नळीची वाट आणि राजनाळ

Submitted by योगेश आहिरराव on 17 March, 2019 - 01:02

नळीची वाट आणि राजनाळ

आम्हा निवडक मायबोलीकर मित्रांचा व्हॉट्स ऍप ग्रुप आहे तसे हल्ली बरेच ग्रुप असतात. पण या ग्रुपची बातच न्यारी, एक से बढकर एक वल्ली इथे आहेतच. त्यात कोणत्याही विषयावर चर्चा ! मग ती कोणत्या थराला कुठपर्यंत जाईल हे काही सांगता येत नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर "सर्व समस्या समाधान" इथे नक्कीच होते. तर असा हा KCBC ग्रुप... कुणाला फुल्ल फॉर्म काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्यक्तिगत पातळीवर सांगण्यात येईल. अधून मधून फोटोमेळावा (निमंत्रक-गिरी)मग सह्यमेळावा नंतर सुसह्यमेळावा होत होत ट्रेक व ट्रेकची चर्चा तशी कमी होते गेली. पण तरीही सह्याद्रीच्या ओढीने अधून मधून का होईना इथली दोन चार टाळकी ट्रेक करतातच.
IMG_20181027_175456_HDR.jpg
अश्याच एका दिवशी यो रॉक्स ने नळीच्या वाटेचा विषय काढला हो ना हो करता सात आठ जण तयार झाले. पुन्हा या ट्रेक चा वेगळा ग्रुप जास्तीची मेजोरिटी या नुसार २७ -२८ ऑक्टोबर तारीख फायनल केली. मग हळूहळू वातावरण निर्मिती होत चर्चा सुरू झाली. मनोज भावे यांनी बेलपाडा गावात बोलून रात्री मोरोशीहून जीपची तर दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता पासून गडावर मुक्कामाची सोय करून ठेवली. तर सतीश उर्फ सूनटूण्या याने तांत्रिक जबाबदारी घेतली. पन्नास फुटी रोप, दोन क्रॅब, दोन सीट हार्नेस इ.सुरक्षा साहित्य घेत मोठं काम केलं. सुरुवातीला माझेही थोडे डळमळीत होते, एकतर मोठी दीर्घ चढाई त्यात माझे हल्लीचे टाचेचे दुखणं आणि अधून मधून येणाऱ्या क्रॅम्प. त्यात भर म्हणजे त्याचं दिवशी कंपनीत Annual Day Celebration. त्यामुळे शुक्रवारी रात्री शेवटची एसटी मिळणं ही मुश्किल. यो, रोमा, गिरी उर्फ नरेश काका आणि मनोज याच्या आग्रहाखातर कसे तरी जमवलेच, थोडक्यात निसर्गाची ओढ आणि ट्रेकची आवड.
नेमकं निघायच्या दोन दिवस आधी नेमका यो टांगारू झाला. शुक्रवारी रात्री कल्याण एसटी स्टँडवर पोहचलो तेव्हा सुनील आधीच येऊन थांबला होता. त्याच्या समोर दोन ग्रुप आधीच्या एसटीने पुढे गेले होते. अकरा नंतर डोंबिवलीहून आका आणि सतीश आले तर ठाण्याहून मनोज, रोमा आणि विनय आले. इंद्रा थोडक्यात बदलापूर पोहचता राहिला कसातरी मोठी सॅक घेऊन कल्याणात उतरला. गिरीची वाट पाहत तोवर अजुन दोन ग्रुप स्टँड वर, विचारल्यावर कळाले की ते सुद्धा नळीची वाट. मला तर वाटतं हल्ली रात्री उशिरा निघणारे हमखास नळीची वाटवाले ट्रेकर अगदी एखादा थोडी तयारी करून गेला तर कुणालाही जॉईन होऊ शकतो. असो..गमतीचा भाग सोडला तर खरच अशी स्थिती आहे. दिल्लीहून सायंकाळी निघून घरी जाऊन सॅक पॅक करून गिरी बारा वाजता स्टँडवर हजर. मागच्या सहा तासात विमान, टॅक्सी, रिक्षा, रेल्वे आणि एसटी असे सारे वाहतुकीची साधन वापरून फक्त आणि फक्त ट्रेकसाठी.. क्या बात है.
