शोध

Submitted by बेफ़िकीर on 13 June, 2015 - 05:47

रस्ता तापलेला आहे. डांबर जणू पुन्हा वितळत आहे. उन्हामुळे इकडे तिकडे बघवत नाही म्हणून रस्त्याकडे मान वळवावी तर रस्त्याकडेही बघता येत नाही. धग लागत आहे. डोळ्यांमधून चमका येत आहेत त्या प्रखर काळेपणाकडे बघताना. चपलांमधूनही रस्त्याचा गरमपणा पावलांमध्ये चढून झिरपत आहे. त्यातच वरून कोसळणारी गरम हवा पावलांना भाजून काढत आहे.

कोलाहल आहे सगळीकडे! वाहनांची गर्दी गच्च झाली आहे. सगळीकडून बूच लागावे तशी वाहने खोळंबून नुसती उभी आहेत. एकमेकांना खेटून मुंगीच्या पावलांनी सरकत आहेत. कर्कश्श हॉर्न वाजत आहेत. कानांचे पडदे फाटतील आता! प्रत्येकजण कावल्यासारखा! प्रत्येकजण प्रत्येक दुसर्‍या माणसावर खवळल्यासारखा! हॉर्नमधून शिव्या देत आहेत माणसे एकमेकांना! जो हॉर्न ऐकत आहे तोही भडकत आहे आणि वाजवणाराही! एक मोठा ट्रक रिव्हर्स घेत आहे. त्या ट्रकला वळसा घालून पलीकडची वाहने इकडे येऊ पाहात आहेत. इकडचे तिकडच्यांवर करवादत आहेत. सायकली दामटणारे फूटपाथवरून जाऊ लागले आहेत. फूटपाथवरून चालू पाहणारे रस्त्यावर आले आहेत. फूटपाथवरचे फेरीवाले सर्व आवाजांवर ताण करून आपापला माल विकू पाहात आहेत. कुठे बटाटे आहेत, कुठे प्लॅस्टिकची खेळणी आहेत, कुठे स्वस्तातले लहान मुलांचे कपडे आहेत, कुठे मासे आहेत तर कुठे केळी! हल्लकल्लोळ आहे सर्वत्र! जणू एक लढाई सुरू असावी. त्यातच मटणाची दुकाने आहेत. बाहेर बांधलेल्या बकर्‍या मलूलपणे बँ बँ करत आहेत. आतमध्ये एखादी मेंढी करूणपणे शेवटचा आक्रोश करत आहे. एका मगाशीच मेलेल्या बकरीचे अवयव एका ओल्या फडक्याने आच्छादून हुकला टांगलेले आहेत. काऊंटरवर दोन तीन जण समोर त्यांच्यासाठी खपाखपा कापले जात असलेले मटणाचे तुकडे पाहात आहेत. होलसेल धान्य विकणार्‍याच्या दुकानातून संमिश्र वास येत आहे. तो वास मटणाच्या वासात मिसळत आहे. त्यात पुन्हा वाहनांच्या धुराचा वास मिसळत आहे. त्यात कुठेतरी विकल्या जात असलेल्या हळदीचा वासही! त्यातच इतका उन्हातही भगभगत असलेल्या एका अमृततूल्यमधील चहाचा वास घुसत आहे. जवळून जाणार्‍या प्रत्येकाच्या अंगाचा किळसवाणा घामट वास त्यात मिसळत आहे. आणि कडी म्हणजे त्यातच भर फूटपाथवर असलेल्या सार्वजनिक मुतारीचा दुर्गंधही त्यातच स्वतःचे अस्तित्त्व पणाला लावत आहे. ह्या सगळ्या वासांचे मिश्रण नाकातून शिरून मेंदूला कोणती रसायने पाझरायला लावत असेल कोण जाणे! ओकारी कशी येत नाही तरीही कुणालाच? एक छपरी, स्थानिक बँक आहे. बँक कसली, ग्रामीण पतपेढीच ती! जणू लुबाडण्यासाठीच काढलेली! शेजारी कचरापेटी आहे. दहा बारा जण त्यात कचरा फेकत आहेत आणि दोघे तिघे तो मनोभावे एका टेंपोत भरत आहे. हा टेंपो कुठून तिथे पोचला असेल आणि आता कुठे जाणार असेल ह्याची काहीच कल्पना येऊ शकत नाही. त्यातच कुठल्यातरी दुकानात लग्नाचा बस्ता बसलेला आहे. असह्य उकाड्यात डझनावारी विविध वयाच्या आणि आकाराच्या तेलकट बायका गाद्यांवर बसून समोरचे साड्यांचे ढीग चिवडत आहेत. त्यांनी हातात निरखायला घेतलेल्या साड्यांच्या रंगाची निवड पाहूनसुद्धा शिसारी येत आहे. त्या भाव कमीजास्त करत आहेत. एक निर्जीव चेहर्‍याचा कृश तरुण आपली वक्तृत्वकला पणाला लावून त्या साड्या कश्या हायक्लास आहेत हे सांगत आहे. गल्ल्यावरचा मालक शून्य नजरेने रस्त्याकडे पाहात आहे. आतल्या साड्या विकल्या जाणार आहेत की नाही ह्यात जणू त्याला स्वारस्यच नाही. एक घाणेरडी पाणपोई फूटपाथवर आहे. त्यात तो साखळीला बांधलेला गडू हाताने बुडवून आत्तापर्यंत शेकडो जणांनी आपापले घसे ओले केलेले आहेत. बस्ता मांडून बसलेल्या बायकांमधील एखादी लेकुरवाळी आपल्या दिड वर्षाच्या मुलाला शू लागली म्हणून पाणपोईच्याच शेजारी आणून बसवत आहे. पानाच्या टपर्‍यांवर अनेक सडेफटिंग तोबरे भरून आणि कोणाच्यातरी आईबहिणींचा उद्धार करत तावातावामे बोलत आहेत, थुंकत आहेत. त्यांच्या स्वस्त सिगारेटींचे वास मळमळायला लागेल असे आहेत. त्यातच एक बंडल आणि जुनाट थिएटर आहे. आत्ता बारा ते तीनचा शो सुरू असून डोअरकीपर वगैरे लोक सरळ रस्त्यावर येऊन स्टूले टाकून बसलेले आहेत. अजून दिड तास त्यांना काहीही काम नसणार आहे. रस्त्यावरून येणारे जाणारे पोस्टरवरील सलमान आणि कोणत्यातरी जवळपास तितक्याच उघड्या नटीचा फोटो क्षणभर पाहून हृदयाचा चुकलेला ठोका पुन्हा सेट करत आहेत.

