युगांतर - आरंभ अंताचा भाग ८

Submitted by मी मधुरा on 23 July, 2019 - 06:14

देवव्रत.... त्याने हस्तगत केलेल्या शस्त्रांपुढे एकही राजा शस्त्र उचलू धजत नव्हता. त्याची किर्ती सर्वत्र पसरली. शंतनूची राजगादी सांभाळणारा एक उत्तम राजा म्हणून देवव्रत सोडून बाकी कोणी नव्हते. धर्म, न्याय, युद्धकला..... सर्वोत्तम होता देवव्रत! राज्याबद्दल त्याला वाटणारी आपुलकी, जिव्हाळा! राजाला शोभेल असेच त्याचे वर्तन होते. त्याच्या कर्तव्यदक्षपणा बद्दल शंतनूला दाट विश्वास होता.

शंतनू आता निश्चिंत झाला होता. वनविहार करत अनेकदा नदी काठी जाऊन बसायचा. प्रवाहाच्या जलावर हात फिरवत जुन्या आठवणी ताज्या करण्यात त्याला रस वाटू लागला.

असेच एका दिवशी शंतनू नदीकाठी बसला होता. त्याने नदीच्या निळ्याशार भासणाऱ्या प्रवाहाकडे नजर टाकली. दूरवर एक नाव दिसत होती. नाव किनाऱ्यालगत आली तसा एक मंद सुवास सर्वत्र पसरला. नाव चक्क एक तरुणी वल्हवत होती. किनाऱ्यावर पोचताच त्या सुवासाने पूर्ण निसर्ग व्यापला. तिच्यातूनच येत असावा. तिने शंतनूकडे बघत विचरले, "मत्स्यराज्यला जायचे आहे?"
शंतनूने नकळत होकार दिला. चढू लागला तर थांबवत म्हणाली, "मुद्रा आहेत ना?"
" किती? "
तिने हातांनेच तीन बोटे दाखवली.
शंतनूला हसू आले. तिच्यासकट अख्खी नाव विकत घेऊ शकतो तो, हे कुठे माहिती होते तिला! साधा वेष असल्याने ओळखले नव्हते बहुदा!

नाव नदीत प्रवास करू लागली.
"तु रोज याच मार्गे प्रवास करतेस?"
"नाही. या योजनगंधेची नाव वेगवेगळ्या नगरीचा प्रवास करते."
"अच्छा? एकटीच?"
"नाही. सोबत असते."
"कोणाची?"
"तुमच्यासारखे जे एका किनाऱ्यावर नावेची वाट पाहतात त्यांची!"
शंतनू पुन्हा हासला.
त्याच नावेतून योजनगंधेशी गप्पा मारत नियमाने शंतनू कैक नगरींचा प्रवास योजनगंधेसोबत करू लागला.
उरलेल्या आयुष्यात अखेरपर्यंत हिचा सहवास मिळाला तर किती बरे होईल असे त्याला वाटू लागले. संवाद वाढत राहिला तसा तिला तो राजा आहे हे कळले. तिच्या आनंदाला पारवार राहिला नाही. आपण राणी होणार !

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान हा सुद्धा भाग. पण मोठे भाग टाकत जा ना.
महाभारत हा माझा सगळ्यात आवडता ग्रंथ. त्याबद्दल किंवा त्यातील कोणत्याही पात्राबद्दल काहीही दिसले तरी मी अधाशासारखी वाचून काढते त्यामुळे वाचायला सुरवात करत नाही तर लगेचच संपत आहे असं वाटते.

धन्यवाद मन्याजी, धन्यवाद निल्सन जी. Happy
रोज एक भाग टाकते आहे. कधी कधी वेळ मिळत नाही पुरेसा लिहायला. म्हणून भाग लहान झालेत काही. Happy पण प्रयत्न नक्की करेन थोडी जास्त कथा लिहिण्याकरिता!