साडेबारा वाजता शेवटची कल्याण नगर लागली त्यात जागा मिळाली, याही एसटीत ऐन वेळी एक ग्रुप आलाच. रात्री रहदारी नसल्यामुळे कुठेही न अडखळत दोनच्या सुमारास मोरोशीत उतरलो. मनोजने फोन केल्याप्रमाणे जीपवाला आमच्या आधीच येऊन थांबला होता. नेमका हाच जीपवाला त्या आमच्या बस मधल्या दुसऱ्या ग्रुपला ही घेऊन जाणारा निघाला. आम्ही नऊ जण आणि ते पाच सोबत मोठ्या सॅक एकत्र जाणे शक्यच नव्हते. आम्ही पुढे निघालो आम्हाला सोडून तो यांना घ्यायला पुन्हा येणार. न्याहाडी फाटा मग आत जात तळेगाव रोड सोडून जीप वालीवऱ्हे बेलपाडासाठी उजवीकडे वळली. काही अंतर काळू नदीच्या बाजूने जाणारा शांत निर्जन रस्त्यावर काही ठिकाणी नाईट जार निवांत बसलेले. कच्या पक्क्या रस्त्याने अर्ध्या पाऊण तासात कमळूच्या घरी दाखल झालो. तिथेही दोन ग्रुप वेगवेगळ्या कोपऱ्यात, आम्ही नऊ जणांनी उरलेले दोन कोपरे घेत पथाऱ्या पसरल्या. डोळे लावतो तोच मागचा ग्रुप पण आला कमळू बहुतेकांची सोय लावून देत होता. मला तर त्याचे घर टप्पा टप्प्याने येणाऱ्या पाहुण्यांचे लग्न घर वाटू लागले. आजूबाजूला घोणससुर असल्यामुळे खास अशी अखंड झोप लागली नाहीच. थोड उजाडताच उठून आवरते घेत नाश्त्याला पोहे तयार. कमळूचे घर भारीच, त्याच्या अंगणातून थेट समोर कोकणकडा दिसतो. ते बघताच मन थेट कड्यावर पोहचलं सुद्धा. हा हरिश्चंद्रगड किती त्या आठवणी त्याच्या या विविध ठिकाणहून चढणार्या वेगळ्या वाटा खरंच 'गड जितका मोठा तितक्या वाटा अधिक' हे म्हणतात ते इथे तंतोतंत लागू पडते.
बरोब्बर पावणे सात वाजता गावातून निघालो कमळू मागून दुसऱ्या ग्रुप सोबत येणार होता. एक दोन ग्रुप आधीच निघालेले, आमच्या सोबत त्याचा पुतण्या रामदास चार टेंट घेऊन निघाला. ही मंडळी भारीच एका दिवसात थोडफार सामान घेऊन आरामात या नळीच्या वाटेने वर जाऊन खाली येतात. कोकणकडा समोर ठेऊन चालू पडलो सूर्य पूर्वेला पलीकडे असल्यामुळे सकाळच्या थंड हवेत जास्तीत जास्त मजल मारायची हा हेतू. डावीकडे नाफ्ता तर उजवीकडे रोहिदास पासून दूरवर देवदांड्याची रांग. सुरुवातीला शेताच्या बांधावर चालत हळूहळू वाट मोकळं वनातून रानात शिरली. ओढ्याला अगल बगल देत मळलेल्या वाटेने त्यात सकाळच्या वातावरणात रानात विविध पक्ष्यांचे आवाज. गिरी, विनय व इंद्रा तर आवाजावरून आणि दुरून दिसला तरी तो पक्षी अचूक ओळखायचे. कधी मुख्य ओढ्याला उजवीकडे ठेवत तर कधी ओढ्यात उतरत मोठमोठ्या दगड धोंड्यातून मिळेल तशी वाट काढत काय ते ‘थ्री जायंट स्टेप’ म्हणतात तिथे मोठा थांबा घेतला.
ओढ्यात काही ठिकाणी अजूनही पाण्याची धार वाहत होती. थोडफार खाऊ तोंडात टाकून पुढे निघालो. डावीकडून वाट वर चढू लागली आणखी थोडे वरच्या बाजूला आल्यावर ओढ्याच्या उजवीकडे माकडनाळच्या दिशेने वाट जाते.
