नलुची गोष्ट !!!!!

Submitted by Sujata Siddha on 5 August, 2019 - 01:14

“या या मंडळी बसा… , अहो sss पाणी आणा जरा , पाहुणे आलेत बाहेर” भाऊंनी ओसरीतून वर्दी दिली तशी सुशीला लगबगीने बाहेर आली आणि ओसरीत आलेल्या पाहुण्यांना बघून तितक्याच लगबगीने परत आत गेली ,आतल्या खोलीच्या दाराशी हळूच जाऊन कुजबुजत्या स्वरात तिने नलूला विचारलं “निलेश्वरी , पाहुणे आलेत बाहेर , भाऊ हाका मारतायत, येता ना ?”
"सुशे मी तुला आणि भाऊंना एकदा सांगितलंय ,मला लग्न करायचं नाही , मी आवरणार नाही आणि बाहेर तर मुळीच येणार नाही करारी आवाजात आतून नलूने उत्तर दिले ,पाठोपाठ खाड्कन कडी घातल्याचा आवाज झाला आणि सुशीला मट्कन खालीच बसली . . तेव्हढ्यात भाऊं ओसरीतून पुन्हा विचारते झाले ," पाणी आणताय ना sss ?" सुशीला परत लगबगीनं उठली आणि बाहेर पाण्याचा तांब्या भांड ठेऊन आली , खाली वाकताना तिने अतिशय अजीजीने भाऊंना आत यायला खुणावलं . थोड्याशा नाखुशीने ते आत आले , " हं …” भेदरलेल्या चेहेऱ्याने तिने नलूच्या बंद खोलीकडे बोट दाखवलं ,ते पाहून भाऊ काय समजायचं ते समजले ,चढलेल्या पाऱ्याने , ते दारापाशी गेले आणि दबक्या आवाजात ओरडले "नीलेश्वरी पटकन आवरून बाहेर यां , मी परत सांगायला येणार नाही " आणि तरातरा बाहेर बैठकीत जाऊन बसले , तरीही आतमधून काहीच हालचाल जाणवली नाही . नलूची वाट बघून ,अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या ,पाहुण्यांची चुळबुळ सुरू झाली , मग मात्र भाऊंनी सरळ सांगून टाकले की मुलगी लग्नाला तयार नाही म्हणून बाहेर येत नाही , हे सांगताना ते अतिशय शरमून गेले पण त्यांच्यापुढे पर्याय नव्हता , खोटं बोलणं त्यांच्या स्वभावात नव्हतं ,पाहुणे काही म्हणाले नाहीत ,अवाक् झाले, मात्र गावात भाऊंचा दरारा इतका होता कि कोणी काही बोललं नाही , पाहुणे जाई पर्यंत ते कसेबसे बसले मग मात्र त्यांना राग अनावर झाला , अशावेळी त्यांचे गर्द मातकट डोळे लाल भडक होत आणि आणखीन क्रूर दिसत ,त्या डोळ्यांना भिऊनच आजवर सुशीला मान खाली घालून जगत आली होती .
पाहुणे गेले आणि हिरवागार वळिचा फोक हातात घेऊन भाऊ जोरात ओरडले "निलेश्वरी SSSSSSSS दार उघडा SSSSSSSSS " त्या आवाजाने अख्खा बंगला दणाणला , नलूच्या पाठची दोन लहान भावंडं घाबरून बाहेर पळाली आणि सुशीला ?... ती तर त्या मुलांपेक्षा जास्त भेदरून स्वतःच्याच मांडीत तोंड खुपसून बसली. कितीतरी वेळ माराचे आणि नलूच्या किंचाळ्याचे स्वर बंगल्यात घुमत राहिले , रात्री कधीतरी सर्व शांत झालं .
टण टण टण… शाळेची घंटा वाजली आणि सगळ्या मुली किलबिल करत आपापल्या वर्गाबाहेर पडल्या , "आता तरी सांग डोळ्याजवळ हा काळा निळा वळ कसला आहे ? " बाहेर पडता पडता मितालीने विचारलं , “पाठीवर खूप आहेत असले वळ , काल रात्री भाऊंनी मारलं !..." हे सांगताना नलूच्या तपकिरी टपोऱ्या डोळ्यातले दोन अश्रू दप्तरावर घरंगळले , पण लागलीच तिनं स्वतः:ला सावरलं . "ठाकूरांच्या मुली रडत नसतात " ती निर्धारानं म्हणाली .