मान वर करण्याची कोणाचीच हिम्मत नाही आहे. सूर्याने जो काही ज्वालामुखी बरसवलेला आहे तिकडे बघणार कोण! पण कोणी मान वर केलीच तर ह्या असंख्य प्रकारच्या दुकानांवरील दोन दोन मजले दिसत आहेत. त्यात झेरॉक्सची दुकाने, केमीस्ट, नेट कॅफे, क्लासेस, टेलर्स, ब्युटी पार्लर्स, आयुर्वेदिक दवाखाने, शारीरिक कमजोरीवर रामबाण उपाय करणारे भामटे डॉक्टर्स, ज्योतिषी, वडा पाव आणि चहा विकणारी दुकाने, चपलांची दुकाने, होजिअरी, स्वीट मार्ट हे सगळे आहे. स्वीट मार्टमधील तेलकट राजस्थानी मुले 'समोसा गरम नसला तरी अब्बी निकाला है' म्हणत तो हातात देत आहेत. गिर्‍हाईक समोसा कुरवाळून वैतागून शेवटी कोणतीतरी माश्या बसलेली घाणेरडी बर्फी खात आहे. शेकडो गिर्‍हाईकांच्या हाताची घाण लागलेले ते केविलवाणे समोसे पुन्हा टोपलीत जाऊन बसत आहेत. त्या स्वीट मार्टच्या आतल्या टिचभर खोलीत टुकार फरशीवर सहा उघडीबंब मुले फक्त हाफचड्डी घालून काम करत आहेत. कोणी भल्या मोठ्या परातीत असलेले सारण घेऊन नवीन समोसे तयार करू पाहात आहे. कोणी काहीतरी तळत आहे. कोणी काहीतरी गाळत आहे. तेथील पंखा त्या तळणाचा धूरसुद्धा बाहेर धाडू शकत नाही आहे. त्यातच तीन हिजडे टाळ्या वाजवत आणि कंबर हालवत भीक मागत प्रत्येक दुकानासमोरून जात आहेत. त्यांना हमखास एखादे नाणे मिळत आहे. त्यांचा किळसवाणा मेक अप आणि किळसवाणे चालणे पाहून काही वेळ जात नसलेले लोक छद्मी हसत आहेत.

