कथा: असाही "तो"

Submitted by सविता कारंजकर on 30 January, 2019 - 08:03

सकाळची प्रसन्न वेळ...
रेडिओवर भक्तीगीतांचा कार्यक्रम सुरू होता..
प्राजक्ताची धावपळ सुरू होती..
साडे पाच वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा..

सासूबाईंच्या नियमानुसार अंघोळ करूनच स्वयंपाकघरात शिरायचं..सडारांगोळीनं अंगण सजवायचं..आत येतानाच पूजेसाठी अंगणातल्या बागेतली फुलं तोडून आणायची..विशेषतः देवचाफ्याची फुलं तिला आवडायची..ती फुलं वेचताना ती. क्षणभर तिथं रेंगाळायची...रोजच..

मुलांना उठवून एकीकडे त्यांचं आवरायचं आणि दुसरीकडे स्वयंपाक करायचा..त्यातही पथ्याचं वेगळं..मुलांच्या आवडी जपायच्या.. नव-याच्या जीभेचे चोचले...शिवाय.मुलांचा गृहपाठ पूर्ण आहे का, त्यांनी सगळं व्यवस्थित घेतलंय का..त्यांच्या फीज्..शाळेतल्या तक्रारी..प्रोजेक्ट..

सगळं सगळं ती मनापासून करायची विनातक्रार..पण ती कधीच खुललेली नसायची..

एवढं करून तिला बँकेत बरोबर १०.०० वा बायोमेट्रिक...वेळ गाठायचीच...
दिवसभर बँकेत लढायचं..ग्राहकांच्या तक्रारी..बाॅसचं चिडणं..सहका-यांचा असहकार..
पण कसली म्हणून तिची तक्रार नव्हती..ऑफिस सुटल्यावर घरि
जाताना मंडई..सासूसास-यांची औषधं..मुलांचं काहीबाही..अशी खरेदी रोज असायचीच...

सुटीदिवशी हिची विश्रांती राहिलीच घरच्याच जबाबदा-या पार पाडता पाडता तिला वेळ पुरायचा नाही..
राकेश..प्राजक्ताचा नवरा..एका कंपनीत उच्चपदस्थ.. पगार गलेलठ्ठ..
पण घरची कसलीच जबाबदारी नको असलेला..आत्मकेंद्रीत..

त्यानं स्वतःभोवती आखलेल्या वर्तुळात मुलंही नसायची...
प्राजक्ताच्या जीवावर हा बिनधास्त..प्राजक्ताच्या आधीच हा
घरी यायचा पण बसून रहायचा...वाट बघत..ती आली की हा तिचा बाॅस...आणि प्राजक्ता त्याची सेविका...
ती दमायची कंटाळायची... पण तरीही...करत रहायची..तिचं हिरमुसलेपण कुणाच्याच लक्षात यायचं नाही..सगळे आपापल्या कोषात..सगळं हातात मिळतं ना..मग झालं तर..

आज मात्र ती खुश होती..तिला कधी एकदा ऑफिसमध्ये पोचतेय असं झालेलं...रोजच्या पेक्षा आज तिची पावलं वेगात आणि ठेक्यात पडत होती..

दोनदा..चारदा आरशात स्वतःला न्याहाळून ती बाहेर पडली...

आज दिवसभर तिला थकवा जाणवला नाही..घरी आली तीच गुणगुणत...अंगणातल्या चाफ्यानं तिचं दरवळून स्वागत केलं..

पुन्हा रहाटगाडगे..

दुसरा दिवस उजाडला...तीच ऑफिसमध्ये पोचण्याची घाई..तोच ठेका..तीच लय...तेच ते स्वतःला आरशात न्याहाळणं..

पंधरा दिवस हेच रूटीन...
घरात इतर कुणाच्या लक्षात नाही आला हा बदल...पण ..

पण तिच्या लक्षात आलं..
रविवारची सुटी होती..सगळं आवरून ती कपडे आवरत होती आणि तिचं लक्ष स्वतःच्या प्रतिबिंबाकडे गेलं...

