खरे परिवार (कथा)

Submitted by jayshree deshku... on 7 August, 2019 - 13:53

|| श्री गोंदवलेकर महाराज प्रसन्न ||
खरे परिवार
आम्ही नवीन flat मध्ये रहावयास गेलो. नवीन सोसायटीतील लोक कसे असतील? कुठल्या परिवारांशी कसे संबंध येतील ह्या बाबत थोडे कुतूहल होतेच. ह्या flat सिस्टीम मध्ये आजकाल कुणाचा कुणाशी विशेष संबंध येत नाही. सारे जग गुगल मुळे जवळ वाटते पण बऱ्याच वेळा शेजाऱ्याचे नाव सुद्धा माहित नसते. पण वेळप्रसंगी शेजारीच उपयोगी पडू शकतात. त्यामुळे ते चांगल्या स्वभावाचे,वेळेला मदत करणारे मिळणं जास्त गरजेचं असत. हळू हळू १५-२० दिवसात बिल्डिंगमधल्या सगळ्या परिवाराशी ओळखी होत गेल्या, म्हणजे आम्हीच परिचय करून घेत होतो. त्यात बिल्डींग मधल्या भालचंद्र खरे परिवाराशी परिचय झाला. छान, सुखी, आनंदी कुटुंब वाटलं. दोघ नवरा-बायको एक मुलगा, आणि एक मुलगी. सगळ कुटुंब गोर गोमट आणि गोल चेहऱ्याच. भालचंद्र खरेंच्या बायकोच नाव रसिका, मुलीचं रचना आणि मुलाचं नाव भरत. रसिका जवळ जवळ माझ्याच वयाची म्हणजे चाळीशीची असावी मोठा मुलगा भरत दहावीला होता. धाकटी मुलगी रचना आठवीला होती. रसिका गोरी, गोल चेहऱ्याची, गोबऱ्या गालाची. हसल्यावर तिच्या चेहऱ्यावर गोड खळी पडायची. एकदम पाहिल्यावर प्रसन्न दिसणाऱ्या तिच्या व्यक्तिमत्वावर मी जाम खुश झाले होते. पहिल्या भेटीतच तिने माझ्याशी मैत्रिणी सारखी जवळीक साधली. तिच्या घरी बेसनाचा लाडू आणि कॉफी देऊनच तिने माझी बोळवण केली. मनात म्हणल, चला वेळेला धावून येईल असं एक तरी कुटुंब बिल्डिंगमध्ये आहे असं दिसते. घरातून निघता निघता मी रचनाला म्हणल, “आमच्या मनाली कडे येत जा ग.ती तुझ्या बरोबरीची नाही पण फार मोठीपण नाही अकरावीला आहे.” ती पण हसून म्हणाली, “ हो काकू”
आम्ही flat वर रहावयास आल्यानंतर साधारण महिनाभरा नंतरची गोष्ट.अजूनही काही कंपाऊंड wall च वगैरे किरकोळ कामे राहिली होती, ती पूर्ण करण्याचे काम बिल्डर करत होता. तिथे एक ठेकेदार सुद्धा देखरेखीसाठी होता. काही सोसायटी मधली मूल वाळूत खेळत होती. त्यामध्ये भरत सुद्धा होता.सगळ्याच मुलांना ठेकेदार ओरडला , वाळू नास करू नका म्हणून सांगत होता. रसिकाने ते पाहिले ,तिची तळपायाची आग मस्तकाला गेली. तिचा गोरा गोमटा चेहरा रागाने लालबुंद झाला होता, हीच का ती हसरी प्रसन्न व्यक्तिमत्वाची रसिका हे खरे वाटत नव्हते. ती ठेकेदाराला म्हणत होती, “ तुम्हारी औकात ही क्या?, दो टक्के का आदमी, हमारे लडके के उप्पर चिल्लाता है? पता है हमने flat के लिए कितने लाख दिये है? सुनेगा तो चक्कर आ जायेगा.” असं म्हणत रसिकाने ठेकेदाराच्या जोरदार कानाखाली लगावून दिली. ते पाहून सगळी मुल पळून गेली. फक्त भरत त्याच्या आईजवळ उभा होता. “ चल सोन्या नको खेळूस इथे.लहान मुलांशी कसं समजून घेऊन वागावं ह्याची जरा सुद्धा अक्कल नाही ह्या माणसाला.” हे सर्व मी आमच्या घराच्या खिडकीतून पहात होते. रसिकाचा आतताईपणा, तिचा संताप आणि मुलावरच गाढवी प्रेम पाहून आवाक झाले. काय हे संस्कार मुलांवर ? आपली चूक असताना लोकावर खापर फोडून त्यांनाच त्याची शिक्षा देऊन मोकळ व्हायचं आणि उलट्या बोंबा मारायच्या. ठेकेदार गरीब म्हणून गप्प बसला. बिल्डर बसला असता का? मी मनात विचार केला, “बापरे ह्यापुढे हिच्याशी जपूनच वागले बोलले पाहिजे, माणसे दिसतात तशी नसतात हेच खर.” आख्या बिल्डिंगमध्ये ह्या गोष्टीची थोडीफार चर्चा झालीच. त्यानंतर सोसायटीच गेटटुगेदर ठरल. त्यासाठीची मिटिंग कॉल केली गेली.