"मार खातात का ठाकूरांच्या मुली ? " मितू ने रागानं विचारलं . यावर नली काहीच बोलली नाही . खाली मान घालून चालत राहिली
"आहिरे SSSSSSSSS " दोघीनीं हाकेच्या दिशेने वळून पाहिलं , लांबून सुलभा पळत येत होती , "चल तुला चै. कु.मॅडम नी बोलावलंय "..तीं धापा टाकत म्हणाली.
"मला… ? .. का?" नलू आठवायला लागली आपण काही खोडी नाही ना केली कुणाची ?
"माहिती नाही , मला सांगितलं त्यांनी कि धावत जाऊन 'निलेश्वरी आहिरे' ला बोलावून आण, आणि सु.दा. पण होत्या तिच्याशेजारीच , माझ्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होत्या ,परवा तु त्यांचा तास सोडून , पाचवीच्या मुलींबरोबर कबड्डी खेळताना पाहिलं त्यांनी तुला ,आता माहिती नाही बाबा काय शिक्षा करणार ? " सुलभा खांदे उडवत म्हणाली .
"काहीही मनच ठोकतेस का गं देशपांडे ?खोटारडी कुठली , उगाच घाबरवू नको तिला , नलू तू जा , मी येऊ का तुझ्याबरोबर ? "
"नको .. ठाकूरांच्या मुली भीत नसतात कधी ! " नली ताठ होऊन बेधडक निघाली आणि मितालीनं कपाळावर हात मारून घेतला , "काय करायचं या ठाकूरांच्या मुलींचं ?" तरातरा पुढे निघालेल्या नलूच्या मागे न राहवून मिताली गेलीच ,पण टीचर्स रूममध्ये मात्र वेगळाच माहोल होता , टीचर्स नलुशी कौतुकाने बोलत होत्या ,त्याचं असं झालं , नली खेळात खूप अग्रेसर होती , तशी शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत ती भाग घ्यायला पुढे असायची , पण खेळात ती अव्वल होती , सणसणीत उंची , बळकट बांधा आणि चपळपणा , आणि हे सर्व कमी कि काय म्हणून परमेश्वराने तिला अत्यंत कुशाग्र बुद्धी दिली होती या सर्वांचा अतिशय कौशल्याने उपयोग करून नली बहुतेक सगळ्या स्पर्धा जिंकत असे , म्हणूनच आता येत्या 'आंतरशालेय कबड्डी स्पर्धेमध्ये ' तिने कॅप्टन म्हणून आपल्या शाळेकरता टीम तयार करावी असं ‘ चैत्राली कुलकर्णी’ बाई उर्फ चै.कु. तिला सुचवत होत्या , आणि नलू ? ती मात्र नाही नाही म्हणत होती .
" अगं नले एवढा मस्त चान्स आहे , सोडू नकोस , का नाही म्हणतेस तू ?मला कळतच नाहीये काय वेडेपणा आहे हा " शाळा सुटल्यावर घरी जाताना मिताली खूपच कळवळून समजावून सांगायला लागली तसं नली म्हणाली ,”जाऊ दे ना ,चल आज कुठेतरी भटकायला जायचं ?आज शाळा लवकर सुटणार होती हे भाऊंना माहिती नाही ” “मी काय विचारतेय आणि तू काय बोलतीयेस “ मिताली वैतागून म्हणाली , तेवढ्यात नलु पाठीवरची सॅक सांभाळत , “ए ए SSS आऊट आहे , चल चल रडीचा डाव खेळायचा नाही , आण इकडे बॉल “ असं ओरडत पुढे पळाली , चार पाच लहान मुलं क्रिकेट खेळत होती , तिथे जाऊन दांडगाईने ती त्यांच्यात खेळायला लागली ,आता हि शाळेची बस येईपर्यंत हलणार नाही , मितालीला ठाऊक होतं .