"प्राजक्ता, का इतकी खुश आहेस तू?"
प्रतिबिंबानं विचारलं..
ती गडबडली...
आणि पुढच्याच क्षणी तिच्या गालांवर गुलाब फुलले...
प्रतिबिंबाला टाळून ती उद्याची वाट पाहू लागली...

ऑफिसमध्ये क्षणभर मानही वर करायला फुरसत मिळायची नाही प्राजक्ताला...

सहका-यांशी वाद नकोत म्हणून ती जास्तच स्वतःला कामात गुंतवून घेत होतं.
सतत मागं राहण्याच्या तिच्या स्वभावाचा फायदा तिचे सहकारी घ्यायचेच...

पण या पंधरा दिवसात एक नविन सहकारी तिच्या शेजारच्या टेबलवर आला होता..त्याची प्राजक्ता ज्या शाखेत काम करत होती तिथंच बदली झालेली..
साधारण तिच्याच वयाचा..
फारसा रूबाबदार देखणा वगैरे नसला तरी प्रसन्न व्यक्तिमत्वाचा होता पंकज...
तिची कामात मदत घेण्याऐवजी तिलाच काही मदत हवीय का असं विचारायचा...

तिला बरं वाटत होतं..
त्याचं वागणं सहज होतं..कोणताही आविर्भाव नव्हता
तिच्याशी मोकळेपणाने गप्पा मारू लागला होता तो आता..तिलाही त्याची सवय होऊ लागली..
त्याच्या वागण्यात तिलाच नव्हे तर ऑफिसमध्ये कुणालाच काहीच खटकण्यासारखं नव्हतं..
स्वच्छ पाण्याच्या नितळ झ-यासारखा पंकज खळखळत्या मनाचा होता..

ऑफिसमध्ये बाॅस विनाकारण चिडले म्हणून खट्टू झालेली प्राजक्ता.. आता घरी जाऊन राकेशजवळ मन मोकळं करू असं ठरवून आलेली..
राकेश घरातच बसलेला होता..तिचा पाय घरात पडतो ना पडतो तोच त्यानं ऑर्डर सोडली.."आज माझे मित्र जेवायला येतायत..चार जण..लवकर चिकन घेऊन ये आणि मस्त कर जेवण..आणि हो..आधी फक्कड चहा होऊ दे तुझ्या हातचा..."

ती म्हणाली.."अरे राकेश..मी चहा करून देते..मसाला आणि बाकीची तयारी करेतो तू आणून दे ना चिकन"
तो वैतागला...मी दिवसभर कंटाळून येतो ..माझ्यावर किती जबाबदा-या!!मला नको का रिलॅक्स व्हायला?"
त्याचं हे नेहमीचंच..

पण आज तीही वैतागली होती..तिनं प्रत्युत्तर केलं..
"मी ही कंटाळलेय..माझ्यावरही ऑफिसच्या जबाबदा-या असतातच..मलाही बाॅस आहे..

ते काही नाही..आज तूच चिकन आणून दे"
राकेश पुन्हा खेकसली..इतक्यात नीरव..तिचा सात वर्षांचा मुलगा पळत येऊन बिलगला .."आई, आज बाईंनी प्रोजेक्ट करायला सांगितलाय..देशील ना?"
तिने प्रोजेक्टची जबाबदारी राकेश घेतोय का हे पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला..आणि हताश होऊन ती कामाला लागली..
झकास बेत झाला..मित्रपरिवार खुश होऊन गेला.सगळं आवरायला तिला रात्रीचे साडे दहा वाजले..
नीरव वाट पाहून पाहून झोपला होता...
राकेशही काही वेळातच टीव्ही बंद न करता तसाच झोपला..
तिनं मुकाट्याने नीरवचा प्रोजेक्ट काय आहे ते पाहिलं..घरात उपलब्ध साहित्य वापरून तिनं तो प्रोजेक्ट पूर्ण केला..तेही कुणाची झोपमोड होऊ नये..म्हणून आवाज न करता..
आणि हुश्श करत बेडवर अंग टाकलं..

