कुट्टाबाई - श्री. गिरीश कार्नाड

Submitted by चिनूक्स on 10 June, 2019 - 08:15

लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, विचारवंत श्री. गिरीश कर्नाड यांचं आज निधन झालं.

कुट्टाबाई या त्यांच्या आई. आपल्या आईबद्दल कर्नाडांनी एक सुरेख इंग्रजी लेख लिहिला होता. या लेखाचं मराठी भाषांतर श्रीमती सरोज देशपांडे यांनी केलं. श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादन केलेल्या आणि साधना प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या 'आई' या पुस्तकात या लेखाचा समावेश केला आहे.

डॉ. गिरीश कर्नाडांना श्रध्दांजली म्हणून हा लेख इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

***

माझ्या आईचं नाव कृष्णाबाई - कृष्णाबाई मंकीकर. पण घरातली वडिलधारी माणसं तिला 'कुट्टाबाई' म्हणायची आणि लहानांची ती 'कुट्टाक्का' होती. ती ब्याऐंशी वर्षांची झाल्यावर १९८४मध्ये माझी वहिनी सुनंदा हिने तिला आत्मचरित्र लिहायला प्रवृत्त केलं. कोकणीमधलं हे आत्मचरित्र सुमारे ३२ पानांचं आहे - माझ्या वडिलांच्या रोजमेळाच्या जुन्या डायरीत रिकाम्या जागेत खरडलेलं. संदेह आणि हुरहूर यांनी अतिशय अस्वस्थ करणाऱ्या रात्रींशी समझोता करण्याची धडपड ते वाचण्याआधी मी आणि माझी भावंडं लहानपणी करीत असू. तिच्या आत्मचरित्रानं त्या भयांची उत्तरं देऊन ती उजेडात आणली.

कुट्टाबाईचा जन्म हुबळीला झाला. लहानपणीच तिला 'मद्रास अँड सदर्न मराठा रेल्वे'त नोकरीला असलेल्या वडिलांबरोबर पुण्याला जावं लागलं. तो काळ पुण्यात सामाजिक, तसंच कलाक्षेत्रातल्या प्रचंड उलथापालथींचा होता. स्त्रीशिक्षणाची चळवळ जोरात होती. उज्ज्वल भविष्यकाळाच्या नव्या दृष्टी त्यामुळे जाग्या होत होत्या. डॉक्टर झालेल्या किती तरी स्त्रिया मुंबई आणि पुण्यात होत्या. सरलाबाई नाईक नावाची एक स्त्री एम. ए. झाली होती. कुट्टाबाईला त्यांच्यासारखं व्हायचं होतं. मराठी साहित्य आणि नाटक प्रेरणादायी, स्फुर्तिप्रद होतं. कुट्टाबाईला हे दोन्ही नेहमीच अत्यंत प्रिय राहिले. पुण्यातल्या वास्तव्याची ही वर्षं तिच्या आयुष्यातली अतिशय आनंदाची वर्षं होती. पण ती आठ वर्षांची असताना तिच्या वडिलांची अचानक गदगला बदली झाली. आयुष्यात पुढे समोर वाढून ठेवलेल्या अनेक निराशाजनक प्रसंगांपैकी हा पहिला प्रसंग. गदग हा सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला गाव मानला जाई. तिथे कन्नड भाषा बोलली जाते. तिला ती येत नव्हती. तिथलं वातावरणही जुनाट होतं. शिवाय गदगमध्ये मुलींच्या शिक्षणाचीही सोय नव्हती.

कुट्टाबाई रडत आपल्या मास्तरीणबाईंजवळ गेली. ''मला गदगला जायचं नाही. मला खूप शिकायचं आहे- अगदी बी.ए.पर्यंत.'' तिच्या मास्तरीणबाई हुजूरपागेतल्या एका शिक्षिकेची बहीण होत्या. त्या दोघी बहिणी कुट्टाबाईच्या बरोबर घरी आल्या आणि तिच्या वडिलांना म्हणाल्या, ''कुट्टाबाईला शिकायची फार हौस आहे. तिला तुम्ही हुजूरपागेच्या होस्टेलवर ठेवा. तुम्हाला काही खर्च येणार नाही. तिच्या राहण्या-जेवणाचा सगळा खर्च सरकार देईल." पण आई-वडिलांनी ते मानलं नाही आणि तिला गदगला घेऊन गेले.

कृष्णाबाई पुण्याला राहिली तर तिला बाटवून ख्रिश्चन केलं जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. त्यानंतर अर्धशतक उलटल्यावर ज्या वेळी या घटनेविषयी आई माझ्याशी बोलली, त्या वेळीसुद्धा तिचे डोळे पाण्याने एकदम भरून आले होते.

गदगमध्ये मुलांच्या शाळेत, वर्गात ती एकटीच मुलगी होती. वयात येऊन ॠतुमती झाली, तरी कुट्टाबाईचं लग्न झालं नव्हतं. नातलग आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांपासून ही लाजिरवाणी गोष्ट लपवून ठेवण्याचा आणि सगळं काही 'ठीक' आहे हे सोंग दर महिन्याला भासवण्याचा घरातल्या माणसांचा निकराचा प्रयत्न असे. अखेर 'गोकर्ण' कुटुंबातला एक मुलगा त्यांना हिच्यासाठी आढळला.

तिचं लग्न झालं. एक मुलगाही झाला. भालचंद्र. पण वर्षभरातच अ‍ॅनीमिया आणि न्युमोनिया यांनी तिच्या पतीचा मृत्यू झाला. सासू-सासरे भेटायलाही आले नाहीत. कुट्टाबाई लिहिते, 'त्या वेळी वडिलांनी दिलेल्या दागिन्यांपलीकडे माझ्यापाशी एक कवडीसुद्धा नव्हती. एक विमा पॉलिसी होती, पण हप्ते न भरल्याने ती रद्द झाली होती.'

अशा रीतीने, कडेवर मूल घेऊन भविष्यकाळाची तिची वाटचाल सुरू झाली.

