प्रचारकी 'लैला' - Series Review 'Leila' (Netflix)

Submitted by रसप on 25 June, 2019 - 05:26

'नेटफ्लिक्स'वरील बहुचर्चित 'लैला' ह्या मालिकेचा पहिला सिझन पाहिला. दुसरा अजून आलेला नाहीय. एकूण सहा भागांच्या ह्या पहिल्या सिझनमधून कहाणी एका उत्कंठा वाढवणाऱ्या टप्प्यापर्यंत येऊन थांबलेली आहे.

'लैला' ही एक लहान मुलगी आहे. साधारण ५-६ वर्षांची. जरी मालिकेचं शीर्षक तिच्यावर बेतलेलं असलं, तरी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे 'शालिनी' (हुमा कुरेशी). ही कहाणी भविष्यातली आहे. कथानक सुरु होतं २०४७ सालात. स्वातंत्र्योत्तर १०० वर्षांत भारत अश्या एका स्थितीत पोहोचलेला आहे, जिथे जाती, धर्म ह्यांचा राजकीय वापर करून त्याच्या जोरावर समाजाला विभाजित केले गेले आहे. वेगवेगळे समुदाय वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वास्तव्य करून आहेत आणि भिंती बांधून प्रत्येक सेक्टर इतरांपासून वेगळं केलं गेलं आहे. प्रत्येक भिंतीच्या प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त असून तपासणी केल्याशिवाय कुणीही आत जाऊ शकत नाही. सुखवस्तू कुटुंबं एक सर्व सोयी-सुविधांचं सुखाचं जीवन जगत आहेत आणि गरीब लोकांना पाण्यासाठीसुद्धा झगडा करावा लागतो आहे. पाणी ही एक महागडी चीजवस्तू झालेली आहे. प्रदूषित हवा इतकी भयानक आहे की क्वचित काळा पाऊसही पडतो आहे. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकावर पाळत आहे. सगळ्यांचे सगळे रेकॉर्ड्स सरकारकडे आहे. त्यामुळे एकंदरीतच परस्परविश्वास कधीच संपलेला आहे.
अश्या ह्या विषण्ण देशाचं नावही आता बदललेलं आहे. 'आर्यवर्त' असं त्याचं नाव आहे आणि त्याचा प्रमुख नेता आहेत 'डॉ. जोशी' (संजय सुरी).
'आर्यवर्त' देशाच्या एका सुखवस्तू सेक्टरमध्ये, मोठ्या घरात शालिनी चौधरी (हुमा कुरेशी), पती रिझवान चौधरी (स्राहूल खन्ना) आणि तिच्या लहान मुलीसोबत राहते आहे. एक दिवस त्यांच्या घरावर काही कट्टरपंथी हल्ला करून रिझवानला ठार मारून शालिनीला सोबत घेऊन जातात. आंतरधर्मीय विवाह आणि त्यातून एका मिश्रित (दूषित) रक्ताची मुलीला दिलेला जन्म ही शालिनीची दोन पापं मानली जाऊन तिची रवानगी 'शुद्धी केंद्र' नावाखाली उभारल्या गेलेल्या छळछावणीत होते. आपल्या पतीला गमावलेल्या शालिनीला काहीही करून स्वत:च्या मुलीपर्यंत पोहोचायचं असतंच. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करते. 'लैला' ही एका आईची आपल्या मुलीला शोधून तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे.

Leila-poster.jpg

हुमा कुरेशी, सिद्धार्थ, आरिफ झकारिया, सीमा बिस्वास, आकाश खुराना अशी सगळी ह्या मालिकेची स्टारकास्ट आहे. हुमा कुरेशी आणि सिद्धार्थच्या व्यक्तिरेखा मुख्य आहेत. दोघांचंही काम दमदार आहे.
सिद्धार्थ हा गुणी अभिनेता 'रंग दे बसंती'च्या जबरदस्त यशानंतरही हिंदीत फार काही दिसला नाही. त्याला इथे पाहून खूप आनंद वाटला. गेल्या काही वर्षांत हिंदीत वेगळे आणि चांगले सिनेमे बनायला लागले आहेत. ह्या चांगल्या बदलाच्या लाटेवर सिद्धार्थसारख्या कलाकारांनी स्वार व्हायला हवं.
हुमा कुरेशी अगदीच मर्यादित वकूबाची अभिनेत्री नसली, तरी 'तबू'च्या जवळपासची आहे. हे तिने एक थी डायन, बदलापूर, देढ इश्क़िया अश्या काही सिनेमांतून दाखवून दिलं होतं. 'शालिनी'ची धडपड, तडफड, घुसमट हे सगळं तिने खूप छान सादर केलं आहे. पण तिच्या व्यक्तिरेखेला विविध कंगोरे नाहीत. साधारण एकाच एका मूडमध्ये ती असते.

