उन्नूचा मोरपिसारा

Submitted by बिपिनसांगळे on 26 June, 2019 - 12:33

उन्नूचा मोरपिसारा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जंगलात राहणारा उन्नू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा .कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं , तर कधी सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या.
एकदा उन्नू म्हणाला , "आई , काय हा माझा काळा रंग ! मी बदकांसारखा गोरा गोरा हवा होतो ."
त्या वेळी तिथून एक परी चालली होती . तिनं ते ऐकलं . आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागं लपून बसली .
आई म्हणाली , "एक काम कर . आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो . तू सारखा काहीतरी कल्पना करत असतोस . तर 'मी काय करू ? असं तू त्यालाच जाऊन विचार !"
उन्नू पळत रामूकडे निघाला . परी त्याच्या मागे होतीच . वाटेत त्याला मोर दिसला . रंगीबेरंगी पिसारा असलेला , तो फुलवून नाचणारा .
‘ ये हुई ना बात ! असं असेल तर नाचायला काय मज्जा येईल !’ उन्नूला वाटलं .
उन्नू रामूकडे पोचला . त्याला स्वतःच्या डोक्यातल्या कल्पना सांगितल्या . रामूला त्याचा वेडेपणा कळत होता . पण उन्नू छोटा आहे , त्याची समजूत घालावी म्हणून त्यानं विचारलं ,7" तुला तुझं रूप नको आहे . ठीक . पण मग तुला काय व्हायचं आहे ?"
"मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे ."
त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला . तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि ? ....उन्नू च्या शेपटीच्या वर - अगदी मोरासारखा , रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला . तो होता छोटाच , त्याच्या मापाचा . पण सुंदर !
तो मोरपिसारा पाहून तर रामूही आश्चर्यचकित झाला .
उन्नूनं पिसारा पहिला आणि तो एकदम खुश झाला . तो रामूलाही विसरला . आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला .
तो बिळापाशी आला . पळून पळून त्याला खूप भूक लागली होती . म्हणून घाईघाईनं तो बिळात शिरू लागला अन... अरे देवा ! त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला . मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो . कारण तो मोर असतो .हा तर होता उंदीर ! तो पिसारा त्याचा नव्हता . तो मिटेना . उन्नू वैतागला . त्याला काय करावं कळेना ! तो उलटा होऊन आत जाऊ लागला . तर बिळ पूर्ण झाकलं गेलं .
आत आई घाबरली . तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं . तर उन्नू धाडदिशी पडलाच. ती बाहेर आली . आईनं ढकलून पाडलं , म्हणून उन्नूला राग आला . तो आईवर चिडला . त्याला पाहून आईला हसूच फुटलं . ती आधी हसली अन नंतर तिला आपल्या पोराची काळजी वाटली . असा उंदीर कधी असतो का ? मोरपिसारा असलेला ? '
"आई , मला भूक लागली ."
"बरं ! चल आत ."
"कसा येऊ ? पिसारा अडकतोय , मिटता येत नाही ."
"पिसारा कसला , पसाराच हा ! अरे , आणलास कुठून ?"
"रामूकडून ."
"रामूकडून ? " आईला आश्चर्य वाटलं . मग तिनं खाऊच बाहेर आणला. उन्नूला भरवला आणि म्हणाली , "रामूला हे शक्य नाही ! "
"आई , आता झोप आली ." खाऊन झाल्यावर तो म्हणाला .
"आत कसा येणार ? आता बाहेरच झोप बाळा ."
शेवटी उन्नूला बाहेर झोपण्याची शिक्षा मिळाली . त्याची चांगलीच फजिती झाली . त्याला नीट झोपही येईना ! त्याला सारखी स्वप्नं पडत होती . एकदा त्याला तो मगर होऊन पाण्यात पोहल्यासारखं वाटत होतं , तर एकदा त्याला साप होऊन सरपटल्यासारखं वाटत होतं .
सकाळी आई लवकर बाहेर आली . उन्नूही जागा झाला .
"आई , मला हा पिसारा नको . खरंच नको . यापुढे मी काही मागणारही नाही . "
"मग देवाला मनापासून तशी प्रार्थना कर ." आई म्हणाली .
परीला हे असं होणार हे माहीतच होतं . ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती .
उन्नूनं प्रार्थना केली . परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली .
....आणि उन्नू पुन्हा पहिल्यासारखा झाला ! आईनं त्याला जवळ घेतलं . त्याला खूप बरं वाटलं .
मग आई म्हणाली , "अरे , तुला रामू हत्ती आवडतो ना ? तर अशी इच्छा करावी , की रामूसारखं बुद्धिमान होऊ दे ; त्याच्यासारखं अवाढव्य शरीर मागितलंस - तर काय उपयोग ? "
आईला काय म्हणायचंय , ते वेड्या उन्नूला तरीही कळलं नाही . त्याला फक्त एवढाच प्रश्न पडला , की तो रामूएवढा झाला तर बिळातून आत कसा जाणार ?
पण उन्नूच्या आईला काय म्हणायचंय , ते तुम्हाला कळलं का मुलांनो ?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सानेगुरुजी यांच्या कथेचे हेच कथाबीज आहे . फक्त थोडा फरक केलाय. तिथे दगडफोड्या इथे उंदीर. लहानपणी वाचली होती.
https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B8%E0...