिलेली कामं आणि रात्री सर्वांना हे काम... या सगळ्यात खानपान, विश्रांती यासाठी पुरेसा वेळही मिळायचा नाही. बऱ्याचदा तर असंही व्हायचं की ‘रेड ऍलर्ट’चा सायरन वाजायचा आणि भटारखान्यातला स्वयंपाक अर्धवट टाकून आमच्या आचार्‍यांनाही पळावं लागायचं. अशा वेळेला चुलीवरच्या भाज्या पार जळून जायच्या, कुणालाच धड जेवायला मिळायचं नाही. पण असं असलं तरी आमची कुणाचीच त्याबद्दल काहीही तक्रार नव्हती.
इतकं असूनही काम करत असताना आम्हाला सतत हे जाणवायचं की आपला युध्दातला सहभाग अप्रत्यक्ष आहे. कारण धोक्याच्या अनेक सूचना होऊनसुध्दा पाकिस्तानचं एकही विमान अंबाल्यापर्यंत पोहोचू शकलं नव्हतं. या आमच्या जाणीवेला तडा गेला तो १८ आणि २० सप्टेंबर या दोन दिवशी.

१८ आणि २० सप्टेंबरच्या रात्री एक ते तीनच्या दरम्यान पाकिस्तानी विमानांनी अंबाल्यावर बॉम्बफेक केली. एकून बारा बॉम्ब टाकले गेले. त्यांपैकी एक चर्चवर, एक हॉस्पिटलवर, एक ऑफिसर्स मेसच्या बागेत, एक आमच्या रेशन स्टॅन्डवर आणि एक एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या इमारतीवर असे एकूण पाच बॉम्ब फुटले.[*] बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडने फुटू न शकलेले बाकीचे सात बॉम्ब दगड गोळा करून आणावेत तसे गोळा करून आणून ठेवले. ते निकामी करण्याची निराळी गरजच नव्हती कारण ते निकामी अवस्थेतच टाकले गेले होते.[**] सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही पण तरी आता आमच्या मनात धास्ती बसली. अंबाल्याची अशी कुरापत पाकिस्तानला पुन्हा काढू देणं परवडण्यासारखं नव्हतं. नॅट विमानांचा आता अजून अधिक परिणामकारक वापर करावा लागणार होता.
नॅट विमानं हलकी असल्यामुळे अगदी कमी जागेत झपकन्‌ वळू शकायची. त्यांना हवी ती दिशा देणं इतर विमानांच्या तुलनेत अतिशय सोपं होतं. पण ती विमानं नाईट फायटर नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात कुचकामी ठरायची. रात्रीच्या वेळेला गस्त घालण्याचं अथवा हल्ले करण्याचं काम हंटर किंवा तूफानी या जातीची विमानं करायची. मात्र या बॉम्बहल्ल्यानंतर आमच्या वैमानिकांनी रात्रीच्या वेळेला गळ्यात दोन सेलची छोटी बॅटरी लटकवून कॉकपिटमधलं समोरचं इन्स्टृमेंट पॅनल तेवढं फक्त दिसेल अशा बेतानं नॅट विमानांचीही गस्त सुरू केली.

... ती २१ सप्टेंबरची रात्र होती.
आम्ही सर्वजण आपापल्या खंदकात लपलो होतो. रात्री दीड वाजता आमचं जेवण आलं. जेवणाच्या वेळांची अनिश्चितता आता अंगवळणी पडली होती. जेव्हा जे समोर येईल ते खाऊन घ्यायचं याची सवय मात्र प्रत्येकानं लावून घेतली होती.
३-४ पोळ्या आणि त्यावर थोडी भाजी असं दिलं गेलेलं जेवण डाव्या हातावर घेऊन मी जेवायला सुरूवात केली. जेमतेम एखादी पोळी खाऊन झाली असेल आणि इतक्यात ‘बत्ती जलाऽऽव’चा पुकारा ऐकू आला. मी हातातल्या पोळ्या तश्याच पटकन्‌ बाजूला ठेवून दिल्या, पळत जाऊन मला नेमून दिलेला टेंभा पेटवला आणि पुन्हा पळत येऊन खंदकात आश्रय घेतला. परतल्यावर गुडूप अंधारातल्या गवतात माझं जेवण मला कुठे सापडेचना. जास्त शोधाशोध करण्यात अर्थ नव्हता कारण दरम्यान एक विमान उतरलं आणि पाठोपाठ ‘बत्ती बुझाऽऽव’चा आदेश आला.
मी धावत जाऊन माझा टेंभा विझवला आणि मागे वळलो. इतक्यात माझ्या डावीकडचा पन्नास फुटांवरचा एक टेंभा तसाच जळत असलेला मला दिसला...
असं व्हायला नको होतं खरं... केवढा धोका होता असा टेंभा जळत ठेवण्यात! तिथे जाऊन पहावं की पुन्हा आपल्या खंदकात जाऊन लपावं?... काय करावं?? खंदकात लपल्याने मला मिळणार्‍या सुरक्षेपेक्षा तो टेंभा सुरू राहील्यामुळे आमच्या आख्ख्या एअरफोर्स स्टेशनला असणारा संभाव्य धोका टाळणं जास्त महत्त्वाचं होतं. क्षणार्धात मी निर्णय घेतला आणि त्या टेंभ्याच्या दिशेनं पळायला सुरूवात केली. काही सेकंदातच मी तिथे पोहोचलो. तिथे कुणीच नव्हतं. मी तसाच अजून थोडा पुढे पळत गेलो आणि...
तिथे जे दृश्य दिसलं त्यानं माझ्या जीवाचा अक्षरश: थरकाप उडाला...

