अबोली

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 24 January, 2019 - 09:30

फुलं आवडणारी माणसं असतात. फुलं केसात माळणारीही... फुलांच्या माळा गुंफणारी, तशीच देवाच्या चरणी वाहणारीही. पण तो मात्र फूलवेडा होता. आणि तेही एका अशा फुलासाठी ज्याचा कसलाच गंध नव्हता. अबोली. अबोलीची फुलं त्याला खूप आवडायची. मोठ्या बंगल्यात राहायचा तो. सोबत वडील फक्त. आई तो लहान असतानाच निवर्तली होती. भावंडं कोणी नव्हतं. वडिलांचा एकही शब्द खाली पडू द्यायचा नाही. वडील खूप बोलके. ओळख नसलेल्या माणसालाही चुटकीसरशी मित्र बनवतील. पण हा अगदीच शांत. घुम्या म्हणावा इतका कधीकधी.
त्याने बंगल्याच्या आवारात अबोलीचे ताटवेच्या ताटवे फुलवले होते. त्या फुलांना अगदी जीवापाड जपायचा. त्याच्या पाकिटात एक फोटो होता, त्याच्या आईचा. त्यात तिने भरगच्च अबोलीचा गजरा माळला होता. त्याच्या नजरेसमोर आई तशीच उभी राहायची, डोळ्यात स्निग्ध प्रेम असलेली, हसरी, शांत तेवणारी समईच जणू. त्याच्या वडिलांनी सगळा व्यवसाय आता त्याच्याकडे सोपवला होता. आजकाल त्याच्यामागे सारखा एकच लकडा लावला होता त्यांनी. लग्न कर...

तो जमेल तितका विषय टाळायचाच. पण एक दिवस त्यांनी त्याचं काही ऐकलं नाही. एक फोटो दाखवला त्यांनी. सावळा रंग, बोलके डोळे आणि केसात माळलेली चाफ्याची वेणी. तो काही वेळ पाहतच राहिला. त्याच्या गप्प बसण्याला त्याची संमती मानून वडिलांनी लग्न ठरवलं. लग्न झालं आणि ती त्याच्या घरी अाली.

ती. कशी होती? अगदी अल्लड. खोडकर. हसरी. तिच्या आई बापाने तिला अगदी लाडाकोडात वाढवली नसली तर तिच्या घराचा जीव होती ती. सहा भावंडात सगळ्यात मोठी. बहिणींचं आवरण्यापासून ते भावांचे हट्ट पुरवण्यापर्यंत सगळ्यांचं सगळं अगदी निगुतीने करणारी. आईचा उजवा हात जणू, एकाहाती सगळी काम उरकणारी. तिचा बाप गरीब होता. त्याला वाटायचं हि गोड पोरगी भरल्या घरात द्यावी. पोरगी सोन्यासारखी आहे, तिला सोन्यासारखं घर, नवरा मिळावा. पण चांगलं स्थळ म्हणजे मजबूत हुंडा. तिथे त्याचा उपाय चालायचा नाही.