निम्न मध्यमवर्गातल्या विधवांच्या कपाळी हेच असायचं. अजूनही असतं. सुदैवाने १९२०च्या सुमारास चित्रापूर सारस्वत जातीच्या लोकांनी विधवा-केशवपनाची चाल सोडून दिली होती. त्यामुळे मोकळे सोडल्यावर गुडघ्यापर्यंत येणारे तिचे लांबसडक केस न्हाव्याच्या कात्रीपासून वाचले होते.

अशा निराशाजनक परिस्थितीतही शिक्षण घेण्याचा कुट्टाबाईचा निश्चय होता. काही तरी महत्त्वाचं साध्य करायचं- शक्य झाल्यास डॉक्टर व्हायचं, ही आकांक्षा होती. ती गदग येथे आई-वडिलांकडे राहत होती. त्या काळी महाराष्ट्रात मिशनरी लोक, तसंच ब्रिटिश सरकार मुलींना शिक्षण देण्याच्या योजनांना सक्रिय पाठिंबा देत होते. त्यामुळे दिगंतापलीकडे मदत मिळण्यासारखी होती. पण घरच्या कोणाला तिची जबाबदारी घेऊन तिला पुण्या-मुंबईला नेऊन एखाद्या शिक्षण संस्थेत दाखल करावं, इतकं स्वारस्य नव्हतं आणि वेळही.

या परिस्थितीत तिच्या मोठ्या बहिणीचे यजमान शशीतल मंगेशराव काय ते तिच्या मदतीला पुढे आले. ते उत्तर कर्नाटकात मामलेदार होते. आधी हावेरीतलं आणि नंतर धारवाडमधलं त्यांचं घर म्हणजे जणू एखादं मोठं थोरलं अनाथालयच असे. स्वत:ची सात मुलं होतीच, शिवाय दूरच्या नात्यांतल्या अनेक निराधार, अनाथ मुलांना आणून ते नवरा-बायको आसरा देत.
या सगळ्या मुलांना शिकवून सुसंस्कृत करण्याचा मंगेशरावांना ध्यास होता.

सकाळी शाळेला जाण्याआधी संस्कृत शिकवण्यासाठी एक शिक्षक येत. शाळा सुटून मुलं घरी आली रे आली की, लगेच त्यांची शिकवणी घेणारे दुसरे एक शिक्षक हजर होत. शिवाय स्वत: मंगेशरावांना शिकवण्याची आवड. या अविश्रांत शिकवणीने ती बिचारी मुलं किती सुशिक्षित झाली देव, जाणे; पण त्यामुळे कुट्टाबाईला घरबसल्या स्वशिक्षणाचा मार्ग सोपा झाला. "मला अभ्यासाची आवड होती, त्यामुळे पाच-सहा महिन्यांत मी इंग्रजी चौथीपर्यंतचा अभ्यास पूर्ण केला. बीजगणित, अपूर्णांक, काळ-काम-वेग वगैरे. संस्कृत भाषांतर असा विषय असायचा. त्यावरही मी प्रभुत्व मिळवलं. मग मी घरूनच मॅट्रिकची परीक्षा द्यायचं ठरवलं. त्या काळी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी फक्त मॅट्रिक व्हावं लागे. मला डॉक्टर व्हायचंच होतं...''

पण दुर्दैवानं मंगेशरावांची बैलहोंगलला बदली झाली. लहानसा मागासलेला गाव. तिथे शिक्षणाची सोय नव्हती. कुट्टाबाईची स्वप्नं धुळीला मिळाली. पुढं जे घडलं, ते मी तिच्याच शब्दांत सांगेन.

"...माझ्या मेहुण्यांना कोर्टाच्या कामासाठी वरचेवर बेळगावला जावं लागे. बेळगावला ते डॉक्टर कार्नाड या नातलगाकडे उतरत असत. तिथे काम करणाऱ्या नर्सेसना बघून त्यांच्या मनात मला नर्सिंग शिकण्यासाठी तिकडे पाठवण्याची कल्पना आली. 'आपल्या मेहुणीला नर्सिंगला प्रवेश मिळेल का', असं त्यांनी डॉक्टर कार्नाडांना विचारलं. डॉक्टर 'हो' म्हणाले. तेव्हा त्यांनी मला नर्सिंग शिकायला सांगितलं. मी तक्रार करीत म्हटलं, 'मला मॅट्रिक संपवून डॉक्टरच व्हायचं आहे.' पण ते म्हणाले, 'तू नर्सिंगचं शिक्षण घेता-घेता अभ्यास करून परीक्षा दे.' एवढंच नाही, तर मला शिकवण्यासाठी शिक्षक ठेवायचीही तयारी त्यांनी दाखवली.

''एका वर्षाच्या मिडवाइफरी अभ्यासासाठी मला प्रवेश मिळवून देऊन ते गेले. आमच्या संपूर्ण कुटुंबात तेच तेवढे मला मदत करीत होते, त्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता. माझ्याकडे नव्हते पैसे, की दागिने. आईने मला गळ्यातली एक बोरमाळ, बांदी आणि तोडे दिले होते. सगळं मिळून चार-पाच तोळे सोनं होतं. पण माळेखेरीज बाकीचं सोनं कुठे गडप झालं, कोण जाणे! सासूबाईंनी मला लग्नात पिढीजात चालत आलेली पुतळ्यांची माळ घातली होती. पोटापर्यंत येणारी ती माळ त्यांनी घरी जाताना परत नेली. त्या वेळी मी या कशाचाच विचार केला नाही.

''बेळगावच्या नर्सिंग कॉलेजला जॉईन झाल्यावर माझ्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. मला महिना 20 रुपये स्कॉलरशिप मिळत होती.''
''डॉक्टर म्हणाले, 'इथंच माझ्या घरी राहा.'
''त्यांच्या घरी स्वयंपाकी होता. डॉक्टरांची बायको आजारी असे. कशाने; मला माहीत नाही. ती अंथरुणाला कायम खिळून असे. अंघोळ नाही, उठणं किंवा हिंडणं-फिरणं नाही.