खाली गर्दीत अडकलेल्या चारचाकींच्या खिडक्यांवर हाताने टकटक करत एक भिकारीण तिच्या कडेवरचे अत्यंत कुपोषित आणि विचित्र बालक दाखवून भीक मागत आहे लाचार चेहरा कसा करायचा असतो ह्याचे जणू तिला बाळकडू पाजण्यात आले असावे. त्या बालकाला सूर्याची काहीही भीती वाटत नाही आहे. त्या बालकाची एक एक वर्षाच्या अंतराने मोठी असलेली दोन तीन भावंडे अर्धनग्न अवस्थेत रस्त्याकडेला एक डबडे हातात घेऊन खेळत आहेत. त्यातील त्यातल्यात्यात मोठी मुलगी सर्वात लहान मुलाला उचलू पाहात आहे. ते मूल रडत असल्यामुळे ती त्याला हातातील बारीक काडीने फटके देत आहे. त्या मुलात आता रडण्याचाही जीव उरलेला नाही.

सरकारमान्य दारू विक्री केंद्राबाहेर एक घाणेरडा म्हातारा मुडद्यासारखा निजलेला आहे. त्याच्या अंगावरून गाडी जात नाही आहे हे केवळ त्याचे भाग्य आहे. किंवा भोगही असतील. येणारेजाणारे त्याच्याकडे कोरडेपणाने पाहात आहेत. म्हातार्‍याच्या कंबरेखाली वाहिलेले ओघळ कसले आहेत हे सगळ्यांना कळत आहे, म्हातार्‍याला सोडून! तरीही त्या केंद्रात आत जाणार्‍यांची संख्या अमाप आहे. दारावर लावलेले स्वस्त पडदे चुकुनमाकून उडलेच तर आतले क्षणभर दिसणारे दृश्य अवाक करणारे आहे. काऊंटरवर लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. नुसते मीठ आणि कच्ची मिरची ह्याच्यासोबत लोक देशी दारू ढोसत आहेत. गुत्त्याच्या बाहेर एक हातगाडी चालवणारी म्हातारी उकडलेली अंडी विकत आहे. पण तिथे एकहीजण जात नाही आहे आणि तिलाही त्याचे सोयरसूतक नाही आहे.

ट्रकला अजूनही रिव्हर्स घेणे जमलेले नाही तोवरच तिथेच एक बस येऊन थांबली आहे. बसला हॉर्न नसल्यामुळे ड्रायव्हर इंजिनचा आवाज वाढवून संताप व्यक्त करत आहे. आता सगळेच खोळंबलेले आहे. पेंगुळलेली मेंगळट कुत्री निर्जीव असल्यासारखी पहुडली आहेत. एखादा भिंतीवरून धावणारा बोका पलीकडे दिसणार्‍या लटकलेल्या कबाबांकडे आशेने पाहात आहे. कर्कश्श ओरडणारे कावळे झुंडीनी एखाद्या मेलेल्या उंदरावर झेपावत आहेत.

एक भण्ण दुपार!

ही दुपार आपल्या प्रत्येक इंद्रियावर झेलत तो विषण्णपणे चाललेला आहे. त्याला जे दिसत आहे ते मेंदूपर्यंत पोचत नाही आहे. त्याच्या चालण्यात एक संथपणा आहे. त्याला घाई नाही. चालणे आणि थांबणे दोन्ही समान आहे त्याच्यासाठी! त्याला मान वर करताना सूर्याचा विशेष त्रास होत नाही आहे. आपल्याला केव्हाची तहान लागली आहे हे तो विसरलेला आहे. त्याला धक्के मारून लोक जात आहेत पण त्याचे त्याला काही वाटत नाही आहे. त्याच्या संथ चालण्याला शिव्या देत लोक जात आहेत हेही त्याला समजत नाही आहे.

तो शोधत आहे शहाणपणा!

पण त्याला शहाणपणा सापडतच नाही आहे. पुन्हा पुन्हा वेडा ठरण्याचा त्याला कंटाळा आला आहे. त्याला रस्त्यावर दिसत आहे दुतर्फा झाडी! झाडांनी वर जाऊन एकमेकांत आपापल्या फांद्या मिसळून केलेला बोगदा! त्याला दिसत आहे रस्त्यामध्ये नसलेला डिव्हायडर! त्याला दिसत आहे पाणपोईवर पाच पैशाला एक ग्लास विकले जाणारे शुद्ध पाणी आणि ते विकण्यासाठी नेमलेला एक कोणीतरी बेरोजगार! त्याला दिसत आहे एक सार्वजनिक शौचालय जेथे स्त्री व पुरुष दोघांसाठी सोय असून योग्य ते शुल्क आकारून मेन्टेनन्स ठेवलेला आहे. त्याला दिसत आहेत खास ठेवलेल्या डब्यातच पान थुंकणारे सभ्य लोक! भीक मागणार्‍या बाईच्या जागी त्याला काकड्या किंवा पेरू विकणारी बाई दिसत आहे, तीही हसतमुख, लाचार नव्हे!

