सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !

Submitted by कुमार१ on 3 February, 2019 - 21:03

खनिजांचा खजिना : भाग २

भाग १ : https://www.maayboli.com/node/68939
******************************************************
सर्वांना परिचित असणारे सोडियम(Na) हे मूलद्रव्य शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्गात ते विविध खानिजांत आढळते. त्यापैकी NaCl म्हणजेच मीठ हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज. आपल्या शरीरातही ते काही क्षारांच्या रुपात अस्तित्वात असते आणि जगण्यासाठी मूलभूत स्वरूपाची कामे करते.
सोडियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.

आहारातील स्त्रोत व प्रमाण:

स्वयंपाकाच्या बहुतेक पदार्थांत आपण चवीसाठी मीठ घालतो. त्यामुळे प्रथमदर्शनी असे वाटेल की ‘वरून घातलेले मीठ’ हाच सोडियमचा स्त्रोत आहे. पण तसे नाही. दूध, मांस आणि मासे या नैसर्गिक पदार्थांतही ते आढळते. याव्यतिरिक्त आपण अनेक प्रक्रिया केलेले, साठवलेले आणि खारावलेले पदार्थ मिटक्या मारीत खातो. त्यांत तर सोडियम दणकून असते. ब्रेड, वेफर्स, लोणची, sauces.... यादी तशी संपणारच नाही ! त्यामुळे आधुनिक खाद्यशैलीत आपण सगळेच गरजेपेक्षा जास्तच सोडियम खातो.

रोज नक्की किती सोडियम शरीराला आवश्यक आहे, हा तसा लाखमोलाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तसे सरळ नाही आणि त्याबाबत थोडे मतभेदही आहेत. एका अभ्यासानुसार त्याची रोजची खरी गरज ही जेमेतेम अर्धा ग्रॅम आहे. जगभरातील अनेक वंश आणि खाद्यशैलींचा अभ्यास केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने एक शिफारस केली आहे. त्यानुसार रोजची सोडियमची गरज २ ग्रॅम आहे आणि याचाच अर्थ असा की ५ ग्रॅम मीठ (NaCl) हे पुरेसे आहे. हा जो आकडा आहे त्याला ‘वरची’ पातळी समजायला हरकत नाही. त्यापेक्षा जरा कमीच खाल्ले तर तब्बेतीला ते चांगलेच आहे असा सर्वसाधारण वैद्यकविश्वातला सूर आहे. अतिरिक्त खाल्ले असता आपली तब्बेत बिघडवणाऱ्या “पांढऱ्या विषां”पैकी ते प्रमुख आहे असे प्रतिपादन काही जण करतात.

शरीरातील अस्तित्व आणि कार्य:
शरीरातील ७५% सोडियम हा विविध क्षारांच्या रुपात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असतो. शरीरातील एकूण द्रव हे दोन गटांत विभागलेले आहेत:
१. पेशी अंतर्गत द्रव आणि
२. पेशी बाह्य द्रव

सोडियम हा मुख्यतः पेशीबाह्य द्रवांत असतो. रक्त हे प्रमुख पेशीबाह्य द्रव होय. त्यातील सोडियम हा मुख्यतः क्लोराईड व बायकार्बोनेटशी संयुगित असतो. त्याची मुख्य कार्ये अशी आहेत:

१. पेशींतील मूलभूत प्रक्रियांत आवश्यक
२. रक्ताचे एकूण आकारमान(volume) स्थिर राखणे
३. रक्तातील हायड्रोजनचे प्रमाण (pH) स्थिर राखणे
४. मज्जातंतूंच्या संदेशवहनात मदत.

शरीरातील चयापचय:

आहारातील सर्व सोडियम रक्तात शोषले जाते. त्याचे शरीरातून उत्सर्जन हे लघवी, शौच आणि घामाद्वारे होते. त्यांपैकी सर्वात जास्त उत्सर्जन लघवीतून होते आणि ते आहारातील प्रमाणाशी थेट निगडीत असते. हे उत्सर्जन व्यवस्थित होण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असले पाहिजे आणि या कामात Aldosterone हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. सोडियमचे घामाद्वारे उत्सर्जन हे अत्यल्प असते. अगदी उष्ण व दमट हवामानात देखील ते विशेष वाढत नाही हे लक्षात घ्यावे. दीर्घकाळ अशा हवामानात राहिल्यास शरीर हळूहळू या प्रक्रियेस जुळवून घेते आणि शरीरातील सोडियमचा समतोल राहतो.