''डॉक्टरांचं म्हणणं मान्य केल्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. दिसायला डॉक्टर देखणे होते. जवळजवळ सहा फुट उंची. कुरळे केस. गोरा वर्ण. कोणालाही आकर्षण वाटावं अशी चाल. ना लठ्ठ, ना रोड. हॉस्पिटलमध्ये जाताना ते हॅट घालीत. त्यामुळे लोकांना ते अँग्लोइंडियन वाटायचे. त्या वेळी ते 34-35 वर्षांचे असतील.

''डॉक्टरांनी त्या वेळी मला विचारलं, 'रिमॅरेज करण्याचा विचार आहे का?' म्हणून. मग त्या विचाराचा भुंगा माझं मन पोखरायला लागला. मी फक्त 22 वर्षांची होते.''

अशा रीतीने कुट्टाबाईचा डॉक्टरांच्या घरातल्या पाच वर्षांच्या वास्तव्याला प्रारंभ झाला. आमच्या पोरसवदा वयात मी आणि माझी भावंडं यांच्या मनांना घरं पाडणारी ही पाच वर्षं. सरतेशेवटी त्यांचं लग्न झालं, हे खरं; पण ही पाच वर्षं त्यांचं नातं काय होतं? त्यांचा शरीरसंबंध आला असेल का? आमच्या आईने एका विवाहित पुरुषाबरोबर अनैतिक संबंध ठेवला असेल- तो माणूस आमचा पिता का असेना- हा विचारसुद्धा कमालीचा क्लेशकारक होता. परवा-परवापर्यंत या विषयाची चर्चा झाली आणि कधी तरी त्यांचा शरीरसंबंध येत असेल, असं मी नुसतं सूचित जरी केलं; तरी माझ्या बहिणी 'ए गप्प बैस' म्हणून संतापत असत, नाही तर त्यांना रडू कोसळत असे. हे सगळे प्रश्न या आत्मचरित्रामुळे मार्गी लागले.

पण मला नवल वाटतं आणि कोडं पडतं ते शशीतल मंगेशरावांचं! एका बाविशीच्या तरुण, सुंदर विधवेला पस्तिशीच्या गृहस्थाच्या झोळीत घालून हात झटकून ते मोकळे झाले खरे; पण या प्रतिष्ठित माणसाला इतकी लोकविलक्षण कृती करताना समाजव्यवस्थेच्या कोणत्या चौकटीचा आधार मिळाला असेल? डॉक्टर तिच्याशी लग्न करतील असं धरून चालणं शक्य तर नव्हतं आणि ते तितकं सरळ घडलंही नाही. दोघंही सारस्वत, मध्यमवर्गीय; तेव्हा औचित्य सांभाळून सरळ मार्गाने चालतील, असा विश्वास त्यांना वाटला असेल? की, या विधवेचा भविष्यकाळ अंध:कारमय आहे आणि आपण तिला घरी जन्मभर सांभाळू शकणार नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल?

काहीही असेल; पण या सगळ्या प्रकरणाचे कारणपुरुष होते मंगेशराव. ते आमच्या कुटुंबाचे खरे पुराणपुरुष ठरले.

डॉक्टरांनी लग्नाचं नावही पाच वर्षं काढलं नाही. त्या काळी द्विभार्या प्रतिबंधक कायदा नव्हता. महाराष्ट्रात चार-पाच बायका असलेले पुरुष होते. पण डॉक्टरांना लोकमताचं भय वाटत होतं. त्यांची भीती नेमकी काय होती, ते कुट्टाबाई सांगत नाही. पण दोन बायका करण्याच्या भीतीपेक्षा विधवेशी लग्न करण्यामुळे होणाऱ्या लोकनिंदेच्या भीतीमुळे त्यांचा पाय मागे येत होता.

त्यामुळे कुट्टाबाईला परिस्थितीचा एकाकी सामना करावा लागला. बेळगाव सोडून एकटीनं बंगलोरसारख्या लांबच्या ठिकाणी कामाच्या शोधात जायचं आणि हात हलवत बेळगावला डॉक्टरांच्या आसऱ्याला परत यायचं... तिच्या जीवनाचं धृपद झालं.

''...आमची सलगी वाढली होती. पण लोकांचं आडून-आडून बोलणं, टोमणे मारणं मला असह्य व्हायला लागलं होतं. डॉक्टरांची धारवाडच्या सिव्हिल हॉस्पिटलला 1928 मध्ये बदली झाली. माझं नर्सिंगही पूर्ण झालं होतं. मी नोकरीच्या शोधात होते. डॉक्टर म्हणाले, 'धारवाडला हॉस्पिटलच्या स्टाफ नर्सची जागा भरायची होती. त्यासाठी अर्ज कर.'

''मी धारवाड हॉस्पिटलमध्ये रुजू झाले.

''आणखी एक वर्ष गेलं. अजूनही ते पाऊल पुढे टाकत नव्हते. मग मीच पुढाकार घ्यायचं ठरवलं. मी त्यांच्याशी सरळ प्रतिवाद केला- 'तुमच्यासाठी मी खूप विखारी लोकनिंदेला तोंड देत आहे. आता मला अर्ध्या वाटेवर सोडून देणार आहात का?' असं विचारलं. 'तुम्ही दुसऱ्या ठिकाणी बदली करून घ्या. लग्नानंतर आपण तिकडे जाऊ या' म्हणून पाठीस लागले.''