डाव्या हातात जेवण आणि उजव्या हातात मोडलेला घास अश्या अवस्थेतले, धडापासून फक्त शीरं वेगळी झालेले दोन वायूसैनिकांचे मृतदेह तिथे पडलेले होते. बघून काळजाचं पाणी पाणी झालं. नक्की काय झालं, ते दोघं हातातल्या जेवणासकट एकाच टेंभ्यापाशी काय करत होते काहीही कळायला मार्ग नव्हता.
मी मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरूवात केली. दरम्यान एकच टेंभा सुरू आहे हे पाहून सिक्युरिटीची एक गाडी तिथे येऊन पोहोचली. आम्ही दोन्ही मृतदेह गाडीत ठेवले आणि गाडी निघून गेली. मी पुन्हा माझ्या खंदकात येऊन लपलो. ज्या अवस्थेत ते दोन मृतदेह मला दिसले ते दृश्य डोळ्यांसमोरून जाईना. त्या सैनिकांच्या मृत्यूचं कारण न कळल्यामुळे मनाची अस्वस्थताही जाईना.
‘बत्ती जलाव, बत्ती बुझाव’चं आमचं काम पहाटे चार वाजता संपलं.

या अपघाताबद्दल दुसर्‍या दिवशी जे कळलं ते ऐकल्यावर डोकं सुन्न झालं. हरियाणाचे ते दोन सैनिक एकमेकांचे मित्र होते. त्या दोघांनी मिळून एकच टेंभा पेटवला. त्यावर कहर म्हणजे काही मिनिटांत तो विझवायला परत यायचंच आहे तर मागे खंदकाकडे एवढं अंतर पळत जायचंच कशाला असा अत्यंत आत्मघातकी विचार करून स्वतःजवळची पोळीभाजी खात ते त्याच्या पुढच्या न पेटवलेल्या टेंभ्याजवळ बसून राहीले! दरम्यान गस्तीवर गेलेलं एक हंटर विमान उतरताना धावपट्टीच्या मधोमध न राहता थोडं डावीकडे सरकलं (स्कीड झालं). धावपट्टीच्या शेजारीच बसून जेवणार्‍या त्या दोघा सैनिकांना विमानाच्या ड्रॉपटॅन्कची जोरदार धडक बसली आणि ते दोघं जागेवरच गतप्राण झाले. अपघाताचं कारण कळल्यावर मन विषण्ण झालं....
दोनच दिवस आधी बॉम्बफेकीसारखी भीषण घटना घडूनसुध्दा त्यात कुणालाही आपले प्राण गमवावे लागले नव्हते पण त्यानंतर दोनच दिवसांत हा असा दुर्दैवी अपघात घडला. युध्दातल्या अनिश्चिततेचा अजून एक पुरावा आम्हाला मिळाला.