खरंतर आज तिला मानसिक आधाराची गरज होती.
राकेशच्या एका आश्वासक स्पर्शानेसुद्धा हे काम केलं असतं...
पण राकेश..असाच..बेदरकार..
त्याला फक्त स्वतःचीच गरज माहिती..

आपल्या बायकोला आपली मानसिक शारीरिक गरज असू शकते..हे त्याच्या कधी लक्षातच आलं नाही..
ती पाठमो-या राकेशकडे पाहत राहिली..

पुढाकार घेऊन त्याच्या कुशीत शिरण्याचा तिचा प्रयत्न असफल झाला...नेहमीप्रमाणेच..

नाराज होऊन ती डाव्या कुशीवर वळली.दिवसभराच्या दगदगीनं देह शिणला होता..मेंदूही शिणलेलाच...विनाकारण झालेल्या अपमानानं मनही बेचैन..अस्वस्थ..अशावेळी झोप लागणं कठीणच ..

आपसूकच दिवसभरचा घटनाक्रम आठवू लागला..
मग हळूहळू मन सरकत सरकत भूतकाळात जाऊ लागले.समस्या..संघर्ष..अपमान..उपेक्षा अशा सगळ्या आठवणींनी मनात थैमान घातलं.उशीचा कोपरा भिजणं ओघानंच आलं मग....

मन आक्रंदू लागलं.."राकेश,एकदा बघ तरी..कधीच कशी रे तुला माझी अवस्था समजत नाही..?मला बाकी काही नको रे.....तुझा हात माझ्या हातात घट्ट असू दे ..फक्त इतकंच कर रे..मला त्या स्पर्शातून जाणवू दे...तू आहेस माझ्या सोबत..मग बघ..मी कशी लढते ते...
प्लीज राकेश.."

पण त्याचं घोरणं वाढतच राहिलं.. तिचं डोकं गच्च झालं..डोळे रडून रडून सुजले..
उद्या पुन्हा लढाईला सामोरं जायचंय..आता बिल्कुल रडायचं नाही असं म्हणून ती उठली आणि पर्स मधून मोबाईल काढला..

* * *
शे पाचशे हून अधिक मेसैजेस येऊन पडलेले..अश्रूंमुळे धूसर दिसत होतं सगळं..

रात्रीचे साडे बारा वाजलेले...
हॅलो....

या अक्षरांकडे तिचं लक्ष गेलं...
बापरे! पंकजचा मेसेज..हा अजूनही जागाच कसा?आणि यानं मला का मेसेज केलाय?

पंधरा तीन आठवड्यातला हा त्याचा पहिलाच मेसेज..

प्रत्युत्तर म्हणून ती ही हॅलो म्हणाली...

त्याचा पुढचा मेसेज तयार...

खूप रडलीस ना?

ती सुन्न..याला कसं कळलं?

तो :-प्लीज आता आणखी रडू नकोस..
ती :-नाही..

असं म्हणून तिनं डोळे पुसले.

तो :-आता शांतपणे झोप...उद्या पाहू..
ती गप्पच राहिली.

पाच सात मि कुणीच काहीच बोललं नाही..

तो :- झोप..
ती:- हम्म..
तो :- बघ परत रडायला सुरुवात केलीस

ती मनातल्या मनात
अरे..याला कसं कळतंय?

तो:- मला सगळं कळतंय..
ती गप्पच..

पुन्हा पाच मि गेली...

तो :- डोळे मिटून घे..आणि..

ती आणखीनच रडू लागली..तिला हुंदके आवरेना...
निसर्गही तिला साथ करू लागला...पाऊस कोसळू लागला

तो: - तू शांत हो आधी..बघ..बाहेर पाऊस पडतोय..
ऐकायचा प्रयत्न कर..
मला माहिताय...तुला पाऊस आवडतो..

अरे हा कोण आहे नक्की? याला सगळंच कसं कळतंय?

तो :-ऐक शांतपणे..तुझं डोकं दुखतंय..डोळे सुजलेत..
ती : - हम्म..

तो :- मग आता एक काम कर...मनानं गच्चीवर जा..मनसोक्त भिज पावसात...तुला बरं वाटेल..