IMG_20181027_084614.jpg
वाट म्हणजे अशीच दगडांची रास, हल्ली या उजव्या नाळेने जाण्याचे प्रमाण ही वाढले आहे. या जंक्शन पर्यंत यायला आम्हाला मधला विश्रांती थांबा पकडून सव्वादोन तास लागले. इथेच कमळू मागून दुसरा ग्रुप घेऊन आला. कधी आम्ही पुढे तर कधी ते पुढे, ठराविक अंतराने थोड थांबत फोटो घेत जात होतो. दगड धोंड्यांच्या या नाळेत एक मात्र खरं उगाचच धावत उड्या मारत मोठमोठी स्टेप्स ढांगा टाकत जाण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा एका लयीत छोट्या ठराविक अंतराने पावलं टाकत चढाईची मजा घेत होतो. यामुळे फार दम लागला असं मुळीच जाणवलं नाही. तसेही आम्हाला विक्रमी वेळात नाळ पार करून अमुक वाजता पोहचलो तमुक केले असे काहीही दाखवायचे नव्हते. कारण नळीच्या वाटेचा ट्रेक म्हटलं तर या नळीच्या चढाईची मजा घेणं, काय ते म्हणतात "जहा रास्ते ही मंजील है" असं काहीतरी.
IMG_20181027_100805.jpg
मुख्य नळीची सुरुवात झाली, जसं जसे आत घुसत होतो तसे नळी आणि बाजूचे आकाशात घुसलेले उंच उंच कडे तर उजवीकडे महाकाय कोकणकडा, फार थरारक वगैरे नाही पण भन्नाट वाटत होते. उजवीकडून डावीकडून मिळेल तशी वाट काढत आणि महत्वाचं म्हणजे ठिसूळ दगडी सांभाळत. नाळेच्या सुरुवातीला तसेच अधेमधे लहान उंबराची झाडं त्यामुळे त्यांच्या सावलीत थोड टेकून घोट भर पाणी पिऊन चालू पडायचं.
दुसरी एक गोष्ट म्हणजे दरवर्षी पावसानंतर नाळेत थोडफार बदल होतो, छोटे मोठे पॅच काही जातात तर काही नव्याने तयार होतात. दहा वाजेच्या सुमारास पहिला रॉक पॅच जवळ आलो. तसा पाहिलं तर हा पॅच खालचा ठिसूळ दगडी भाग सोडला तर फार कठीण नाहीच.
सतीश पुढे होता पटकन वर जाऊन दोर सोडला सुद्धा, कुठलाही कमीपणा न वाटून घेत दोराच्या सहाय्याने सॅक पाठीवर घेऊन सर्वांनीच हा पॅच अगदी आरामात पार केला. पुन्हा मोठे धोंडे चढाई तर काही ठिकाणी स्लेट सारखी ठिसूळ बारीक दगडांची रास, परिणाम घसारा. त्यात आता नाळेत उन जाणवू लागले, ही नाळ साऊथ वेस्ट त्यामुळे इथे ठराविक वेळेत हमखास उन असतेच. उजवीकडे कड्याखाली थोडीफार सावली होती व कपारीत थोडे पाणी तिथेच थांबून सुका खाऊ, काकडी, लिंबू सरबत तर आकाने आणलेली साजूक तुपातली कचोरी. तिथे बसून खात असताना अचानक मनात आले कड्याला बिलगून बसलो आहोत चुकूनही जर वरून माकडं गेली आणि त्यांच्या धक्क्याने दगडी पडली तर काही खरं नाही!
नाळेत वर पाहिलं तर मध्ये एक भिंतीचा भाग सुळक्या सारखा दिसत होता. नीट निरीक्षण केल्यावर तिथे दोर लावलेला दिसला आधी गेलेल्या ग्रुपचा आवाजही ऐकु आला हाच तो तिसरा उंबराच्या झाडाचा पॅच. आम्हाला तिथे पोहचण्यासाठी मधला दुसरा पॅच पार करायचा होता.
IMG_20181027_112943.jpg
दुसरा साधारण वीस फुटांचा असेल डावीकडच्या बाजूने स्लेटच्या पावठ्या करत मध्ये किंचितसा चिमणी क्लाईम प्रकार त्यातून मोठी सॅक पाठीवर घेऊन चढाई सुरक्षेसाठी इथेही सतीशने रोप लावला, तर काहींनी हार्णेस ही घातली. एक एक जण वर जाई पर्यंत बाजूच्या उंबराच्या झाडाच्या सावलीत आराम केला.
