वारसदार - भाग २ - गोवा!

Submitted by महाश्वेता on 4 July, 2019 - 12:43

वारसदार - भाग १
https://www.maayboli.com/node/70503

ऐशीच्या दशकात कॉंटेसा आली, आणि तिने लोकांना वेड लावलं. मुंबईच्या उच्चभ्रू वर्तुळात दारासमोर कॉंटेसा असणं म्हणजे एक श्रीमंतीचं लक्षण समजलं जाऊ लागलं.
...अशीच एक कॉंटेसा गोव्याच्या एका गावात उभी राहिली, आणि आजूबाजूच्या लहान पोरांनी तिला गराडा घातला. 
स्टीफन अंसूरकर गाडीतून रुबाबात उतरला. गाडीच्या डिक्कीतून त्याने काही खाऊचे पुढे काढून पोरांना दिले, आणि पोरांना पिटाळले. पोरं दूर गेल्यावर त्याने गाडीतून काळी बॅग काढली, आणि तो एका गोडावूनच्या दिशेने जाऊ लागला.   
ते गोडावून तसं बरच मोठं होतं. बाहेर दहा बारा ट्रक लागल्या होत्या. आजूबाजूला बरीच मोठी पोत्यांची थप्पी पडली होती. सगळीकडे पत्रे ठोकून गोडावून बंदिस्त केलं गेलं होतं. 
"साळगावकर गाडी आणलीय बघ!"
महेश साळगावकर, गोव्यातील एक ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक. धंदा बऱ्यापैकी चांगला असला, तरी साळगावकरच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या, म्हणून बेकायदा मालाची ने आण करण्याचही काम साळगावकर करायचा.
"अरे, गाडी चांगली दिसतीय. कितीला पडली?"
स्टीफनला हसू आवरेना.
"अरे कितीला पडली काय ईचारतय साळगावकर, तुझीच असा. अलीने बक्षीस म्हणून गाडी दिली. एक लाखाची गाडी आसा."
"वा, बरं चाळीस हजार रोख मोजलेत ना? नंतर लफडं नको."
"अरे अलीने एक लाखाची गाडी दिलीये, आणि तू चाळीस हजाराची बात करतो साळगावकर."
"म्हणजे, तू फक्त गाडी आणली?"
"फक्त गाडी म्हणजे?" स्टीफनने प्रतिप्रश्न केला.
खाडSSS!!!!
स्टीफनचा गाल लालेलाल झाला...
"शिंच्या, गोव्याचा पुढचा मुख्यमंत्री आहे मी, कळलं? अशा दहा गाड्या घरासमोर उभ्या करीन, पण पैसा लागतो, रोख, निवडणूक लढवायला. कळलं? गाडी घेऊन जा, आणि रोख चाळीस हजार घेऊन ये. निघ!"
स्टीफनला साळगावकरने धक्के मारून बाहेर काढला.
"ये साळगावकर, आणतो चाळीस हजार, पण साधा मागची आमदारकी जिंकू शकला नाय तू, माका सांगतोय, मुख्यमंत्री होणार म्हणून."
साळगावकरने रागाने चप्पल काढून त्याच्या दिशेने भिरकावली.
स्टीफन घाईघाईने ती चप्पल उचलून जोरजोरात हसत पळाला.
'रां**' स्वतःशीच पुटपुटत साळगावकर फटफटी काढून घराकडे निघाला.
आपल्या दुमजली घरात साळगावकर, त्याची बायको वसुंधरा आणि मुलगा विनायक यांच्याबरोबर वास्तव्यास होता. विनायक नुकताच सहावी उत्तीर्ण झाला होता, आणि सातवीला गेला होता.
"वसू, ये वसू, वाढ लवकर."
"आले," वसुंधराबाई घाईघाईने ताट पुढे घेऊन आल्या.
भात, कोलंबीची आमटी, सुक्या बांगड्याच कालवण, भाकरी, सोलकढी आणि कोंबडीवड्यांनी संपूर्ण ताट भरलेलं होतं.
"अरे, वा सुगरणबाई, वा. अशी अन्नपूर्णा आमच्या घरात आली, अहोभाग्य."
वसुंधराबाई लाजल्या.
"मग आज आमच्या बापाचं श्राद्ध, की तुमच्या, एवढा नैवेद्य बनवलाय ते?"
वसुंधराबाई अविश्वासाने त्याच्याकडे बघू लागल्या.