ती :-अरे बघ ना...तुला एवढ्या अंतरावरूनही कळतंय सगळं...

तो :-अंहं...आता परत रडायचं नाही..चल.उठ..पावसात चल

पावसाचे टपोरे थेंब..

बघ.कशी खुलत चालली तू...

ती :- हम्म..

ती खरंतर बेडवर पडून राहिली होती..पण पंकजच्या दिलासा देण्यानं ती मनानं पावसातच होती..

तो :-चल..बघ दोन्ही हात पसरून पावसाला कवेत घेतेयस तू!!

ती :-हो..पाऊस मला आवडतो..मी फील करतेय पंकज..मी पावसात भिजतेय..
मला बरं वाटतंय...

तो :-गुड...आता थोडावेळ भिजत रहा आणि मग आपोआप शांत झोप लागेल..गुडनाईट!!
ती :- पंकज....
तो :-बोल ना...

पुन्हा शांतता...
तो :- ए वेडाबाई..परत सुरू झालीस?
ती:- तुला तर सगळंच कसं कळतंय रे?
तो :- अगं..असं काय?
ती:- पंकज..
तो:- काय गं?
ती :- पंकज,हात पकड ना माझा...
तो :- हे बघ...घट्ट पकडला तुझा हात..
ती :- पंकज..मला हाच आश्वासक स्पर्श हवा होता..
तो :-आता मिळाला ना?
ती :- हम्....
तो :-मग आता शांत झोप बघू..गुडगर्ल!!
ती:- पंकज..प्लीज..थोडावेळ हात सोडू नकोस..
तो :- नाही गं...चल मी अंगाई गातो....

पापणीच्या पंखात....

ती:-पंकज....

ती शांत झाली...पंकजचा हात तसाच हातात घेऊन तिची एका क्षणात झोप लागली...गाढ..

* * *

सकाळी साडेपाच वाजता गजर होताच ती उठली...
प्रसन्न वाटत होतं..हलकं हलकं..
हस-या चेह-यानं ती उठली...आवरलं...
आणि तिला रात्रीचं भिजणं..हातात पंकजचा घट्ट पकडून ठेवलेला हात..अंगाई..सगळं आठवलं...
ती नखशिखांत हादरली..
हे काय?स्वप्न की खरंचच तो इथं आलेला?
नाही...तो इथं कसा येईल?

बावरलेली प्राजक्ता परत बेडरूममध्ये धावली...मोबाईल पाहिला...
ओह गाॅड!!आपण वाॅटसअपवर? मग तो उबदार स्पर्श का जाणवतोय?ते भिजलेपण?
तिला काही सुचेनासं झालं..

हे काय?आपण असे कसे वागलो?
तो तरी असा कसा वागला?
हात धरला त्यानं आपला...
नाही..आपणच तशी मागणी केली!!

बापरे..

अरे..पण प्रत्यक्षात कुठं?यात काय गैर?
उलघाल चालू झाली तिची...
पुढचं सगळं तिनं यंत्रवतपणे पार पडलं..
आज काही स्वतःला आरशात न्याहाळणं तिला जमलं नाही..उगीचच एक अपराधीपणाची भावना मनात दाटून राहिली..
ऑफिसला जायला बाहेर पडली खरी पण पावलं आणि मनही जडावलेलंच...
पंकज आधीच येऊन बसलेला..त्याचं काम सुरू होतं..
काही घडलंच नाही अशा आविर्भावात...

ती धडधडत्या ह्रदयानं खुर्चीत बसली.काॅम्प्युटर ऑन केला...तिच्या डेस्कटाॅपवरचा चाफा तिच्याकडे पाहून हसत होता..तरीही आज तिला प्रसन्न वाटेना..

लंचब्रेक झाला...तिनं कसेबसे चार घास घशाखाली उतरवले आणि ती काॅफीमशिनजवळ जाऊन बसली..
पाठोपाठ पंकजही आला...काॅफीचा घोट घेता घेता त्यानं सहजपणे विचारलं...कशी आहेस?

