एका शब्दापायी...!

Submitted by अतुल ठाकुर on 9 August, 2019 - 21:33

MLBwHkJxxqKlglL-400x400-noPad.jpg

शाळा कॉलेजेसचे दिवस सुरु झाले की शिक्षण, अभ्यासक्रम, क्लासेस, शिकणे आणि शिकवणे यांची चर्चा वातावरणात असते. अशावेळी शिक्षक या व्यक्तीबद्दलही चर्चा केल्यास ते वावगे होणार नाही. स्वतः अनेक वर्षे मास्तरकी करीत असल्यामुळे आणि आयुष्यभर विद्यार्थी रहाण्याची मनिषा बाळगल्याने अनेक क्षेत्रातील अनेक शिक्षकांचा सहवास लाभला. काही फार सुरेख माणसे पाहिली. ऐकली. त्यांच्या हाताखाली शिकलो. काही शिक्षक म्हणून चांगले वाटले तर काही संशोधनाला मार्गदर्शक म्हणून मोठे वाटले. शिक्षक आणि मार्गदर्शक दोन्ही म्हणून एकच व्यक्ती थोर वाटली असेही कधी कधी घडले. मात्र कुणीतरी आपला शिक्षक आहे, त्याचे शिकवणे चांगले आहे म्हणून आणि फक्त म्हणून त्याची सर्व मते पटली असे मात्र माझ्याबाबतीत कधीही झाले नाही. मला माझ्या शिक्षकांबद्दल वाटणारा आदर हा मतभेद बाळगूनही तसाच राहिला. मात्र काही शिक्षक दुर्दैवाने विषारी स्वभावाचेही लाभले. मला स्वतःला याचा पुरेसा अनुभव आहे. मात्र अलिकडेच एका मैत्रिणीचा अनुभव महत्त्वाचा वाटला.

ती लहान असताना नृत्याच्या क्लासला जात होती. नृत्यात तरबेज असलेल्या त्या मुलीमागे तिच्या शिक्षिका मेहनत घेत होत्या. मात्र एका स्पर्धेला तिला नाचाची एक स्टेप काही केल्या जमेना. तिच्या शिक्षिकेने चिडून तिला " तू घरी जा. तुला काहीच जमणार नाही असे सांगितले". ती हिसमुसली होऊन घरी जाण्यास निघाली. निघताना शिक्षकाच्या पाया पडण्याची पद्धत आहे. ती पाया पडण्यासाठी जाताच तिच्या शिक्षिकेने एकदम पाय मागे घेतले आणि पाचवी सहावीच्या मुलीसाठी ते विषारी शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले " जा तुझी लायकीच नाहीये नाच शिकण्याची". या शब्दांनी पुढे काय रामायण घडवले?

ती मुलगी स्पर्धेत हरली. तिचे नृत्य थांबले. आणि साधारण आठ वर्षे तिचा आत्मसम्मान, सेल्फ एस्टीम नाहीसाच झाला. तिला कशातही राम वाटेना. मला काहीच करता येणार नाही. माझी काही करण्याची लायकी नाही. मी कशातच यशस्वी होऊ शकणार नाही या भावनेने घेरलेली अशी तिची आठ तरूण निर्मितीक्षम वर्षे गेली. तुम्ही मला सांगा मी काय करायचं ते पण मला मात्र स्वतःला सांगता येणार नाही. मला स्वतःचे निर्णय घेता येणार नाहीत अशी तिची परिस्थिती होती. त्या शिक्षिकेला आपल्या शब्दांमुळे काय घडले याची कल्पना तरी असेल का? कदाचित येथे काही मंडळी म्हणतील तिच्या स्वाभिमानाला धक्का देऊन तिला चेव आणून तिने जास्त मेहनत घ्यावी म्हणूनच त्या शिक्षिका अशा वागल्या असतील. त्यांचा उद्देश चांगलाच असेल.

हे तात्पुरते मान्य केले तरी त्याचा परिणाम भयंकरच झाला. त्यामुळे हा उपाय रोगापेक्षा भयंकर ठरला हे निश्चित. शिवाय हा उपाय प्रत्येकावर लागु होईल असेही नाही. आणि या जर तर विधानांमध्ये त्या शिक्षिकेने निव्वळ चीड येऊन हे म्हटले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. काहीही असले तरी सार्‍याची गोळाबेरीज एकच. निर्मितीक्षम वयातील आठ वर्षे अपराधीपणाच्या, नकारात्मक भावनेत जाणे. पुढे एका अनौपचारीक भेटीत या मैत्रिणीने मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेतला. आणि त्याच्या सल्ल्याने तिने आठ वर्षांनी पुन्हा तोच क्लास जॉईन केला. त्याच बाईंच्या हाताखाली पुन्हा सराव सुरु केला. आणि एका कार्यक्रमात तिने अतिशय चांगला परफॉर्मन्स दिल्यावर तिचे ग्रहण सुटले. ती या नकारात्मक भावनेतून मुक्त झाली. तिचा आत्मविश्वास परत आला.