त्याच स्थळ सांगून आलं तेंव्हा बापाला आकाश ठेंगणं झालं होतं. त्याने त्याच्यापरीने हौसेनं लग्न करून दिलं. नवऱ्यामुलाच्या वडिलांच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. नेसत्या साडीनिशी मुलीला द्या असं सांगितलं होत त्यांनी. पोरीनं नशीब काढलं जो तो म्हणत होता.
ती घरी अाली. घरी कोणीच बाईमाणूस नाही. नाही म्हणायला ह्याची आत्या येऊन राहिली होती लग्नासाठी. तिनेच पोरीला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. चार दिवस राहून आत्या परत गेली तिच्या घरी. त्या दिवशी संध्याकाळी तिला खूप उदास वाटायला लागलं. घरच्यांची आठवण यायला लागली. डोळे पाण्याने डबडबले तिचे. देवापुढे सांजवात करत असताना रडायलाच लागली ती.
त्याच्या वडिलांच्या ते लक्षात आलं. त्यांनी आतून जाऊन पाणी आणून दिलं तिला. म्हणाले “पोरी, रडू नको. माहेरची आठवण आली का?”
त्याने तिचा बांधच फुटला. खूप रडली ती. सासऱ्यांनी तिला मनसोक्त रडू दिलं. अखेर बऱ्याच वेळाने ती शांत झाली. सासरे म्हणाले, चल काहीतरी खाऊन घेऊया. त्यांनी पटकन खिचडीचा कुकर लावला. तिला आश्चर्यच वाटलं, त्यावर ते म्हणाले, “अगं इतकी वर्ष आमची ही गेल्यापासून मीच करतोय सगळं. आणि काळजी करू नकोस बरं, तुझ्या नवऱ्यालाही सगळं शिकवलंय.” ती हसली.
तिथून पुढे त्या दोघांची अगदी गट्टीच जमली. वडिलांच्या जागी मानून ती मनातलं सगळं बोलली त्यांच्याशी त्या एका आठवड्यात. त्यांचा आधार वाटायला लागला तिला.

तो, तिचा नवरा, ज्याच्यासाठी ती तिचं माहेर सोडून अाली होती, तो, तिच्याशी अगदी मोजकेच शब्द बोलला असेल. तिच्या येण्याने त्याचा दिनक्रमही काही फारसा बदलला नव्हता. अगदी पहाटेच उठायचा, व्यायाम करून, आवरून कामाला निघून जायचा. हां आता त्याच्याकडे नियमित तिने दिलेला गरमागरम जेवणाचा डबा मात्र असायचा.
एके दिवशी सकाळी त्याचं आवरून नेहमीप्रमाणे नाश्ता करायला तो स्वयंपाकघरात आला आणि बघतच राहिला तिच्याकडे. तिने आपले लांब केस धुतले होते, अर्धे ओले केस तसेच एकमेकात गुंतवले होते आणि त्यावर त्यांच्या बागेच्या अबोलीचे सुंदर गजरे माळले होते. त्याचं एकटक बघणं तिच्या लक्षात आलं. तिला वाटलं आत्ता काहीतरी बोलेल, मग बोलेल पण तो नाश्ता उरकून निघून गेला. ती हिरमुसलीच. त्याच्या तोंडून दोन प्रेमाचे शब्द ऐकायला आतुर झाली होती पण त्याच्या जगात जणू तिला अजून प्रवेशच नव्हता.

