७/१२ व त्यातल्या नोंदी

Submitted by कायदेभान on 23 April, 2019 - 04:37

माणूस पैसे कमावू लागला की इनवेस्टमेंट सुरु होते. अन इन्वेस्टमेंटच सगळ्या खात्रीशीर क्षेत्र म्हणजे जमीन जुमला. पण जमिन जुमला म्हटलं की सात-बारा नावाचा कागद डोळ्यापुढे नाचतो. बरेच लोकांना हा कागद समजत नाही. अन अनेकाची त्यात फसवणूक होते व कष्टाचे पैसे अडकून पडतात किंवा कायमचे बुडतात. त्यासाठी सात बाराचं जुजबी नॉलेज असणं आवश्यक असतं. तर आज आपण सातबारा नेमका काय असतो ते समजावून घेऊ या.

देशाचे एकूण क्षेत्रफळ
तर आपल्या देशाचे एकूण क्षेत्रफळ आहे ३२ कोटी ८७ लाख हेक्टर. म्हणजे ३२ लाख ८७ हजार चौरस किलोमिटर. आता हेक्टर म्हणजे किती हा घोळ होतोच. तर त्याला सोपं करुन सांगतो. १० मिटर x १० मिटर = १०० चौ. मिटर (म्हणजे १ आर). १०० मिटर x १०० मिटर = १०,००० चौ. मिटर (म्हणजेच १ हेक्टर) तर ही आहे आताची नविन पध्दती. जुनं कॅलक्यूलेशन हे गुंठा व एकर याच्यात होतं. ते कसं होतं ते पण बघू या. ३ x ३ चौ. फूट = ९ चौ. फूट. (याला १ चौ. वार म्हणायचे) ११ x ११ वार = १२१ चौ. वार(म्हणजे १ गुंठा म्हणजे १०८९ चौ. फूट) अन ४० गुंठे म्हणजे १ एकर. हे असं जुनं कॅलकुलेशन होतं. पण आता मात्र आर. व हेक्टर मध्येच जमिनीचं मोजमाप व हिशेब होतो. जमीन मोजणीचं तंत्र ब्रिटीशांनी आपल्याला दिलं. याचा इतिहास काहीसा असा आहे.

मोजनीचा इतिहास
सन १८०२ मध्ये कर्नल लॅमटन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीशांनी मद्रास प्रांतात ब्रिटीश सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. सन १८३० मध्ये मुंबई प्रांताचे जमाबंदी आयुक्त जे.एम. अन्डरसन यांनी जमाबंदीचे काम सुरु केले. सन १८३० नंतर १८८० व १९३० मध्ये राज्यातील जमिनीची फेरमोजणी झाली. अन ती मोजणी इतकी अचूक होती की आजही भारताची एकूण जमीन सेटेलाईटच्या माध्यमातून जेवढी भरते (३३ लाख चौ. किमी. एवढी ) ती बरोबर ब्रिटीशांच्या हेक्टर मोजणी म्हणजे ३२ कोटी ८७ लाख हेक्टर याच्याशी जवळजवळ तंतोतंत मिळते.

तर जमीन आणि व्यवस्थापणासाठी गावातील तलाठी जे विविध गाव नमुने ठेवतो त्यातील नमूना सात आणि नमूना बारा असे हे दोन एकत्र करुन आपण सात बाराचा नमूना म्हणतो. म्हणजे सात बारा हा एक नमूना नसून तो जोड नमूना आहे. त्या कागदातील वरचा भाग म्हणजेच सात नमूना हा ’हक्क पत्रक’ असतो तर खालचा म्हणजेच बार नमूना हा ’पीक पाहणी पत्रक’ असतो. हा ७/१२ चा उतारा म्हणजे जागेच्या महसूल विषयक कागद होय. ज्यात जागेच्या मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीवर असलेला बोजा व इतर कोणते अधिकार याची माहिती असते. पण हीच जमीण जर गावठाण किंवा शहरात असल्यास तिचे प्रापर्टी कार्ड किंवा इंडेक्स-२ नावाचे कागद असते. त्यामध्ये सुद्धा वरील प्रमाणेच माहिती असते. वर म्हटल्या प्रमाणे ७/१२ मधील नमूना ७ हा जमिनीच्या मालकी हक्का संबंधी असून १२ नंबरचा नमूना हा पिकांसंबंधीत आहे.

७/१२ च्या उता-यात कब्जेदार सदरी म्हणजेच भोगवटादाराच्या नावे जमीन विकत देणा-या व्यक्तीचे नाव शाई मध्ये लिहले आहे याची खात्री करुन घ्यावी. एखाद्या व्यक्तीचे नाव साता बाराच्या नमून्यात शाईने कंस केलेले असल्यास त्या व्यक्तीचे नाव उता-यातून कमी केले गेले असा त्याचा अर्थ होतो.

७/१२ च्या उता-यात गोल करुन नंबर लिहलेले दिसल्यास त्या गोलातील नंबर हे फेरफार नंबर असतात. अशा वेळी फेरफारचा एक वेगळा नमूना असतो ज्याला गाव नमूना क्रं. ६ असे म्हणतात. या नमूना सहा मध्ये सातबारातल्या गोलातले नंबर पडताळून पहावे. कारण गोलातला नंबर नमूना ६ मधल्या फेरफार व्यवहाराचा नंबर असतो.

