खेकड्यांनी धरण फोडले

Submitted by Dr Raju Kasambe on 20 July, 2019 - 01:08

मुंगळ्यांनी रस्ते पोखरले
घुशींनी मजले पाडले
उंदरांनी दस्तावेज कुरतडले
खेकड्यांनी धरण फोडले !

बेडकांच्या धारेने फलाट बुडाले
स्थलांतरित पक्ष्यांनी ढग पळविले
हर समस्येसाठी पिल्लू नवे सोडले
खेकड्यांनी धरण फोडले !

धरणासाठी घर बुडाले
धरण फुटल्याने परत बुडाले
यमदूताने रेडे मोकाट सोडले
खेकड्यांनी धरण फोडले !

मेवा हडपून कुणी पळाले
गुपित कुणा नाही उलगडले
पत्रकार उगाच बडबडले
खेकड्यांनी धरण फोडले !

चौकशांचे घोडे खुप दौडले
वरच्यांनी खालच्यांना झोडले
खऱ्या गुन्हेगारांना मोकाट सोडले
खेकड्यांनी धरण फोडले !

गुन्हेगार बिळात दडले
पितळ अधिकाऱ्यांचे उघडे पडले
नेत्यांनी कंबरेचे सोडले
खेकड्यांनी धरण फोडले !

नेत्यांनी लॉजिक जोडले
वड्याचे तेल वांग्यावर सोडले
जनतेने हात जोडले
खेकड्यांनी धरण फोडले !

डॉ. राजू कसंबे
डोंबिवली (पूर्व)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

याने कोणाला काहीही फरक पडत नाही.
खेकडे, उंदीर, घुशी राष्ट्रहितार्थच काम करतात याची सगळ्यांना खात्री आहे.

दादा त्या धरणातल्या खेकड्यांवर मुतले त्याचा राग काढला त्यांनी.

सत्य आहे.
मधे पुण्यात कालवा फुटला तेव्हा उंदिर आणि घुशींचे कारण समोर केले. तोपर्यत जबाबदार अधिकार्याना तक्रार करुनदेखील त्याकडे दुर्लक्षच होत राहीले.आणि शेवटी खापर फुटायचे ते उंदीर आणि घुशींवरच फुटले.

धरण च का सार्वजनिक सरकारी पैसे वापरून जे काम होत ते कनिष्ठ दर्जाचे असते हे उघड सत्य आहे .
जे काम २० रुपयात होणार असते तिथे ३० रुपायचे बजेट आणि ,४० रुपये अधिकारी ,नेते ,गुंड,समाज सेवक (ngo)ह्यांच्यात वाटले जातात आणि फक्त १० रुपये खर्च केले जातात .
हे काही गुपित नाही .
ह्यात सर्व पक्ष ,सर्व सरकारी अधिकारी सहभागी असतात

सुंदर

हे वेगळे खेकडे बर का. फक्त नामधारी. भेटले तर दया आणुन. मस्त रस्सा करते. त्याने त्या निष्पाप लोकांच्या आत्म्याला शांती तरी लाभेल.

(खरे) खेकडे सुद्धा नदीमध्ये गडप झाले आहेत आता हे ऐकून.

बातमीत फोटो दिसतो त्यात धरणाची भिंत म्हणजे मातीचा ढिगारा रचलेला बंधारा आहे. असे बंधारे पाणी धरतात. पण डोंगराकडून पाण्याचा जोराचा लोट आला तर बंधारा ढेपाळतो. खेकड्यांनी माती पोखरलेलीच असते. असे बंधारे पाहिले आहेत, पण त्यांची उंची फार नसते आणि पुढे पात्रात वस्ती नसते.

Srd साहेब बंधारा फार लहान असतो, धरण त्यामानाने बरेच मोठे क्षमतेचे असते. धरणाला गळती लागली हे दिसताच योग्य काळजी घेतली पाहिजे, लोकांना सुरक्षित स्थळी हलवून धरण रिकामं करून दुरुस्ती केली पाहिजे. पण आपल्याकडे जोपर्यंत माणसं मरत नाहीत तोपर्यंत कुणी लक्ष देत नाही. मग ते रस्त्यातील खड्डे असो, की धोकादायक पूल, इमारती असोत.

धरण शब्द बातम्यांत वापरतात पण चित्रात काही तसे वाटले नाही. नियोजीत धरण असते तेव्हा पुढच्या लोका़चे स्थलांतर करतात. कर्जतजवळ कोंडाणे धरण होणार आहे ( घाटात ठाकुरवाडीला ट्रेन्स थांबतात त्याखाली) तेवहा बघू कोंडाणे गाव हलवतात का. भिंतीपासून जवळच असेल.

पानशेत धरण फुटले तेव्हा काय वाताहत झाली होती हे सर्वांना माहीत आहे. धरण कोणतेही असो ते नैसर्गिक शक्तीच्या एका तडाख्यात केव्हाही फुटू शकते. धरणे जेवढी गरजेची आहेत तितकेच धोका संभवणाऱ्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना हलवणे अवघड आहे. तेव्हा ही टांगती तलवार आहे हे लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थापन करणे व सुरक्षिततेचे साधनं तयार ठेवणं एवढेच हातात आहे.

धरण कोणतेही असो ते नैसर्गिक शक्तीच्या एका तडाख्यात केव्हाही फुटू शकते. बरोबर शशिकांत जी.
लोकसत्ता मधील बातमी नुसार "गाववाल्यानी वारवार धरणाची खालावलेली स्थिती सरकारच्या दृष्टीस आणुन देखिल, कोणतीही दखल घेतली गेली नाही" शेवटी धरण फुटले.