दुपारी तिच्या सासऱ्यांनी सांगितलं कि ते दोन दिवसासाठी बाहेरगावी जाणार आहेत. काहीतरी महत्वाचं काम होतं. न टाळण्यासारखं. तिचे डोळे पुन्हा भरून आले. आता इतक्या मोठ्या घरात तीच एकटी.
सासऱ्यांनी तिला समजावलं, म्हणाले “अगं असा जाईन आणि असा येईन बाळा. काळजी करू नको. आणि तू एकटी कुठे आहेस? तुझा नवरा आहे की” त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं.
ती त्यांच्या समाधानाखातर हसली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते गेले. नवरा त्यांना सोडून कामाला गेला. हि एकटीच घरात. सकाळ घरची कामं उरकण्यात गेली. दुपारी काहीच काम उरल नव्हतं. तिने उगाचच स्वच्छता काढली सगळ्या घराची. सगळं आवरेपर्यंत संध्याकाळ झाली. घर अगदी लखलखीत दिसत होतं. मग तिने स्वयंपाक करायला घेतला. सासऱ्यांनी त्याला आवडतात म्हणून सांगितलेली कांदाभजी, खीर केली. इतकं होऊनही अजून तो यायला वेळ शिल्लक होता. ती छान आवरून त्याची वाट बघत बसली. आता कुठल्याही क्षणी तो येईल म्हणून. पण तो आला नाही. दोन तास उलटले. आता अंधार पडायला लागला होता. तिला काळजी वाटायला लागली. त्याच्या फोनवर फोन केला तर तो लागेना. तिने देवासमोर निरांजन लावलं. मन शांत ठेवायला रामरक्षा म्हणत बसली. पण जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तशी तिची अस्वस्थता वाढायला लागली. सासऱ्यांना फोन करावा का असं मनात आला तिच्या, पण ते उगाच काळजी करत बसतील म्हणून तिने फोन करण्याचा मोह टाळला.
आणखी थोडा वेळ वाट पाहिल्यावर मात्र तिचा धीर सुटायला लागला. आता रात्र झाली होती. ती दिवाणखान्यात येरझाऱ्या घालत होती. खूप उशीर झाला होता आता. शेवटी न राहवून तिने सासऱ्यांना फोन केलाच. त्यांनी तिला समजावून सांगितलं काळजी करू नको. त्याला कधी कधी उशीर होतो, मी पण लावतो त्याला फोन. येईल तो लवकरच. तिला जरा बरं वाटलं.
परत वाट पाहायला लागली ती. अखेर रात्री जवळजवळ १२ च्या सुमाराला तो घरी आला. हातातली पिशवी तिच्याकडे देऊन जणू काही विशेष झालंच नाही असा चेहरा करत तो निघालाही हातपाय धुवायला. मग मात्र तिचा संयम सुटला.
“थांबा” तिचा आवाज त्याने पहिल्यांदाच इतका मोठा ऐकला असेल.
तो थबकला.
“उशीर होणार होता तर फोन का केला नाहीत? आपली घरी कोणीतरी वाट पाहत असेल, काळजीत असेल हे तुमच्या लक्षात आलं नाही का?”
“मी..” त्याच्याकडे उत्तर नव्हतं. घरी फक्त वडील असायचे या आधी, आणि त्यांना याचा स्वभाव माहित होता त्यामुळे तो कधीच उशीर होणार आहे म्हणून फोन करायचा नाही आणि तेही करायचे नाहीत पण तो येईपर्यंत बाहेर कट्ट्यावर बसून राहायचे. ती एकटी आहे, वाट पाहत असेल आपण तिला कळवायला हवं असं त्याच्या डोक्यातच आलं नव्हतं.
“कोणी जाब विचारात नाही म्हणून मन मानेल तसं वागायचं का? बाबा पण तुम्ही येईपर्यंत वाट बघत असतात, त्यांनाही तुम्ही कळवत नाही. का असं? का आम्ही कोणीच नाही आहोत तुमचे?” ती काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती.
“पण मी..” त्याने मध्ये बोलायचा प्रयत्न केला.
“माझं बोलणं संपलेलं नाहीये अजून. आपल्यावर विश्वास ठेऊन एक नवीन व्यक्ती घरात आलीये, तिला काय हवं नको ते तर जाऊदेत पण साधं बोलायलाही तुमच्याजवळ वेळ नाही का? मला किती काळजी वाटत होती.. काही झालं की काय...” आणि हमसून हमसून रडायला लागली ती. त्याला कळेना तिला शांत कसं करावं. त्याने पटकन स्वयंपाक घरात जाऊन पाणी आणलं. तिला सोफ्यावर बसवलं आणि पाणी प्यायला लावलं. ती जरा शांत झाल्यावर त्याने जेवायला पानं वाढून घेतली. ती शांत झाली होती पण त्याच्यावरचा तिचा राग गेला नव्हता. तिने काहीच न बोलता जेवण केलं. स्वयंपाकघरातली झाकपाक त्यानेच केली. तो त्यांच्या खोलीत परत येईपर्यंत ती झोपून गेली होती. त्याने हळुवार तिच्या अंगावर पांघरूण घातलं आणि हसला. आजवर त्याला जाब विचारणारं कोणी नव्हतंच. तो त्याच्या मनाचा राजा होता. पण आज त्याला त्याची मालकीण मिळाली होती. हक्काने काळजी करणारी. हक्काने बोलणारी आणि हक्काने रागवणारीही. किती सुंदर दिसत होती ती. तिच्याकडे पाहत त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही.