डॉक्टर लग्न करण्याचं पुढे ढकलत होते. याचं मुख्य कारण त्यांचा स्वभाव. ते स्वभावत: भित्रे होते. एका गरीब, मोठ्या कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले होते. कुठे एकाच ठिकाणी त्यांना आधार नव्हता. बाळपणात एका घरून दुसऱ्या घरी जात राहावं लागलं. कसलाही 'धोका' पत्करायची त्यांच्यात हिंमत नव्हती. आयुष्यात त्यांना फक्त शांतता आणि स्थैर्य हवं होतं. त्या काळी वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या ब्राह्मण मुलांना शिष्यवृत्ती मिळत असे. एवढ्या एकाच कारणासाठी, इतिहासाची आवड असूनही ते डॉक्टर झाले. ते शवविच्छेदनातले तज्ज्ञ बनले, कारण त्यामुळे पगार वाढणार होता. त्यांच्या नैपुण्याबद्दल त्यांना 'रावसाहेब' हा किताब दिला गेला; इतके ते या विषयात निष्णात होते. पण उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेल्या आपल्या मित्रांना बघून त्यांच्याबद्दल कौतुकाने मान हलवून 'फार हुशार मुलगा!' असं त्यांना कधीच वाटलं नाही. जास्त काही मिळवण्याची धडपडही त्यांनी केली नाही. त्यांचं मुख्य तत्त्व होतं, 'चारचौघांसारखं असावं, चारचौघांसारखं राहावं. उगीच कोणाच्या डोळ्यांवर येईल असं वागू नये.' आयुष्यात त्यांनी एकच साहस केलं, ते म्हणजे एका विधवेशी लग्न करणं. पण त्या साहसाचं श्रेय त्या विधवेकडं जातं.

सरतेशेवटी दोघं वेगवेगळे मुंबईला गेले, तिथं गिरगावमध्ये वैदिक पद्धतीनं लग्न लावणाऱ्या वैद्य नावाच्या गृहस्थाकडे. त्याने सर्व व्यवस्था केली होती. मंगळसूत्रसुद्धा तयार ठेवलं होत. तिथे आई लिहिते, 'अखेरशेवटी, अग्नीच्या साक्षीने आम्ही विवाहबद्ध झालो. त्या पाच-सहा वर्षांत मी किती मानसिक यातना सहन केल्या, ते माझं मला माहीत.'

आपलं लग्न झाल्याचं लिहिल्यानंतर कृष्णाबाईचं आत्मचरित्र एका पानात अचानक संपतं. असं का, असं विचारल्यावर ती हसून म्हणे, ''सांगण्यासारखं आणखी काय असणार? तुम्ही सगळे जन्मलात, एकापाठोपाठ एक. संसार!'' नंतर आई नेहमी म्हणायची, ''ती कठीण वर्षं सोडली, तर माझं आयुष्य सुखात गेलं.'' तिच्याभोवती सदोदित मुलं, नातवंडं, घरचेच होऊन जाणारे नोकर-चाकर, आश्रित यांचा गोतावळा असायचा. ती अतिशय आनंदी, उत्साही जीवन जगली.

तिने जगभर प्रवास केला. मोठा मित्रपरिवार जमवला. आकाशवाणीच्या धारवाड केंद्रासाठी कोकणीतून कार्यक्रम लिहिले. धोका न पत्करता सावधपणे जगण्याचं आपल्या वडिलांचं तत्त्वज्ञान धुडकावून लावण्याचा धोशा ती मुलांमागे लावायची. झेप घेण्याच्या सोन्यासारख्या संधी चालून आल्या असूनही निव्वळ गृहिणी बनून राहिल्याबद्दल तिने आपल्या मुलींना मनोमन कधीच क्षमा केली नाही. नर्मदा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या मोर्चात सहभागी झाली, त्या वेळी तिने नव्वदी ओलांडली होती.

मी पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर असताना आई-वडील माझ्याकडेच राहत होते. मला तर वाटतं, माझ्यापेक्षा आपण अधिक उत्तम डायरेक्टर झालो असतो, असंही तिला कदाचित मनातून वाटत असेल! तरीही, एक पत्नी किंवा आई म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून आपण काही साध्य करू शकलो नाही याची खंत तिला सतत वाटत आली. ती दु:खी नव्हती खरी, पण मनात खोलवर एक असमाधान होतं. तिच्या आत्मचरित्राच्या अनेक खर्ड्यांपैकी एकाची सुरुवात अशी होते : 'कधी-कधी माणूस एकटेपणाच्या जिण्याला कंटाळतं. मी या वयाला आले, पण कोणाच्याच फार कामाची ठरले नाही. ब्याऐंशी वर्षांच्या काठावर उभी राहून मागे वळून बघताना मला फक्त मी केलेल्या चुकाच दिसतात. लहानपणापासून मी अपयशी ठरले- सर्व बाबतींत. मला आकांक्षा होती, त्यातलं काहीही साध्य करू शकले नाही.' आणि एके ठिकाणी :

'खूप वेळा, जेव्हा मनात संताप उसळतो किंवा खिन्नता दाटून येते, त्या वेळी मनातले विचार कागदावर उतरवावेसे वाटतात. माझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करू शकले नाही. मला खूप शिकायचं होतं. बी.ए., एम.ए. व्हायचं होतं. गायला आणि पेटी वाजायला शिकायचं होतं. खूप-खूप वाचायचं होतं, आणखी किती तरी. पण वाचन करण्यापलीकडे काहीही करू शकले नाही.'

एकदा मी समाजशास्त्रज्ञ वीणा दास यांच्याबरोबर माझ्या 'नागमंडल' या नाटकाविषयी चर्चा करीत होतो. नाटकाचा शेवट मी पारंपरिक शब्दांत सांगितला, ''मग राणीला नवरा अन् मुलगा परत मिळाले आणि ते सुखाने नांदू लागले.'' वीणाने लगेच चमकावलं, ''म्हणजे राणीनं घरसंसारात आपलं व्यक्तिमत्त्व विसर्जित केलं; ती नगण्य होऊन गेली.'' कृष्णाबाईचं यावर एकमत झालं असतं.

