युनिटी इज स्ट्रेंथ

Submitted by लोकेश तमगीरे on 2 August, 2019 - 05:56

गोपनार.....भामरागड तालुक्यातील १२१ गावांपैकी एक माडिया आदिवासीबहुल गाव. साधारणतः २२०-२५० पर्यंत लोकसंख्या असलेलं गाव. हेमलकसाहून १३ किलोमीटरचा कुठे पक्का तर कुठे कच्चा रस्ता ओलांडला की कुक्कामेटा फाटा येतो. या फाट्याहून डावीकडे साधारणतः ८-९ किलोमीटरची जंगलवाट आहे. वाटेत ३ मोठ-मोठे नाले आहेत. ६ महिने हा रस्ता सुरळीत चालू असतो. पण एकदा का पाऊस पडला की, मग ४-५ महिने कुठलीही दुचाकी जाऊ शकत नाही. कुक्कामेटा गाव ओलांडलं की समोर वाटेत लाहेरी नदीचं एक मोठं पात्रं लागते. ते लाकडी डोंग्याने पार केल्यावर लष्कर गाव येतं. लष्कर हून २.५ किलोमीटर अंतर गाठलं की अखेरीस गोपनार गाव येते. अशा या गोपनार गावामध्ये (मी आणि डॉ सोनू) आम्ही मागील २-३ वर्षांपासून लोक बिरादरी प्रकल्पातील सामुदायिक आरोग्य विभागाचे कार्य बघत आहोत. सामुदायिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत [Community Health Program] ६ गावांमध्ये आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आली आहे. हे केंद्र चालविण्यासाठी सहा स्थानिक माडिया-गोंड मुलामुलींची आरोग्य-कार्यकर्ता म्हणून गावकऱ्यांच्या एकमताने निवड करण्यात आली आहे. या ६ केंद्रांच्या माध्यमातून एकूण २६ अतिदुर्गम गावांमध्ये लोकांना प्राथमिक आरोग्य सुविधा प्रदान करण्यात येत आहे. एका केंद्राच्या अंतर्गत साधारणतः ४ ते ५ गावं येतात. याच ६ केंद्रांपैकी एक केंद्र आहे गोपनार या गावी. हे केंद्र बिरजू दुर्वा नावाचा एक बारावी शिकलेला माडिया मुलगा अतिशय उत्तमपणे सांभाळतो. बिरजूला लोक बिरादरी प्रकल्पातून प्राथमिक आरोग्य उपचार कसे करावे याचे ट्रेनिंग मिळाले आहे. आणि बिरजू, गोपनार केंद्रांतर्गत येणाऱ्या ५ गावांमध्ये आरोग्य सुविधा प्रामाणिकपणे देतो. पण गोपनार गावाची एक मोठी समस्या होती, जी कदाचित गावकऱ्यांना समस्या म्हणून जरी महत्वाची वाटत नसली तरी आरोग्य कार्यकर्ता म्हणून बिरजूला खूप जाणवायची. आणि ती समस्या म्हणजे सर्व सार्वजनिक नळ/बोरवेल समोर जमा झालेले पाणी. सतत पाणी साचल्यामुळे या सार्वजनिक नळांसमोर खूप चिखल होत होता. परिणामी येथे नेहमीच डुक्कर-म्हशी लोळत असायचे, डासांची पैदास होत होती. तसेच हे सांडपाणी लगतच्या आरोग्य केंद्रापर्यंत वाहत यायचे. हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी सिमेंटच्या नाल्या केल्या होत्या पण त्याही कचऱ्याने सर्व बुजल्या होत्या. बोअरवेल हे सार्वजनिक असल्यामुळे त्या नजीक जमा झालेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आमची नाही असे सर्व गावकरी म्हणत होते. आता अशा अवस्थेत करायचं तरी काय? आम्ही त्यांना शोष खड्डा तयार करा अशी सूचना खूप आधी पासून केली होती पण अद्याप कुणीही पुढाकार घेतला नव्हता. खरे पाहता पूर्ण गाव एकत्र आल्यास शोष खड्डा बनवायला काही फारसा वेळ लागणार नव्हता. पण साचलेल्या पाण्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकते याची जागरुकता लोकांमध्ये नसल्यामुळे ते काम होत नव्हते. मी मनाचा पक्का निश्चय केला, शोष खड्डा इथेच बनणार आणि ते ही गावकरीच बनवणार. असा ठाम निश्चय करून बिरजूला मीटिंगची तारीख पक्की करायला सांगितली. सर्व गावकऱ्यांच्या एकमताने दिनांक २७.०५.२०१९ ला, सोमवार सकाळी ८:०० ही मीटींगची वेळ निश्चित झाली. सवयीप्रमाणे मी ७:५५ ला गोपनारला पोहोचलो. मी गावामध्ये प्रवेश करताच सर्व पुरुष मंडळी चौकात-घोटूलपाशी एकत्र बसून चर्चा करतांना दिसली. थोडी चौकशी केल्यावर कळलं की गावात मातापूजन आहे आणि त्याबद्दलची चर्चा सुरु आहे. धान-पेरणी सुरु करण्याआधी सर्व पुरुष मंडळी एकत्र येऊन गावातील मातेचे (गाव-देवी) पूजन करतात. नंतर त्यांच्या अनुमतीने मी सुद्धा त्यांच्या या शुभकार्यात सामील झालो. खरे पाहता मीटिंग ८:०० वाजता ठरवली होती आणि आता ८:४५ झाले होते. पण गावात काम करतांना गावकऱ्यांच्या मनाप्रमाणे चालणे खूप महत्वाचे आहे म्हणून मी त्यांची पूर्ण पूजा होईपर्यंत थांबलो.

