शोध मराठीपणाचा - पुस्तक परिचय

Submitted by प्राचीन on 27 May, 2019 - 08:46

शोध मराठीपणाचा : संपादन - अरुणा ढेरे,भूषण केळकर, दिनकर गांगल (ग्रंथाली )

या पुस्तकाचे नाव वाचल्यावर संपादक त्रयीमध्ये अरुणा ढेरे यांचे नाव पाहिले , त्यामुळे खरे तर हे पुस्तक वाचावेसे वाटले. १९६०च्या दशकात भारताबाहेर वास्तव्यासाठी गेलेल्या काही गुणिजनांचे अनुभव आणि भारतात राहणाऱ्या काही व्यावसायिक व सर्वसामान्यांची , साहित्यिकांची प्रातिनिधिक मते या दोन्हीचा वर्ण्य विषय एकच : मराठीपण.
स्वतः संपादकमंडळीनीदेखील आपले स्वतंत्र विचार याच संदर्भात व्यक्त केले आहेत. मराठीपणाच्या नेमक्या व्याख्येबाबत जी अनिश्चितता आहे, विशेषतः सद्यकाळात; त्याबद्द्ल त्यांचे साधारण एकमत झालेले आढळते. कारण मराठीपण म्हणजे केवळ मराठी बोलणं, पेहराव, सणवार इतकाच अर्थ नाही. ती तर प्रतीके आहेत. परंतु मराठीपणाच्या या शोधामध्ये गवसलेल्या काही मराठीपणाच्या खुणा, मराठी लोकांचे ओळखीचे गुणविशेष ह्यांचा गौरवपूर्ण उल्लेख या पुस्तकामध्ये ठायी ठायी आढळतो. काही लेखांमध्ये सह्याद्री च्या कुशीत विसावलेलं रांगडं मराठीपण, त्यामुळे स्वभावात आलेला फटकळपणा, तरीही मायाळू वृत्ती असे मराठी गुणविशेष दिसतात ;तर काहीजण मराठी माणसाचं नाट्यवेड, नाट्यसंगीताची जाण, राजकारणात रस असे कंगोरे स्पष्ट करतात. मराठमोळ्या अन्नसंस्कृतीबद्दल तर ही परदेशी मंडळी आवर्जून उल्लेख करतात. परदेशात उपलब्ध असलेल्या सामग्रीचा उपयोग करून भारतीय (मराठी) सणवार साजरे करताना कशी तारांबळ उडत होती त्याचे किस्से म्हटलं तर मजेदार आहेत, पण त्याचवेळी भावनिक करणारेही आहेत. एका अमेरिकन मराठी कुटुंबात दिवाळीच्या दिवशी कंदील लावणाऱ्या आईला मुलं त्यामागील हेतू विचारतात, तर दुसऱ्या एका घरात कामासाठी बाहेर पडताना हातावर दही (योगर्ट) घालणाऱ्या मराठी आईची चेष्टा करणारी मुलंही दिसतात. तरीही जेव्हा या मुलांच्या शाळेत या मराठी मातांना भारतीय संस्कृती बद्दल सांगायला बोलावलं जातं, तेव्हा हीच लेकरं अभिमानाने आईकडे पाहतात, ही बाब आईला आश्वासक वाटते.
मुलांना मराठीत बोलण्याची आवर्जून सवय लावताना घराबाहेर मात्र मुलांचं मराठीपण बाजूला सरून जातं ही खंत जवळपास सर्वच लेखांत व्यक्त झाली आहे. काही लेखकांनी यामधील सुवर्णमध्य काढलेला दिसतो.
