बॅन्केतील मनस्ताप - ह्यावर उपाय काय?

Submitted by मेधावि on 1 March, 2019 - 21:02

स्थळ- स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, D.P. Road, कोथरूड, पुणे, आशिष गार्डनच्या जवळ.

एक आजोबा बॅन्केत शिरतात (वय पंचाऐंशी) त्यांना त्यांच्या पत्नीच्या नावे काही रक्कम SCSS (senior citizen savings scheme) मधे गुंतवायची आहे. SCSS म्हटल्यावर काऊंटरवरील बॅन्क कर्मचारी त्यांना सांगते की आपण आधी आमच्या ब्रान्च मॅनेजरशी बोला. मग ते शेजारीच असलेल्या ब्रान्च मॅनेजरच्या केबिन मधे जातात. ब्रान्च मॅ. त्यांना सांगतो की ह्या SCSS पेक्षा चांगली गुंतवणुकीची योजना मी तुम्हाला सांगतो व त्यामधे तुम्ही पैसे गुंतवा. तो लगेच तिथल्या तिथं केबिनमधे कसलासा म्युच्युअल फंड्सचा फाॅर्म मागवतो व भराभरा स्वतःच तो फाॅर्म भरायलाही लागतो. आजोबांच्या हालचाली वयानुसार ब-याच संथ झाल्या आहेत. रिअॅक्शनला जरा जास्त वेळ लागतोय. जरा वेळानं ते सांगतात, मला जो चेक तुम्हाला द्यावा लागेल त्यावर माझ्या बायकोची सही लागेल आणि त्यासाठी मला घरी जावं लागेल. त्यामुळे मला फाॅर्म द्या, मी तो वाचतो आणि उद्या येतो.
ब्रान्च मॅ. - कशाला? आमचा माणूस देतो ना मदतीला. तो तुमच्याबरोबर घरी येईल आणि सर्व मदत करेल.
आजोबा - नको नको. मीच सर्व गोष्टी बघून घेईन व उद्या परत येईन. ( आजोबांना विचार केल्याशिवाय पैसे गुंतवायचे नाहीयेत.)

आजोबा घरी जातात व माहीती मिळवतात. (आजोबा COEP passed out इंजिनीअर आणि निवृत्त शासकीय अधिकारी आहेत)

दुस-या दिवशी आजोबा ब्रान्च मॅनेजरला सांगतात की मी चौकशी केली, मला "आत्ता" म्युच्युअल फंड्सचा पर्याय योग्य वाटत नाही म्हणून मी आधी ठरवल्याप्रमाणे SCSS मधेच गुंतवणूक करायचं ठरवलं आहे त्यामुळे मला scss चा फाॅर्म द्यायला सांगा.

इथं मॅनेजरचा मूडच पालटतो. आजोबांकडे दुर्लक्ष करून, दुस-या एका कस्टमरशी गप्पा, तो नको म्हणत असतानाही आग्रह कर-करून त्याला पासबुक प्रिंट करून देणे, एका आलेल्या फोनवर बराच वेळ टाईमपास गप्पा, अजून एका कर्मचा-याशी गप्पाटप्पा. आजोबा शांतपणे तिथंच बसले आहेत.
ब-याच वेळानंतर....

आजोबा - माझ्या scss investment साठी मला फाॅर्म द्यायला सांगाल का?
B. M. - तुम्ही ह्यापूर्वी एकदा ह्यात इनव्हेस्ट केले आहेत. एकदाच करता येतात.
आजोबा - ह्यापूर्वी बॅन्केनेच मला दोनवेळा इन्व्हेस्ट करून दिले आहेत. एकदाच करायचे असा काही नियम नाही.
B. M. - तुम्हाला दोन वेळा भरून दिले असेल तर ती आमची चूक झाली.
आजोबा - मग मला नियम दाखवा नाहीतर फाॅर्म द्या.
परत टाईमपास सुरु.....