ती फक्त बायकांसाठी होती. सोसायटीतल्या एक जेष्ठ बाई, गोगटे काकू मला म्हणाल्या “ललिता त्यादिवशी रसिकाच चुकलच ना ! मी मिटिंग मध्ये तिला समजावून बघते.” मी त्यांना म्हणल, “कशाला काकू उगीच विषय काढता, तिला आवडल नाही तर? ती तुम्हांला फटकन काही तरी बोलून अपमान करेल.” तरी त्या म्हणाल्याच , “अग माझ्या वयाचा मान ठेवून ती ऐकून घेईल आणि समजून पण घेईल.” “ठीक आहे मिटींगला भेटू.” असं म्हणून मी निघाले.
मिटींगला सुरुवातीला आम्ही ५-६ बायका जमलो होतो त्यात रसिका आणि गोगटे काकू पण होत्या. अजूनी ८-९ जणी येणार होत्या. तेवढ्यात गोगटे काकूंनी चान्स साधला. आणि विषय छेडला, रसिकाला म्हणाल्या, “ अग त्या दिवशी तू मुलांची बाजू घेतलीस ते ठीक आहे ग पण अश्या रितीने मुलांसमोर त्या ठेकेदाराच्या कानाखाली देण्याची काही गरज नव्हती. ५५-६० वर्षाचा तो ठेकेदार. अशाने मुल मोठ्या माणसांचा मान ठेवत नाहीत.” हसत खेळत बोलणाऱ्या रसिकाचा एकदम चेहराच पालटला. तिच्या मानेच्या शिरा ताणल्या गेल्या. गोरा चेहरा लालबुंद झाला, आणि एकदम क्रूर दिसू लागला. ती एकदम किंचाळून बोलली, “ हे बघा गोगटे काकू तुम्हाला त्या ठेकेदाराची कड घ्यायची काही एक गरज नाही. माणसांच्या लायकी प्रमाणे मी बरोबर वागत असते. माझ्या लाडा-कोडात वाढलेल्या मुलाला कोणी बोलेल मला चालणार नाही.” मी गोगटे काकूंना गप्प बसण्या संबंधी इशारा केला पण तो त्यांना कळला नसावा. त्या पुढे म्हणाल्या, “ राग मानू नकोस, पण तू मुलांनासुद्धा समजावून सांगायला हव होत.” यावर रसिका जास्तच चिडली तिचा आवाज टिपेला गेला. किंचाळत ती बोलली, “ माझा अपमान करण्यासाठीच का ही मिटिंग बोलावली आहे? मला कळत, मला कुणी काही सांगण्याची गरज नाही.” ती अजूनही काही काही बोलत होती, तिच्या आवजाने उरलेल्या बिल्डींग मधल्या बायका भराभरा जमा झाल्या त्याबरोबरच रसिकाची मुल आणि नवराही मिटिंग स्थळी आले. भरत म्हणाला, “ओ काकू आमच्या आईला बोलायची तुमची हिम्मतच कशी झाली?” मिस्टर खरे म्हणाले, “माझ्या बायकोचा चार-चौघांमध्ये तुम्ही अपमानच करत आहात.” गोगटे काकू गोऱ्या मोऱ्या झाल्या. “अहो असं काही नाही.” असं त्या म्हणत होत्या तरी रसिकाने अक्षरशा गोगटे काकूंच्या झिंज्या धरल्या आणि त्यांच्या थोबाडीत मारली. हे पाहून जमलेल्या बायका घाबरून भराभर निघून गेल्या. गोगटे काकूंनी हात जोडून रसिकाची माफी मागितली.अखेर मिटिंग पुढे झालीच नाही आणि गेटटुगेदर पण झाल नाही. पुढाकार घेऊन बिल्डिंगमध्ये एकोपा निर्माण करावा हा माझा विचारही मला तूर्तास रद्द करावा लागला. मिटिंग गोगटे काकूंच्या घरीच चालू होती.गोगटे काकूंच्याच घरात, त्यांच्या घरातल्या आणि बिल्डींग मधल्या माणसांसमोर रसिकाने केलेले हे धारिष्ट्य पाहून मी मनातून पुरती हबकून गेले. मी वारंवार गोगटे काकूंना सॉरी म्हणत त्यांच्या घरातून बाहेर पडले. घरात आल्यावर प्रथम मनालीला बोलावून म्हणल, “बाई ग रचनाशी फार मैत्री ठेवण्याच्या फंदात पडू नकोस. जेवढ्यास तेवढेच संबंध ठेव.थोडी चार हात दूर राहिलीस तरी चालेल. हा शेजार आपल्याला पेलवणारा नाही बाई”. मग मी घरात घडली हकीकत सांगितली.