या घटना घडल्यानंतर तब्बल ऐंशी वर्षांनी माझी मुलगी शाल्मलीसुद्धा तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्नाआधी पाच वर्षं राहत होती. लग्न करायचं का, हा निर्णय घेण्याआधी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर राहून बघायची जीवनसरणी त्या वेळेपर्यंत सुशिक्षित मुलींमध्ये रूढ होऊ लागली होती. अशा आधुनिक मुली आईभोवती जमून तिला जेव्हा मोठ्या कौतुकाने म्हणायच्या, ''केवढं हे तुमचं धाडस! तुमचा अभिमान वाटतो आम्हाला.'' तेव्हा आईला त्या स्तुतीने मनापासून आनंद व्हायचा. हे खरं असलं, तरी विवाहबद्ध झाल्याबरोबर डॉक्टर आणि कृष्णाबाई आपल्या पूर्वायुष्याच्या सर्व खुणा, सगळ्या स्मृती पुसून टाकण्याच्या कामात गुंतले. 'कृष्णाबाई मंकीकर' असती, तरी असा बदल तिच्या आयुष्यात झालाच असता. तरुण स्त्रीचं विवाहपूर्व आयुष्य पुसून टाकण्याचं काम आपले कायदे करतातच.

पुनर्विवाहानंतर डॉक्टरांनी धारवाडहून दूरच्या बागलकोटला बदली करून घेतली- भूतकाळ निर्नाम होऊन नव्या आयुष्याला प्रारंभ करता यावा म्हणून. कृष्णाबाईची नर्सिंगची प्रमाणपत्रं फ्रेम केली जाण्याऐवजी गुंडाळून जुन्या-पुराण्या, धूळभरल्या ट्रंकेत बंदिस्त झाली. तिचं नाव असलेल्या वह्या-पुस्तकांची पहिली पानं गहाळ झाली किंवा नाहीशीच झाली.

आणि अशा रीतीने, हिंदू परंपरेला आव्हान देऊन समाजाला मुळापासून हादरवण्याचं धैर्य ज्यांनी दाखवलं होतं, ते दोघे-जण जणू आपणच एखादा गुन्हा केला असल्यासारखे लोकांच्या नजरांपासून निसटून दूर कुठे तरी नाहीसे होण्याचा प्रयत्न करीत होते.

भूतकाळ पुसून टाकण्याच्या या बृहत् प्रयत्नांत डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीचं नाव अर्थातच पूर्णपणे पुसलं जातं. मी किंवा माझी भावंडं- आम्ही कोणीच कधीही आमच्या आई-वडिलांच्या तोंडून तिचं नाव ऐकलं नाही.
लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांना मुलं झाली. पहिला माझा भाऊ वसंत, त्याच्या पाठची प्रेमा, मी आणि लीना. मी पाच-सहा वर्षांचा असताना माझा भाऊ भालचंद्र याने 'गोकर्ण' हे आडनाव बदललं आणि कागदोपत्री 'भालचंद्र आत्माराम गोकर्ण'चा 'भालचंद्र रघुनाथ कार्नाड' झाला. त्यामुळे तो आमचा सख्खा भाऊ आहे, अशा समजुतीत आम्ही मोठे झालो.

पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये १९४३मध्ये नोकरीत असताना बाप्पा निवृत्त झाले. पण दुसरं महायुद्ध चालू होतं. ब्रिटिश सरकारला डॉक्टरांची गरज होती. त्यामुळे आईचा विरोध असतानाही माझ्या वडिलांनी दूर जंगलात, शिरसी या मुक्कामी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे वीज नव्हती. मलेरियाचा प्रादुर्भाव होता. त्याला 'Punishment Pow' असंच म्हटलं जायचं.

पण जो भूतकाळ आपण गाडून टाकला आहे, असं माझ्या आई-वडिलांना वाटत होतं, त्यानं शिरसीत आमचा पाठलाग चालवला. नाना वेषांमध्ये, डोळे मिचकावत-कुजबुजत आमच्याभोवती तो भिरभिरत होता. आई-वडिलांनी आम्हांला कधीच खरी परिस्थिती सांगितली नव्हती. त्यामुळे आमचं बालपण एका दु:स्वप्नाने अस्वस्थ करून टाकलं. जे सांगायची शरम वाटावी, जे लोकांपासून लपवलं पाहिजे; असं काही तरी आपल्या आई-वडिलांच्या नात्यात दडलेलं आहे- काही तरी गूढ, असह्य रहस्य आहे असं दु:स्वप्न!

एक दिवस कट्ट्यावर गप्पा मारत बसलेल्या बायकांपैकी एकीने विचारलं, ''तुझे वडील आईपेक्षा एवढे मोठे कसे?'' या प्रश्नावर आलेले हसू बाकीच्या बायकांनी दाबल्यावर मनात नाना तर्क-कुतर्क उमटले.
आमच्या धाकट्या बहिणीला सांभाळायला येणाऱ्या मुलीने प्रेमाला सांगितलं की, 'भालचंद्र तुझा सख्खा भाऊ नाही, सावत्र भाऊ आहे.' त्यानंतर कित्येक दिवस ती कोपऱ्यात तोंड लपवून रडत बसायची.

माझ्या वर्गातला एक मुलगा मला अगदी गंभीरपणे म्हणाला, ''माझ्या आजीला सगळं माहीत आहे. तिनेच मला सांगितलं. तुझ्या आईच्या पहिल्या लग्नात तिच्या हातातल्या मंगळसूत्राचा जिवंत साप झाला. तिने त्याला जमिनीवर टाकल्यावर तो नवऱ्या मुलाला चावला आणि नाहीसा झाला. नवरा मुलगा लगेच गतप्राण झाला.'' त्यानंतर किती तरी रात्री मी विचार करायचो- या मुलाचे हात, पाय तोडून त्याला कसं छळता येईल? पण कोणाला विचारणार?

आम्ही 1952 मध्ये धारवाडला आलो. तिथल्या सारस्वत कॉलनीत फक्त सारस्वत कुटुंबं राहायची. त्या सर्वांना आमची कूळकथा माहिती होती. माझ्याहून जरा मोठ्या एका मुलाला मी विचारलं. त्याने मला सगळी खरी गोष्ट सांगितली. माझ्या उरावरचं ओझं दूर झालं. त्या वेळी मी चौदा वर्षांचा होतो.

