वारसदार - भाग ३ - दीड टन सोनं आणि दोन तिजोऱ्या!!!

Submitted by महाश्वेता on 9 July, 2019 - 13:09

भाग २
https://www.maayboli.com/node/70535

विनायक शाळेच्या फरशीवर मांडी घालून बसला होता.
इतिहासाचे जनार्दन मास्तर आज स्वातंत्र्यलढ्यातील असहकार आंदोलन शिकवत होते.
"तर, असहकार आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सरकारी व्यवस्थांवर बहिष्कार टाकणे, मग ते सरकारी कॉलेज असो, अथवा सरकारी परदेशी माल. या आंदोलनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. पूर्ण देश या आंदोलनात एकवटला, मात्र ५ फेब्रु. १९२२ रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यत चौरीचौरा गावात जमावाने पोलीस चौकी जाळली. त्यात २२ पोलीस ठार झाले. या बातमीने गांधीजी व्यथित झाले आणि चळवळ हिंसक बनत चालली म्हणून असहकार चळवळ स्थगित केल्याचे १२ फेब्रु. १९२२ रोजी जाहीर केले.
गांधीजींना महान आत्मा यासाठीच म्हणत, करण ते आपल्याच नव्हे, तर परक्या व्यक्तींच सुद्धा दुःख जाणत असत."
"गुरुजी," विनायकने हात वर उचलला.
"बोल विनायक."
"गुरुजी, एक चौकी जाळली म्हणून गांधीजी व्यथित झाले, मग विदेशी मालाची होळी करताना सुरत, अहमदाबाद येथे व्यापाऱ्यांची घरेदारे जाळली, लोक रस्त्यावर आलेत, तेव्हा गांधीजी व्यथित झाले नाहीत?"
गुरुजी आश्चर्यचकित झाले, आणि नंतर खिन्न हसू चेहऱ्यावर आणत म्हणाले.
"थोडा मोठा हो, मग सांगतो, गांधीजी का व्यथित झाले नाहीत ते."
तेवढ्यात शाळेची घंटा वाजली. मुलांनी पुस्तके दप्तरात भरायला सुरुवात केली.
विनायकने पुस्तके भरली, आणि तो घराकडे निघाला.
●●●●●
वर्षभरापूर्वी...
"साला साळगावकर, तू आमची पोरगी पटवतो होय रे."
महेश गालात हसला. त्याला असं हसताना बघून मोंझेसला हसू आवरत नव्हतं.
"पण तू पडला बामन, कशी पटली?" स्टीफन हसत म्हणाला.
"जाऊ दे र स्टीफन, फक्त बामनाने बारबाला घरात आणली असं म्हणायला नको कुणी, काय?" मोंझेस म्हणाला.
"असं रुपडं पालटवतो ना, बघत राहतील सगळे. आधी तर नाव बदललं, विंसीची वसुंधराबाई झाली, आता बघ, कशी पवित्र करतो ते." साळगावकर अभिमानाने म्हणाला.
"साळगावकर तुला बारमध्ये मी नेलं, पण तू इतका पोहोचलेला खिलाडी असशील असं वाटलं नव्हतं. मोंझेस खदखदून हसला."
...आणि सगळे त्याला सामील झाले.
आठवडाभरापूर्वीच महेश लग्न करून घरी आला होता.
"विनायका, बघितलं का, नवीन आई आणलीय तुझ्यासाठी."
दारात उभा असलेला महेश विनायककडे बघत म्हणाला.
सावत्र आई काय असते, हे पुस्तकात वाचून विनायक चांगलंच शिकला होता. आपला बाप हा प्रताप करणार, हे पाच सहा दिवसापासून बापाची शिकवणी चालू झाल्यापासून तो चांगलंच जाणून होता.
मात्र स्कर्टमध्ये आणलेली नवी आई बघूनच त्याला नवल वाटलं.
ती स्वतःहून पुढे झाली, आणि त्याचा गालगुच्चा घेत म्हणाली,
"पोरगा गोड आहे."
मात्र पोरगा तिच्यापासून कायम लांबच राहिला...
विंसी हळूहळू सगळ्या चालीरीती शिकली. स्कर्ट जाऊन साडी आली, कपाळावर टिकली आली, अरे तुरे जाऊन अहो जाहोची भाषा शिकली, थोडंफार देव देव करू लागली.
साळगावकर खुश होता, प्रचंड आनंदी होता. त्याच्यामधला पुरुष बाईला हवं तसं वाकवून आपल्या इच्छेप्रमाणे वळण देण्यात यशस्वी झाला होता...
मात्र आजकाल घरात पुरुषांची ये-जा जास्त वाढलीये, हे त्याच्या नजरेतून सुटत चाललं होतं.
●●●
"मोंझी, तू त्याला बाहेर मारायला पाहिजे होतं.
वसुंधरा मोंझेसच्या भक्कम मिठीत पहुडली होती."
"विनी, पोरं आवरतील सगळं."
वसुंधरा मोंझेसच्या अजून मिठीत शिरली.
"विनी, सोनं कुठे ठेवलंय माहितीये ना?"
"सगळ्या जागा माहितीयेत मोंझी."