दुसरे दिवशी मी ऑफिसला निघाले होते. पार्किंग मधून माझी टूव्हीलर काढत होते. रसिकाच्या हातात भाजीच्या पिशव्या दिसल्या ती बहुतेक भाजी मंडई मधून आली असावी. मला पाहून गोड हसत म्हणाली, “ काय ऑफिसला का? बर बाई ऑफिसच्या निमित्ताने घरातलं लवकर आटपून होत.” मी पण घाबरत घाबरत हसून ‘हो ना’ म्हणल. खर तर बोलण्याची इच्छा नव्हती पण टाळण अशक्य होत. काल आपण केलेल्या तमाशा बाबतचे थोडेही अपराधी पणाचे भाव तिच्या वागणुकीतून किंवा बोलण्यातून जाणवत नव्हते.
सोसायटीतले सर्व लोक त्या परिवाराशी चार हात अंतर राखूनच होते. भरतला सर्व मुले घाबरून खेळायला घ्यायची, आणि घाबरूनच तो म्हणेल तो खेळ खेळायला तयार व्हायची. नंतर तर मुलांनी भरतला टाळण्यासाठी बाहेर खेळायला जाणे बंद केले.कुणा एकच्या घरात जमून घरातच खेळणे सुरु केले. भरतने मग इतर सोसायटीतल्या मुलांना आपल्या सोसायटीत बोलावून त्यांच्याबरोबर खेळायला सुरुवात केली. इतर सोसायटीतली मुल इकडे यायची त्यामुळे त्यांच्यासमोर भरतचीच दादागिरी चालायची. आमच्या सोसायटीतली मुल आतल्या आत चरफडत रहायची. भरत त्याच्या मित्रांबरोबर एकदा क्रिकेट खेळत असताना जोशींच्या खिडकीची काच फुटली. जोशी आणि खरे परिवारच जोरदार भांडण झालं शेवटी खरेंनी काच भरून दिली नाहीच. खरेंच्या खाली राहणाऱ्या सोमणांच आणि खरेंच पण भांडण झालं कारण खरे नवरा बायको सुद्धा एकमेकांशी इतक्या मोठ्या आवाजात भांडायचे की खरेंच्या खालच्या वरच्या शेजारच्या सगळ्या बिऱ्हाडांना त्यांच्या भांडणाचे आवाज ऐकू जायचे. कारण खरे कधीच घराच्या खिडक्या बंद करून , किंवा आपला आवाज बाहेर जाणार नाही याची काळजी घेऊन भांडत नव्हते. भांडताना त्या परिवाराला कशाचेच भान नसते. मुख्यत्वे रसिका भान न ठेवता भांडायची हे एव्हाना सर्वांच्याच लक्षात आले होते. बिल्डींग मधली बरीच लोक पार्किंग मध्ये उभी राहून खरे नवरा-बायकोच्या भांडणाचा आस्वाद घ्यायची करण खरेंचा flat दुसऱ्या मजल्यावर असल्या कारणाने खाली पार्किंग मध्ये सुद्धा त्यांच्या भांडणाचे आवाज स्पष्टपणे ऐकू यायचे. बिल्डींग मधली दोन तीन बिऱ्हाड सोडली तर पहिल्या एक दोन वर्षातच खरे परिवारच सगळ्यांशी काही ना काही कारणाने भांडण होऊन गेले. त्याला अपवाद फक्त आमच कुटुंब होत. खरे कुटुंब जरी एकमेकांत भांडत असल तरी जेव्हा इतरांशी भांडायची वेळ येईल तेव्हा कौरव पांडवा सारखं सार कुटुंब एक होऊन भांडणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर धावून जायचं. आणि असे काही शाब्दिक किंवा वेळ पडली तर शाररिक फटकारे मारायचं, की समोरच्या व्यक्तीने सपशेल शरणांगती पत्करली पाहिजे.
एक दिवस सोमणांचा सनी आमच्या घरी ब्राह्मण म्हणून जेवायला आला होता. तेव्हा तो मला म्हणाला, “ काकू तुम्हाला म्हणून सांगतो, कुणाला सांगू नका. आम्ही मुलांनी ना खरे कुटुंबातील सगळ्या लोकांचे नामांतरण केले आहे. खरे काकाचं नाव भालचंद्र खरे म्हणजे भांडकुदळ खवीस, खरे काकूच नाव रसिका आहे ना, तर त्यांना आम्ही रणचंडीका खवीस हे नाव ठेवलं आहे. रचना रणरागिणी तर भरत म्हणजे भयंकर खवीस. आहे की नाही मज्जा! म्हणून त्याने हसायला सुरुवात केली. आणि खर सांगायचं तर मलाही हसू आवरल नाही.
वर्ष दीड वर्ष सोसायटीला कुणी सेक्रेटरी नव्हता. सार्वजनिक कार्यक्रम सोसायटीत झाला नाही. सोसायटीतल्या वीस जणांची तोंड वीस दिशांना होती म्हणल तरी चालेल.कुणीही पुढाकार घेऊन सेक्रेटरी बनायला तयार नव्हते. शेवटी सोसायटीच्या मेंटेनन्स बाबत बघणे गरजेचे होते. सर्वजण आडून आडून गोगटे काकांना त्याबाबत सुचवत होते. त्यामुळे एकदाची सोसायटीची मिटिंग गोगटे काकांनीच कॉल केली आणि सेक्रेटरी पदाची सूत्रे हाती घेतली. सोसायटीतले २-३ लोक मेंटेनन्स भरत नव्हते. त्यात खरे पण होते. त्यांच्याशी संबंध नको म्हणून खर तर कोणी सेक्रेटरी व्हायला तयार नव्हते. तरी सुद्धा गोगटे सेक्रेटरी होण हे खरेंना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनतर खरेंनी जास्तच गोगटेना त्रास कसा होईल हे पहायला सुरुवात केली.