एतद्देशीय असलेल्या लोकांना स्थलान्तरानंतर दीर्घकाळपर्यंत (कदाचित आजही) ‘मराठी’पण टिकवावेसे वाटले का? किंवा परदेशात स्थिर होताना जी अनेक पातळ्यांवरील आव्हाने होती,त्यांमध्ये मराठीपण टिकवणे,जोपासणे हीदेखील एक धडपड होती का? इ. अनेक दृष्टिकोनांतून लिहिले गेलेले हे लेख खरोखर खोलवर विचार करून लिहिल्याचे स्पष्टपणे दिसते. “आम्ही संपन्न देशात राहतो” याचा कुठेही बडेजाव जाणवत नाही. उलट ‘तिथेही’ मूळ शोधण्याचा प्रयत्न आपल्याही नकळत कसा व का केला गेला, पुढील पिढ्यांपर्यंत हा प्रयत्न पोहोचवताना कोणत्या वेगळ्या वाटा चोखाळाव्या लागल्या, याचं खूप मोकळेपणाने, प्रामाणिकपणे वर्णन केलेले आहे. वस्त्र-आभूषणे, खाद्यसंस्कृती ,भाषा, परंपरा, संस्कार असा प्रतीकांचा प्रवास जो सूक्ष्माकडे वळसा घेतो, त्याचे हे सारे साक्षीदार आहेत.
हे अनुभव वाचताना काही माहीत नसलेले तपशील कळले. उदाः १९६५ साली भारताबाहेर जाताना फक्त ८ डॉलर्स नेण्याची परवानगी असे. किंवा ABCD (AMERICAN BORN CONFUSED DESI) ही संज्ञा अनघा राईलकर यांच्या लेखात वाचायला मिळाली.
अमेरिकीकरणाच्या रेट्यापुढे मराठीकरणाचा जो प्रभाव आहे, त्याचे वर्णन करताना अमित भावे म्हणतात, ‘जणु नायगारापुढे महाराष्ट्रातील कडेकपारीतील झरे तसा !’
तर जर्मनीमधील यशोधन गोखले मात्र गणेशोत्सव परंपरेनुसार साजरा करताना दिसतात.शिवाय देशोदेशींच्या काही प्रथांचे भारतीय पद्धतीशी असलेले साम्यही शोधून काढताना दिसतात.
याखेरीज भारतात राहणार्‍या लोकांचेही लेख आहेत. त्यांमध्ये आधुनिकीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे मराठी कुटुंबपद्धती वर जो प्रभाव पडला आहे त्यावर मनोगत व्यक्त केले आहे. मात्र त्यांनाही
‘मराठी’पण धोक्यात आले आहे, असे वाटत नाहीये. उलट ते अधिक विस्तीर्ण , समृद्ध होत आहे, असे वाटतेय.
दोन दशकांपूर्वी परदेशस्थ झालेल्या ‘मराठी’ लोकांच्या जीवनात या पुस्तकामुळे डोकावयास मिळाले.त्यांचे ताणतणाव व मानसिकता समजायला मदत झाली. अनघा राईलकर यांच्याच शब्दांत हा पुस्तक परिचय आटोपता घेते =
“आपल्या ABCD मुलांना
अबकड चेहि ज्ञान द्या.
अमेरिकेतल्या मेल्टिंग पॉटवर
‘मराठी’पणाची ‘साय’ जपून ठेवा…”
ता.क. मायबोलीवरील धाग्यांमुळे हे लक्षात आलं आहे की बऱ्याच परदेसिया मा.बो.करांनीही अशी ‘साय’ नि ‘ सय’ मोठ्या निगुतीने जपलेली आहे; त्यांचे या निमित्ताने अभिनंदन !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो त्रोटक वाटला. पुस्तक नक्की कशाबद्दल आहे समजले नाही. भूषण केळकर व इतर काही लोकांनी लिहीलेले "स्वदेस" नावाचेही एक पुस्तक आहे, त्यात त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत. हे त्यापेक्षा वेगळे असावे.