"विनी डार्लिंग, माझा प्लॅन बरोबर होता. साला साळगावकर, ट्रान्सपोर्ट करता करता गोव्याचा किंग बनायला निघाला होता. सगळ्या धंद्यांच्या खाचा माहिती होत्या त्याला. उलटा पडण्याआधीच मी त्याला उलटा केला. पण त्याआधी तू त्याच्या घरात इन्ट्री मारली. येडा साळगावकर, गोव्याचा पहिला मुख्यमंत्री." मोंझेस जोरजोरात हसत होता.
"तू येडा आहेस मोंझेस. साळगावकर येडा नव्हता."
"म्हणजे?"
"मोंझेस, तू सगळ्यात मोठा स्मगलर, पण गोवा काय लहान नाही. आणि साळगावकर जरी गोव्यात असला, तरी बापजाद्यापासून हा व्यवसाय करत होता. दक्षिण महाराष्ट्र आणि बोंबेला साळगावकर जोडायचा."
"विनी सरळ बोल ना."
"बावन्न किलो साळगावकरने गपापल म्हणून तू रडतो, पण साळगावकरकडे किती सोनं आहे माहीत आहे का?"
"किती?"
"दीड टन!!!"
मोंझेसचे डोळे विस्फारले. "तू जोक नाही करत ना?"
"साळगावकर धंद्याविषयी कधी ब्र काढायचा नाही, पण आठवडाभरापूर्वी दारू पिऊन आला आणि दीड टन, दीड टन बरळत होता. त्याला खोदून विचारलं तर सगळं ओकल त्यानं."
"विंसी, माय डार्लिंग, कुठे आहे ते सोनं," मोंझेसने विन्सिला घट्ट मिठीत घेतलं.
"गोडावूनच्या खाली तळघर आहे, तिथल्या मोठ्या तिजोरीत त्याने सोनं लपवलेलं. परवाच एका गारुड्याला घेऊन तिजोरीची पूजा करायला गेला, तेव्हाच मी त्याच्या मागोमाग गेले, आणि चोरून खाली बघितलं."
"विंसी, डार्लिंग..." मोंझेसने तिला अजून घट्ट कवटाळलं.
"बॉस," एक माणूस वर आला.
"बोल परेरा."
"साळगावकरला पोहोचवला. गोल्ड काय मिळत नाय."
"जाऊ दे, विंसी, चल, निघूयात."
कपडे करून विंसी आणि मोंझेस दोन्हीही घराबाहेर निघाले.
...आणि बाकीच्यांनी त्या घराला आग लावली...
पंटर लोकांना पिटाळून विंसी आणि मोंझेस दोन्हीही गोडाऊनवर पोहोचले. तत्पूर्वी विंसीने विनायक दिसताच त्याला गोळी घालण्याची सूचना देऊन ठेवली. हे ऐकून मोंझेसही थरारलाच.
'रक्त आहे मोंझी, रक्ताचा बदला घेतल्याशिवाय रहाणार नाही. नागाच पिल्लू लहान असलं तरी कुणी त्याचं चुंबन घेत नाही.' विंसी थंडपणे म्हणाली.
गोडावूनवर कुणीही माणसे नव्हती. महेशची सक्त ताकीद होती, कामाशिवाय गोडाऊनवर फिरकायचं नाही. गरज असेल तेव्हा तो लोकांना निरोप देऊन बोलवून घ्यायचा. पगार मात्र महिन्याचा द्यायचा, त्यामुळे लोकही खुश असायचे, आणि महेशच्या कामातही जास्त ढवळाढवळ व्हायची नाही.
विंसी आतल्या भागात गेली. आतला भाग प्रचंड मोठा होता, आणि त्याला मोठमोठ्या शहाबादी फरश्या बसवल्या होत्या.
"मोंझेस, गणपतीची फरशी..."
विन्सिने एका फरशीकडे बोट दाखवला.
मोंझेसपासून जवळजवळ दहा पावलांवर ती फरशी होती.
उजव्या सोंडेचा गणपती, एक सुळा अर्ध्यावर तुटलेला, मात्र दुसरा सुळा प्रचंड मोठा आणि वेडावाकडा चितारलेला. मुकुटावर मण्याच्या जागी सर्पमुख, हातात चंद्रकोरीची तलवार, रागीट मुद्रा, आणि पोटावर व्याघ्रचर्म...
मोंझेसला फरशी बघूनच धडकी भरली, आणि त्याने ती उचकटून बाजूला ठेवली!
खाली एक लाकडी जिना होता. दोघेही खाली उतरले...
एक मोठा बंगला मावेन, एवढं साळगावकराच तळघर होतं. मात्र तळघरात काहीही नव्हतं.
दोन मोठ्या तिजोऱ्या सोडून...
...आणि तिजोरीच्या चाव्या त्यांनाच लटकवलेल्या होत्या...
"विनी," मोंझेसने हर्षरितेकाने विंसीला मिठी मारली.
"मोंझेस थांब." विंसीने स्वतःला मिठीतून सोडवून घेतलं.
"साळगावकर एवढा मूर्ख कधीच नव्हता." ती स्वतःशीच म्हणाली.
तिला साळगावकर विनायकला दररोज सकाळी देत असलेली शिकवणी आठवली.
'जगण्याचे दोन मार्ग असतात, आणि नियती प्रत्येक मार्गावर आपल्याला काहीतरी इशारे देत असते. तो इशारा समजला तर जगणं सुखकर होतं, नाहीतर मृत्यू परवडला अशी स्थिती निर्माण होते...'
"मोंझी, यातील एकच तिजोरी खरी आहे, आणि..."
"आणि काय, विनी?" मोंझेसने विचारले.
"…आणि दुसरी म्हणजे, मृत्यू..." विनी मनाशीच म्हणाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्तच...खुप छान....पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
लवकर येऊ द्या..