ती गप्पच..
त्यानेही आग्रह केला नाही..
तिनं काॅफी संपवली आणि जागेवर जायला निघणार तोच पंकज म्हणाला.."काय झालं?गप्प का?"
ती - मला नाही बोलायचं पंकज तुझ्यासोबत
तो -का?माझं काही चुकलं का?
ती -नाही..पण जे झालं ते योग्य नाही
तो - काय झालं?
ती - वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस..
तो - ओह..तू रात्री बोलणं झालं आपलं..त्याबद्दल बोलतेय?
ती -हो
तो - अगं..त्यात काय चुकलं गं?
ती - बरोबर तरी काय होतं?
तो - तुला हलकं वाटलं तेच...
ती - तरीही....चुकीचंच
तो - ठीक..जशी तुझी इच्छा

संवाद थांबला...काही दिवस असेच उलटले..दोघंही एकमेकांशी एकही शब्द बोलत नव्हते.

* * *
दीड महिना उलटला...एका रात्री प्राजक्ता घरकाम उरकून बेडवर पडली..सगळे झोपून बराच वेळ झालेला...राकेश घोरत होताच..
तिने वाॅटसअप ओपन केलं..

पंकज ऑनलाईन...

तिच्याही नकळत तिने त्याला साद घातली...

पंकज....

तो - बोल
ती - जागा का?
तो - असंच
ती - माझ्यावर रागावला?
तो - ते का बरं?आणि हे तुला कसं वाटलं असं?
ती - मी फटकून बोलले त्यादिवशी
तो - आज चांगलं बोलावंसं वाटतंय ना? मग जे झालं ते नको आठवत बसू
ती - पंकज. तू असा रे कसा?
तो - हाहाहाहाहा..ते जाऊ दे...तू का हाक मारली?
ती - माहित नाही..पण..माझ्या नकळत..अरे..आय एम् साॅरी....पंकज

तो - अगं...रिलॅक्स रिलॅक्स...
किती गडबडलीस?
ती - पंकज काहीतरी चांगलं बोल ना रे
तो - आय लाईक यू.
ती - ऑ?
तो - येस्...आय लाईक यू प्राजक्ता..
ती - बट्....बट्..आय डोण्ट लव यू
तो - मी फक्त ..आय लाईक यू म्हटलं वेडाबाई..
ती गप्पच..
तो - काय?
ती - गुडनाईट.

त्यानं गुडनाईट म्हणायच्या आधीच तिनं वाॅटसअप बंद केलं..दीर्घ श्वास घेतला आणि ती झोपायचा प्रयत्न करू लागली..

अनामिक भीती दाटली होती तिच्या मनात...झोप कधी लागली समजलंच नाही..

* * *

वा-याच्या मंद झुळकीबरोबरच तिला जाग आली...रोजच्या गजर होण्याच्या आधी पंधरा मिनिटे...
ती उठली..एक वेगळाच सुगंध वातावरणात भरून राहिला होता..ती खूश होती..आनंदात आवरलं तिनं सगळं..
बाहेर पडायची वेळ अजूनही झाली नव्हती..पंधरा मि बाकी होती..

ती आरशासमोर रेंगाळली. निळसर रंगाचा टाॅप.तशाच रंगाची सलवार..दोन्हीवर काळ्या रंगाची नक्षी...तशीच तलम ओढणी...बाॅब केलेले केस नीट पीनअप केलेले..हलकासा एक पफ फिरवला तिने चेह-यावर...मंद परफ्य्यूमचा एक स्प्रे मारला....
नावाप्रमाणेच ती नाजूक टवटवीत दिसत होती...घराबाहेर पडली..चालताना तिची पावलं ठेक्यात पडत होती..पायात नसलेल्या पैंजणांचा नाद तिच्या कानी पडत होता...गाडी स्टार्ट करून ती ऑफिसमध्ये पोचली.