IMG_20181027_115829.jpg
पॅच चढून आल्यावर समोर दूरवर माकडनाळ व शेंडी सुळका आणि खाली आमची नाळ (सह्याद्री सोबत जुळलेली)
एका लयीत असेच एक एक लहान मोठे पॅच पार करत तिसऱ्या पॅच जवळ आलो इथल्या भागात चढ अधिक तीव्र आणि जोडीला घसारा भरपूर. एक एक जण मिळेल तशी जागा पकडून उभे राहिलो. हा उंबराच्या झाडाचा पॅच म्हणजे आपण ज्या नाळेने येतो त्या नाळेसमोर मोठी कातळभिंत आडवी येते त्यावर सरळ रेषेत न चढता थोडे मागून उजव्या बाजूने तिरके चढायचे. इथेच आधाराला उंबराच्या झाडाला रोप बांधता येतो. अंदाजे वीस पंचवीस फुटाचा हा पॅच सतीशने आरामात जाऊन वर रोप लावला सुद्धा. झाडा व्यतिरिक्त काही ठिकाणी वरच्या अंगाला बोल्ट ही मारलेले आहेत पण झाडाचा बुंधा अधिक विश्वासार्ह हे आमचे मत.
IMG_20181027_123614.jpg
रामदास, मनोज, सुनील, इंद्रा वर गेले, माझा नंबर आला हातात रोप पाठीवर सॅक, दोन स्टेप जात नाही तोच पायात जोरदार क्रॅम्प. कुठलाही रॉक पॅच चढताना मुख्य म्हणजे पायावर जोर देऊन, थ्री पॉईंट टेकनिक वापरणे. पण पायाची हालत खराब त्यामुळे हातावर जोर देऊन चढताना दोरीवरच्या उड्या, मग घडला प्रसंग पाहून सतीश ही वैतागला. वर जाऊन शांत दम खात उभा राहिलो इथेही बसायला जागा कमी त्यामुळे पुढचा ट्रेव्हर्स पार करून पलीकडे जाऊन बसलो. घोटभर पाणी आणि चिक्कीचा तुकडा टाकला. काय माहित पण मला या ठिकाणाहून नाळ भलतीच गूढ वाटत होती. मध्येच एखाद दोन पाकोळ्या भुर्रकण उडत जात त्या नाळेतली शांतता भंग करत होत्या. सावधपणे एक एक जण तर सतीश इंद्रा वाईंड अप करून आले. मुख्य नाळेतून हा ट्रेव्हर्स पार करून दुसऱ्या नाळेत आलो. या नाळेत ही घसारा होताच थोड वर जाताच नाळेच्या मुखाशी झाडी दिसू लागली. थोडक्यात नाळ प्रकरण पूर्ण झाले तर! बहुतेकांनी जरी सुस्कारा सोडला तरी एक मात्र खरं आम्ही सर्वांनी मिळून हसत खेळत, रमत गमत, गप्पा टप्पा हाणत पूर्ण नाळ व्यवस्थित पार केली. वर आल्यावर डावीकडे जंगलात एक वाट उतरते त्या वाटेने खाली उतरून साधले घाटाकडे तर उजवीकडची कोकणकडा मार्गे गडावर. वेळ पहिली तर दुपारचा सव्वा वाजले होते. आम्ही अर्थातच उजवी पकडली, वाट झाडीतून चढणीला लागली. कातळ टप्पा, छोटा ट्रेव्हर्स मग पुन्हा वाट बाहेर आली.