त्याला वाहनांच्या धुराऐवजी झाडाच्या पानांचा गंध येऊन येणारा वारा भिडत आहे. कोणत्याही वाहनाला हॉर्न वाजवायची गरजच नाही अशी अवस्था दिसत असल्यामुळे त्याच्या चेहर्‍यावर एक वेडसर हसू आहे. लोक दुसर्‍याला पुढे जाऊ देत आहेत आणि तसे करताना एकमेकांना हसून हात करत आहेत. खाद्यपदार्थांव अधूळ आणि माश्या फिरकतही नाही आहेत. त्याला दिसत आहेत हातात ग्लोव्ह्ज घालून समोसे पॅक करणारे वेलड्रेस्ड नोकर!

त्याला हे सगळे अनेक वर्षे दिसत आहे. ही गोष्ट आजची नाही. गेली कैक वर्षे तो अशी दृश्ये पाहत आलेला आहे. इतरांना सांगत आलेला आहे. इतरांच्या गळी उतरवण्याचे हरतर्‍हेचे प्रयत्न करत आलेला आहे. स्वतः गटारे साफ केली आहेत त्याने! पानाच्या टपरीपाशी स्वतः दोन दोन तास उभे राहून तेथील पानवीरांना 'कृपया येथे थुंका' असे विनवणीपूर्वक सांगण्यात त्याने खूप काळ दवडलेला आहे. सहा, सातवेळा तर तो चक्क मुतारीच्या आत उभे राहून लघ्वी करून बाहेर पडणार्‍या माणसाला 'अहो, पाणी सोडा आणि जा' असे म्हणून टीकेस पात्रही झालेला आहे.

महापालिकेत त्याने शेकडो अर्ज केलेले आहेत. नगरसेवक आणि इतर पदाधिकार्‍यांचे उंबरे झिजवलेले आहेत. त्याला दिसत आहेत फक्त अधिकृत बांधकामे!

खूप वर्षे शहाणपणा शोधत राहिल्यानंतरही अपयशी ठरल्यामुळे त्याने आता 'वेडा' ही पदवी मोठ्या खुषीने स्वीकारलेली आहे. त्याला दिसते अजूनही सगळे तेच जे त्याला आजवर दिसायचे. पण आता 'हे आपल्याला एकट्यालाच दिसू शकते' इतके तरी त्याला कळले आहे.

तो रोज इथेच फिरत असतो. तो दिसला की आजूबाजूचे दुकानदार किंवा फेरीवाले एकमेकांना डोळे मिचकावून खाणाखुणा करतात. मग कोणीतरी त्याला शुकशुक करते. कोणीतरी 'हे खाणार का' असे विचारते आणि तो आशेने जवळ आला की हाड करते. त्याने पाणपोईत गडू बुडवला की त्याच्या कंबरेत सणसणीत लाथ बसते. त्याला ओळखणारी लहान मुले हळूच त्याला लहानसा दगड मारून पळतात आणि हसत सुटतात. तो क्षणभर वेदनांनी केविलवाणा होतो आणि पुन्हा वेड्यासारखा हसत पुढे जाऊ लागतो. शेवटी संध्याकाळी कोणीतरी त्याला सकाळचा एक समोसा उघड्या हातांनी धरून कागदात घालून देते. कोणीतरी त्याला मुतारीवरच्या नळाचे पाणी प्यायला परवानगी देते. आणि कोणीतरी त्याला पानाच्या टपरीबाहेरच्या लालेलाल जमीनीशेजारी पथारी पसरायला नाही म्हणत नाही.

मग रात्री चकाट्या पिटणारे हमखास त्याचा विषय काढतात.

"आयला ह्याचं ऐकलं आस्तं ना घवर्मेन्नी, तं हितला पार कायापालट झाल्याला आस्ता"

मग त्याची चर्चा सुरू होते. त्याने कधीकाळी घेतलेल्या अपार कष्टांचे तोंडभरून कौतुक होते. आणि मग शेवटी गस्तीला असलेला एखादा पोलीस आपल्या काठीने त्याला ढोसून उठवतो आणि म्हणतो......

"उठे भाडखाव, बापाची जागाय क्काय? ऊठ??"

मग तो उठून कुठेतरी लांब जातो. दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा येतो रस्त्यावर!

शहाणपणा शोधायला!

==================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users