तिची नजर पंकजला शोधत होती.पार्किंगमध्ये गाडी तर दिसत होती..मग हा दिसत कसा नाहीए? ती अस्वस्थ झाली.. काॅम्प्युटर ऑन केला...नजर भिरभिरत होतीच..
डेस्कटाॅपवरच्या चाफ्याची जागा आज कमळाच्या फुलानं घेतली..
दोघांनाही एकमेकांविषयी प्रचंड ओढ जाणवू लागली..प्रत्येक गोष्ट ते एकमेकांशी शेअर करू लागले.
अशाच एका भावनिक प्रसंगी प्राजक्ताने पंकजला विचारलं...तुझ्या घरी कोण कोण असतं?
तिचा रोख पंकजला समजला..त्याने तिची नजर टाळत विषय बदलला...

तिला खटकतं थोडंसं..पण असंख्य विषयांचं खोल ज्ञान असलेल्या पंकजला प्राजक्ताचं मन दुसरीकडे वळवणं कठीण गेलं नाहीच.....

ते दोघे कधीही बाहेर भेटले नाहीत की कधी पंकजनेही तशी अपेक्षा व्यक्त केली नाही...
तिला हव्या त्या क्षणी हवा तसा मानसिक आधार पंकजकडून मिळू लागला..या सगळ्याच गोष्टींना ती वास्तव मानू लागली...पंकजही आपल्यात गुंतत चाललाय...ही गोष्ट तिला सुखावत होती.
आपली कुणालातरी गरज आहे..ही भावनाच तिला पूर्णत्वाकडे नेत होती..

कवी बी यांच्या चाफा कवितेप्रमाणे प्रीतीचे शुद्ध रसपान आपण करत आहोत..असं ती सतत पंकजला म्हणायची.

आजवर त्यांचं सहजीवन केवळ मोबाईलच्या चकचकीत स्क्रीनवरच होतं...
यथावकाश ती घरात ही खुश राहू लागली..घरच्या जबाबदारींचा तिला कंटाळा वाटेनासा झाला..मुख्य म्हणजे ती स्वतःवर प्रेम करायला लागली...अनेक इच्छा आकांक्षांचं दमन तिनं केलेलं...पंकजने आभासी जगात का होईना ती सगळी सुखं तिला दिली...ती स्वतःला परिपूर्ण समजू लागलेली.......

* * *

एके रात्री पंकज त्याच्या काही जबाबदारीमुळे तिच्या संपर्कात राहू शकला नाही...ती अस्वस्थ होती..विचार करू लागली...आपण किती गुंतलो पंकजमधे! पण तो किती सुख देतोय आपल्याला!!

पुरूष असूनही कधीच त्याने आपल्याकडे त्या नजरेनं नाही पाहिलं...
आणि जरी पाहिलं....तरी..तरी ते आवडेल आपल्याला...
खरंच खूप आवडेल..
त्याला अधिकार आहेच तेवढा...
हळूहळू ती त्याच्यासोबत प्रणय रंगवू लागली..अनेक वर्षांच्या सहजीवनात राकेशसोबत जो आनंद तिला मिळाला नव्हता तो तिला त्या रात्री पंकजसोबतच्या काल्पनिक सहवासात मिळाला..तिचं शरीर मोरपीसासारखं हलकं झालं...
पहाटेच्या वेळी ती सुगंधी श्वास घेत शांत झोपली..
झोपेतच तिनं मनोमन निश्चय केला...उद्या दिवसभर दोघांनीही ऑफिसला दांडी मारायची आणि लाँगड्राईव ला जायचं..पंकजसोबत सगळ्या गोष्टींचा आनंद लुटायचा... आपल्या स्वतःसाठी जगायचं...आणि पंकजही नाही म्हणणार नाहीच!!

सकाळी सगळं आवरून ती ऑफिसला आली..पंकज होताच..तिनं त्याला काॅफीमशिनजवळ बोलावलं...ती आता तिच्या मनातला प्लॅन बिनदिक्कतपणे सांगणारच होती...
तेवढ्यात त्यानं त्याची चाफ्यानं भरलेली ओंजळ तिच्या समोर रिती केली..ती मोहरून गेली.
तो म्हणाला..माझ्या चाफ्याच्या फुला...
गर्दीत घुसमटलेली स्वप्नाळू कळी आहेस तू!
आसमंतात भरून राहिलेला सुगंध सोबत घेऊन वारा येतो आणि ती कळी त्याला अंगभर लपेटून घेताच ती खुलते..कळीचं फूल होतं आणि त्या फुलांचा सुगंध पुन्हा पुढे निघून जातो वा-या सोबत...आसमंतात मिसळून जातो...
एवढांच माझा रोल...