"बघताय काय? तुमच्या बापाने पन्नास पोफळीच्या बागा आणि साठ जहाजा आमच्यासाठी आंदण म्हणून ठेवल्या नाहीत, पंचपक्वान्न जेवायला. काटकसर नावाची चीज काय असते, माहिती नाही. रत्ने उधळत फिरू नका, उद्या आम्ही मुख्यमंत्री झालो तर."
वसुंधराबाई वैतागून आत गेल्या.
महेशने वसुंधराबाईंची यथेच्छ खरडपट्टी काढली होती, पण जेवणाच्या वासानेच त्याची भूक चाळवली गेली होती. त्याने जेवणावर यथेच्छ आडवा हात मारायला सुरुवात केली.
टकटक!
दारावर टकटक झाली. 'आले' म्हणत वसुंधराबाई बाहेर आल्या आणि त्यांनी दरवाजा उघडला.
साडेसहा फूट उंची, गोरा गुलाबीसर वर्ण मात्र उन्हाने चढलेला राप, सोनेरी चोपून बसवलेले केस आणि त्याला साजेशी पांढरट सोनेरी मिशी. अंगावर फुलफुलांचा शर्ट आणि वरची दोन बटणं उघडी, आणि खाली निळी ढगळ पॅन्ट.
...मोंझेस, गोल्डमॅन... गोव्यातील सोन्याचा सगळ्यात मोठा तस्कर!!!
त्याला दारात उभा बघताच साळगावकाराचा घास घशात अटकून त्याला ठसका लागला.
"अरे साळगावकर काय करतो, नीट जेव. एवढा सुंदर वास येतोय, वहिनी कायबी म्हणा, साळगावकरने लपवून ठेवलं तुम्हाला आमच्यापासून. कायम त्या स्टीफनीच्या हातचा कोरडा भात आणि गार कालवण खाऊन कंटाळा आला बघा."
वसुंधराबाई कौतुक ऐकून मनोमन सुखावल्याच.
"वसुंधरा आत जा," साळगावकरचा आवाज चढला.
वसुंधराबाई काहीच न कळून गोंधळून उभ्या होत्या.
"वसू आत जा," साळगावकर अजून चिडला.
आणि वसुंधराबाईं घाईघाईने आत गेल्या.
"काय साळगावकर, बाईवर काय चिडतो. ये जेव शांततेत."
"मोंझेस, घरापर्यंत यायचं काम नव्हतं."
"बावन्न किलो गोल्ड गपापल तू साळगावकर, माझ्या घराला आग लागलीये, आणि तुझं घरही बघू नको?"
"मोंझेस, ते सोनं मी चोरलेल नाहीये. कितीदा सांगू?"
"गाडी तुझी, होडी तुझी, माणसं तुझी साळगावकर, मग जबाबदारी नको? अजूनही गोल्ड द्यायच असेल तर दे.'
"माझ्याकडे काहीही नाहीये मोंझेस."
बरं उभा राहू नको, जा, हात धुवून ये.
साळगावकर पूर्णपणे हादरून गेला होता.
मोंझेसने त्याच्यापुढचं ताट उचलून घेतलं, आणि जेवणास सुरुवात केली.
"साळगावकर, वा, काय जेवण आहे बाप. वा वहिनी. तुम्हाला लपवून ठेवलं याने आजपर्यंत."
"मोंझेस, माझ्या फॅमिलीला काहीही करू नको. पाया पडतो मी तुझ्या."
"जेवण, वा... सुंदर, प्रचंड सुंदर."
"मोंझेस..."
आणि पुढच्याच क्षणी साळगावकरच्या कपाळाचा गोळीने वेध घेतला!
"जेवताना डिस्टर्ब नको." मोंझेस शांतपणे जेवू लागला.
गोळीच्या आवाजाने वसुंधराबाई बाहेर धावत आल्या.
समोरचं दृश्य बघून त्यांना प्रचंड धक्का बसला.
शेवटी भानावर येऊन त्यांच्या तोंडून शब्द फुटला...
"बाहेर नेऊन तरी मारायचं होतंस!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय. Happy
खुपच छोटे भाग आहेत. जरा सविस्तर भाग टाका.>>>+१

पहिला भाग वाचला आणि हाही. 'साळगावकर' एवढं आडनावच पहिल्या भागाचा वारसा सांगत आहे. मजा आली दोन्ही भाग वाचायला आणि पुढच्या भागाचं औत्सुक्य वाढलं.

खतरनाक आहे!!!
महेश कोण ते लक्षात नाही आले पण.