आहारातील मीठ आणि रक्तदाब:

BP.jpg

समाजात बहुचर्चित असा हा विषय आहे. त्यातून उच्च-रक्तदाब असणाऱ्यांसाठी तर विशेष महत्वाचा. गरजेपेक्षा जास्त सोडियम रक्तात साठू लागला की त्याबरोबर जास्त पाणीही साठवले जाते. परिणामी रक्ताचे आकारमान (volume) वाढते. त्यातून हृदयावरील भार वाढतो आणि अधिक दाबाने त्याला रक्त ‘पंप’ करावे लागते. त्यातून रक्तदाब वाढतो.
आहारातील सोडीयम आणि रक्तदाब यांचा थेट संबंध (directly proportional) आहे. प्रौढांमध्ये केलेल्या अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की :
१. अधिक सोडियम >>> रक्तदाब वाढणे आणि
२. कमी सोडियम >>>> रक्तदाब कमी होणे.

असे प्रयोग निरोगी आणि उच्चरक्तदाब असलेले, अशा दोघांत करून झाले आहेत आणि त्यातून वरील निष्कर्ष निघतो. साधारणपणे आहारात १ ग्राम सोडियम वाढवल्यास ‘वरच्या’ व ‘खालच्या’ प्रत्येकी रक्तदाबात ३ mmHg ने वाढ होते. त्यामुळे उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी ‘वरून घातलेले’ मीठ आणि प्रक्रियाकृत साठवलेले पदार्थ टाळावेत अशी शिफारस आहे. स्वयंपाकात समाविष्ट मिठाचा मात्र बाऊ करू नये. ते आवश्यकच आहे. (दीर्घ मूत्रपिंड विकाराने बाधित व रुग्णालयात दाखल झालेल्यांबाबत मात्र त्याचे काटेकोर मोजमाप असते).
काही प्रगत देशांत सोडियमचे प्रमाण कमी केलेले खाण्याचे मीठ उपलब्ध असते. हाही एक सोडियम-नियंत्रणाचा उपाय होय.

आजच्या घडीला जगभरातील सुमारे निम्मे प्रौढ लोक उच्चरक्तदाबाने बाधित आहेत. यातून आहारातील सोडियम नियंत्रणाचे महत्व अधोरेखित होते. रक्तदाब योग्य असणाऱ्या व्यक्तींनी मात्र मिठाचा फार बाऊ करू नये, असे अलिकडील एक संशोधन सांगते.

आहारातील मीठ आणि इतर आजार:

अधिक सोडियमचा करोनरी हृदयविकार आणि Stroke यांच्यातील संबध तपासण्यासाठी बरेच संशोधन झालेले आहे. निष्कर्ष उलटसुलट आहेत. दीर्घकाळ सोडियम अधिक्याने या आजारांचा धोका वाढतो असे म्हणता येईल. तसेच वर्षानुवर्षे असे अधिक्य राहिल्यास त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तसेच त्वचा व पचनसंस्थेवरही दुष्परिणाम होऊ शकतात असा इशारा काही संशोधकांनी दिला आहे.

सोडियमची रक्तपातळी :

निरोगीपणात ती १३५ ते १४५ mmol/L इतकी असते. इथे एक मुद्दा ध्यानात घ्यावा. सामान्य आजारांत ती बिघडत नाही आणि ती मोजण्याची गरज नसते. ही चाचणी रुग्णालयात दाखल केलेल्या बऱ्याच रुग्णांत मोजली जाते. डीहायड्रेशन, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, अतिदक्षता विभागातले रुग्ण आणि शस्त्रक्रिया झालेले रुग्ण इत्यादींमध्ये त्याचे महत्व असते. इथे सोडियमबरोबरच पोटॅशियम आणि क्लोराईड यांची एकत्रित मोजणी करतात. या गटाला ‘Electrolytes’ असे म्हणतात.
आता कोणत्या आजारांत ही पातळी कमी/जास्त होते त्याचा आढावा घेतो.

रक्तातील सोडियम कमतरता :
रुग्णालयात दाखल रुग्णांत खूप वेळा आढळणारी ही स्थिती विशेषतः खालील आजारांत दिसते:
१. हृदयकार्याचा अशक्तपणा (failure)
२. मूत्रपिंड विकार
३. तीव्र जुलाब व उलट्या होणे

सोडियम-पातळी कमी होणे हे मेंदूसाठी धोकादायक असते. त्यामुळे या पातळीवर बारकाईने लक्ष द्यावे लागते. पातळी १२० च्या खाली गेल्यास ती गंभीर अवस्था असते.

रक्तातील सोडियम अधिक्य:
ही स्थिती तुलनेने कमी रुग्णांत आढळते. मूत्रपिंडाच्या व्यवस्थित कामासाठी Aldosterone व ADH या हॉर्मोन्सचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. अनुक्रमे Adrenal व Pituitary ग्रंथींच्या आजारांत ते बिघडते आणि त्यामुळे ही अवस्था येते. वाढत्या पातळीचाही मेंदूवर विपरीत परिणाम होतो. ती १६०चे वर गेल्यास ते गंभीर असते. तेव्हा रुग्ण बेशुद्ध पडतो.