७/१२ च्या उता-यात उजव्या बाजूला कुळाचे नाव व इतर अधिकार असे एक स्तंभ असते. त्या स्तंभात स्तंभात कोणाचे नाव आहे का ते नीट पहावे. असल्यास त्याचा अधिकार त्या सात बारात आहे. त्याच बरोबर उजव्या बाजूला असलेल्या इतर हक्क या स्तंभात कोणता बोजा (गहाण, बॅंकेच कर्ज इ.) आहे का ते पहावे.

७/१२ मधील गाव नमूना १२ (पिकांची नोंदवही) यामध्ये जमीन कसणा-याचे नाव व वहिवाटदाराचे नाव याची नोंद आहे का ते पहावे. तसेच इतर हक्कामध्ये जमीन संपादीत केलेली असल्यास नोंद असते या सर्व बाबी तपासून पहावे.

गाव नमूना ८-अ चा उतारा हा चालू खात्याचा उतारा असतो. एखादि जमीन विकत घेताना ७/१२ सोबत ८-अ तपसाचा असतो. कारण यात जमीन विकत देणा-याचा व जमीनीचा उल्लेख असतो. म्हणजे अजून कोणी जर याचा मालक असल्यास ८-अ मध्ये ती गोष्ट बाह्रे पडते. कारण तो चालू खात्याचा उतारा असतो.

७/१२ च्या उता-यातील इतर हक्क स्तंभात ’नवीन शर्त’ किंवा ’जुनी शर्त’ यापैकी काही लिहले आहे का ते पहावे. कारण नविन शर्त म्हणजे शासनानी काहीतरी नविन अट घातली असून जिल्हा अधिका-याच्या परवानगी शिवाय नविन शर्तवाली जमीन विकली जाऊ शकत नाही.

७/१२ च्या उता-यातील इतर हक्काच्या स्तंभात जर कलम-८४(क) असा शेरा असल्यास ती जमीन शासनाकडे जमा होण्यास पात्र असून त्याचा खरीदी विक्रीचा व्यवहार होऊ शकत नाही असा अर्थ असतो.

तर मित्रानो, ७/१२ समजावून घेताना वरील गोष्ट नीट तपासा व त्या नंतरच काय तो व्यवहार करा. कारण अशा लहान सहान गोष्टी असतात ज्या नंतर खूप ताप ठरतात.

सात बारा कसा वाचायचा याबद्दल मायबोलीवर आणखी एक लेख आहे तोही पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपयोगी माहिती...
धन्यवाद
बारा वरच्या पीक नोंदी ब-याचदा तलाठी अंदाजे लावतो असे दिसते. ऊसा सारखे पीक घेतले तरी नोंद ज्वारी, बाजरी अशी होते.
भोगवटादार वर्गा विषयी लिहिले तर बरे होईल.
इतर हक्क, इकरार म्हणजे काय?

जर एखाद्या खातेदार वारला. त्याच्या वारसांची नावे कशी नोंदवावी?
एक केसमध्ये वारसांच्या नोंदीचा अर्ज नोटरीकडे नोंदवून तलाठ्याला दिला तरी त्याने १० वर्ष वारसांची नोंदच घेतली नाही. सदर खाते मयताच्या नावे ठेवले. अशा गोष्टी कशा हाताळाव्या ? सर्कल, तहसीलदार यांचे भय नसते. का ते वेगळे सांगायला नको.

सातबारा हा त्या पुर्ण सर्व्हे नंबरचा/ गटाचा असतो. त्यात वाटप झाले असेल तर भोगवटादारांच्या नावापुढे आणेवारी म्हणजे किती क्षेत्र व आकार लिहिलेले असते.
वाटप झाले नसेल तर एक मुख्य नाव व इतर वारसांची नावे असतात. व तो सातबारा सामायिक मालकीचा असतो. सामायिक सातबारा असणाऱ्या शेतकऱ्यांना पिकविमा, पिककर्ज, इतर नुकसानभरपाई मिळणे, जमीन विक्री करणे हे फार कटकटीचे असते.
आठ अ उताऱ्यावर त्या शेतकऱ्याचे त्या गावातील एकुण क्षेत्र दर्शवलेले असते. जमीन खरेदी करताना आठ अ पाहिला पाहिजे. त्या गावातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले मालकीचे क्षेत्र आठ अ वर एकत्रित नोंदलेले असतात.
शेतकऱ्यांना वारस नोंद, कर्जाची नोंद म्हणजे बोजा चढविणे,उतरवणे, वाटपपत्रानुसार नोंदी करणे या कामांसाठी फार पिळले जाते. महसूल खाते एक नंबर भ्रष्टाचारी आहे, सर्वांत जास्त पैसा हा जमीन खरेदी विक्री व्यवहारात खेळत असतो.‌ शेतकऱ्यांच्या रक्ताचा पैसा ही यंत्रणा निर्लज्जपणे हडपत असते. साध्या ओळख दाखवायच्या स्वाक्षरीसाठी वकील लोक दोन हजारांहून जास्त रक्कम घेतात.