IMG_20181027_133217.jpg
मागे वळून पाहिले पाचनई पेठेची वाडी रस्ता तर नकटा त्यामागे नाफ्ताची जुळी शिखरं आणि कलाडगड फारच जवळ भासत होते. हा सारा मुळा खोर्याचा भाग. पुढे जातो तोच अजुन एक पॅच आमची वाट पाहत होता तो पार करून एका मैदानावर आलो एके ठिकाणी अजूनही पाणी, बारीक का होईना पण वाहती धार. जोडीला सोनकी, जांभळी मंजिरी, घाणेरी, काटेकोरांटी, रानजीरे सारखी रानफुलें. आमच्यातला आका त्याला फुलांबद्दल भरपूर माहिती त्यांचे मिळेल तसे फोटो टिपत होता. झाडांच्या सावलीत जेवणाची पंगत मांडली. सुनील आणि मनोज यांनी लिंबू सरबत तयार केले. याच जागी शनिवार रविवार पेठेची वाडी येथील दोघे जण लिंबू सरबत विकायला बसतात कारण नळीची वाट चढून येणाऱ्यांची वाढलेली संख्या. असो... सारे काही वेळेत होते घाई अशी काही नव्हतीच जेवण करून भर दुपारी चांगलीच झोप काढली. इंद्रा मनोज व विनय तर पाठ टेकताच घोरायला लागले. पण त्या दिड एक तासाच्या विश्रांतीमुळे चांगलेच रिफ्रेश झालो. इथून आता समोर असलेले झाडी भरलेलं हे शेवटचे टेपाड मग आलाच कोकणकडा. निघतो तोच कमळू परत येताना दिसला. आधीच्या ग्रुपला वर सोडून आता एकटाच घरी परत या नळीच्या वाटेने जात होता. घड्याळात पाहिलं तर साडेतीन होत आले होते, खरंच मानलं बुवा. हे खरे सह्याद्रीतील शेर्पा.
सुस्तावलेल्या शरीराला सुरुवातीला थोड जड गेलं. नंतर चांगलीच लय गवसली. शेवटचा सोपा कातळ टप्पा पार करून वर आल्यावर दूरवर तारामती शिखर नजरेस आले. IMG_20181027_154316.jpg
पठारावर पिवळ्या धमक सुकलेल्या गवतातून शेवटचा चढ संपवून कड्यावर पोहचलो. वेळ पहिली चार वाजत आले होते. खूप काही वेगळं केलं असं मुळीच नाही पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि वेगळाच आनंद होता. मुक्काम कोकणकड्यावर करायचा ठरलं होत. आता कोकणकडा म्हणजे भास्कर आलाच. त्याच्याकडे सॅक व इतर सामान टाकले. एव्हाना गर्दी जमायला सुरुवात झाली होती. चहा पाणी करून बाहेर बसलो होतो तोच समोरून डोक्यावर अंडरवियर टोपी सारखी घातलेला एक जण येताना दिसला जवळ आल्यावर समजले अरे हा तर महाभयानक मंगू नंगू उर्फ ‘मंगेश सपकाळ’ या इरसाल अवलिया बद्दल सांगायचं झालं तर वेगळा विषय होईल. तरी कुणाला उत्सुकता असेल तर त्याचे फेसबुक प्रोफाइल स्वतः च्या रिस्क पाहावे. थोडफार बोलणं झाल्यावर तो त्यांच्या ग्रुप सोबत निघून गेला. आम्ही सुद्धा कोकणकड्यावर मिळेल तशी जागा पटकावून बसलो. हो सद्या विकेंडला कोकणकड्याची अवस्था जुहू चौपाटी सारखी झाली आहे. बरेच अतरंगी तऱ्हेतऱ्हेचे पोज देणारे विदूषक त्यांचे फोटो? घेणारे महाभाग एकंदरीत साराच विचित्र मामला. थोड अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत थोडेफार फोटो आम्हीही घेतले. हरिश्चंद्रगडाचा मुख्य आकर्षण असलेला साधारण अर्ध्या किलोमीटर लांबीचा अर्धवर्तुळाकार प्रसिद्ध असा कोकणकडा याबद्दल फार काही सांगायची गरज नाही. ते फक्त अनुभवायचं अर्थातच गर्दी टाळून यातच खरी मजा आहे.
IMG_20181027_174202_HDR.jpg
सूर्यास्त पाहत नजर सारखी नळीच्या वाटेवर जात होती. खाली सरळ रेषेत बेलपाडा कुठे सकाळी तिथे होतो आणि कसे कुठून वर आलो यावर विश्वास बसत नव्हता. सावळाने तीन टेंट लावून दिले त्यातच बिस्तरा मांडला. इंद्राने चांगले स्ट्रेचिंग सेशन घेतलं त्यामुळे खूपच रिलॅक्स वाटलं. जसा अंधार दाटू लागला तशी थंडी जाणवायला लागली. आजूबाजूला जिथे नजर जाईल तिथे टेंट कमीत कमी चाळीस पन्नास सहज असतील त्यात आणखी लोकं येत होतेच. भास्करचे हॉटेल दुसरं लग्नघर सात वाजेपासून जेवणाच्या पंगती सुरू. इंद्रा आणि विनय पटकन नंबर लावून आले, ते आल्यावर आम्ही गेलो. कधी नव्हे तर आमच्यातील काही जेवण करून चक्क आठ वाजता झोपले सुद्धा. अर्थात शुक्रवारची दिवसभर कामाची दगदग, रात्रीचा प्रवास, अर्धवट झोप आणि मोठा रूट हे पाहता स्वाभाविक होते. बहुतेक ठिकाणी कॅम्पफायर, कुणी गाणी म्हणतय तर कुणी स्पीकर वर वाजवतंय, तर कुठे डफ तुणतुणे. रात्री उशिरापर्यंत लोकांची ये जा सुरू होती.