हे सर्व आटोपल्यावर मी मीटिंगच्या स्थळी सर्वजण एकत्र येण्याची वाट बघत बसलो होतो. बिरजू सर्वाना मिटींगसाठी एकत्र आणण्याची धडपड करीत होता. अर्ध्या तासानंतर साधारणतः गावातील ५०-६०% लोकं जमली आणि आरोग्य केंद्रासमोर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली अंथरलेल्या प्लास्टिकच्या ताडपत्रीवर बसली. गावात कुणी थोडा शिक्षित व्यक्ती किंवा सरकारी माणूस, डॉक्टर आला की आदरातिथ्य म्हणून त्यांच्यासाठी खुर्ची-टेबल मांडतात. त्याचप्रमाणे माझ्यासाठी सुद्धा खुर्चीची व्यवस्था करण्यात आली. पण मी त्या खुर्च्या उचलून बाजूला ठेवल्या आणि सर्वांसोबत खाली चटईवर जाऊन बसलो. [कारण मी आणि सोनुने ठरवलं होतं की गावांमधील कुठल्याही मीटिंगमध्ये आपण खुर्चीवर आणि बाकी सगळे गावकरी खाली बसणे योग्य नाही. आपण नेहमीच त्यांच्या सोबत बसलं पाहिजे. आणि हा नियम आम्ही सुरुवातीपासूनच कटाक्षाने पाळायचो.] तत्पूर्वी मीटिंग मध्ये लागणाऱ्या सर्व सामानांची जसे पोस्टर्स, साबण, बाईंडर क्लिप्स, पांढरा बाउल इ. मी तयारी करून ठेवली होती. बऱ्याच लोकांना मराठी समजत नसल्यामुळे आणि माझेही माडिया भाषेवर प्रभुत्व नसल्याने मी समूहामध्ये बसलेल्या एका बी.ए. शिकणाऱ्या मुलाला मराठीचे माडिया भाषांतर करून सांगायला लावले. खरे पाहता लोकांना त्यांच्यात भाषेत समजवणे खूप आवश्यक आहे. स्थानिक भाषेचा मान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
आणि मग मी मीटिंगला सुरुवात केली, “आज आपण एक खेळ खेळणार आहोत. खेळ सुरु करण्यापूर्वी मी काही नियम तुम्हाला सांगतो. या खेळामध्ये मी स्वेच्छेने तयार झालेल्या पुरुष/स्त्रीच्या मागे एक चित्र लावणार आहे. ते कुठलं चित्र आहे हे त्याला/तिला माहित नसणार. ते चित्र तो/ती सर्वाना स्पष्ट दिसेल इतक्या जवळ जाऊन दाखवणार. आणि बसलेल्या सर्वांना ते चित्र ओळखायचे आहे आणि हातवारे/इशारे/कृती करून मधल्या व्यक्तीला सांगायचे आहे. यात खाली बसलेल्या कुणालाही चित्र कोणते आहे हे बोलून सांगायची परवानगी नाही. पण ज्याच्या मागे चित्र लावले आहे तो/ती मात्र बोलून तुम्हाला विचारू शकते. आणि मग तुमचे हातवारे/कृती बघून कोणते चित्र आहे हे त्याला/तिला ओळखायचे आहे. तर मग सगळे हा खेळ खेळायला तयार आहात का ? (माडियामधील भाषांतर सुरुच होते). सगळ्यांचे होकारार्थी उत्तर आले. आणि खेळ सुरु झाला.