दहावीसारखं महत्वाचं वर्ष असताना पुणं सोडून , नाशिकच्या शाळेत , ऍडमिशन घ्यावी लागेल असं मितालीला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं , पण काही कारणांमुळे तिला ती घ्यावी लागली. आजीकडे राहण्याची सोय करून मितालीचे आई बाबा पुण्याला निघून गेले , शाळेच्या पहिल्या दिवशी बस साठी उभी असताना तिला पहिल्यांदा नलु दिसली आणि दिसली तीच मुळी शाळेच्या गणवेशात मुलांबरोबर लगोऱ्या खेळताना.. , दणकट बांधा तरी प्रमाणबद्ध देखणं शरीर, नितळ गोरा -गुलाबी रंग आणि कमालीचे सुंदर मोठे तपकिरी डोळे , हसली कि तिचे मोत्यासारखे एकसारखे ओळीने बसवल्या सारखे दिसंणारे दात मधूनच चमकत ,मितालीला गंमत वाटून ती त्यांचा खेळ बघत राहिली , तेवढ्यात शाळेची बस आली ,आणि मुलं नलूच्या नावाने ओरडत असताना नलु पळत बस मध्ये चढली , तिच्यामागे मितालीही चढली , नंतर एकमेकींशेजारी बसून गप्पा मारताना त्या दोघी जिवलग मैत्रीणी कधी झाल्या कळलंही नाही , हळू हळू मितालीला नलूच्या घरातल्या कडक वातावरणाबद्दल माहिती झालं , नलूचे वडील जुन्या रूढी परंपरांना चिकटून होते , ठाकूर घराण्याचा अभिमान जो बऱ्याचदा नलूच्या बोलण्यातूनही डोकावत असे त्यांनाही त्या अभिमानाने नको इतकं पछाडलं होतं , शिवाय मुलीला जास्त शिकवायचं नाही, लवकर लग्न करून द्यायचं या अंधश्रद्धाही तोंडी लावायला होत्याच, पण नलु पडली बंडखोर स्वभावाची , ती हे वेसण जितकं जमेल तितकं झिडकारुन टाकायची ,आणि मग मार हा ठरलेला असे, पण नलूची हौस दांडगी , घरच्या नापीक आणि खडकाळ , दुष्काळी जमिनीतही हे रोप तरारून वर यायचा प्रयत्न करत होतं ,शाळेतल्या कुठल्याही स्पर्धा असोत , नलू चोरून भाग घेत असे , प्रथम क्रमांक तर ठरलेलाच असे , पण कुठलहि बक्षीस नलुला घरी नाही नेता आलं , नलूची आई ‘सुशीला’ हि एक अश्राप बाई होती , सतत भेदरलेल्या कोकरासारखी घरात वावरणारी, पण स्वतःच्या जीवाला सांभाळून असणारी , ती कधी त्या दोघा बाप-लेकीच्या मध्ये पडली नाही , नलूची दोन लहान भावंडं आईसारखीच भेदरलेली असत , नलू एकदा म्हणाली होती मितालीला ,” आमची सुशी गोष्टीतल्या त्या माकडिणी सारखी आहे , जी स्वतः:चा जीव वाचवण्यासाठी पिल्लाला पायाखाली घेते ,” म्हणून नली तिला आई न म्हणता ‘सुशी ‘ म्हणत असेल का? मितालीला खूप विचित्र वाटायचं हे सगळं , एकीकडे मुलांनी अव्वल व्हावं म्हणून जीवाचं रान करणारे पालक तिने पाहिले होते , इथे रेडिमेड अव्वल दर्जाचं पाल्य हातात असताना त्याचं महत्व न कळणारे दुर्दैवी पालक होते , दैवदुर्विलास म्हणतात तो हाच का ?