दिलेली आज्ञा तंतोतंत पाळली गेलीच पाहीजे या सैन्यातल्या अतिशय महत्त्वाच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, केवळ बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळेच त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.
गटात न बसणार्‍या शब्दावर जशी आपण फुली मारून टाकतो तशी नियतीनं त्या दोघांवर फुली मारून टाकली होती. कारण...
‘नभस्पर्शम्‌ दीप्तम्‌’ (टचिंग द स्काय विद ग्लोरी) हे ब्रीदवाक्य मिरवणार्‍या वायूदलात ते दोघं गटात न बसणार्‍या शब्दाप्रमाणेच होते; त्या ‘ग्लोरी’लाच काळीमा फासणारं कृत्य त्या दोघांच्या हातून घडलं होतं...!

---------------

[*] अंबाला कॅन्टोनमेंट परिसरातल्या सेंट पॉल चर्चची या बॉम्बहल्ल्यात झालेली नासधूस आजही पहायला मिळते. (महाजालावरच्या संदर्भावरून)

[**] स्वतःकडच्या तयारीचा पूर्ण आढावा न घेता पाकिस्ताननं आततायीपणे युध्द सुरू केल्याचा तो परिणाम होता. त्या युध्दात पाकिस्तानकडून वापरली गेलेली बरीच शस्त्रास्त्रे, दारूगोळा हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते.

------------------------------------------------------------------------------------

(माझ्या सासर्‍यांचे वायूदलातले मित्र श्री. एम. एन. भराटे यांच्या आठवणींवर यावेळची कथा बेतलेली आहे.)

गुलमोहर: 

तुमच्या युध्दस्य कथेचे सर्व भाग वाचले आहेत... सर्वच कथा युध्दाविषयी वेगवेगळ्या माहिती आणि थरारक अनुभव देणारया आहेत...

मी पण एका दमात वाचुन काढलं, माझा बॉस माझ्य दिशेने येताना दिसला तरी मी वाचतच होतो.
तसं तो माझ्या परयंत आला नाही.
कसले अनुभव आहेत हे.......
थरारक.............
मस्त.

बापरे.....जबरदस्त अनुभव, तुमची लिहण्याची शैली पण सुरेख आहे....आपल्या सैन्यदलास सलाम...

तुमच्या सगळ्याच सत्यकथा अंगावर काटा आणतात. ही देखिल तशीच.

>>>(माझ्या सासर्‍यांचे वायूदलातले मित्र श्री. एम. एन. भराटे यांच्या आठवणींवर यावेळची कथा बेतलेली आहे.)

एक विनंती, आर्म्ड फोर्सेसमधल्या व्यक्तींबद्दल लिहिताना, उल्लेख करताना त्यांचा हुद्दा नावाआधी लावतात असा संकेत असल्याचं ऐकलंय. ते खरं असल्यास श्री. भराट्यांचा हुद्दा लिहिणार का?

Sad

>>माझा बॉस माझ्य दिशेने येताना दिसला तरी मी वाचतच होतो.
फारच थरारक अनुभव दिस्तोय Proud

कुठल्याही जीवरक्षकाला युद्धभूमीवर उतरलेलं असताना अशा प्रकारे मॄत्यू येणं यासारखी वेदनादायक गोष्ट नाही.
काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या सहा अग्निशमन कर्मचार्‍यांचा लिफ्टमध्ये गुदमरुन मॄत्यू झाल्याची बातमी मनाला चटका लावून गेली. नंतर कित्येक दिवस ती बातमी मनातून जात नव्हती. आगीशी लढताना प्राण गमावले असते तर खूप वाईट वाटलं असतं पण त्याची अशी चुटपूट लागली नसती.
'ह्यूमन एरर' मुळे झालेल्या मॄत्यूमध्ये सांत्वनाचे सगळे मार्ग खुंटतात. अस्वस्थता उरते फक्त !

लले ही पुर्ण लेखमालिका खुपच उत्कंठावर्धक आहे. सुरेख म्हणवत नाही, कारण त्यानंतर मनाला टोचणी लागते ग!! निवडक दहा मध्ये टाकला आहे ह लेख!! लेखमाला नाही का टाकता येत निवडक १० मध्ये?

संपूर्ण लेखमालाच अत्यंत सुंदर लिहिलीयेत. इथे बसून अनुभव घेतल्यासारखं वाटतंय. तुमच्या सासर्‍यांना आणि तुम्हांलाही धन्यवाद हे अनुभव सगळ्यांपर्यंत पोचवल्याबद्दल.

बापरे.. युद्धस्य रम्य कथा कोण म्हणेल...काटे आले वाचतांना आणी सैनिकांना स्वतःच्या हलगर्जीपणा मुळे नाहक प्राण गमवायला लागले..अरेरे!! वाईट वाटलं Sad