इतिहास झाकून ठेवण्याचा एवढा प्रयत्न करण्याऐवजी आई-वडिलांनी आम्हाला सरळ खरी परिस्थिती सांगितली असती, तर आम्ही मुलं अधिक शांतपणे जगलो-राहिलो असतो.

माझ्या आईच्या विवाहित जीवनाच्या आधीच्या काळात जो बेधडकपणे इकडे-तिकडे टोलवला गेला, पण कसाबसा तग धरून राहिला; तो म्हणजे माझा मोठा भाऊ भालचंद्र. माझ्या आईच्या मोठ्या बहिणीच्या घरात त्याला ठेवलं होतं. धारवाडमधल्या त्या घरात आणखी पंधराएक निराधार मुलं राहायची. भालचंद्र देखणा होता, बुद्धिमान होता. त्याच्याकडे कला होती आणि तो प्रेमाचा भुकेला होता. बाप्पांबरोबर त्याचे संबंध अतिशय मोकळेपणाचे होते. पण आईशी वागताना ताण असे. सुदैवाने त्याचे दोन काका- वडिलांचे भाऊ- केव्हा तरी धारवाडलाच आले, त्यामुळे 'गोकर्ण' कुटुंबाचे त्याचे संबंध पूर्णपणे तुटले नाहीत.

एकोणीसशे सत्तरच्या दशकात साधारणपणे पन्नास-पंचावन्नचा असताना भालचंद्राने आईला लिहिलेलं एक पत्र मला मिळालं.

एव्हाना अशा पत्रांबद्दल दक्षता बाळगणं तिने सोडून दिलं होतं. त्यात म्हटलं होतं, 'तू कधीच मला तुझा मुलगा मानलं नाहीस.' त्याने असं का म्हणावं, असं मी आईला विचारल्यावर तिने जे सांगितलं; त्यात त्याच्या संपूर्ण आयुष्याची वेदना होती. लग्नानंतर लगेच बाप्पा आणि आई बागलकोटला असताना, शाळेच्या सुट्टीत भालचंद्र त्यांना भेटायला आला होता. तिथल्या एका बाईने आईला 'हा कोण?' म्हणून विचारलं. आईला उत्तर सुचेना. नुकत्याच झालेल्या लग्नाशी अकरा वर्षांच्या मुलाचा काय संबंध सांगणार?

'माझा भाऊ.' ती म्हणाली. भालचंद्र ऐकत होता.

''चाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. आता त्याची पन्नाशी उलटली आहे. पण तो ते विसरलेला नाही. काय म्हणणार मी?'' ती उदासवाणं हसली. अठ्ठ्याहत्तर साली, वयाच्या नव्वदाव्या वर्षी, माझ्या धारवाडच्या घरी बाप्पा वारले. भालचंद्र आणि वसंत, माझे दोघे भाऊ मुंबईहून तातडीने आले.
बाप्पा नास्तिक होते. वैदिक ब्राह्मण त्यांना मुळीच आवडत नसत. त्यांनी मला बजावलं होतं, 'मी मेल्यावर त्या चोरांना घरात येऊ देऊ नकोस.' त्याप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार कोणत्याही धार्मिक विधीशिवाय झाले. भालचंद्राने चितेला अग्नी दिला आणि त्यावर कोणी काही म्हटलं नाही.

पण घरात करायचे सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने झाले पाहिजेत, असा आईने आग्रह धरला. ''जायचं ते माणूस गेलं. मागे राहिलेल्यांना शुचि भावाने - पवित्र मनाने राहता यायला हवं. आयुष्य नव्याने सुरू करता यायला हवं. शांती केलीच पाहिजे.'' याचा अर्थ असा की- होम, पितृदान वगैरे करायला हवं होतं. तर्पण कोणी करायचं, असा प्रश्न उठला. तो अधिकार सर्वांत मोठ्या, नाही तर लहान मुलाला असतो. मी सर्वांत लहान पण मी नास्तिक! मी निश्चितपणे 'नाही' म्हटलं. म्हणजे माझ्या मोठ्या भावाला- वसंतला विधी करायला हवेत. पण मी त्याला म्हटलं, ''हे बघ दादा, लहानपणापासून भालचंद्रालाच आपण बाप्पांचा मोठा मुलगा मानत आलो आहोत. त्यानेही आपलं नाव बदललं, आपल्या वडिलांचं नाव सोडून बाप्पांचं लावलं. आपण त्यालाच मोठा मुलगा म्हणून विधी करू दिले पाहिजेत.'' वसंत लगेच तयार झाला.

पण होमहवन करायला आलेले पुरोहित आणि काही प्रतिष्ठित शेजारी यांनी विरोध केला.

त्यांचं म्हणणं होतं की, तर्पण फक्त स्वत:च्या पितरांना दिलं जातं आणि भालचंद्रचे खरे पिता बाप्पा नव्हते. तेव्हा त्यांना तर्पण करण्याचा अधिकार त्याला नव्हता. मी हटलो नाही. आई मला बाजूला घेऊन म्हणाली, ''हे चुकीचं नाही का? आम्ही त्याला दत्तकसुद्धा घेतलेलं नाही.''
''ती तुमची चूक. नुसतं त्याचं नाव बदलण्याऐवजी तुम्ही त्याला दत्तक घ्यायला हवं होतं.'' मी वाद घालत म्हटलं. ती गप्प राहिली. भालचंद्रही तयार झाला. विधी यथासांग पार पडले. समाराधनाही झाली.

दुसऱ्या दिवशी, जिथे होमकुंड केलं होतं, त्या खोलीच्या साफसफाईवर मी देखरेख करीत होतो. कुंडापासून थोड्या अंतरावर- ज्या दिशेला भालचंद्राने पितरांना तर्पण केलं होतं, त्याच दिशेला- कपाटाआड मला काही तरी दिसलं. मी जाऊन ते उचललं.