पार्श्वसंगीत धीरगंभीर आहे आणि अनेक ठिकाणी जिथे प्रसंगाचं चित्रण फुसकं आहे, तिथे नाट्यमयता, तीव्रता फक्त त्याच्याच जोरावर टिकते. त्यासाठी आलोकनंदा दासगुप्ता विशेष उल्लेखनीय आहेत. ह्यापूर्वी 'ट्रॅप्ड', 'ब्रीद' आणि 'सेक्रेड गेम्स' मध्ये त्यांनी उत्तम काम दाखवलं आहेच.
कॅमेरावर्क आणि व्हीएफएक्ससुद्धा उत्तम जमले आहेत.

ज्येष्ठ दिग्दर्शिका दीपा मेहतांच्या ह्यापूर्वीच्या बहुतांश चित्रकृती वादोत्पादक ठरलेल्या आहेत. 'लैला'ही त्याला अपवाद नाहीच. पण वादाचे मुद्दे बाजूला ठेवून विचार केला तरी अनेक ठिकाणी 'लैला' कमकुवत ठरते.
कथानक मुळात 'एका आईने तिच्या मुलीचा घेतलेला शोध' ह्यावर केंद्रित आहे. ते कुठल्याही जगात घडू शकलं असतं. आजच्याही. भारतातही, अमेरिकेतही, पाकीस्तानातही आणि आर्यवर्तातही. त्यामुळे २०४७ चा काल्पनिक कालखंड, आर्यवर्त वगैरे सगळं अनावश्यक वाटत राहतं. किमान पहिल्या सिझनमध्ये तरी त्यामुळे काही वेगळा प्रभाव मूळ कथानकावर पडलेला नाहीय.
अजून ३० वर्षांनंतरच्या भारतात आमुलाग्र बदल झालेले दाखवलं आहे खरं, पण ते सगळं सोयीस्करपणे. ३० वर्षांनंतरही ह्या विकसित देशात रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या आजच्याच आणि आजच्यासारख्याच आहेत. आज विकसित देशांत स्वयंचलित आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आलेल्या आहेत. ३० वर्षांनंतरच्या 'आर्यवर्त'मध्ये त्यांचा मागमूसही नाही. तांत्रिक प्रगती फक्त हवेत प्रोजेक्शन करू शकणाऱ्या मोबाईल्स व इतर डिव्हाइसेस पर्यंतच मर्यादित दाखवली आहे. सुरक्षा रक्षक, पोलीस वगैरेंकडे असलेली शस्त्रंसुद्धा पुढारलेली दिसत नाहीत. गुलामांच्या हातांवर 'टॅटू'सदृश्य कोडींग केलेलं दाखवलं आहे. पण त्याद्वारे प्रत्येक गुलामाचं ट्रॅकिंग करता येणं सहज शक्य असतानाही ते टाळलं आहे, कारण मग शालिनीच्या हालचाली व डावपेचांना कदाचित खूप विचारपूर्वक मांडावं लागलं असतं. अश्या अनेक गोष्टी आहेत, जिथे ही तथाकथित प्रगती व आधुनिकता सोयीस्करपणे बाजूला ठेवली आहे. तिचा कथानकातला उपयोग फक्त अत्याचारी राजवट दाखवण्यापुरताच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पसाऱ्यातला प्रचारकी नाटकीपणा उघडा पडतो.
शालिनीला शिक्षा म्हणून 'शिद्धी केंद्रा'तून ज्या 'श्रम केंद्रा'त पाठवले जाते, प्रत्यक्षात तिथलं आयुष्य आधीपेक्षा किती तरी पट सुसह्य असल्याचं दिसून येतं. असं वाटत राहतं की आता हिला काही त्रास होईल, पण रोज २०-२१ मजले चढून जाण्याव्यतिरिक्त तिलाच काय, कुणालाही कुठलाही त्रास दिला जात नाही. ही काय गंमत आहे, कुणाच्या लक्षात कशी आली नाही की ह्यातली कलात्मकता मलाच लक्षात आली नाही, कुणास ठाऊक !
पहिला सिझन जरी सहाच एपिसोड्सचा असला, तरी प्रत्यक्षात त्यात दाखवलेलं कथानक कदाचित २-३ एपिसोड्समध्येच संपू शकलं असतं. अतिशय रटाळपणे आणि झाकोळलेल्या निराशामयतेत हे सहा भाग सरकतात. खूप संयम ठेवून आणि अंमळ जबरदस्तीनेच मला सहा पूर्ण पाहता आले आहेत. 'शोधकथा' म्हटल्यावर ती थरारक असते, ह्या प्राथमिक समजाला तडा देणारा अनुभव हे एपिसोड देतात आणि इतकं करूनही कथानक पूर्णत्वास जात नाही. अगदीच विचित्र आणि अर्धवटपणे ते सोडून देण्यात आलं आहे. जिथे सहावा भाग संपतो, सिझन संपतो, तिथे चालू असलेला प्रसंगही पूर्ण संपलेला नाही. नाट्यमयता जपण्यासाठी, लोकांनी पुढचा सिझन पाहावा ह्यासाठी असा प्रसंगाचा तुकडा पाडावासा वाटणं, हा माझ्या मते तरी कलात्मक पराभव आहे.