आजोबा - हे बघा, मला समजतंय की मी mutual funds मधे पैसे गुंतवत नाहीये आणि तुम्हाला त्या गुंतवणुकीचं टारगेट असणार म्हणून तुम्ही माझा मुद्दाम छळ करत आहात. मी वर तक्रार करीन.

इथं ग्राहकाकडे एक तुच्छ कटाक्ष व पुन्हा टाईमपास चालू.

आजोबा- मला फाॅर्म द्या.
B. M - (अती उद्धटपणे) तुम्ही बाहेर बसा.
शिपायाला फाॅर्म द्यायला सांगतो.

काऊंटरवरच्या इतर कर्मचा-यांना झाला प्रकार समजलेला आहे. बाहेर आल्यावर ते आजोबांना मदत करतात. फाॅर्मचे सोपस्कार पार पडतात.

दोन दिवसांनी चेक जमा झाला का बघायला आजोबा परत बॅन्केत जातात तर चेक return आलेला असतो आणि त्यासाठी SBI नं त्यांना दंड केलेला असतो. आताशा सही करताना आजोबांचे हात थरथरतात म्हणून सही चुकली की काय अशी भिती वाटते. मग ते गावातलया महाराष्ट्र बॅन्केत तिसर्या मजल्यावरील कक्षात जाऊन चौकशी करतात. तिथं समजतं की SBI नं चुकीचा नंबर कळवल्यामुळे चेक परत आलाय. अहंकार दुखावलेल्या ब्रांच मॅनेजरनं असा वचपा काढलेला असतो.

आजोबा BOM कडून sbi ची चूक आहे असं लेखी पत्र घेऊन येतात व SBI ला देतात. दंड माफ करायला लावतात.
पंचाऐंशीव्या वर्षी 3 SBI च्या आणि एक BOM च्या हेलपाट्यांनंतर फायनली एक गुंतवणूक पार पडते.
ग्राहक देवो भव:

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाईट वाटलं. आणि राग आला.
तक्रार करा. दखल घेतात. मी एकदा चिडून विड्रॉल स्लिप च्या मागे तक्रार लिहून त्या तक्रार पेटीत टाकलेली तर आठवडयात फोन आलेला. अर्थातच स्टेट बँक मुंबई. दखल घेतली नाही तर कन्झ्युमर कोर्टात अर्ज करा. तिकडे ही स्वतःच स्वतः रिप्रेझेंट करता येतं.
या वयात त्यांना जड जाईल पण सोयीचं असेल तर त्या बँकेतले सगळे पैसे काढून प्रायव्हेट बँकेत ठेवा.

झाला प्रकार उद्वेगजन्य आहे.सुशिक्षित लोकांची ही तर्‍हा तर अशिक्षित/अल्पशिक्षित लोकांना काय वागणूक मिळत असेल?

U/ajoba can write to the RBI top and SBI top.>> म्हणजे नक्की कुठे हेच शोधते आहे.

त्या त्या बॅँकेत एक फलक असतो,त्यावर विविध कार्यालयीन पातळ्यांवरील अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक दिलेले असतात, एका पातळीवर तक्रार निवारण झालं नाही, तर पुढच्या पातळीवर तक्रार करायची अशी सूचना असेल.
किंवा बॅँकेच्या वेबसाइटवर कस्टमर केअर असेल, त्यांना लिहा .

वाईट प्रकार.
बँकेत कॅश काढण्यापलीकडे जात नाही. तेही १००/१० च्या नोटा हव्या असतात म्हणून. पण प्रत्येक वेळी म्यु च्युअल फंडची स्कीम , बहुतेक एन एफ ओ किंवा एखादी युलिप गळ्यात घालायला बघतात. मला वेळ असला तर मी या दोन्ही मध्ये गुंतवणूक करणं कसं चुकीचं आहे आणि त्यांनी सांगितलेली माहिती कशी चुकीची आहे इ. सांगून येतो.

त्यांना टारगेट्स असतात, हे माहीत आहे. आजोबांनी न चिडता , शांतपणे हे हँडल केलेलं दिसतंय.
बँक मॅनेजरकडेच लेखी तक्रार सीसी टु तक्रा र निवारण् कक्ष पोस्टाने पाठवा.

