एक छोटी कथा: घर

Submitted by मुक्ता.... on 16 April, 2019 - 09:20

एक छोटी कथा
घर...

गीताने छकुल्याचा हात धरला आणि तडक घराच्या उंबऱ्याची वेस ओलांडून ती रेलवेस्टेशनच्या दिशेने निघाली. काल जरा जास्तच बोललो आपण असं तिला सारखं मनात खात होतं. "हा माझा प्रश्न आहे" हे वाक्य अश्रुधारा बनून वैनींचा पदर पूर्ण दिवसभर भिजवत होतं. जाऊबई खरं तर खूप प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या होत्या. पण प्रेमळ असलं म्हणजे त्या व्यक्तीला आपली मतं नसतात का? असे उमेशरावना वाटत होते. उमेशराव आणि वहिनी म्हणजे शिवपार्वतीचा जोडा वाटे. मुलं शाळेत गेली होती आणि रिकाम्या घरात हा असा भावनांचा महापूर सुरू होता.या घराला नवीनच!
गीता अगदी सहा महिन्यांपूर्वी महेशशी लग्न होऊन आपट्यांची कधी झाली ते कळलं ही नाही.आपल्या दक्ष आणि प्रेमळ स्वभावाने तिने थोड्या काळात सर्वांचे मन जिंकून घेतले होते. आणि मोठ्या जाऊबई तर जाऊ नाहीच मोठी बहीण,कधी आई अशाच.गीताही लेक होऊन राहिली होती. गीता म्हणजे अगदी जाऊबाईंच्या ओठावर वसलेलं गाव झालं होतं. पण मग आज काय झालं होतं?
दादर हुन सुटणारी स्लो कल्याण पकडली गीताने. त्याच गाडीला भांडुपला महेश चढला. ठाण्याला सगळ्या कागद पत्रांची पूर्तता करून दोघे दादरला परत घरी आले. छकुल्याला गीताचा लळा लागला होता. कदाचित त्या तीन वर्षाच्या निरागस मनाने हीच आपली आई म्हणून तिला स्वीकारलं होतं. आता गीताने वैनींची माफी मागायची ठरवली. आधार ओरफनेज मधून छकुल्याला आणणं हा निर्णय वैनींच्या जुन्या संस्कारात वाढलेल्या मनाला पटत नव्हता,जरी अनाथाला आधार देणे पटत होते पण वळत नव्हते. गीतासाठी हा निर्णय स्वाभाविक होता.वैनींनी गीताला समजावण्याचा प्रयत्न केला पण उपयोग नव्हता. आणि फटकळ स्वभावाच्या अनुसार गीताने त्यांना वरचे उत्तर दिले. वैनीचे भरून आलेले डोळे गीताला अस्वस्थ करत होते.
गीताने बेल वाजवली. काSSSSकु म्हणून तो वैनींना बिलगला. काय करावे त्यांना समजेना...मेण वितळावे थोड्याश्या उष्म्याने तशा वैनी पाघळल्या...त्यांनी गोबऱ्या गालाच्या छकुल्याला गचकन कुशीत घेतले आणि पुन्हा त्याच मायाळू डोळ्यांनी गीताकडे पाहिले. आणि सारा महापूर आता प्रेमाच्या सागराकडे अलोट वाटचाल करत होता.उमेशराव फक्त किनारा न्याहाळत होते.

रोहिणी बेडेकर
16.04.2019

Group content visibility: 
Use group defaults

छान छोटीशी कथा. आवडली.

ही आणि अश्शीच घटना मैत्रिणीच्या घरी बाळ adopt केल्यावर झाली होती. पण ते बाळ आता आजीचा जीव की प्राण आहे.

एकमेकांना एकमेकांची गरज व काळजी असते , तिथे छोटे छोटे रागलोभ विसरून हसतखेळत आनंदाने जगायचे असते ती जागा म्हणजे घर. घर माणसाला ओढ लावते. गुरुत्वाकर्षण बलासारखं अदृश्य प्रेमाचे बल खेचून एकत्र ठेवत असते ती उब म्हणजे घर.

<<एकमेकांना एकमेकांची गरज व काळजी असते , तिथे छोटे छोटे रागलोभ विसरून हसतखेळत आनंदाने जगायचे असते ती जागा म्हणजे घर. घर माणसाला ओढ लावते. गुरुत्वाकर्षण बलासारखं अदृश्य प्रेमाचे बल खेचून एकत्र ठेवत असते ती उब म्हणजे घर.>>+१०००
छान आहे कथा. आवडली.

खूप सुंदर प्रतिक्रिया दिल्यात.मायबोलीवर ही पहिलीच कथा पोस्ट केली. हा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. लवकरच दुसरी छोटी कथा पोस्ट करीन.मनपूर्वक आभार सगळ्यांचे

कथा छान आहे.
पण लग्नाला सहा महिनेच झाले असताना मुल दत्तक का घेतलं?
हा माझा प्रश्न आहे असं गीताचं उत्तर असेल ते माहितीये Happy

छान कथा. आवडली.
पण लग्नाला सहा महिनेच झाले असताना मुल दत्तक का घेतलं? हा माझा प्रश्न आहे. Wink दिवे घ्या