इतक्या चांगल्या कथेला इतके कमी प्रतिसाद??

माबोवर हल्ली कंपू तयार झालेत...कंपूतल्याने 'क्ष' जरी टंकल तरी भराभर प्रतिसाद येतात...बाकी इतरांनी कितीही दर्जेदार लिहू द्यात ते कायम दुर्लक्षित राहतात...

अहो इतकं सुंदर लिखाण करता आहात, आणि इतके लहान भाग का टाकता ? अतिशय उत्कंठा वर्धक भाग आहेत, प्लिज प्लिज प्लिज मोठे भाग टाका हो !!!!!

उत्कंठावर्धक!
प्लीज लवकर लवकर आणि मोठे भाग टाका.
पहिल्या भागात तुम्ही लिहिले होते की तुमच्याकडे कथा तयार आहे मग फक्त टायपायचचं आहे ना? तरीही नविन भाग इतका लहान व उशिरा का टाकत आहात. तुम्ही रिकामटेकडे नसाल तरीहि खूप दिवसांनी काहीतरी भारी वाचायला मिळत आहे म्हणून हा अट्टाहास Happy

उत्कंठावर्धक!
प्लीज लवकर लवकर आणि मोठे भाग टाका.
पहिल्या भागात तुम्ही लिहिले होते की तुमच्याकडे कथा तयार आहे मग फक्त टायपायचचं आहे ना? तरीही नविन भाग इतका लहान व उशिरा का टाकत आहात. तुम्ही रिकामटेकडे नसाल तरीहि खूप दिवसांनी काहीतरी भारी वाचायला मिळत आहे म्हणून हा अट्टाहास Happy

उत्कंठावर्धक!
प्लीज लवकर लवकर आणि मोठे भाग टाका.
पहिल्या भागात तुम्ही लिहिले होते की तुमच्याकडे कथा तयार आहे मग फक्त टायपायचचं आहे ना? तरीही नविन भाग इतका लहान व उशिरा का टाकत आहात. तुम्ही रिकामटेकडे नसाल तरीहि खूप दिवसांनी काहीतरी भारी वाचायला मिळत आहे म्हणून हा अट्टाहास Happy>> +1

अहो इतकं सुंदर लिखाण करता आहात, आणि इतके लहान भाग का टाकता ? अतिशय उत्कंठा वर्धक भाग आहेत, प्लिज प्लिज प्लिज मोठे भाग टाका हो !!!!! > +++ १

mahashweta mast.. aaj shodhat hote 4th part .. pan nirasha zhali.... Mala mahashweta... naav vachlyavar lagech Dr. Sumati Shetramade Yanchi.. mahashweta aathvali..

Pages