सकाळी लवकरच जाग आली. पुन्हा स्ट्रेचिंग मग इतर आवराआवर चहा नाश्ता करून निघालो. परतीला राजनाळेची वाट सर्वानुमते उतरायचे ठरले. याच वाटेने राजनाळ चढून बैल घाट पुढे साधले घाट असा ट्रेक मी फेब २०१७ मध्ये केला होता. असो तर...
सकाळी मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात खूपच प्रसन्न वाटत होते. सकाळचे कोवळे ऊन, मंद गतीने वाहणारा गार वारा. आता पर्यंत कोकणकड्यावर तीन वेळा मुक्काम केला पण मंदिर परिसरात खुद्द मंदिराच्या मागच्या गुहेत, वरच्या भागात असणाऱ्या गणेश गुहेत मुक्कामाची मजाच वेगळी. IMG_20181028_080814_HDR (1).jpg
मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाजूच्या टाक्यातील थंडगार पाणी मनसोक्त पिऊन सोबतचा साठा पूर्ण भरून घेतला. बाकी मंदिर, शिलालेख, गणेश गुहा, केदारेश्वर, पुष्करणी, तारामती, डोंबाची घुमटी, विश्वामित्र, चांगदेव इतर अनेक गोष्टी तसेच या गडाबद्दल भरपूर माहिती पुस्तकात तसेच आंतरजालावर उपलब्ध आहे.
साडेआठच्या सुमारास मंदिर परिसरातून निघून टोलार खिंडीच्या वाटेला लागलो डावीकडे मोठी वाट पाचनईच्या दिशेने जाते. बरोब्बर पंधरा मिनिटे टोलारच्या वाटेने गेल्यावर एक झोपडी लागते लव्हाळीचा एक माणूस इथे चहा लिंबू सरबत विकायला बसतो. सांगायचं मुद्दा हा की या झोपडी जवळून दोन वाटा फुटतात डावीकडची टोलार खिंडीची प्रचलित वाट तर उजवीकडची वाट राजनाळ उर्फ जुन्नर दरवाजाने खिरेश्र्वर उतरते. हाच आमचा आजचा रूट असल्याने आम्ही उजवी मारली. वळसा घेत पुढे झाडीत शिरून वाट चढणीला लागली. वरच्या टप्प्यात आल्यावर डावीकडे दूरवर मुळा खोरं थेट वायव्येला नाफ्ता मागे आजोबा, करोंडा, कात्राबाई, मुडा, गवळदेव, घनचक्कर, भैरवगड ही सारी रांग तर या मागे अधून मधून डोळे बारीक केल्यावर दिसणारे कुलंग, कळसूबाई तसेच पट्टा सुध्दा ओळखता आला. चढ संपवून वाट मोकळ्या मैदानात आली समोरच बालेकिल्ला त्याच्या पायथ्याशी काही गावकरी कुठल्यातरी कामात व्यस्त होते.
मनात विचार आला एवढ्या लवकर खिरेश्र्वर उतरून करणार काय ? वेळ आहे तर इतक्या जवळ आलो आहोत तर बालेकिल्ला सहज करता येईल. सोबतच्या सहकाऱ्यांना हे सांगितले भरपूर विनवण्या केल्या पण कुणी तयार होईना. शेवटी डावीकडची बालेकिल्ला जाणारी वाट सोडून उजव्या हाताला वळून तसेच पुढे निघालो. अगदी छोटासा चढ चढून बालेकिल्ला आणि तारामती शिखर या मध्ये आलो. दक्षिणेला पूर्ण माळशेज ते काळू नदीचं खोरं. आज आमचं नशीब जोरात, हवा खूपच स्वच्छ असल्यामुळे त्या प्रसन्न वातावरणात खूपच छान नजारा मिळाला.