ती आश्चर्याने त्याच्याकडे पहात...
"अरे , मग आपलं नातं?"
तो - समुद्र अथांग असतो..
कारण त्याचा तळ कधी सापडलाय का कुणाला? तसंच आपलंही नातं अथांग राहू दे..
आपण एकमेकांना आनंद देत आणि घेत राहू..
प्राजक्ता..आपलं प्रेम या फुलांसारखंच राहू दे...फुलं केवळ सुगंध देत राहतात..कधी कुणा रमणीच्या केसात माळून सुगंध दूरवर पसरवत राहतात तर कधी ईश्वराच्या चरणी देह अर्पितात.. निर्माल्य झाल्यावर मातीत मिसळून पुन्हा खत बनतात पुढच्या फुलासाठी..
आपलं नातं असंच राहू दे..
ते विषयात नको बरबटायला...

ती 'आ' वासून...

"पंकज,तू ही माझ्यावर खूप प्रेम करतोस ?"
तो - ज्याक्षणी तुला पाहिलं..त्या क्षणालाच मी तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो..
तुझ्यातली आई मला जास्त भावली..तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तू आई झालेली पाहून माझ्यातलं वात्सल्य जागं झालं..मला कुटुंब नाही प्राजक्ता..
मी एकटा आहे..
"तू लग्न का नाही केलं?"तिनं अगतिकतेनं विचारलं...
हताशपणे तो उत्तरला....
"लग्न? केलेलं लग्न...खूप प्रेम होतं माझं तिच्यावर...जीव ओवाळून टाकत होतो मी तिच्यावर...रितसर सगळ्या नातेवाईकांच्या साक्षीनं लग्न झालेलं आमचं..ती सगळ्या जबाबदा-या पार पाडत होती..पण ती कधीच खुश नव्हती...मला परकेपणा जाणवायचा..नवीन घरात रुळायला वेळ लागेल..असं समजून मीही तिला अवधी दिला..मी कसलीही सक्ती केली नाही की कसली अपेक्षा केली नाही तिच्याकडून...सगळी सुखं तिच्या पायाशी लोळण घेत होती...पण तिच्या वागण्याबोलण्यातली यांत्रिकता मला स्वस्थ बसू देत नव्हती..मी खोदून खोदून तिला विचारत राहिलो...भविष्यातील स्वप्नं तिच्यासमवेत रंगवायचा प्रयत्न करत होतो....

मला घरी माझी वाट पाहणारं कुणीतरी हवं होतं.. लहानपणीच मी आईवडिलांचं छत्र हरवून बसलो..भीषण अपघातात आईबाबा गेले..मला भावंडं नाहीत..शेजारीपाजारी जे देत राहिले..त्यावरच जगलो...मला उबदार कुटुंब हवं होतं चौकोनी...मला सगळ्यांवर भरभरून प्रेम करायचं होतं..बायकोला खुश झालेलं..खळखळून हसताना पाहायचं होतं....पण..
पण तिचं आधीच एका मुलांवर प्रेम होतं..तिनं मला आधी सांगितलं असतं तर मी पुढाकार घेतला असता ..तिचं लग्न लावून दिलं असतं..पण छे...हे सगळं नव्हतं माझ्या नशिबी...लग्न झाल्यावर सहा महिन्यानी
माझ्या भरल्या घरातून ती पळून गेली..मला कल्पना न देता..
मग मी खूप खचली..पण रडत नाही बसलो...मी अनाथाश्रमात गेलो..तिथल्या मुलांशी बोललो..त्यांच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो..तिथली मुलं स्पर्शाची भुकेली असतात...मी त्यांची ती भूक भागवू लागलो.माझं कुटुंबच बनलं ते..मग माझी आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यावर आज मी तिथल्या दोन मुलांचं पालकत्व स्विकारलं..
प्राजक्ता..एखादा पुरूषही आई होऊ शकतो गं..सगळेच वासनेनं बरबटलेले नसतात..मला तुझ्यातलं फूल खुलवायचं होतं..ते मी केलं..तू अशीच रहा...

