श्रीमंत बाजीराव पेशवा जयंती १८ ऑगस्ट

Submitted by शैलेशगांवकर on 16 August, 2015 - 13:55

90(3).jpg

मला आलेली एक मेल पाठवीत आहे. विचार करायला लावणारी आहे.......
नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…
उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…
आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…
शोध होतं तो एकच गोष्टीचा…पण ती देखील कुठे आहे कोणालाच माहित नव्हती…
आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच’ आपल्यावर येऊ शकते..

१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…
शिवाजी शिवाजी करत बसणारे आम्ही ….मराठ्यांच्या पूर्ण इतिहासाला शिवाजी पुरताच मर्यादित करून बसलो होतो!
हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर, त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!

बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू आम्हाला माहित होतं…
पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?
आपलं सरकार तरी कुठे मान्यता देतं? शिवाजी महाराजांचे समुद्रात पुतळे उभारतील,
पण त्यांचे गड किल्ले भाग्नावास्तेत पडू देतील, असलं हे विचित्र सरकार! शाळेतील
इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव खरोखर किती मोठा होता हे
आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा
‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच
ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!

ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!

"जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज
बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!"

बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदाराखिलाफ बाजीरावाची मदत मागितली.
संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते. असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव उठले
आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले. बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.

“ उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून उशीर झाला!"

ह्याला म्हणतात मराठी बाणा! मैत्रीचं राजकारण खेळावं तर ते असं! पोकळ दंडावर फुकटचे षड्डू थोपटत
बसणाऱ्या राजकारण्यांनी आणि सरकारी यंत्रणेने काहीतरी शिकावे ह्यातून!! ह्या कृत्यानंतर बाजीरावाने
बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…
आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!

अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय
आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा
म्हणून आम्ही लगेच निघतो काय…सगळं अगदी घाईघाईत घडलं…

इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला..
जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या
पुलावरून ती ओलांडली…घोड्यांच्या टापांनी हादरून उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या
आवाजाने भरून गेला होता!

बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे
एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही बलजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला….
आणि नंतर लागल ते एक छोट गाव! हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला!
अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही पटाईत!
गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये विचारल,

"इधर कोई समाधी है क्या?"

" सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?" असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड होतो
अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली! कोणालाच माहित नहीं! मग मूळ मुद्द्यावर आलो,

"ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?"

रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…
पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय…
मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली…

ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली… गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे…
भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम…जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर असावीत!
सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील!
अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला, सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि
आपल्या डेरयात मसलती करीत बसलेला एक दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा हाच तो!

बाजीराव!

गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत विचारशक्ती!

कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा पंतप्रधान!
(नाहीतर आजकालचे पंतप्रधान!) असो!

तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसता सपाट जमीन!
डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकी भाजून काढणार ऊन!!
आता काय करायच ह्या विचारत असताना एक उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी
वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पहु इथे विचारून! भात्यातील शेवटचा बाण उरले तो मारून पाहू!
असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!

पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची जाणीव त्या दिवशी झाली!

आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो!
आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!

आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणूनदेखील घेत नहीं! भारताबाहेर
कोणाला इथले पराक्रमी माहित असेल आपण अपेक्षा ठेवत नहीं! तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!

महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून आम्ही कधीच, "पेशवा बाजीराव की समाधी कहा है?
" असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही गोष्ट घडली खरी!

असो!

मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, "इधर कोई समाधी है क्या?"

"मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!", असे म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!
हा माणूस म्हणजे दादासाहब!
नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली
आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता!

मी म्हट्ल, " दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?"

आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले, "समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो….."

पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!!

पेशवा सरकार!

पेशवा सरकार!!!

इतका मान! इतका आदर!! ते देखील पुण्याहून शेकडो मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!!

आश्चर्य!

मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या कडा पाणवल्या!

ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे देखील त्याला इतका मान नाही!

महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी
"अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?" असे प्रश्न विचारणारे महारथी देखील आहेत!

आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे
आणी ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा गावठी ‘दादासाहब’ कुठे !

मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत
आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!

कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं, क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश,
पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे!
पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते!
शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पाने आपण नवे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान?
कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना इतका आदर करतो!

पेशवा सरकार!!

ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या पुत्राला वंदन केले
आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो!

तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो!

परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण
विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी
आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’!

बाहेर वाऱ्यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील
असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत परत ऐकू येत होते!

पेशवा सरकार!!

पेशवा सरकार!

साभार :- श्री विवेक नानीवडेकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराजांसारख्या पराक्रमी मराठ्यांनी कर्तृत्त्वाने निर्माण केलेल्या स्वराज्याच्या प्रामाणिक प्रधानसेवकास भावपुर्ण आदरांजली..!

छान पण अस्वस्थ करणारी माहिती. मागे असेच कुणीसे गेले होते समाधी शोधत. तो लेख वाचला होता. त्यात फोटोही होते. येथेही फोटो असते तर बरे झाले असते.

छान लेख.
इतका मान! इतका आदर!! ते देखील पुण्याहून शेकडो मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!!>>>>>>> १-२ वर्षांपूर्वी वाचलेल्या वृत्तपत्रात बाजीरावांबद्दल तिकडच्या लोकात आदरभावना वाचल्याचे आठवते.

सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.
अवांतर - माझ्या परिचयातील काही व्यक्तीदेखील रावेरखेडी येथे जाऊन आले आहेत. अशीच काहीशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. (आदर वगैरे)

छान लेख !!! समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय
आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा
म्हणून आम्ही लगेच निघतो काय >> आता तेथे समाधी नाही आहे का ? जालावर फोटो दिसतायत आणि त्याच्यावरच्या कंमेंट्स २०१७ च्या आहेत.

छान लेख,
मध्यप्रदेश सरकारने या समाधी स्थळाची योग्य निगा राखल्याचे दोन-तीन वर्षापूर्वी पाहिले होते.

गुगल नकाशावर दाखवलेय हे ठिकाण. फोटो पण दिसत आहेत (अर्थात लेख जुना आहे. लिहिला त्यानंतर हे सगळे अपडेट झाले असेल कदाचित):

https://www.google.com/maps/dir/18.4513132,73.8544554/Samadhi+Of+Bajirao...

"Samadhi Of Bajirao Peshwa, Rawer Khurd, Madhya Pradesh 451113" हे शोधा.

आम्ही नोव्हेंबर 2017 मधे रावेरखेडीला गेलो होतो. समाधीस्थळ चांगल्या अवस्थेत आहे,आसपासचा परिसरही स्वच्छ ठेवलेला आहे. आम्ही ओंकारेश्वर हुन सनावद ->बेडीया मार्गे गेलो होतो.या मार्गावर 2 ठिकाणी ,एक बेडीया जवळ आणि दुसरा रावेर फाट्याला 'बाजीराव पेशवा समाधी स्थळ,रावेर'असे अंतराचे बोर्डस दिसले.आम्ही गुगलवर gps लावून प्रवास करत होतो पण बोर्ड्स मुळे gps शिवायही नीट सापडू शकेल असं वाटलं.
रावेर फाट्यानंतर रस्ता जरा अरुंद आहे,पण चांगल्या अवस्थेत होता. रावेर च्या अगदी अलीकडे एका छोट्या नदीवरचा ब्रिज लागतो आणि तिथून गाव सुरू होत,तीथे gps चं नेटवर्क गेलं पण थोडंच पुढे गेल्यावर गावातल्या एका घराच्या भिंतीवर 'बाजीराव पेशवा समाधीस्थळ आणि दिशादर्शक बाण' दिसला. आणि काही मीटर वरच समाधीस्थळ दिसलं.
तिथे रेग्युलर झाडलोट होत असावी, असं वाटलं.2 ठिकाणी महितीफलक आहेत.