तो एक ग्रुपफोटो होता. 40 च्या सुमाराच्या फॅशनप्रमाणे सूट आणि टाय अशा पोषाखात, ओळीने मांडलेल्या चार खुर्च्यांमध्ये आढ्यतेने बसलेले चार पुरुष होते. दोघांना मी ओळखले. ते भालचंद्राच्या वडिलांचे धाकटे भाऊ होते.

मी थक्क, अवाक् झालो. भालचंद्राचे वडील फोटोत असणं शक्य नव्हतं, कारण ते आधीच एकवीसमध्ये वारले होते. तो फोटो गोकर्ण कुटुंबाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथं ठेवला गेला होता, हे उघड होतं. कोणी तरी गोकर्णांच्या घरातून तो आमच्याकडे आणला असावा. कोणी? आणि भालचंद्राने आपल्या वडिलांना अर्घ्य दिलं, त्या दिशेला तो ठेवला कोणी? असा खोडसाळपणा करण्याइतक्या खालच्या पातळीवर भालचंद्र गेला असावा, या कल्पनेचा मला धक्काच बसला.

त्याच वेळी आई तिथे आली. माझ्या हातातला तो फोटो बघितला, पापणीही न लववता माझ्या हातून तिने तो घेतला आणि काही तरी अस्पष्टपणे पुटपुटत घरात निघून गेली.

त्यानंतर तो फोटो मी कधीही पाहिला नाही.

***

अनुवाद- सरोज देशपांडे

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल साधना प्रकाशन व श्री. विनोद शिरसाठ यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या आईविषयी इतक्या तटस्थपणे लिहायचे म्हणजे खायचे काम नाही. कर्नाडच असा लेख लिहू शकतात. कुट्टाबाईंविषयी वाईट वाटले.

त्यांचे, त्यांच्या विचारसरणीची जडणघडण कशाप्रकारे झाली याविषयी त्यांनी लिहिलेले काही वाचायला आवडेल. इथे प्रकाशित करशील तर अजूनच छान.

कुट्टाबाईंचे व्यक्तिमत्व धाडसी, काळाआधीच स्वतःला बदलू पाहाणारे वाटले. पुढील काळाचा वेध घेऊन आधीच तो काळ जगू पाहाणार्‍याची कशी घुसमट आणि फरफट होते त्याचे हे आणखी एक उदाहरण. कार्नाडांची शैली छान आणि अनुवादही उत्तम. हा लेख दिला ह्यासाठी आभार.

कुट्टाबाई महत्त्वाकांक्षी वाटल्या. समयोचित नाही पण त्यांनी डॉक्टरांवर लग्नासाठी दबाव आणला असेल असं वाटून गेलं अन्यथा प्रेमसंबंध सुरू राहून रखेलीसारखे जीवन वाट्याला आले असते. भालचंद्राच्या मनाची अवस्था समजू शकतो. आईने भाऊ म्हणून ओळख करून दिली याचे शल्य मनात घर करून राहीले असेल. अर्थात तो काळ तसाच दुष्टही होता. अलिकडे मुखर्जी प्रकरण घडलं तेव्हा आईने आधीच्या मुलांना नाकारले होते. आईने पाच वर्षांत पाप तर केले नसेल ना असे बालमनाला वाटावे म्हणजे अनैतिक गोष्टी करणाऱ्यांवर समाज किती लक्ष ठेवून होता हे लक्षात येते.

धन्यवाद चिनुक्स हा लेख ईथे दिल्याबद्दल.
हर्पेन हीरा शक्तीराम यांच्या प्रतिसादाशी सहमत. मला तर अजुन शब्द सापडत नाहीएत.

सुंदर लेख चिनुक्स. ह्या लेखांतून गिरीश कर्नाडांच्या स्वभावाच्या जडणघडणीची थोडीशी कल्पना येते आणी त्यांच्या काही कृतींची संगती लागते.

सुंदर लेख आहे. चिनुक्स, लेख इथे आणल्याबद्दल धन्यवाद.
कुट्टाबाई, भालचंद्र आणि बाकीच्या भावंडांसाठीही जीव हळहळला. सर्वसामान्य चौकोनी कुटुंबात वाढलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला त्या
वेदनेची तीव्रता कळणार नाही. पण त्या मुलांनी किती सोसलं असेल, असं वाटलं.

ही सगळी माहिती नविन आहे. शब्द नाहीत. कुट्टाबाई धाडसी, हुशार आणि हिकमती होत्या. त्या फोटोचं काही कळलं नाही, कुट्टाबाईने ठेवला होता का तो फोटो.

आपल्या आईविषयी इतक्या तटस्थपणे लिहायचे म्हणजे खायचे काम नाही. +१
अनया+१
इथे हा लेख दिल्याबद्दल धन्यवाद चिनुक्स.

आपल्या पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये बाप चुकला तर माफ असते पण आई चुकली तर मुलेही माफ करत नाहीत. कर्नाडांनी फार तटस्थपणे हा लेख लिहिल्यामुळे त्यांना तिच्याविषयी प्रेम वाटत होते का अन्य काही भावना होत्या हे मला कळलं नाही. त्यांना तिचा पुनर्विवाह आवडला होता काय?

त्यांना तिचा पुनर्विवाह आवडला होता काय?
Submitted by शक्तीराम on 11 June, 2019 - 09:34
<<

इथे आवडण्या ना आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे?
मुळात गिरिश कर्नाडांचा जन्मच, त्यांच्या आईच्या पुनर्विवाहानंतर झालेला आहे.

अतिशय ह्रदयस्पर्शी लेख. पण त्यातले अनेक पुरुषसत्ताक संदर्भ आजही समाजात तितकेच लागू होतात हिच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.
जरी विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांचे पुनर्विवाह करण्याचे प्रमाण वाढले असले तरी पहिल्या नवर्‍यापासून झालेल्या मुलांची होणारी परवड आजही बघायला मिळते.

छान लिहिलंय पण भालचंद्रची मानसिकता समजुन घेता यायला हवी होती. सर्वांनी आपल्यापुरता विचार केला आणि ते ११ वर्षाचे पोर किती दुखावले असेल याचा कुणीच नाही!