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रेम करत राहीन तुझ्यावर...आणि मलाही खात्री आहेच की तूही माझ्यावर असंच प्रेम करत राहशील..
आपली कुटुंबं..हेच आपलं प्रथम कर्तव्य राहील..ते च आपलं पहिलं प्रेम..
हे बोलताना त्याचा कंठ दाटून आला....
अचानकच आणखी एक चाफ्याची ओंजळ त्यानं तिच्या पदरी रिती केली....जणू तिची ओटी त्याच्या ओतप्रोत भरली इतकी की ....तहहयात आता तिला प्रेमाची उणीव भासणार नव्हती.....आता तिला तिचं गोड कुटूंब डोळ्यासमोर दिसू लागलं...

* * *

कितीतरी वेळ ती तशीच तिथंच बसून राहिली....
जड पावलांनी ती आता उठली आणि शांत मनानं ऑफिसमध्ये आली....

सगळे सहकारी पंकजला पुष्प गुच्छ देत होते..त्याची बदली करून घेतली होती त्यानं...

तिच्या पदरी आनंदाचं दान टाकून तो असंख्य अनाथांवर मायेचं पांघरुण घालून स्वतःचं दुःख लपवायला निघाला होता जणू....

* * *
लेखिका: सविता कारंजकर, सातारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिच्या पदरी आनंदाचं दान टाकून तो असंख्य अनाथांवर मायेचं पांघरुण घालून स्वतःचं दुःख लपवायला निघाला होता जणू....>>> मला अगदी उलट वाटतेय
काही क्षण आनंदाचे देऊन आधीचे दुःख द्विगुणीत होणार नाही का अश्याने

> राकेश पुन्हा खेकसली.
मग मी खूप खचली. > खेकसला, खचलो.

> बोलावलं...ती आता तिच्या मनातला प्लॅन बिनदिक्कतपणे सांगणारच होती... > इथेपर्यंत बरी आहे कथा...

पंकजला प्राजक्ताच्या मनातलं कसं कळलं??
मला असा शेवट अपेक्षित होता की पंकज हा संपूर्ण काल्पनिक माणूस होता जो प्राजक्ता ने तिच्यासाठी तयार केला. म्हणूनच पंकज ला प्राजक्ताच्या मनातलं कळतंय.
(प्राजक्ता schizophrenic आहे)

So he made her fall in love with him,did sex chat, when she wanted to take things to next level he backed out??
Agree with VB- this will make her sad.

मला वाटलं प्राजक्ताच्या डोक्यात केमिकल लोचा झाला मुन्ना भाई सारखा. पण नाही, शेवटी ते येडं निघून गेलं.

शेवटी ते येडं निघून गेलं.>>> Lol
मला असा शेवट अपेक्षित होता की पंकज हा संपूर्ण काल्पनिक माणूस होता जो प्राजक्ता ने तिच्यासाठी तयार केला. म्हणूनच पंकज ला प्राजक्ताच्या मनातलं कळतंय.
(प्राजक्ता schizophrenic आहे)>>>> अगदी +१

चांगली आहे कथा. एक-दोन वर्षांपूर्वी मौज दिवाळी अंकात मिलिंद बोकिलांची सरोवर नावाची लघुकादंबरी आली होती. तिची आठवण झाली वाचताना.

छान!

चांगली कथा आहे.सर्व फ्रेश आहे.
व्यक्तीशः असं सर्व हसत आयुष्यभर सहन करणारी माणसं उतारवयात प्रचंड आक्रमक बनतात, किंवा आतल्या आत सहन करत राहिल्याने 55 व्या वर्षी हार्ट ऍटॅक येऊन अल्ला के प्यारे होतात अशी एक दोन उदाहरणं.('जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला' वगैरे वचनं हेच सुचवत असावीत.आयुष्यभर चंदनापरी दुसऱ्या साठी झिजा, देव तुम्हाला लवकर घेऊन जाईल.)