IMG_20181028_092238_HDR.jpg
आग्नेय दिशेला हाटकेश्र्वर पासून हडसर निमगिरी तर समोरचा सिंदोळा, उधळ्या, गुण्या, भोजगिरी ते पार नैऋत्येला देव दांड्या, नाणेघाट, भैरवगड ढाकोबा, गोरख मच्छिंद्र पर्यंतचा मुलुख. खरच कॅमेराला मर्यादा हे सारं डोळ्यात साठवावे. डावीकडे वळून किंचितसा अरुंद असा ट्रेव्हर्स तो सावकाश पार करून वाट खालच्या भागात आली. आता मागे उजवीकडे तारामती शिखर तर डाव्या हाताला बालेकिल्ला.
IMG_20181028_092113_HDR.jpg
या ठिकाणी भरपूर फोटो काढले. आणखी एक टप्पा उतरत वाट मैदानात आली काही अंतर गेल्यावर पाण्याचे टाके. पाणी बऱ्यापैकी स्वच्छ थोड पिऊन तेच गार पाणी तोंडावर मारून निघालो समोर एक धार उजवीकडे उतरत होती त्याच धारेवर हरिश्चंद्र गडाचे नेढे जे खिरेश्र्वरहून चढताना व्यवस्थित दिसते. हिच ती राजनाळेची सुरुवात. काही ठिकाणी कोरीव पायऱ्या आहेत.
IMG_20181028_095712_HDR.jpg
पण अरुंद अशा नाळेत काही टप्पे सावकाश उतरावे लागले. कधीकाळी हा राजमार्ग होता पण काळानुसार बरीच पडझड होत सद्या मात्र बिकट परिस्थिती आहे. थोड खाली उतरल्यावर डावीकडे कातळात शिवलिंग कोरलेले पुढे कड्यात काही पायऱ्या.
IMG_20181028_100918_HDR_0.jpg
आणखी खालच्या टप्प्यात उजवीकडे कातळात कोरलेले पाण्याचे कोरडे टाके हे सहजी नजरेत येत नाही. एक पॅच चढून वर जात सतीशने फोटो घेतला. नाळ आता बऱ्यापैकी रुंद झाली वाटेत एका लहान उंबराच्या झाडाच्या सावलीत थांबलो, इथून एक वाट डावीकडे कड्याला चिकटून कारवीतून आडवी जात होती. थोड चाचपडायला झाले पुढे जाऊन पाहून आलो वाट अस्पष्ट होत होती. काही मंडळी तशीच नाळेतून हाकेच्या अंतरावर पुढे होती. बरोब्बर या झाडापासून अंदाजे दहा मिनिटे उतरलो असू तेव्हा स्पष्ट अशी वाट डावीकडे झाडीत शिरली. नाळेतून बाहेर येत त्या वाटेला लागलो मागे तारामती त्या पलीकडे रोहिदास तर दूरवर नाणेघाट आणि भैरवगड. तसेच खाली खिरेश्र्वर, पिंपळगाव जोगा धरण. झाडी भरली आडवी वाट पार केल्यावर कळशा डोंगर आणि त्याची खिरेश्र्वर दिशेने उतरत गेलेली सोंड.
IMG_20181028_111347_HDR.jpg
त्या कळशा डोंगराला जोडणाऱ्या धारेवरचा मधला गवताळ घसरडा टप्पा सावकाश पार करून खिंडीत आलो. इथून डोंगराला उजवीकडे ठेवत झाडी भरल्या वाटेने उतराई करत सपाटीवर आलो. वाटेत एक छानसा ओढा लागला, मी सुनील व आका अंघोळीसाठी थांबलो. इथेच लक्षात आलं की रोमा कुठे दिसत नाहीये. त्याला शोधायला बाकी मंडळी पुढे गेली. गावात गेल्यावर कळलं की रोमा खाली उतरल्यावर कुठली तरी ढोरवाट पकडून आमच्या आधी गावात पोहचला. नंतर समजले की या आधी पण त्याने असे केले आहे काय करणार KCBC ग्रुप. असो.. खिरेश्र्वरात दुपारचे जेवण करून निघालो. एका भल्या जीपवाल्याने लगेच पारगाव फाट्या पर्यंत सोडले उतरत नाही तितक्यात पंढरपूर कल्याण एसटी मिळाली. कधी नव्हे तर रविवारी सायंकाळी कुठेही ट्रॅफिक मध्ये न अडकता सहा वाजता कल्याण स्थानकात उतरलो. एक दमदार ट्रेक पोतडीत जमा करून.

