खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ

Submitted by कुमार१ on 31 January, 2019 - 21:25

नुकतीच माझी येथील जीवनसत्वांची लेखमाला संपली (https://www.maayboli.com/node/68579). वाचकांना ती उपयुक्त वाटल्याचे व आवडल्याचे प्रतिसादांतून दिसले. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनातून आता नव्या लेखमालेस हात घालत आहे. ती आहे जीवनसत्वांचे भाऊबंद असणाऱ्या खनिजांची.

min.jpg

खनिजे ही मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी पोषणद्रव्ये आहेत. निसर्गात ती विविध खाणींमध्ये असतात. निसर्गदत्त अनेक खानिजांपैकी सुमारे १६ मानवी शरीरास आवश्यक आहेत. त्यांचे आपल्या आहारातील गरजेनुसार दोन गटांत वर्गीकरण केले जाते:

१. जास्त प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा अधिक असते. यांमध्ये मुख्यत्वे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियम यांचा समावेश होतो.

२. सूक्ष्म प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा कमी असते. यांमध्ये मुख्यत्वे लोह, आयोडीन, तांबे, जस्त, कोबाल्ट, मॅन्गेनीज, क्रोमियम, सेलेनियम व फ्लुओराइड यांचा समावेश होतो.

आहारातून घेतलेल्या या खनिजांचा आपण शरीरात साठा करतो. एक प्रकारे तो आपला ‘आरोग्य खजिना’च असतो. खनिजे शरीरात अनेकविध कामे करतात. थोडक्यात ती खालील स्वरूपाची असतात:

१. पेशींचे मूलभूत कामकाज
२. हाडे व दातांची बळकटी
३. महत्वाच्या प्रथिनांचे घटक (उदा. हिमोग्लोबिन)
४. अनेक एन्झाइम्सच्या कामाचे गतिवर्धक
५. हॉर्मोन वा जीवनसत्वाचे घटक.
६. Antioxidant कार्य.

या यादीवरून त्यांचे महत्व लक्षात येईल. लेखमालेत तुलनेने अधिक महत्वाच्या खनिजांवर स्वतंत्र लेख असतील तर उर्वरित खनिजे ही शेवटच्या एका लेखात समाविष्ट होतील.
प्रत्येक खनिजाबद्दलच्या लेखात त्याचे आहारातील स्त्रोत, गरज, शरीरकार्य, त्याच्या अभावाचा आजार आणि अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम असे विवेचन असेल. अन्य पूरक माहिती प्रतिसादानुरूप दिली जाईल. वाचकांनीही त्यात जरूर भर घालावी.

आणि हो, एक सांगितलेच पाहिजे ....
लेखमालेचे ‘खनिजांचा खजिना’ हे सुरेख शीर्षक माबोकर ‘अनिंद्य’ यांनी सुचवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार ! अर्थात वाचकांच्या सोयीसाठी पुढच्या प्रत्येक लेखाला मात्र ज्या त्या खनिजाचेच नाव त्याच्या वैशिष्ट्यासह देत आहे.
.. तर लवकरच भेटूया ‘सोडियम’ च्या पहिल्या लेखातून.
धन्यवाद !
***************************************************************************************
(‘मिपा’वर पूर्वप्रकाशित ही लेखमाला काही सुधारणांसह इथे प्र.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

छान सुरुवात...
सुवर्ण भस्म, मिठाईवरचा चांदीचा वर्ख या विषयी जाणून घ्यायला आवडेल..

वरील सर्वांचे प्रोत्साहनाबद्दल आभार.
दत्तात्रय, सूचनेची नोंद घेत आहे.

वा नवीन लेखमालिका ! इथे येण्यात खूप गॅप झाल्याने जीवनसत्त्वे बाकी आहेत वाचायची. आत दोन्ही वाचते.

अमा अ‍ॅड्मांटिअम साठी डॉ विलियम स्त्राईकर यांना कॉन्टॅक्ट करा!
व्हायब्रेनियम साठी उलीसस क्लाऊ हा एक चांगला पर्याय होता, पण त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अलट्रोनला जास्त वायब्रेनियम मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला (जास्त खनिजे शरीरासाठी वाईटच)
यु मे कॉल शुरी, किंवा एव्हरेट रॉस. ते वाचलेत इन्फिनिटी वॉर मध्ये, अशी वदंता आहे.