हर्पेन व फारएण्ड, धन्यवाद. सूचनेनुसार बदल करणार आहे परंतु पुस्तकातील गळे संदर्भ इथे देणं बरोबर होईल का हे न समजल्यामुळे थोडक्यात लिहिले होते.

बदलला का लेख? आता लक्षात आले. मराठीपण जपण्यातील अडचणी, त्यात आपोआप झालेले बदल वगैरेवर दिसते हे पुस्तक. वाचायला हवे.

या विषयावर "फॉर हिअर, ऑर टू गो", स्वदेस आणि अजून एक - नाव आठवत नाही- वाचलेली आहेत. यात लिहीणारेही ६० द्या दशकात आलेले दिसतात.

हर्पेन, वावे, किल्ली, मन्या, अज्ञातवासी, फारएण्ड सगळ्यांना धन्यवाद.
फारएण्ड, तुम्ही दिलेली माहिती चांगली आहे. पैकी स्वदेस अजून वाचले नाहीये. आवडेल वाचायला. हल्ली प्रत्येक मुद्दा अस्मितेचा बनवण्याचा जो प्रकार काही वेळा आढळतो, त्याऐवजी ह्या पुस्तकात जे मराठीपण समोर येते, ते खरंच व्यापक आहे.

छान थोडक्यात परिचय करून दिला आहे.
६०च्या दशकात परदेशात गेलेले म्हणजे यांची मुलं आता ४०+ वयाची असतील. या ABCD ना संपर्क करायचा कोणी प्रयत्न केला आहे का? त्यांना त्यांच्या मुलांपर्यँत कितपत मराठीपण पोहचवता आलंय, तसा प्रयत्न त्यांनी केला आहे का?

<< या ABCD ना संपर्क करायचा कोणी प्रयत्न केला आहे का? त्यांना त्यांच्या मुलांपर्यँत कितपत मराठीपण पोहचवता आलंय, तसा प्रयत्न त्यांनी केला आहे का?>>
संपर्क रोजच येत असतो. मराठीपण कसे पोहोचवायचे हे कळले नाही अजून.
मराठी भाषा म्हणाल तर आजकाल पुण्यात देखील कुणि मराठी बोलत नाहीत, इंग्रजीच जास्त!

माझ्या मते आधी महाराष्ट्रात मराठी पण येऊ दे, मग इकडचे बघू.

माबोवर आहे का कोणी ABCD? त्यांच्यासाठी काहीप्रश्न:
• ६०-७०च्या दशकात अमेरिकेत वाढणे, तिथल्या शाळा-कॉलेजात जाणे कसे होते?
• वंशभेदाचा सामना तुम्हाला, तुमच्या पालकांना आणि तुमच्या मुलांना करावा लागला/लागतो का?
• तुम्ही भारतात किती नियमितपणे येता? इथला अनुभव कसा असतो?
• ७०-८० च्या दशकात अमेरिकेत वाढलेले तुम्ही जेव्हा त्याच काळात भारतात वाढलेल्या आणि ९०-०० च्या दशकात अमेरिकेत आलेल्याशी बोलता तेव्हा काही फरक जाणवतो का?
• त्यांच्या मुलांमधे आणि तुमच्या मुलांमधे किती फरक असतो?
• मराठी खाद्यपदार्थ, सणवार, साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट यांच्याशी तुमचा कितपत संबंध राहिला आहे? आणि तुमच्या मुलांचा?
• आणि नेमसेक बघून विचारावासा वाटलेलाशेवटचा अतीवैयक्तिक प्रश्न - तुम्ही लग्न कोणाशी केले? जोडीदाराला कसे भेटलात? लग्न आयुष्यभर (म्हणजे मुलं मोठी होईपर्यंत) टिकले का? तुमच्या पालकांची कितपत लुडबूड असते संसारात?

अँमी धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
तुमच्या सगळ्याच शंकांचे निरसन करता नाही येणार मला पण या पुस्तकात काही बाबी नक्कीच स्पष्ट मांडल्या आहेत. उदाहरणार्थ एका लेखात म्हटले आहे की लेखिकेच्या आत्ता चाळिशीच्या आसपास असलेल्या मुलींना कार्यबाहुल्यामुळे फोनवर ही बोलायला वेळ नसतो. पण दुसर्‍या एका ठिकाणी घरात दोन तीन दिवसात पोळ्या केल्या नाहीत तर मुलांना खटकतं व ती तसं आईला सांगतात (मराठी वा भारतीय खाद्य संस्कृती पासून फारशी फारकत नाही) इ.
बाकी परदेशस्थ मा. बो. करांकडे अनुभव नक्कीच अधिक असणार.