रडत-खडत सोसायटीच काम चालू होत, वर्ष जात होती. मी घरी कधी कुठले हळदी-कुंकू केले की रसिकाला पण बोलवायची पण रसिका आलेली दिसली की घरात आलेल्या बाकीच्या बायका पटकन उठून जायच्या. पण ती माझ्याशी मस्त गप्पा मारून उठायची. सोसायटी मध्ये २-३ वर्षे बायकांनी भिशी केली तीपण रसिकाला वगळून . हे रसिकाच्या लक्षात आल्यावर तिने भांडण केलेच. त्यानंतर भिशी पण बंद पडली. कुणी कुणाला कामाशिवाय विचारत नव्हत. भेटल तर फक्त हाय ,हलो करून पुढे चालू लागत होत. काळ थोडाच कुणासाठी थांबतो? ७-८ वर्षाच्या अवधीत ५-६ बिऱ्हाडा मधली पिकली पान गळून पडली. ही छोटी छोटी दिसणारी मुले बघता बघता डोळ्यासमोर मोठी झाली, उद्योग धंद्याला लागली. आमची मनाली इंजिनिअर झाली. लग्न होऊन नवऱ्या बरोबर यु.एस. ला गेली. भरत पण इंजिनिअर झाला. रचना आर्किटेक्ट झाली. रसिकाने मोठ्या धुमधडाक्यात रचनाच्या लग्नाचा बार उडवून दिला. तेव्हाच माझ्या मनात आलं ह्या रणचंडीकेने जावयाशी भांडण करू नये म्हणजे झाल. नाहीतर बायको आणि सासू ह्यांच्या त्रासाला की जाचाला कंटाळून बिचारा काहीतरी करून बसायचा. लग्नानंतर रचना पण नवऱ्या बरोबर जर्मनीला गेली. रसिका सारखी कौतुकाने सांगत रहायची. लेक जावई जर्मनीला आहेत. दोघेजण लाखोने कमावतात. मी आपली मनाली बाबत फारस न बोलता, रचनाच कौतुक करायची. म्हणायची, “छान झाल बाई,रचनाने नशीब काढल.” रचनाचे प्रत्येक सण रसिकाने हॉल घेऊन दणक्यात केले. शेवटच डोहाळजेवण आणि बारस पण दणक्यातच झाल. कधी कधी शेराला सव्वाशेर भेटतोच. मुलाच्या बारशा नंतर बायकोला आणि बाळाला सोडून जावई जर्मनीला निघून गेला. नंतर त्याने खरे कुटुंबाशी संबंध तोडला. आपला पत्ता, फोन नंबर सारे काही त्याने सिक्रेट ठेवले. खरे परिवाराला काही मागमूस लागू दिला नाही. ह्या गोष्टीचा अर्थातच रसिकाने बोभाटा होऊ दिला नाही. आणि तिच्या स्वभावामुळे तिला कोणी विचारायला पण गेले नाही. पण रसिकाच्या घरातलं भांडण म्हणजे आगीचा बंबच जणू. रसिका रचनाला वाटेल ते किंचाळत बोलत सुटायची. त्यामुळे आख्या सोसायटीला रचना घरी परत आल्याची बातमी कळली. सोसायटी मधले विघ्नसंतोषी लोक कुजबुजायला लागले होते. “अती माजात, टेचात रहात होते ना! आता बसा म्हणावं मुलीला आणि नातवाला जन्मभर गळ्यात घेऊन.” ‘हीच आता पुन्हा दुसर लग्न कुठलं होणार?’ ‘ही सवत्स धेनू कोण गळ्यात बांधून घेणार?’ कोणी पत्करली तर रसिका थोडाच त्यांचा संसार सुखाने होऊ देणार? वगैरे वगैरे. रचनाच्या चेहऱ्या वरची गुर्मी उतरली होती. तिचा चेहरा म्लान दिसू लागला होता. ते पाहून मलाही तिच्याबद्दल दया वाटू लागली. देव करो आणि हीच सार सुरळीत होवो असं वाटायचं. खरेंच्या घरात आजकाल रसिकाची आणि रचनाची भांडण पेटलेली असायची. त्यामुळे सोसायटीतल्या लोकांशी खरे कुटुंब जरा सौख्याने वागत होते. एक दिवस mornig walk वरून परत येत असताना रसिकाचा चढलेला आवाज ऐकला आणि मी पाच मिनिट तिथेच थांबले. रसिका रचनावर गुरकावत होती. “साधा नवरा सांभाळता आला नाही. आली परत माहेरी, तिकडच तोंड काळ का नाही केलस? मेलीस तरी पाणी द्यायला येणार