राजकीय परिस्थितीवर जराही भाष्य करणाऱ्या कलाकृतींना, खासकरून जर ते भाष्य बंडखोरी, विद्रोही, विरोधी असेल तर भारी मानलं जातं. 'लैला'बाबतही थोडंफार तसंच आहे. सिरीज बरी आहे, पण विशेष दखल घ्यावी असं काहीच मला तरी जाणवलं नाही, तरी तिची चर्चा तर होणारच आणि होतेही आहे ! त्यामुळे मेकर्सचा हेतू साध्य झाला आहे, हे नक्कीच.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2019/06/series-review-leila-netflix.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय रटाळ सिरीज... पांचट vfx. भविष्यातील न वाटता भूतकाळातील वाटते असले सेट्स आहेत.

हुमा कुरेशी अगदीच मर्यादित वकूबाची अभिनेत्री नसली, तरी 'तबू'च्या जवळपासची आहे.
>>> काहीही... तब्बू लेव्हल गाठायला हुमा ला जमणार नाही.

Interesting.. बघणार आता.
तरबेज अन्सारी आणि चमकी ताप ही विश्वगुरु ची लक्षणे आहेत. 2024 ला लैला अतिशयोक्ती राहणार नाही.

मस्त लेख, पण या लेखामुळे series बघण्याचा निर्णय रद्द केला

(बाकी इथे काय होईल ते सहन करायला तुम्हाला बळ मिळो)

डिस्टोपिअन सोसायटी आहे... सो अतिरंजित/ एक्स्ट्रिम व्ह्यू दाखवणं ही गरज आहे. त्यामुळे प्रचारकी वाटली नाही.
तुमचे सिलेक्टिव्ह टेक अ‍ॅडॉप्शनचे आक्षेप मात्र अगदी पटले.
स्टोरी टेलिंग आवडले. नॅरेशनचा आधार घेतला नाही हे ही आवडले. सध्या भडक खून आणि वारेमाप सेक्स सीन्सच्या चलतीत तसं चित्रण अजिबात न करता मनावर फ्रेम्सच्या माध्यमातुन तोच/रादर भितीच्या भावनेत काकणभर जास्तच परिणाम करते ते ही आवडलं.
मेकप ही अत्यंत सुंदर केलेला आहे. हुमा कुरेशी चे काम ही आवडले.