सर्वप्रथम एक तरुण मुलगी स्वेच्छेने पुढे आली. मी आणि बिरजूने तिच्या मागे एक चित्र बाईंडर क्लीप लाऊन लटकवले आणि तिला सर्वांना जवळ जाऊन दाखविण्यास सांगितले. चित्र बघून कुणी गालातल्या-गालात तर कुणी जोरजोराने हसू लागले. समूहामधील बरीच मंडळी त्या चित्राची कृती करण्यास लाजू लागली. एक मुलगा मोठ्या हिमतीने उठला आणि जंगलाकडे हात दाखवीत खाली शौच करण्याच्या स्थितीत बसला. मधल्या मुलीने लगेच ओळखलं की “जंगलामध्ये एक मनुष्य उघड्यावर शौचालयास बसला आहे.” शेवटी मी ते चित्र मुलीला दाखवले. चित्र बघून ती पण थोडी लाजली आणि खाली आपल्या जागेवर जाऊन बसली. जोरदार टाळ्यांच्या कडकडाट झाला. या मुलीचं झालेलं कौतुक बघून एक-एक जण खेळामध्ये सहभागी होण्यास समोर येऊ लागली. एकामागून-एक चित्र उलगडत जात होती. सर्वजण सक्रीय सहभाग घेऊ लागली. नंतरच्या चित्रांमध्ये नदीकाठी खड्डा खणून पाणी पीत असलेला मनुष्य, उघड्यावर केलेल्या संडासावर बसलेली माशी, धानाचे शेत, अन्न, अस्वच्छ हात, उलटी-पातळ संडास झालेला रोगी इ. चित्र होते. शेवटी सर्व चित्र मी खाली एका विशिष्ट पद्धतीने ठेवली. आता पुढे काय म्हणून सर्वजण ऐकायला उत्सुक होते.

उघड्यावर केलेल्या विष्ठेवर माशा बसतात आणि त्याच मग न झाकलेल्या अन्नावर बसतात. हे अन्न आपण खाल्लं की रोग होतात (मी रोगी व्यक्तीच्या चित्राकडे बोट दाखवत सांगितलं). संडास करून आल्यावर हात न धुता जेवण केलं की रोग होतात, पाण्याचा स्त्रोत किंवा नदीच्या बाजूला संडास केली आणि तसे मलमिश्रित पाणी प्यायले की रोग होतात इ. अशा प्रकारे मी समजवायला लागलो. काही मिनिटांपूर्वी हसणारे चेहेरे आता गंभीर झाले होते. सर्वजण आता विचार करू लागली होते. त्यांना त्या चित्रांचा एक मेकांसोबतचा असणारा संबंध कळायला लागला होता. [याला आमच्या मेडिकल भाषेमध्ये F-diagram असे म्हणतात]. सर्वजण शांत झाली होते. लोकांना त्यांची चूक तर समजली होती. आता यावर काय उपाय काय? मी त्यांना विचारले. एकाने सांगितले की संडास उघड्यावर, नदीकाठी करणे चुकीचे आहे, त्यावर उपाय म्हणून घरी संडास बांधणे कधीही योग्य. उघड्यावर शौचाला गेल्यास त्यावर माती टाकणे म्हणजे त्यावर माशा बसणार नाही, एका महिलेने उत्तर दिले की, संडास झाल्यावर आम्ही फक्त पाण्याने हात धुतो तर साबणाने धुणे आवश्यक आहे नाही तर उलटी-पातळ संडास होईल, एका बाईने सांगितले की अन्न स्वच्छ पाण्याने धुवावे आणि झाकून ठेवावे म्हणजे त्यावर माशा बसणार नाही, परिणामी रोगांपासून बचाव होईल. नंतर हात कसे धुवावे हे सर्वांना करून दाखवलं. समूहातील काही जणांना पुढे बोलावून त्यांनासुद्धा साबणाचा वापर करून योग्य हात धुण्याची पद्धत प्रत्यक्ष करायला लावली. योग्य पद्धतीने हात धुवून रोगराई थांबवता येते हे लोकांना पटले. शेवटी साचलेल्या पाण्यामुळे काय दुष्परिणाम होतात हे सुद्धा सगळ्यांना कळले आणि त्यावर तोडगा म्हणून शोष खड्डा बनवायला सांगितले. तो कसा बनवायचा हे सुद्धा वर्णन करून सांगितले.