नाही लिहून ठेव.” बापरे पुढच काही मला ऐकवेना. मी घरी निघून आले. मनात विचार आला, ही बिल्डींग मधल्या लोकांना वाटेल ते बोलायची. पण त्यांच्याशी निदान काही देणे घेणे तर नव्हते पण स्वत:च्या पोटच्या मुली बाबत अशी भाषा वापरताना हिला काहीच कसे वाटत नाही. ते म्हणतात ना, क्रोधाचे भरले काविरे आणि पिशाच्चा परी वावरे ; रसिकाच्या बाबतीत तसं होत. त्या काळात गोगटे काकांना देवाज्ञा झाली. अख्खी सोसायटी अंत्यदर्शनासाठी जमली होती पण खरे कुटुंबाचा मात्र त्यात सहभाग नव्हता. मरणोत्तर सुद्धा वैर धरून वागण सगळ्यानाच खटकल. सगळच तर इथ सोडायचं आहे. बरोबर काय न्यायचं आहे तर फक्त कर्म , हे कळून सुद्धा लोक अशी अहंम कुरवाळत का राहतात ते कळत नाही. whatsapp .ग्रुप वर सगळ्यांनी गोगटे काकांच्या मरणाबाबत हळहळ व्यक्त केली. पण त्यावर खरेंनी बिनधास्त लिहलं बिल्डींगची कीड गेली. सगळ्यांनी कपाळाला हात लावला. पण त्यांना बोलण्याच धारिष्ट्य कोण करणार? राडीत दगड टाकून शिंतोडे कोण उडवून घेणार?
मी योगाच्या क्लासला जायला सुरुवात केली होती. तिथं माझा एका बाईंशी परिचय झाला. केळकर तिच नाव काही दिवसातच ती माझी मैत्रीण बनली. कोण कुठ राहत, याबाबत विचारणा झाली तेव्हा ती मला म्हणाली, “अग बाई तू त्या सोसायटीत राहतीस होय? तिथे खरे पण आहेत ना? तो भांडकुदळ परिवार ! बिल्डींग मधल्या सगळ्यांशी भांडून झाल असेल.” मी म्हणल, “पण तुम्हाला कसं माहित?” त्यावर ती म्हणाली?
“कसं माहित काय, सगळच तर माहित आहे. तुमच्या सोसायटीत रहावयास येण्याआधी हे लोक आमच्या सोसायटीत रहात होते. अतिशय झाम्बाज कुटील बाई. आमच्या इथे सुद्धा त्यांची सगळ्यांशी भांडणे झाली. तिने तुमच्या सोसायटीत येण्याआधी सासूला मारून बाहेर काढले. ती मुलीकडे रहावयास गेली. तरी ह्या बयेला ते बघवले नाही. तिथून उचलून तिने सासू – सासऱ्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकले. सासूने खूप बोट मोडली. पण करते काय बिचारी असहाय्य होती ना! ती सोसायटी सोडून गेल्यानंतर आम्ही सर्व लोकांनी एक झकास गेट टुगेदर साजरे केले, सोसायटीतली घाण गेल्याबद्दल. कुणीही त्यांना निरोप दिला नाही.” खूप वर्षानंतर मिळालेल्या खरे कुटुंबाची कहाणी ऐकून मी सुन्न झाले.
बरेच दिवस खरे परिवार सोसायटीमध्ये दृष्टीस पडला नाही. कधी कुठे गावाला शिवाला न जाणारा हा परिवार गेला तरी कुठे? सगळ्या सोसायटीला एक गहन प्रश्न पडला होता. दीड एक महिन्यांनी बातमी कानावर आली. भालचंद्र खरेंना म्हणे जावयाचा पत्ता लागला. नंतर ताबडतोब रसिका आणि मिस्टर खरे रचनाला घेऊन जर्मनीला गेले. तिथे जाऊन त्यांनी जावयाला बडवून तर काढलेच पण मारहाणीची, फसवणुकीची उलटी केस त्याच्यावर ठोकली. तिथं जावयाला पोलीस कोठडी पहावी लागली. जावयाच्या आई-वडिलांनी जाऊन त्याला सोडवले. त्यात त्याची नोकरी गेली. मग तिथून जावयाला घेऊन ते भारतात आले. आणि आता मुली नातवा बरोबर जावयाच्या घरीच मुक्काम ठोकून आहेत. जुलमाचा रामराम करून त्याला पुन्हा प्रपंचाला लावला आहे.आणि म्हणे हा इथला flat विकून आता लेकीच्या अपार्टमेंट मध्येच flat विकत घेणार आहेत. आम्ही सर्वजण म्हणालो आता काही त्या जावयाची ह्या परिवारच्या तावडीतून सुटका नाही. चला तूर्तास सोसायटीची तरी ह्या परिवाराच्या तावडीतून सुटका झाली आहे. तेव्हा आनंद उत्सव साजरा करू या. चला चला लवकर सत्यनारायणासाठी मुहूर्त पहा. हसत हसत गोगटे काकू म्हणाल्या.

