"लोकमान्य"ता - मोरपिसारा -२

Submitted by प्राचीन on 25 February, 2019 - 12:47

लोकमान्यता
काही व्यक्तींचा परिचय,सहवास नि स्मृति ह्या आपल्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव उत्पन्न करतात, तर काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांच्या जीवनचरित्राबद्दल इतरांकडून ऐकले तरी तुमचं कुतूहल जागृत होतं नि तुम्ही त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायला उत्सुक बनता ! एका व्याख्यानात मी ऐकलेलं एक वाक्य – लोकमान्य टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत होते.. पुढे कान अगदी आपलेपणाने ऐकते झाले.. महर्षि अण्णासाहेब पटवर्धन ! त्यानंतर काहीसा तपशीलात पुढील मुद्धा आला व नंतर व्याख्यान संपले. पण मला मात्र कोण हे अण्णासाहेब ? या विचाराने बेचैनी आली. आधीच लोकमान्य टिळकांबद्दल अपरंपार आदर नि अशा आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला जे पूजनीय होते, ते अण्णासाहेब कसे असतील?
दरम्यान वाचन, श्रवण इ. उपक्रमांतून अधिक गोष्टी कळत गेल्या आणि एका प्रखर तेजस्वी विभूतीचा परिचय घडला.
त्यांचे संपूर्ण नाव विनायक रामचंद्र पटवर्धन ; जन्म ४ मे १८४७.अशा लोकोत्तर व्यक्तीचा, माझ्या जुजबी अभ्यासातून घडलेला परिचय येथे म.भा.दिवस (२०१९)च्या निमित्ताने शब्दबद्ध करीत आहे.
तत्कालीन वहिवाटीप्रमाणे शालेय शिक्षणानंतर वकिलीच्या परीक्षेसाठी ते सन १८६७ मध्ये मुंबईस आले. गोकुळदास चाळीतील त्यांच्या बारा वर्षांच्या वास्तव्यात अनेक कार्यकर्ते (काहीजण १८५७च्या संघर्षाशी संबंधित असून वेगळ्या नावांनी मुंबईत मुक्काम असे) व व्यापारी इ. विविध सामाजिक स्तरांतील लोकांशी संबंध आला. मुळात असलेली तीक्ष्ण नजर व अफाट स्मरणशक्ती, त्याशिवाय आवश्यक असा जिव्हाळा व सावधानता यांच्या आधारे अण्णासाहेबांनी मोठाच लोकसंग्रह केलेला होता. अनेकांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरित केले. फारसी, रशियन, लॅटिन अशा परदेशी व कानडी,तमिळ अशा देशी भाषांचे जुजबी ज्ञान त्यांना होते, त्याचाही उपयोग कसा झाला, त्याबाबतची ही आठवण. एकदा रशियन राजपुत्र मुंबईभेटीस आला होता. तेव्हा अण्णासाहेबांस बोलावणे आले, ते त्याच्यासह (नेटिवांचा प्रतिनिधी म्हणून) संवाद साधण्यासाठी. हे तिथे तर गेलेच नि लष्करी जहाज कसे असते हे पाहण्यासाठी मुद्दाम जहाजावर जाऊन माहिती करून घेतली.
विद्यार्थिदशेत असताना अण्णासाहेब निव्वळ करमणुकीसाठी जाड दोरखंड नुसत्या हिसक्याने तोडणे, दोन हातांत दोन व दातांत एक अशा भरलेल्या घागरी उचलून दाखवणे इ. अचाट गोष्टी करून दाखवत असत. त्यामुळे सोबतीही त्यांना वचकून असत. याचं प्रत्यंतर एकदा असं आलं – ग्वाल्हेरचे दिवाण दिनकरराव राजवाडे एकदा मुंबईंस मुक्कामाला होते. त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अण्णासाहेब त्यांच्या भेटीस गेले, तेही एखाद्या तालीमबाजाप्रमाणे हाती सोटा घेऊन ! एवढ्यावर भागले नाही,तर त्यांना त्यांच्या एका राष्ट्रीय अपराधाची जाणीव करून दिली (१८५७च्या वेळी इंग्रजांच्या बाजूने राहणे व ग्वाल्हेरचे राजे जयाजीराव शिंद्यास इंग्रजांच्या हकेलेृकरणे) दिवाणांनीदेखील तशी कबुली दिली, तेव्हा, यानंतरच्या काळात प्रसंगवशात राष्ट्रनिष्ठा व्यक्त करावी, असे सूचक बोलणे करून स्वारी परतली.
एल्.एल्.बी. चा अभ्यास सुरू असताना अण्णासाहेब काही कारणाने मेडिकल चा देखील अभ्यास करू लागले. या दरम्यान त्यांच्या एका प्राध्यापकाने, एडिनबर्गच्या विद्यार्थ्यांनी चालवलेले वैद्यकीय अंक दाखवून, एतद्देशीयांना कधीतरी असे जमेल का, अशी टिपण्णी केली. या अवहेलनेस अण्णासाहेबांनी कृतीने उत्तर देण्याचे निश्चित केले. तो दिवस होता ४ मार्च १८७४. बरोब्बर एका महिन्याने त्यांनी स्वत: वैद्यकीय अंक काढला व त्या प्राध्यापकांस दाखवला. अर्थात त्यामध्ये जाहिराती नव्हत्या. कारण अण्णासाहेब एका इंग्रज कंपनीकडे जाहिरातींकरिता गेले असता, त्या गोर्‍या अधिकार्‍याने काळा माणूस म्हणून त्यांची उपेक्षा केली. गंमतीचा भाग म्हणजे ४ महिन्यांनी असा योग आला की अण्णासाहेबांच्या ग्रँट मेडिकल जर्नल या अंकाचा खप एवढा वाढला, की हाच गोरा मनुष्य जाहिरात घ्यावी, याकरिता अण्णासाहेबांच्या कडे विनंती करू लागला.