वाईट वाटले . आजोबांना उगाच हेलपाटे पडले

स्टेट बँक अश्या अनुभवासाठी फारच प्रसिद्ध दिसतेय .
माझ्या इथल्या ब्रँचच्या क्लार्क लोकांकडे withdrawal स्लिप मागायची पण भीती वाटते .
उपकार केल्यासारखे टेकवतात .

बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, एसबीआय इत्यादी हा माझा प्रांत नाहीच. पण एकदोनदा नाईलाजाने जावे लागले होते तेंव्हाचा माझा पण अनुभव चांगला नाही. ग्राहक आला कि "हा आणि कशाला इथे आलाय?" अशा नजरेने बघतात. या घटनेत सिनियर सिटीझन आहेत म्हणून वाईट वाटले आणि रागसुद्धा आला. अन्यथा या लोकांचे असले अनुभव फार मनावर न घेतलेले बरे. इथे एक ऑनलाईन तक्रार अर्ज उपलब्ध आहे तो भरून काय उपयोग होतो का पहा:

https://www.sbi.co.in/portal/web/customer-care/complaints-feedback-appre...

>> काही रक्कम SCSS (senior citizen savings scheme) मधे गुंतवायची आहे.

ओके. पण हि गुंतवणूक ऑनलाईन करण्याची त्यांची सुविधा नाही का? माझे एका खाजगी बँकेत खाते आहे तिथे मला कधीच जावे लागत नाही. सर्वकाही ऑनलाईन करून ठेवले आहे. एफडी गुंतवणूक वगैरे. एसबीआय चा SCSS चा फॉर्म तरी दिसत आहे ऑनलाईन. पण यात सुद्धा गमतीजमती करतात हे लोक. फारा वर्षांपूर्वी एकदा मी BoI मध्ये त्यांच्या वेबसाईटवर मिळालेला फॉर्म भरून त्यावर फोटो सह्या वगैरे सगळे सोपस्कार करून घेऊन बँकेच्या शाखेत गेलो होतो. मला वाटले बस्स आता म्यानेजर खुश होऊन एक मिनिटात मला रिकामा करेल. पण कसचे काय. कपाळाला आठ्या घालून एकदा माझ्याकडे आणि एकदा फॉर्मकडे आणि पुन्हा फॉर्म मध्ये बघत साहेब म्हणाले,

"कुठनं घेऊन आलाय हे?"

मला क्षणभर मी खोटी कागदपत्रे घेऊन आलेला भामटा वगैरे आहे आणि त्यांनी मला रंगेहात पकडले आहे असे वाटून गेले.

मी म्हणालो, "अहो तुमच्याच वेबसाईटवरून डाऊनलोड केलाय"

च्याक असा तोंडाने आवाज काढत तो इतका नीटनेटका जपून भरलेला फॉर्म माझ्याकडे त्यांनी जवळजवळ फेकलाच आणि आपल्या जवळचा एक कोरा फॉर्म काढून माझ्यापुढे फडकवत म्हणाले, "तो आउटडेटेड आहे. डाऊनलोड वगैरे कोणी करत नाही. हा घ्या हा भरून आणा"

मी कपाळावर हात मारून घेतला.

जवळच्या पोलिस चौकीत तक्रार करा. ज्येष्ठ नागरिकाची हॅरेसमेंट करणे हा गंभीर अपराध आहे. या तक्रारींची त्वरीत दखल घेण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना आहेत. तक्रारदार COEP passed out इंजिनीअर आणि वरीष्ठ निवृत्त अधिकारी आहेत तेव्हा त्यांनी एखाद्या पोलिस निरीक्षक / उप निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याला याविषयी सांगितले तरी ते त्या चुकार बँक मॅनेजरला असा दम भरतील की पुन्हा कुणाच्या गळ्यात म्युच्यूअल फंड स्कीम मारायची त्याची हिंमत होणार नाही.