आधी मी मुद्दाम कुठेही "गुरु" हा शब्द वापरलेला नाही. कारण त्या शब्दाला वेगळे अर्थ आहेत. पण गुरुघरी कष्ट घेतले, कसून सेवा केली, गुरुने सेवा करून घेतली, परीक्षा पाहिली, कसोटी घेतली,पारखून घेतले, या आणि अशा कथांचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. कारण त्यातून तावून सुलाखुन एखादा निघत असेलही. पण अनेकांची आयुष्य कोळपून जात असतील अशी माझी नम्र समजूत आहे. रामकृष्ण परमहंसांकडे अनेक शिष्य होते. असं म्हणतात ते प्रत्येकाचा स्वभावधर्म, त्याचा कल पाहून त्याला उपदेश करत आणि त्याच्या कडून तशाच उपासनेची अपेक्षा ठेवीत असत. आमच्या योगात आमचे गुरुवर्य निंबाळकरसर यांनी आम्हाला एक गुरुमंत्र दिला होता. ते म्हणायचे "योग टेलरमेड हवा, रेडीमेड नको". हा मंत्र मला स्वतःला फार महत्त्वाचा वाटतो. कारण वाट दाखवण्याचे काम करणारा गुरु हा काही वेळा "वाट लावणारा" देखील ठरू शकतो असे माझे मत आहे.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे. काही आततायी शिक्षक माझ्या लहानपणी मुलांना ठोंब्या, दगड, टवळे, घोड्या, गाढवा असे शब्द वापरत. मारापेक्षा शब्दांचा मार भयंकर असे. माझ्या वर्गातल्या अनेक मुलांनी शाळेला रामराम केला. संवेदनशील मनाने जर समोरची हेटाळणी स्विकारली तर अंतर्मनात विषासारखे दु:ख दडून राहते व त्यातून सहजासहजी बाहेर पडता येत नाही. तुमची मैत्रीण बाहेर पडली हे वाचून आनंद झाला.

> आणि त्याच्या सल्ल्याने तिने आठ वर्षांनी पुन्हा तोच क्लास जॉईन केला. त्याच बाईंच्या हाताखाली पुन्हा सराव सुरु केला. आणि एका कार्यक्रमात तिने अतिशय चांगला परफॉर्मन्स दिल्यावर तिचे ग्रहण सुटले. ती या नकारात्मक भावनेतून मुक्त झाली. तिचा आत्मविश्वास परत आला.> हाऊ आय मेट युअर मदरमधे एक एपिसोड आहे The Pit Guy बद्दल तो आठवला.

खरं आहे.
अनेक शिक्षक जिव्हारी लागणारे शब्द वापरतात मुलांना.
आमच्या शाळेतही होते असे शिक्षक.
शाळा दोन अधिवेशनात भरत असे. जेव्हा परीक्षा असायची तेव्हा आम्हा दुपारच्या मुलांची परीक्षेची वेळ सकाळची असायची.
तेव्हा सकाळच्या अधिवेशनातले शिक्षक पर्यवेक्षक म्हणून असत.
मी आधीची उत्तरपत्रिका भरल्यावर ज्यादा पुरवणी घेतली आणि तडक लिहायला सुरुवात केली.
काही वेळाने सर सह्या करायला आले. पुरवणीवर नाव वैगेरे लिहिलेलं नव्हतं तर मला म्हणतात ह्यावर नाव गाव लिहायला बाप येणार आहे का?
बाकी सगळी मुलंमुली एवढुशी तोंडं करुन बघायला लागली. मी काही न बोलता नाव वैगेरे लिहिलं. पण मनात इत्क्या शिव्या दिल्या की बसरेबस.
शिक्षक असले तरी एक माणुस म्हणुन असलेला स्वभावदोष आहे हा.
त्यामुळे शिक्षक म्हणून असायला पाहिजे तो आदर मुलांच्या मनातुन नष्ट होतो.
तुमची मैत्रीण हळव्या मनाची असणार. ती सावरली ते छानच झालं पण आठ वर्ष नैराश्यात गेली त्याची भरपाई कशी होणार. Sad
बरीच मुलं हुड असतात. मी पण फारच होते. आताही आहे. मनात चार शिव्या घातल्या की झालं. Happy

माझे एक शिक्षक खूप आवडते होते व मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो. वर्गात सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करत. असंच एकदा गुरूजींनी मुलांकडे पिन मागितली, मी पेन ऐकलं व धावत जाऊन पेन दिले ते बघून गुरुजींच्या तोंडून " गाढवा, पेन नाही पिन पाहिजे" हे वाक्य बाहेर पडले. माझं बारिक झालेलं तोंड बघुन त्यांनाही वाईट वाटले. पण 'गाढवा' हा शब्द मनात अजूनही रुतून बसला आहे. नंतर मला त्यांच्या विषयी पहिल्या सारखा जिव्हाळा वाटला नाही.

आपला शिक्षक आहे, त्याचे शिकवणे चांगले आहे म्हणून आणि फक्त म्हणून त्याची सर्व मते पटली असे मात्र माझ्याबाबतीत कधीही झाले नाही. >> हे माझ्या बाबतीत पण आहे. मी समोरच्याला, मग तो कितीही मोठा, अनुभवी व्यक्ती असो. माणूस मानते. म्हणजे गुण अवगुण सगळेच त्यात येते. हे
एकदा मानले की समोरच्याकडून अवास्तव अपेक्षा बाळगल्या जात नाहीत. आपला भ्रमनिरास होत नाही.

शाळेत उघड उघड भेदभाव होत असलेला पाहत होते, त्यामुळे कोणाबद्दल भाबडी श्रध्दा बाळगली गेली नाही. Happy