याखेरीज इंदुप्रकाश या वृत्तपत्रातही अण्णासाहेब लेखन करीत.
वकिली व वैद्यकी या दोन्ही क्षेत्रांमध्ये पदवी मिळण्याएवढे शिक्षण पूर्ण झाले खरे, परंतु तत्कालीन नियमांप्रमाणे एकच पदवी घेणे क्रमप्राप्त होते. तीव्र बुद्धी व दोन्ही विषयांत गती असूनही, असा पेच निर्माण झाला तेव्हा अण्णासाहेबांनी बाबावाक्यं प्रमाणम् असं जे आपण विनोदाने म्हणतो, तोच मार्ग स्वीकारला. म्हणजे वडिलांचे मत शिरोधार्य मानले : ब्राह्मणाने वैद्यकीवर पैसा मिळवू नये. त्यापेक्षा वकिली कर.
आणि आजन्म एखाद्या व्रताप्रमाणे रुग्णाकडून पैसा वा काहीही वस्तू न घेता त्यांनी कार्य केले आणि चरितार्थासाठी वकिलीची कामे केली.
महानगरपालिकेपासून ते सार्वजनिक सभेपर्यंत अण्णासाहेबांच्या मागे अनेक व्याप असत. न्या.रानडे वगैरे मंडळींशी स्नेह असल्यामुळे सुरुवातीच्या काळात विधवा पुनर्विवाह इं चळवळींना त्यांनी मनापासून पाठिंबा दिला. कालांतराने ह्या मवाळ धोरणांच्या मुळाशी न्यूनगंड (जितांना असतो तो) असावा व हे अयोग्य आहे, असे अण्णासाहेबांना वाटू लागले. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक चळवळीशी जोडलेले असूनही त्यांनी कायद्याच्या कामांत सहाय्य करण्यापुरती कार्यमर्यादा स्वीकारली.
पुढे आयुष्यावरील गंडांतर व त्यानंतर आळंदीचे नृसिंह सरस्वती यांच्या मार्गदर्शनामुळे अण्णासाहेबांनी ईश्वरी क्षेत्रात व रुग्णसेवेत जीवन व्यतीत करण्याचे ठरविले. त्यांचे अद्वितीय चिकित्साकौशल्य व परिपाठ यांबद्दल लिहिणे शब्दमर्यादेपलीकडे असल्याने एवढेच नमूद करते की पहाटे सहा ते रात्री एक –दोन वाजेपर्यंत या नि:शुल्क रुग्णसेवेचा उपक्रम चालायचा. याशिवाय प्रापंचिक,राजकीय,सामाजिक अशा विविध बाबतींत सल्ला देणे हादेखील व्याप होताच !
वेगळी पाऊले : टिळकांनी काढलेल्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांची पूर्वाश्रमीची रूपे म्हणजे अण्णासाहेबांनी स्थापन केलेली किरण व डेक्कन स्टार ही होत. तसेच इंग्रजी व आर्य वैद्यकशास्त्रांची तुलनात्मक गुणवत्ता नुसत्या वाचिक अभिनिवेशाने सिद्ध करण्याऐवजी अण्णासाहेबांनी त्यांचे दोन दवाखाने सुरु केले.
राजकारणापासून सेवाव्रताकडे वळल्यानंतरही लोकमान्य, वासुदेव बळवंतांसारख्यांचे प्रेरणास्थान असलेले अण्णासाहेब शेवटपर्यंत चाफेकर बंधूचे तर्पण स्वत: करीत असत, इतका त्यांच्या मनात हुतात्मांबद्दल आदर होता !
आपल्या राष्ट्रीयत्वाचा गाभाच बदलून केलेल्या पाश्चात्त्य सुधारणा नकोत, असे त्यांचे मत असे.
इंग्रजांच्या प्रत्येक सामाजिक धोरणाच्या मुळाशीदेखील आत्मलाभाचे राजकारण असते, त्यामुळे आधी स्वराज्य नि त्या जोडीने सुधारणा कराव्यात, असे प्रतिपादणार्‍या अण्णासाहेबांच्या विचारांचा लोकमान्यांवरदेखील आदरयुक्त प्रभाव असे.
अण्णासाहेबांचा मृत्यू २ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला.
देशसेवा किती अंगांनी करता येऊ शकते, विहित कार्यामध्ये निस्पृहता कशी असावी व आधुनिक विद्या शिकूनही प्राचीन भारतीय विद्येची जपणूक कशी करावी, याचा प्रत्यय अण्णासाहेबांचे जीवनचरित्र अवलोकन केल्यानंतर येतो.
लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञानुमर्हति ।
- स्त्रोत : ब्रह्मर्षि अण्णासाहेब पटवर्धन - लेखक अप्रबुद्ध.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अण्णांसाहेब पटवर्धनाबद्दल काहीही माहिती नव्हती. आपल्या लेखामुळे एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची ओळख घडली