शाळेच्या रोजच्या वेगवेगळ्या घडामोडींनी वर्ष कधी संपलं कळलंही नाही ,बोर्डाची परीक्षा संपल्यावर मिताली परत पुण्याला निघून आली, दहावीचा रिझल्ट लागला आणि अपेक्षेप्रमाणे नलु बोर्डात तर आलीच शिवाय तीन विषयात पहिली आली . मितालीही खूप चांगल्या मार्कांनी पास झाली , नवीन कॉलेज , नवीन activities आणि नवीन मैत्रिणी यात मिताली रमली , त्याकाळी म्हणजे साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी फोन नव्हता , त्या दोघींचा एकमेकींशी पत्र व्यवहार चालू होता पण काळाच्या ओघात पुढे तो हि थांबला, आजी गेल्यावर मितालीचं पुढे आजोळी जाणंही कमी झालं, आणि शिक्षणात रमलेल्या मितालीला एक दिवस एक धक्कादायक बातमी समजली , ‘नलूने आत्महत्या केली !!!!...”
नली आणि आत्महत्या ????...शक्यच नाही , तिच्या ठाकूर घराण्याचा तिला किती अभिमान होता , मोडेन पण वाकणार नाही असा बाणा असलेली नली , भाऊंना पण कधी दाद लागू दिली नाही तिने , ती असं कसं करेल ? पण तसं खरंच घडलं होतं ,जे काही तिला समजलं त्याने ती सुन्न होऊन होऊन गेली , तिला कळलं की भाऊ नलीला दहावीनंतर शिकवायला तयार नव्हते , आणि नली ऐकायला तयार नव्हती शेवटी कॉलेज ला न पाठवता मालेगावच्या एका शाळेत तिला त्यांनी ऍडमिशन घेऊन दिली आणि १८ वर्षांची होईपर्यंत कसा बसा धीर धरला खरं तर ते दहावीतच तिचं लग्न लावून देत होते पण नलूने जमेल तितका केलेला विरोध आणि त्याहीपेक्षा कायद्याचा बडगा म्हणून ते गप्प बसले होते , १८ व लागताच , येईल त्या स्थळाला होकार देऊन त्यांनी तीचं लग्न लावून दिलं , नवरा तिच्यापेक्षा किमान दहा एक वर्षांनी मोठा होता ,सासरी काय झालं ?त्यांनीही तिचा तिथे छळ केला का ? कि तिचं शिक्षण बंद पडलं म्हणून ती खचली ? नवरा हि भाऊंसारखाच बुरसटलेल्या विचारांचा होता का ? हे कोण विचारणार ? जिथे जन्मदात्या पित्यालाच मुलगी नकोशी झालेली तिथे परक्यांचं काय ?
चार महिन्याचं मूल आत्याच्या पदरात टाकून नली कायमची निघून गेली. हे असं व्हायला नको होतं , नलू गेली यापेक्षा ज्या पद्धतीने गेली तशी ती जायला नको होती , मितालीला खूप असहाय वाटलं त्याक्षणी “, मृत्यू कोणाचाच बांधील नसतो , त्याला हवं तेव्हा हवं तिथे येता येतं पण , नलू असं हतबल होऊन तू त्याला बोलावलंस हे त्यालाही नसेल आवडलं गं “!!

"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्महत्येला जितकी हिम्मत लागते, त्यापेक्षा कमी हिंमतीत माणूस खूप खूप काही करू शकतो...
ठाकुरांच्या मुलीला हे माहिती नव्हतं वाटतं... Sad

छान आहे... खरी परीस्थिती आहे, जुन्या काळात तरी अजुन भयानक...
पण,

तेवढ्यात शाळेची बस आली ,आणि.... नुसत बस म्हणाल असत तर पटल असत....

त्याकाळी म्हणजे साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी... त्या कळात, शाळेला बस होत्या???? शन्का वाटते...
तस असेल तर माफी असावी वीनाकारण चुक काडल्याबद्दल..

बाकी छान वाटली...

अनेक शुभेछा

धन्यवाद पाजु !.. तुमचा प्रश्न बरोबर आहे , शाळेची बस म्हणजे , शाळा जिथे होती त्या स्टॉप वर थांबणारी PMT ची बस . :

धन्यवाद पाजु !.. तुमचा प्रश्न बरोबर आहे , शाळेची बस म्हणजे , शाळा जिथे होती त्या स्टॉप वर थांबणारी PMT ची बस . :