सौ. जयश्री देशकुलकर्णी पुणे

मोब. ९४२३५६९१९९

Group content visibility: 
Use group defaults

भारी.
भांडकुदळ परवडले पण अतिशय गलिच्छ राहणारे, दुसऱ्यांच्या वस्तू गृहित धरून वापरणारे माजुरडे शेजारी नको रे बाबा.

जयश्री बाई आपण गोंदवलेकर महाराजांचे स्मरण लेखापुर्वी केले आहे. श्रीमहाराजांना हे असे चहाडी केल्यासारखे लिहिलेलं आवडणार नाही. श्रीमहाराज यांनी वाईटातल्या वाईट मनुष्याला देखील आपला म्हणून सन्मार्गाच्या वाटेवर आणलं. या लेखावरून श्रीमहाराज आपणास कळले नाहीत असेच म्हणतो.

खरे परिवार कथेच्या नावामुळे क्षणभर गोंधळले.. Lol

आम्हाला असा शेजार लाभलाय.पुर्ण कुटुंब चांगल फक्त एक बाई भांडकुदळ. कधी कधी इतकी प्रचंड गोड वागते कि समोरच्याला मधुमेह होईल.आणि भांडायला लागली कि बीपीचा त्रास होईल. Sad

भारी..
कथेचं नाव वाचून आधी वाटलं की, आदर्श परिवार पहायला मिळेल!
पण मस्त आहे कथा....

डिसफ़ंक्शनल कुटुंबाचे चित्रण आवडले!