ऑनलाईन गुंतवणूक हा पर्याय असतो पण बँक ना मालदार पार्टी नी त्यांच्या कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर ला संपर्क करून त्यांनी सांगितलेली गुंतवणूक केलेली जास्त पसंत असते.
मला परवा माझी नेमून दिलेली कस्टमर रिलेशनशिप ढमी फोनवर सांगत होती की टॅक्स सेव्हर fd मी घरी येऊन करून देते, ऑनलाईन करू नका, ऑनलाईन केल्यास रिसीट मिळणार नाही ☺️☺️☺️
मी गेली अनेक वर्षं ऑनलाईन करूनच त्या रिसीट pdf डाउनलोड करून ऑफिस ला दाखवतेय.

वाईट अनुभव. निदान वयाचा तरी विचार करायचा, निर्लज्जपणा आहे हा.

ऑनलाईन केल्यास रिसीट मिळणार नाही>>> तिला म्हणायचं बाप रे! नको असली बँक, धन्यवाद तू प्रामाणिकपणे सांगते आहेस असले धंदे स्वतःच्या बँकेचे. मी दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करते पैसे आणि काढते ऑनलाईन FD.

१) एक समंजस फंड म्यानेजर गाठावा आणि इन्वेस्टमेंट करावी. सध्या आठ -साडेआठ टक्के सेफ इन्टरेस्ट आहे. तो मनुष्य वेळोवेळी फॅार्मस भरणे, १५एच इत्यादि करेल.
२) वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करेल.
३) वयस्करांनी स्वत: काही धडपड करू नये., सल्लाही घेऊ नये.

Banking Ombudsmen कडे तक्रार करा..
अशी तक्रार करताय हे जरी कळलं तरी सौजन्य दिसू लागेल..
त्याबद्दल ऑनलाईन भरपूर माहिती आहे.. बॅकेतून पण मिळू शकते.. त्याबद्दल बॅकेच्या शाखेत बोर्ड असतील..

ऑनलाईनची धास्ती वाटते त्यांना.>>>>>> त्यांच्या वायाचा विचार करता बरोबर आहे.तसेच वर तक्रार करण्यासंबंधी लिहिले आहे.त्याबद्दल परत वय हा मोठा फॅक्टर आहे.या वयात अकारण वाद नको वाटतात किंवा ते दोघेच रहात असतील तर थोडीफार भिती असू शकते.त्यामुळे हा एक वाईट अनुभव होता म्हणावं आणि पुढे चलावं असं मला वाटते.

आजच्या मटामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवेसंदर्भात रिझर्व्ह बँकेची खालील जाहिरात आलेली आहे.
तिथे दिलेल्या मेल / फोन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवून पाहा

New Doc 2019-03-02 12.09.19_1.jpg

बँकेतल्या बाकीच्यांनी मदत केली म्हणजे हा दीड शाहाणा आहे हे बाकीच्यांना माहित आहे. त्याची इज्ज्जत गेलीच आहे.
वाईट अनुभव म्हणून सोडून द्या. स्वभावाला औषध नाही.
आजोबांचे कौतुक आहे, खूप छान हाताळली परीस्थिती Happy

जेष्ठ नागरीक असलेल्या व्यक्तीस त्रास देणे तसेच आर्थिक व्यवहारात अधिकाराचा गैरवापर करुन चुकीच्या पद्धतीचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणे यासाठी पोलीसांकडे तक्रार करा. त्याची एक कॉपी आणि लेखी तक्रार असे रिझर्व बँकेला आणि संबंधीत बॅकेच्या तक्रार खात्यात द्या. जोडीला लोकसत्तेसारख्या वृत्तपत्रालाही झाल्या प्रकाराची माहीती द्या. जे काही झाले ते अतिशय अनएथिकल आहे. त्यांना टार्गेट असले तरी असे चुकीचे गुंतवणूकीचे पर्याय गळ्यात मारण्याचा प्रयत्न करणे आणि तो साध्य झाला नाही म्हणून अडवणूक करणे हे गैर आहे. ही अशी कीड 'जाऊ दे' म्हणून अजिबात पोसू नये. हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच! तेव्हा तक्रार करावीच.