हा अनुवाद येथे दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

समाराधनाही झाली. <<< हे टायपो एरर आहे का

आपल्या आईबद्दल कर्नाडांनी एक सुरेख इंग्रजी लेख लिहिला होता. <<< ह्या लेख चा दुवा मिळु शकतो का.

अवांतर.
काल दुरदर्शन वर इक्बाल परत पाहिला. कर्नाड सर, नासिर सर, श्रेयस आणि श्वेता ह्यांचे अभिनय नैसर्गिक होते, खुपच भावले.

कर्नाड सरांच्या निधना बद्दल विर ने केलेली ट्वीट येथे quote करत आहे,

quote

vir sanghvi

@virsanghvi
Can you think of anyone else who could become President of the Oxford Union,could then come back & write brilliant plays in Kannada, could direct art films & also act in Salman Khan movies?
Just a glimpse of what a Renaissance man Girish Karnad was.
A great loss to India

unquote

R I P KARNAD SIR

विलक्षण लेख आहे.

मला यावरून एक आठवलं. मी ' बापलेकी' या पुस्तकात ना. सी. फडके यांची मुलगी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ लीला पाटील यांचा लेख वाचला होता. ना. सी. फडक्यांनी पहिल्या पत्नीला ( लीलाताईंच्या आईला) सोडून दुसरं लग्न केलं होतं. लीलाताई पाटील यांच्या या लेखात त्यामुळे वडिलांबद्दल अर्थातच खूप कटुता आहे.

पण नंतर मी अंतर्नाद दिवाळी अंकात ना. सी. फडके आणि त्यांची दुसरी पत्नी कमल फडके यांच्या मुलीचा लेख वाचला. ( त्यांचं नाव लक्षात नाही, क्षमस्व). त्या भावंडांनाही वडिलांच्या पहिल्या लग्नाबद्दल अधिकृतपणे काहीच ठाऊक नव्हतं. असंच उडत उडत कानावर पडत असे. पण ना. सी. फडक्यांच्या शेवटच्या आजारपणात लीलाताई पाटील त्यांना भेटायला आल्या होत्या. तेव्हा सर्वांचीच झालेली घालमेल, अपराधीपणाची भावना, अगतिकता हे सर्व त्या लेखात उतरलं आहे.
अवांतरासाठी क्षमस्व.

ना सी फडक्यांच्या दुसर्‍या पत्नीच्या मुलीचे नाव अंजली. कित्येक वर्षे श्री. ना. सी. फडके अंजली या नावाचे एक वार्षिक काढीत असत. त्यात त्यांच्या एक दोन नव्या कादंबर्‍या असत. (जाता जाता : कमला फडके ह्या इंदिराबाई संत यांच्या भगिनी.)
@संजीव बी : समाराधना म्हणजे ब्राह्नणभोजन अथवा भंडारा. एखाद्या शुभ कार्यानंतर समाप्तीचे म्हणून घालतात.

सुंदर अप्रतिम लेख !

ज्यांची योग्यता, पात्रता आणि महत्वाकांक्षा उच्च असेल, अश्या परिस्थितीत कुट्टाबाईचा किती कोंडमारा झाला असेल कल्पना येतेय.
माझ्या आईचं परिस्थिती मुळे शिक्षण आणि लग्नानंतर शिक्षिकेची नोकरी करण्याची इच्छा मारली गेली अन वडिलांच्या निधना नंतर अचानक अर्थाजन करण्यासाठी वणवण करावी लागली ! हे तिला फार क्लेशकारक झालं होतं. मृत्यू पूर्वी ही सल कायम तिच्या तोंडून निघत असे.

धन्यू चिनूक्स इथं शेअर केल्याबद्दल.

... आणि मंकीकर ऐवजी माणकीकर असं हवं आहे बहुतेक.
निधनानंतरच्या काही वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये "माणकीकर" असाच उल्ल्लेख होता.
(इंग्रजी स्पेलिंगमुळे मुळे गडबड झाली असावी)

चौथा कोनाडा,
ते मंकीकर असंच आहे.
वृत्तपत्रांमधलं माणकीकर हे आडनाव चूक आहे.

मायबोलीवरच्या सध्याच्या हाणामारीच्या वातावरणात हा लेख सुखद वार्‍याची झुळूक देऊन गेला.
धन्यवाद चिनूक्स.
गिरीश कर्नाडांना श्रध्दांजली.

सुंदर लेख आहे. चिनुक्स, लेख इथे आणल्याबद्दल धन्यवाद.>>> +१.
कार्नाडांचे आत्मचरित्र वाचल्याने बर्‍याच गोष्टी माहित होत्या.पण कुट्टाबाईंचे विचार विस्तृतपणे इथे वाचले.

आडनावाचा ऊचार कार्नाड की कर्नाड ? लेखात दोन्हीही शब्द आले आहेत.
तेव्हाच्या बुरसटलेल्या विचारांच्या समाजाच्या माणूसकीला धरून नसलेल्या चालीरितींमुळे कुट्टाबाईंची नकळत्या वयात झालेली ससेहोलपट वाचून वाईट वाटले. आणि त्याही परिस्थितीते त्यांनी बाळगलेले ध्येय आणि त्यासाठी प्रयत्न ... त्याबद्दल त्यांचा आदर वाटला.
डॉक्टरांच्या आगमनानंतर मात्र सगळा मामला बराच फॅमिली ड्रामा आहे. दुसर्‍या लग्नानंतर कुट्टाबाईंचे आणि डॉक्टरांचे वागणेही बर्‍यापैकी विसंगतीने भरलेले वाटले.
फोटोचा नेमका सिग्निफिकन्स कळाला नाही.

फोटो त्या दिशेला ठेवणे म्हणजे भालचंद्राने डॉ कर्नाडांना तर्पण करण्याऐवजी त्याच्या biological पितरांना तर्पण केले असा अर्थ असणार.

Pages