काही लोकांच्या चेहेऱ्याकडे बघून वाटलं की ही मंडळी आता खड्डा बनवतील पण काहींचं म्हणणं होतं की आम्ही तर या सार्वजनिक नळाचं पाणी वापरत नाही म्हणून आम्ही नाही बनवणार किंवा मदत नाही करणार. गावात काही बदल घडून आणण्यासाठी एकमत असणे आवश्यक आहे. माझे प्रयत्न अपुरे पडले असं वाटायला लागलं. मग मी काही मुलांना काड्या जमा करायला सांगितले. आणि समूहातील काही निवडक ८-१० लोकांना त्या काड्या वाटल्या आणि मग त्यांना तोडायला लावल्या. प्रत्येकाने सहज तोडल्या. मग सर्व काड्या एकत्र केल्या व त्याला दोरीने बांधले. आणि मग हा तयार झालेला काड्यांचा बंच तोडायला सांगितला. अर्थात कुणीही ते तोडू शकले नाही. लोकांना त्या मागचा उद्देश कळायला लागला. एकीच्या बळाचे महत्व त्यांना कळले. आणि सरते शेवटी लोक एकमताने म्हणाली, “आम्ही आज रात्री गावामध्ये मीटिंग घेऊ आणि उद्याच्या–उद्या आरोग्य केंद्रा जवळ असणाऱ्या सार्वजनिक नळासमोर शोष खड्डा नक्कीच बनवू.” गावकऱ्यांच्या या ऐतिहासिक निर्णयाने मी समाधानी होऊन हेमलकशाला परतलो.

५ जून २०१९ ला (म्हणजेच मीटिंगच्या ठीक ९ दिवसांनंतर) बिरजूचं लग्न होतं, त्यासाठी आम्ही आमंत्रित होतो. मी माझा डी.एस.एल.आर कॅमेरा घेऊन गोपनारला पोहोचलो. दुरूनच लग्न मंडप दिसला. मी लग्न मंडपाकडे जात होतो. माडिया लग्न बघण्यासोबतच मला शोष खड्ड्याचे काय झाले याची पण उत्सुकता होती. गाडी स्टॅन्डवर लावली आणि पहिल्यांदा सार्वजनिक नळाकडे धावत गेलो आणि थोडा वेळ ‘आ’ वासुन उभा राहिलो. मला विश्वासच बसत नव्हता. ज्या बोअरवेलसमोर मागील कैक वर्षांपासून पाणी साचलेलं रहायचं, चिखल रहायचा, डुक्कर-म्हशी लोळत असायच्या, डास असायचे.. तसलं काहीही नव्हतं. होता तर एक स्वच्छ सुंदर तयार केलेला शोष-खड्डा. नंतर लग्नामध्ये एकाकडून कळलं की दुसऱ्याच दिवशी सर्वजण (खास करून गावातील युवा मंडळी) एकत्र येऊन ७ फुटाचा खड्डा केला. गावातील कुण्या एकाचे ट्रॅक्टर घेऊन नदीतून रेती आणि छोटे-मोठे दगड जमा केले. नंतर खड्ड्यामध्ये सर्वात खाली रेती टाकली, त्यावर छोटी-मध्यम आकाराची दगडं टाकली आणि शेवटी मोठी दगडं व्यवस्थित रचली. त्याजागी पाणी सोडून थोडी तपासणी केली. आणि अशा प्रकारे गोपनार ग्रामस्थांनी साकारला ‘रोग प्रतिबंधक शोष खड्डा’.

shosh khadda.jpg

शब्दांकन:
डॉ. लोकेश चंद्रकांत तमगीरे, नागपूर.
http://hobiradari.blogspot.com/2019/08/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@ हर्पेन :
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दादा.
हा आमच्या कामाचाच एक भाग.

@mi_anu:
आमच्या कामाचं भागचं तो. आणि शिवाय ते करायला आम्हाला आवडते सुद्धा.
हो काही अडचणी नक्कीच आहे पण कामाचा आनंद मिळतो.
आपल्या प्रोत्साहनपर शब्दांबद्दल आभार.

फारच छान! कौतुकस्पद आहे.

पण > पण काहींचं म्हणणं होतं की आम्ही तर या सार्वजनिक नळाचं पाणी वापरत नाही > का वापरत नाहीत नळाच पाणी?