मी स्वतः बँकेत आहे ....आम्हाला टारगेट जरूर असतात पण जोपर्यंत ग्राहकाला पटत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही scheme त्यांना करायला लावत नाही ....,ज्येष्ठ नागरिकांना rbi ने खास सुविधा दिली आहे ........मागे एकदा एक अशिक्षित बाई आलेली जिने दुबई ला maid म्हणून नोकरी केली होती म्हणून तिच्याकडे पैसे होते ....एका ऑफिसर ने तिला mutual फंड ची scheme सांगितली ब्रँच मॅनेजर कडे गेले दोघे ....मॅनेजर ला कळलं की हिला काहीही समजत नाहीये की आपण नक्की कशात गुंतवतो आहोत आमच्या सरांनी तिला चक्क नाही सांगितलं आणि नंतर त्या ऑफिसर ला समजावलं की आपण अश्या पद्धतीने नाही करायचंय टार्गेट .....Ethical banking नाम की कोई चीज होती है ....असा बोलले शेवटी ..
बँकेने नाहक त्रास दिला असेल तर अश्या वेळेला तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता ....आताशा इ मेल ने लगेच जाब विचारला जातो ...

#ServeSeniors किंवा तत्सम काही हॅशटॅग करून रिझर्व्ह बँक व स्टेटबँकेला ट्वीट करणे हा ही एक पर्याय आहे. सूपनाझी सारखा हा मॅनेजर फॉर्मनाझी दिसतो. ट्विटर्/फेसबुक वरच्या तक्रारींची दखल घेतली जाते.
(फारच मुन्नाभाई संचारला असेल तर रोज मॅनेजरला एक बाकरवडी भेट पाठवणे हा ही एक पर्याय आहे. Wink )

मी भारतात दोनदाच बँकेत गेलो होतो, ट्रॅवलर्स चेक कॅश करायला, खरे तर बँकेत एसी मधे एक दोन तास बसायला मिळेल म्हणून. पण माझी कामे अत्यंत घाईघाईने करून दिली. एकदा तर पासपोर्ट न्यायला विसरलो तरी. उद्या परवा येऊन दाखवून जा म्हणाले. एकदा चहा दिला नि एकदा पेढा! मीच कर्मदळीद्री - मधुमेहामुळे सा़खर घातलेला चहा नि पेढा नाकारावा लागला.
पण एकदा खाते उघडायला गेलो तर प्रथम पुण्यात बसून तो बँकेचा मॅनेजर मला म्हणतो, आप हिंदीमे बोलीये. मराठी भाषा दिन नव्हता तरी मी अस्सल मराठीत तुझ्या नानाची टांग असे सांगून दुसर्‍या बँकेत गेलो. तिथे एक महिन्यात खाते उघडून मिळाले, एव्हढा वेळ लागला कारण माझ्याजवळ आधार कार्ड, पॅन कार्ड असले काही नव्हते, नि ते तर लागतेच खाते उघडायला. काहींनी सांगितले लाच द्या, पण मला ते करायला वेळ नव्हता नि नक्की माहितहि नव्हते कसे ते.
भारतात लाच दिली की कामे लवकर होतात हे पूर्वी अनुभवले आहे. त्यात मला काही moral outrage वगैरे होत नाही. पैशाचे व्यवहार - मग लाच भ्रष्टाचार आलेच, जगात कुठेहि जा!

अमेरिकेत लाचेला फी, सरचार्ज अशी गोंडस नावे देतात. पण पैसे आपणच भरतो. राजकारणी लक्षावधी डॉलर्स ची लाच खातात त्याला देणग्या, लॉबीइंग असे म्हणतात. भ्रष्टाचार तर ठरलेलाच, पण त्यालाहि वकील काहीतरी गोंडस नाव देतात. फक्त कामे अतिशय झटपट होतात म्हणून आपण त्रास करून घेत नाही.