> सोसायटी मधले विघ्नसंतोषी लोक कुजबुजायला लागले होते. “अती माजात, टेचात रहात होते ना! आता बसा म्हणावं मुलीला आणि नातवाला जन्मभर गळ्यात घेऊन.” ‘हीच आता पुन्हा दुसर लग्न कुठलं होणार?’ ‘ही सवत्स धेनू कोण गळ्यात बांधून घेणार?’ कोणी पत्करली तर रसिका थोडाच त्यांचा संसार सुखाने होऊ देणार? वगैरे वगैरे. > शेजारीदेखील विघ्नसंतोषीच आहेत.
रचनादेखील (कौटुंबिक पार्श्वभूमी वगळून, स्वतः एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघितल्यास) भांडकुदळ होती असा एखादं प्रसंग आला असता तर, हे शेजार्यांचे विचार (कदाचीत) ठीक वाटले असते.

काविरे म्हणजे काय?

असेच अजून लिखाण येऊद्या. पांढरपेशा समाजातल्या काळ्या-करड्याचे चित्रीकरण चांगले करता तुम्ही.

खर्‍यांचे भयंकर वर्णन जमले आहे. आशा आहे, खरे खरेखरे नव्हते. अ‍ॅमी, रचना पण व्यवस्थित असती तर तिचा नवरा , बायकोच काय मुलाला सोडुन पळाला नसता. शेजार्‍यांनी म्हटलेले ‘सवत्स धेनु कोण पत्करणार‘ वगैरे तसेही बरोबर वाटत नाही. पण रचनाच्या नवर्‍याची वाटच लावली की.

> रचना पण व्यवस्थित असती तर तिचा नवरा , बायकोच काय मुलाला सोडुन पळाला नसता. शेजार्यांनी म्हटलेले ‘सवत्स धेनु कोण पत्करणार‘ वगैरे तसेही बरोबर वाटत नाही. पण रचनाच्या नवर्याची वाटच लावली की. >
भरत जसा दोनतीन भांडणात सहभागी दाखवलाय तशी रचना दिसत नाही, त्यामुळे तीदेखील व्यवस्थित नव्हती असा 'अंदाज' करावा लागतो.
खरेंचे जुन्या आणि नव्या ठिकाणचे रेप्युटेशन बघितले आणि रचनाचे टिपीकल भारतीय पद्धतीने अरेंज्ड लग्न झाले असेल तर रचनाच्या नवर्याला तिच्या कुटुंबाबद्दल इतरांकडे चवकशी करताना कळले असते. तरीही त्याने लग्न केले म्हणजे तोदेखील डिसफ़ंक्शनल कुटुंबाला असू शकतो. त्यामुळे त्याचे पळून जाणे पूर्णपणे रचनाच्या माथी मारता येत नाही.

बाकी वर मन्याने तिच्या शेजारच उदाहरण दिलंय- पूर्ण कुटुंब चांगले फक्त एक बाई वाईट; तसंच खरेंकडे पूर्ण कुटुंब वाईट फक्त एक मुलगी चांगली असेदेखील होऊ शकते.

सर्व प्रथम प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. माझे नेट चालू नसल्यामुळे प्रतिसाद देण्यास उशीर झाला. मी ज्या ह्या सगळ्या कथा टाकत आहे. त्यातल्या बहुतेक सत्यकथांवर आधारित आहेत. आणि चैतन्य एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, मी गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला आहे. पण प्रत्येक्षात दैनदिन व्यवहारात माझे वागणे वेगळे असते. ही कथा आहे. रोजच्या संपर्कात येणारया लोकांपासून कसा त्रास सोसायटीत होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून ही कथा लिहिली आहे. कथेतील मुलगी प्रत्यक्षात खुप चांगली आहे. पण कुटुंबातील इतर सदस्यांमुळे काही संकटे आपल्यावर येतात. त्याला आपलं नशीब म्हणाव लागत. दुसर काय?

> कथेतील मुलगी प्रत्यक्षात खुप चांगली आहे. पण कुटुंबातील इतर सदस्यांमुळे काही संकटे आपल्यावर येतात. त्याला आपलं नशीब म्हणाव लागत. दुसर काय? > खरंय....

पण प्रत्येक्षात दैनदिन व्यवहारात माझे वागणे वेगळे असते. ही कथा आहे.
>> कथा आहे तर पोथी लिहिलंय यासारखं देवाचं नाव कशाला घ्यायला लागतं?
कथेतील मुलगी प्रत्यक्षात खुप चांगली आहे. पण कुटुंबातील इतर सदस्यांमुळे काही संकटे आपल्यावर येतात.
>> मुलगी चांगली आहे तर कथेतच सांगायचं ना. आता सांगता म्हणजे ही सत्य कथा नाव बदलून लिहिली असावी.
Light 1

काहीही नवीन लिहिताना मला महराजांच स्मरण करण्याची सवय आहे. नकळत लिहलं जात, पण पुढच्या वेळेस टाळेन. थोडे बदल करून लिहिलेली सत्यकथाच आहे.