…. तर असे हे धातूरुपी मूलद्रव्य – सोडियम. मिठाच्या खाणी, समुद्राचे पाणी आणि संपूर्ण जीवसृष्टीत आढळणारे. आपल्यासाठी जीवनावश्यक आणि आहारात माफक प्रमाणात हवेच. मात्र जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात त्याचा आहारातील अतिरेक मात्र नको.
***********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या वडिलांना सोडीयम डिफिशान्सीच्या त्रासामुळे गेल्या तीन महिन्यात चार वेळा अ‍ॅडमिट करावे लागले.

वरील सर्वांचे आभार.

किरणुद्दिन, वडिलांना माझ्या शुभेच्छा.
एम- श्रद्धा<
हिमालयन गुलाबी मीठ ?>>>>

या मिठाचे नक्की रासायनिक घटक मला माहित नाहीत. त्यात NaCl व्यतिरिक्त इतर मिसळ असावी.

नेहमीच्या NaCl या मिठाऐवजी अन्य एक मीठ असे असते की त्यात NaCl, KCl व MgCl असे तीन घटक योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. या मिठात सोडियमचे प्रमाण नेहमीच्या मिठापेक्षा निम्म्याने कमी असते.
या मिठाचे सखोल विवेचन लेखमालेतील पुढच्या पोटॅशियमच्या लेखात येईल. तिथे त्याची अधिक चर्चा करू.

छान लेख. मीठ हे भारतीय पापड व लोणचे ह्या दोन पदार्थात भयान क जास्त प्र मा णात अस्ते. ते ही अगदी कमी खावे. प्रोसेस्ड फूड तर नो वे.
मोनॅको हे बिस्कीट तर हॉरिबली खारट असते. मी बिन किंवा कमी मिठाचेच खाते कारण उच्च रक्त दाब. जेवताना प्रत्येक घासाला मीठ लावून जेवायची सवय आजिबात वाइट आहे. ती ग्लोरिफाय करू नये.

माहितीपूर्ण लेख... धन्यवाद >> +१
थोडक्यात जेवताना वरुन मीठ घे ऊ नये हो ना ? तसेच हाय बीपी वाल्यांनी पापड, लोणची टाळावीत.

वरुन मीठ खाणार्‍यांच्या शरीराला त्याची गरज भासत असेल का? म्हणून त्यांना वरुन नुसते मीठ खावेसे वाटते?

माझा मुलगा, तोंडी लावायला कांदा घेतला तर त्याला भरपूर मीठ लावून खातो. मला ते चांगले लक्षण वाटत नाही Sad

वरील सर्वांचे आभार.
अमा, सहमत.
अनघा, बरोबर !
विनिता, तो वखवखल्याचा (craving) प्रकार आहे. त्याची सवय मोडा.

उत्तम आणि सोपा लेख.
विनिता मलाही कांदा लागतो बरेचदा आणि तोही मिठाच्या पाण्यात बुडवलेला.
जेवणात वरुन मात्र अजिबात मिठ घेत नाही.

डायलिसिस मध्ये बरेच रुग्ण कार्डिय्क अरेस्ट जातात ते हेच कारण असे एका डॉकटरने सांगितले व म्हणाला की, पोटेशियम आणि सोडियमचे प्रमाण समतोल मध्ये बिघाड झाला.

धन्यवाद डॉक्टर __/\__ त्याला हा लेख वाचायला देते.

शालीजी, तसा कांदा मला पण आवडतो Happy पण असे मीठ लावून खाणे अघोरी वाटते हो Sad

वरुन मीठ खाणार्‍यांच्या शरीराला त्याची गरज भासत असेल का? म्हणून त्यांना वरुन नुसते मीठ खावेसे वाटते?>>>>> हो माझाही मुलगा लहानपणी नुसते मीठ किंवा तिखट+मीठ एकत्र करून खायचा.अगदीच नाही तर हाजमोलाच्या गोळ्या(त्यात मीठ) चाखत बसायचा.खूप दटावलं,आता आठवतही नाही पण ३-४वर्षांनी आपोआप त्याची सवय गेली.
त्यावेळी मलाही क्रॅविंग वाटायचे.

छान माहितीपूर्ण लेख.

मीठ म्हणजे किचन मधला आवश्यक घटक असल्याने त्याचे मागणी तसे पुरवठा ह्या न्यायाने उत्पादन वाढत गेले असले तरी टेबल सॉल्ट (रिफाइंड पैक्ड प्रॉडक्ट्स) आणि मीठागरात मिळणारे क्रूड सॉल्ट ह्यापैकी नक्की काय चांगले हां प्रश्न अनेकदा मनात येतो आणि त्याच बरोबर अशीही एक शंका येते की मिठागरांची संख्या तर दिवसेंदिवस कमी होत चाललीय मग हे टाटा, कॅप्टन कूक वगैरे प्रोडक्ट सिंथेटिक असतात की खऱ्या मीठापासून बनलेले शुद्ध स्वरूप असते ?