लेखात तपशिलाच्या चुका आहेत.
इंदुप्रकाश हे दैनिक नव्हते. आधी साप्ताहिक होते, नंतर आठवड्यातून दोनदा व नंतर तीनदा प्रकाशित होऊ लागले.

<टिळकांनी काढलेल्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांची पूर्वाश्रमीची रूपे म्हणजे अण्णासाहेबांनी स्थापन केलेली किरण व डेक्कन स्टार ही होत. >

किरण व डेक्कन स्टार ही वेगळी वर्तमानपत्रे नव्हती. पूर्वी एकाच वर्तमानपत्रात मराठी व इंग्रजी मजकूर असे. तशी एकाच वर्तमानपत्राची ही दोन नावे होती. आणि हे वर्तमानपत्र माधवराव नामजोशयांनी सुरू केलं होतं. केसरी व मराठा ही दोन वेगळी वर्तमानपत्रं असावीत ही कल्पना चिपळूनकारांची. सहा भागीदारांनी मिळून केसरी व मराठा सुरू केले, एकट्या टिळकांनी नव्हे. वेगळा परवाना नको म्हणून डेक्कन स्टार ऊर्फ किरण या वर्तमानपत्राचे नाव मराठा झाले. याची भाषा इंग्रजी होती. केसरी स्वतंत्र मराठी वर्तमानपत्र होते. या दोन्हींच्या छपाई3साठी लागणार असलेलं यंत्र डेक्कन स्टारचं होतं. गहाण पडून असलेलं यंत्र आगरकर, टिळक, चिपळूणकर, नामजोशी, बल्लाळ आणि गर्दे यांनी सोडवून आणलं. या प्रेसचं नाव ठेवलं आर्यभूषण.
असो.

लेख चांगला आहे.

अण्णांसाहेब पटवर्धनाबद्दल काहीही माहिती नव्हती. आपल्या लेखामुळे एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची ओळख घडली+१११

अण्णांसाहेब पटवर्धनाबद्दल काहीही माहिती नव्हती. आपल्या लेखामुळे एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची ओळख घडली>> +१

दिनकरराव हे गवाल्हेरचे राजे नसून कारभारी होते. 1886 सालापर्यंत जयाजीराव राजे होते आणि इंग्रजांशी लढावं अशीच त्यांची मनीषा होती.

अण्णांसाहेब पटवर्धनाबद्दल काहीही माहिती नव्हती. आपल्या लेखामुळे एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची ओळख घडली>> +१

चूक आहे ते.
आणि हा मजकूर जिथून घेतला तो संदर्भ लेखनात तुम्ही द्यायला हवा.

योग्य तो बदल केलेला आहे, चिनूक्स. धन्यवाद.
एक विनंती आहे ,आपल्या माहितीचे स्त्रोत कृपया इथे दिलेत , तर माझ्या अभ्यासातही भर पडेल व अण्णासाहेबांबद्दल अधिक जाणून घेता येईल.

हे नाव खूप जणांकडून आदराने घेतले गेलेले लहानपणापासून ऐकत आलो होतो. एक प्रकारची धूसर अशी प्रतिमा होती मनात. कुतूहल होतं !
तपशीलवार परिचय वाचून या व्यक्तिमत्वाचे लख्ख दर्शन झाले..
धन्यवाद.

अण्णांसाहेब पटवर्धनाबद्दल काहीही माहिती नव्हती. आपल्या लेखामुळे एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची ओळख घडली >>> +१