सकाळी तिला अंमळ उशिराच जाग आली. तो शेजारी नव्हताच, नेहमीप्रमाणे लवकर उठला असेल म्हणून पटकन अंघोळ आटोपून ती स्वयंपाकघरात आली तर पोह्यांचा खमंग वास सगळीकडे पसरला होता. तो टेबलवर प्लेट्स ठेवत होता. त्याने तिला हात धरून खुर्चीवर बसवलं, समोर गरम पोहे आणि वाफाळता चहा ठेवला. ती सुखावली पण अजूनही हा काहीच बोलत नाहीये याच तिला खरंतर आश्चर्यच वाटलं. तिने पोहे आणि चहा संपवला. तो उठून बाहेर गेला. ती संभ्रमात पडली होती. असा कसा हा? काल आपण इतकं बोललो तरी याला काहीच बोलावं असं वाटू नये? निदान रागाने तरी?

ती उठून आपल्या खोलीत जाणार तेव्हढ्यात तिला कट्ट्यावर एक परडी ठेवलेली दिसली, तिने ती उचलली आणि तिचे हातही दरवळले. सोनचाफ्याच्या फुलांनी भरली होती ती परडी. तिने तो सुगंध श्वासात भरून घेतला. तिचं आवडतं फुल. त्या परडीत एक कागदही होता. तिने तो उघडला,
त्याने लिहिलं होतं,
“माझ्या सोनसळी चाफ्याच्या फुला,
मला माफ कर. कालसाठी... चाफा दूर असलेल्या माणसालाही त्याच्या दैवी सुगंधाने जवळ यायला भाग पडतो तसंच काहीसं झालंय बघ.
पहिलं तर मला कालच्यासाठी माफ कर. पुन्हा असं होणार नाही.
काल तू बोललीस तसं आजवर कोणीच माझ्याशी बोललं नव्हतं.
अबोलीच्या फुलांवर प्रेम करता करता मीही तसाच कधी बनलो कळलंच नाही. काल तू जे बोललीस ते अगदी जीवापासून आलेलं होतं गं.
माझ्यावर हक्क सांगणारी तू पहिलीच. आणि त्या हक्कासाठी भांडणारीही. तू अबोली नाहीस याचं मला दुःख नाही उलट तू सोनसळी चाफा आहेस याचा आनंद आहे मला.”
तिने समोर पाहिलं, तो परत आला होता. तिच्या हातून तो कागद खाली पडला. ती धावतच जाऊन त्याच्या मिठीत विसावली आणि त्याच्या हातातली चाफ्याची फुलं तिच्या केसात हसू लागली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

छान लिहिलीय....
Short n Sweet..

हे त्या गोड मुलीसाठी...
_IMG_000000_000000_12.jpg

आणि हे तिच्या समंजस अबोल नवर्यासाठी...

IMG-20190125-WA0002.jpg

खूप सुंदर लिहिलंय.

चाफा भाव खाऊन जातोच पण अबोलीही खूप सुंदर असते हे मस्त दाखवून दिलंय - कथेने आणि निरु यांच्या प्रचिने पण!

धन्यवाद माधव, कोमल १२३४५६, नानबा, दत्तात्रय साळुंके, भावना गोवेकर, Kally, वैशालि कदम, नँक्स, पलक आणि मंजूताई Happy

> आधी वाटला मुलगा गे आहे आणि सासरा सून अफेयर होतंय की काय, > एवढं स्कॅन्डलयाझिंग लेखन? मराठी आंजावर?? आणि तेपण स्त्रीआयडीकडून??? कायपन अपेक्षा आहेत बरं तुमच्या च्रप्स Biggrin

एनिवे ही काही पिवळ्या पुस्तकांची साईट नाही. पण तरीही साधारण लेखन जरा जास्तच गोडगोड, सुसंस्कारी, अपोलोजेटीक असे असते....

यानिमित्ताने मनात एक प्रश्न आला मराठीत इस्मत चुगताईसारखे लिहणारी कोणी लेखिका होती/आहे का? बहुतेक कविता महाजन होत्या...