जर सिंथेटिक असेल किंवा एखाद्या प्रोसेसचे बायप्रोडक्ट असेल तर आपल्या आहारात ह्याचा समावेश कितपत योग्य असेल.
(Reference - https://www.quora.com/Is-it-true-that-vacuum-evaporated-salts-like-Tata-...

https://www.globalhealingcenter.com/natural-health/dangers-of-salt/)

टाटाने लो सोडीअम नावाचे हिरव्या पाकिटात मिळणारे मीठ बाजारात आणले आहे, महाग आहे थोडेसे
ते जास्त फायदेशीर असेल का?

योगेश, माहितीबद्दल धन्यवाद.
चिंतेचा विषय आहे.

भारतातील बऱ्याच branded मिठांत सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. अलीकडेच आय आय टी, मुंबई च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
याचे मूळ कारण म्हणजे समुद्रात होणारे प्लॅस्टिक-प्रदूषण हे होय.

@ किल्ली,
लो सोडीअम नावाचे मीठ जास्त फायदेशीर असेल का?>>

त्यातील इतर घटकही पहावे लागतील- विशेषतः पोटॅशियम.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या डॉ च्या सल्ल्याने त्याचा विचार करावा.

म्हणजे आपण आपलं आयुष्य वाह्यात केलय का प्रगतीच्या नावाखाली? साधं मिठ खायचे वांधे.

मी खाण्याचा सोडा एक चमचा घेतो आठवड्यातून तीन वेळा,विथ लेमन ज्युस. त्यातही सोडीयम आहे ,त्याने बिपी वाढू शकतो का?

के तु,
खाण्याचा सोडा >>>
आपण रोजच्या आहारात जे एकूण सोडियम खातो त्या तुलनेत तुम्ही खात असलेला सोडा किरकोळ आहे. रक्तदाब योग्य (निरोगी) असल्यास काळजी नाही.
पण मुळात तो खायची आवश्यकता काय? माझ्या मते उगाचच खाऊ नये.

नेहमीप्रमाणे च छान लेख. आधुनिक खाद्यशैलीत आपण नको इतके मीठ खातो.
एक शंका आहे.
जर रक्तातील सोडियमची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का?

स्वाती, साद : आभार.
जर रक्तातील सोडियमची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का?
>>>>>>>
होय, त्याचा अंदाज येतो. लक्षणे आजाराच्या कारणानुसार असतात. आता दोन्ही परिस्थिती बघू:

• कमी पातळी : जलद नाडी, कमी रक्तदाब, कोरडी जीभ आणि पायांवर सूज (edema)

• जास्त पातळी: त्वचेची लवचिकता कमी होणे, लघवीचे प्रमाण कमी व ती concentrated असणे.

धन्यवाद, डॉक्टर.

म्हणजे आपण आपलं आयुष्य वाह्यात केलय का प्रगतीच्या नावाखाली? साधं मिठ खायचे वांधे.>
>> +१

माहितीपूर्ण लेख.
शिजवलेल्या आणि न शिजवलेल्या मीठामध्ये काही फरक असतो का?
म्हणजे वरण भातावर मीठ वरुन घेण्याऐवजी कुकरमध्ये तांदळाबरोबरच घालावे, कडधान्य मीठ घालून शिजवून घ्यावी व वरुन बिन किंवा अगदी कमी मीठाची फोडणी द्यावी. कोशिंबीर, ताक यात मीठ घालू नये (शेंदेलोण वगैरे चालेल),
याला सवय, पध्दत,चव याव्यतिरिक्त काही शास्त्रीय आधार आहे का?

पीनी, धन्यवाद.

शिजवलेल्या आणि न शिजवलेल्या मीठामध्ये काही फरक असतो का? >>>>>

चांगला प्रश्न आहे आणि याचे अनुभवी उत्तर आहारतज्ञ देऊ शकतील. तरी माझे मत सांगतो. एकंदरीत जेवताना ‘वरून’ मीठ घेण्याने ते बरेचदा गरजेपेक्षा जास्तच घेतले जाते. याउलट अन्न शिजवताना ते माफक घातले तर ते जेवताना कुटुंबात विभागले जाईल. त्यातून ‘वरून’ घालायची सवय मोडू शकेल.

मुळात सोडियम हे खनिज असल्याने स्वयंपाकाच्या उष्णतेने त्यावर विशेष फरक पडत नसावा. कुठल्याही प्रकारे ते पोटात गेले की त्याचा आरोग्यावरील परिणाम एकच असेल.
... इतरांचे मत ऐकण्यास उत्सुक.

Pages