ही असली माणसे प्रत्यक्षात भेटल्याशिवाय विश्वास बसत नाही।। Happy

ही कथा वाचत सोसायटीच्या मीटिंगला गेले. तिथे मायलेकीची जोडगोळी आली होती व त्यांच्यासोबत त्यांचे दोन शेजारी. लेक आल्या आल्या भांडायला लागली. तिची सगळे लक्षणे डीप डिप्रेशन मध्ये गेलेल्या माणसाची होती. सेक्रेटरी व चेअरमनला शिव्या दिल्या. माझ्या घरी कचरेवाला येत नाही, सोसायटीच्या agm मला बोलवत नाही म्हणून मुलगी भांडत होती. माझ्या आईचे वय बघा व तिच्याशी जोरात बोलू नका हे ओरडून सांगताना, शेजारी म्हणून जे वृद्ध आले होते त्यांना साला अडाणी, मूर्ख आणि बरेच काही म्हणाली. मी थक्क होऊन हे सगळे पाहत होते. आईच्या नावावर घर आहे पण राहते मुलगी. आई दुसरीकडे राहते. ही जोडगोळी गेल्यावर शेजारी सांगायला लागले की रोज आई मुलीची भांडणे व्हायची, शेवटी आई दुसरीकडे राहायला गेली. कचरेवाला आला की माझ्याकडे का रोखून बघतोस म्हणून त्याच्याशी भांडण, त्याने यायचे बंद केले. कुणीही दारात गेला की हाच आरोप. म्हणून सोसाईटीची agm ची नोटीस तीच्यापर्यंत जात नाही. शेजारी दिसले की त्यांच्या बाजूला थुंकायचे. स्वतःच्या अंगणाच्या बाजूला ढिगाने कचरा गोळा करून ठेवलाय जो उचलत नाही, उचलू देत नाही, त्यात पावसाळ्यात साप येतात हा शेजाऱ्यांचा आरोप. तिने लावलेली बांबूची झाडे दुसऱ्यांच्या बाल्कनीत पोचलीत व त्यावरून चढून एकाच्या बाल्कनीत साप गेला. आमच्या कॉलनीत सगळी घरे स्वतंत्र असली तरी खूप जवळ जवळ आहेत, त्यामुळे एकाच्या कचऱ्याचा दुसऱ्याला त्रास होउ शकतो. रात्रीची ही मुलगी दारू पिऊन फुल्ल टाइट असते आणि सगळ्यांना शिव्या देत बसते.

मी सोसायटी कार्यकारिणीत बसून सोसाइतितले बरेच नमुने बघितले, बरीच भांडणे बघितली पण हा असला नमुना पहिल्यांदा बघितला.

बाई गं !! कसला भांडकुदळ शेजार Sad
योगायोगाने काही वर्षांपूर्वी आमच्या शेजार्यांचे आडनाव हि 'खरे' होते .. पण या लेखात वर्णन केल्याच्या अगदी विरुद्ध .. कितीतरी सालस , प्रेमळ , हसमुख !!
साधना , तुमचा अनुभव पण कसला डेंजर आहे .. Sad

सिध्दी, उमानु, अजय, साधना, अंजली सर्वाना मनापासून धन्यवाद. आणखी सुध्दा एक असाच वेगळाच नमुना अनुभवला आहे. त्याची सुध्दा कथा लवकरच टाकेन

अजय तुम्हाला शिफ्टिंग साठी शुभेच्छा. छान शेजार मिळो कारण नातेवाईक, जवळचे लोक आपल्या अडचणीच्या वेळी उशिरा पोहचतात. प्रथम मदत होते ती शेजाऱ्यांची

हो हे खरं आहे ताई.. आताच खुप हळवा झालोय...आमच्या सध्याच्या शेजारच्या काकू आणि काका खुप छान आहेत...अगदी खुप जिव्हाळ्याचे सबंध झालेत ह्या दीड वर्षात...आता त्यांना असं सोडून जाताना जीवावर आलय....तरीही जवळच शिफ्ट होतोय पण शेजार तो शेजारच ना.

आता त्यांना असं परक्यासारखं मुद्दाम वेळ काढून भेटावं लागणार..

सोसायटी ( सहनिवास?) प्रकरण फेल गेलं आहे असं मला बऱ्याचदा वाटतं. दुसरा पर्याय नाही.
असे शेजारी भेटले की आपलीच कुंडली वाईट आहे हे पटते.

Pages