अवांतर : नळीची वाट ही काही पुरातन घाट वाट नाही. जुनी ट्रेकर मंडळी त्यांचे या वाटेचे किस्से, काहींचे चुकणे किंवा फसलेले नियोजन मग मदतीसाठी स्थानिकांनी रात्री अपरात्री केलेली मदत. अजूनही तग धरून असलेली दुर्गमता गडाचे एका वेगळ्या कोनातून होणारं दर्शन, धडकी भरवणारा कोकणकडा त्याच्या घळी हे सारं या वाटेच्या लोकप्रियतेचे किंबहुना आकर्षणाचे मुख्य कारण.
हा काही खूप फार असा अवघड ट्रेक मुळीच नाही. पण तरीही दीर्घ चढाई आणि कस पाहणाऱ्या या वाटेला जाताना अनुभव, तुमची शारीरिक मानसिक क्षमता या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. चांगली दणकट टीम, अनुभवी सहकारी, पुरेसे सुरक्षा साहित्य तसेच वेळेचे नियोजन फार गरजेचे.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/11/nalichi-vaat-rajnaal.html

योगेश चंद्रकांत आहिरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! मस्त झाला ट्रेक. फोटोही सुरेख आलेत अगदी.
रच्याकने, यो रॉक्सने म्हणे गरुडासारखी घरटी बांधलीत सह्याद्रीत ठिकठिकाणी आणि तिकडेच राहतो म्हणे. Happy

व्वा! योगेश तुम्ही आणी तुमचे मित्र ग्रेट आहात. अतीशय अवघड वाटा, कडे -कपारे तुम्ही लोक लिलया पार करता. खूप कौतुक वाटते. फोटो अतीशय छान आहेत. देव करो नी पुढला जन्म मला ट्रेकरचा मिळो.

छान वर्णन आणि फोटो.
राजनाळ, नळीची वाट हे कुठेही लिहिले तरी वाचतोच. दुसरं काय करणार? गणेश गुहेत मुक्काम. झोपडीतला भास्करकडे खवा मिळतो का?

धन्यवाद हर्पेन व प्रविण ... कोकण कडा आणि नळी ची वाट.... प्रत्येक ट्रेकर च स्वप्न असतेच >>> सहमत

विडिओ पाहिला. नळीची वाट खरंच अवघड आहे॥
>>>दिड एक तासाच्या विश्रांतीमुळे चांगलेच रिफ्रेश झालो. इथून आता समोर असलेले झाडी भरलेलं हे शेवटचे टेपाड मग आलाच कोकणकडा. निघतो तोच कमळू परत येताना दिसला. आधीच्या ग्रुपला वर सोडून आता एकटाच घरी परत या नळीच्या वाटेने जात होता. घड्याळात पाहिलं तर साडेतीन होत आले होते, खरंच मानलं बुवा. हे खरे सह्याद्रीतील शेर्पा.>>
हे गाववाले एकटेच दोर न लावता उतरतात?
!!
राजनाळ चढायला सोपी आहे का?

इन्द्रा, विडिओ भारीच पुर्ण ट्रेक कव्हर झाला की. size कमी करताना quality मात्र गेली >>> फारस काही वाटत नाही. माझेही फोटो मोबाइल नेच काढलेले आहेत.

SRD ....
हे गाववाले एकटेच दोर न लावता उतरतात?
!! >> होय अगदी सहज दर आठवडे येजा सुरू असते.

राजनाळ चढायला सोपी आहे का? >>> नियमित ट्रेकरसाठी मुळीच अवघड नाही.

मस्त वर्णन आणि झकास फोटो.
मी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये जाऊन आलो.
हे असले फोटो आधी पाहिले असते तर मी कधीच गेलो नसतो.

धन्यवाद गुगु..
हे असले फोटो आधी पाहिले असते तर मी कधीच गेलो नसतो. >>> खरंय फोटोत जास्तच भयावह वाटतं पण प्रत्यक्षात फार अवघड नाही.