तर उगीच काय भारताला नावे ठेवायची? हे चांगले तर ते वाईट. असे सगळीकडेच चालते.

मी एक bank कर्मचारी ,
असे प्रकार सर्रास रोज घडतात , एकमेव कारण - Targets , ह्यातुन खालपासुन अगदी उच्चपदस्थ कमीशन व विदेश यात्रा ह्या करीता हा उपद्व्याप करतात ,
फार कमी लोक ह्या सगळ्याला विरोध करतात , त्याना बाजुला करतात,
CROSS SELLING च्या नावाखाली mis selling सुरु आहे .
वाईट प्रव्रुती , अजुन काय ?

मी सुद्धा बँकेत काम करते पण ऑप्रेशन मध्ये, सो टार्गेट्स वगैरे नाहीयेत. वर लिहिलेला प्रसंग तर जाऊ द्या म्हणून सोडून देण्यासारखा नक्कीच नाही आहे.
तुम्ही रितसर तक्रार कराच, ग्राहक म्हणजे सर्वस्व असते ब्राँच वाल्यांसाठी, जिथे विक्षिप्त माणसाला सुद्धा मानाने वागवतात ते, तिथे इतक्या वयस्कर व्यक्तीला अशी वागणूक देणे लज्जास्पद आहे अन त्याचे परिणाम भोगू द्या त्याला, नाहीतर तो असाच वागत राहील सर्वांशी.
जलद कारवाई हवी असेल तर बँकेचे MD escalation ई-मेल आयडी असेल वेबसाईटवर, तिकडे मेल करा. वर त्यांना लिहा की त्वरित उत्तर आले नाही किंवा त्या ब्राँच मॅनेजर विरुद्ध कारवाई केली नाही तर तुम्ही ते सोशल मीडियावर टाकल ज्याने बँकेची बदनामी होईल.
माझ्यामते इतक्याने देखील ते नक्कीच त्या मॅनेजर विरोधात कारवाई करतील.

थोडेसे अवांतर...

हे mutual फंड जबरदस्तीने विकणे प्रकार अजूनही घडतात वाचुन आश्चर्य वाटले. म्हणजे माझे ब्राँच मधील मित्र असे करताना दिसत नाही. उलट हे easy टार्गेट असते त्यांच्यासाठी. खरी कसोटी तर लाईफ इन्शुरन्स विकताना लागते असे सांगतात☺️

Vb, म्युच्युअल फंड सर्रास विकायला बघतात.
या सर्व भानगडी नको म्हणून ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ला एक फॉर्म भरून द्यावा लागतो.तो बँक मध्येच मिळतो.बँक मध्ये तो घ्यायला गेल्यावर 'तुम्ही आमचा अमका फंड आताच घ्या' म्हणून एक असामी मांजर(मॅनेजर) आणि नंतर एक बाई यांनी आग्रह केला.त्यांना नम्रपणे इथे करायची नाही फक्त ऑनलाईन एनाबल करायचा फॉर्म द्या म्हटल्यावर त्या कागदावर लिहून दिल्या.फॉर्म दिला.
1 वर्ष नीट ऑनलाईन इन्व्हेस्ट केल्यावर नोटबंदी च्या वेळी काहीतरी चमत्कार होऊन ऑनलाईन बंद झाले.माझ्या साठी असाईन केलेल्या ढम्या ला सांगितलं तर तो तुमच्या कडे ऑनलाईन कधीच नव्हतं, सर्व प्रोसेस परत करा म्हणाला.
त्यांना हुरर म्हणून कॅम्स ऑनलाईन वरून घेणे चालू केले.
ते अजूनही सुरळीत चालू आहे.कधीकधी प्रत्येक कंपनी च्या साईट वरून जाऊनही खरेदी करते. आमच्या लंच ग्रुप च्या शिऱ्या च्या मते असे केल्यास स्वस्त पडते.

Pages