‘अ’ जीवनसत्व : निरोगी दृष्टीचा मूलाधार

Submitted by कुमार१ on 8 January, 2019 - 00:45

जीवनसत्त्वे लेखमाला : भाग २

( भाग १ : https://www.maayboli.com/node/68579)
* * * *

सामान्यजनांना ‘अ’ या नावाने परिचित असलेल्या या रासायनिक घटकाला जीवनसत्वांच्या यादीत अग्रस्थान द्यायला काहीच हरकत नाही. त्याचे अधिकृत नाव Retinol आहे. आपल्या निरोगी दृष्टीसाठी ते अत्यावश्यक असते. याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्वाची कार्ये ते शरीरात करते. गरीब देशांतील दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्यांमध्ये त्याचा आहारातील अभाव बऱ्यापैकी आढळतो. त्यामुळे अनेक राष्ट्रीय आरोग्यसेवांच्या माध्यमातून ‘अ’ च्या गोळ्यांचा पुरवठा वंचितांना केला जातो.
अशा या महत्वाच्या जीवनसत्वाचा परिचय या लेखात करून देत आहे.

शोधाचा इतिहास:
रातांधळेपणाची समस्या प्राचीन काळापासून माहित होती. तेव्हा इजिप्तमध्ये यावर संशोधन चालू झाले. सुरवातीस आहारातील एखाद्या पदार्थाने त्यावर फरक पडतो का यावर लक्ष केंद्रित केले गेले. प्रयोगांती असे आढळले की मांसाहारातील यकृताचा भाग अशा रुग्णास नियमित दिल्यास त्याला बराच फरक पडतो. नंतर काही वैज्ञानिकांनी दुधामधून काही ‘मेदरुपी घटक’ शोधले आणि ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यावेळेस या घटकांना ‘अ’ असे तात्पुरते नाव देण्यात आले. पुढील संशोधनात हे घटक डोळ्याच्या दृष्टीपटलात (retina) असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांचे रासायनिक नामकरण Retinol असे झाले. हेच ते ‘अ’ जीवनसत्व. ते केवळ एक रसायन नसून अनेकांचे मिळून एकत्र कुटुंब आहे (Retinoids).

नंतर ते वनस्पतींत शोधण्यात आले. तेव्हा असे आढळले की नारिंगी रंगाच्या भाजीपाल्यांत ते Carotene या रुपात आढळते. किंबहुना गाजरामध्ये (Carrot) ते विपुल असल्यानेच त्याला हे नाव पडले. Carotene हे Retinol चे पूर्वरूप (precursor) आहे. अशा भाज्यांमधून ते शरीरात गेल्यावर त्याचे पक्क्या ‘अ’ मध्ये रुपांतर होते.

आहारातील स्त्रोत:
Foods+High+in+Vitamin+A+Carrots+Papaya+Squash+Fish+Meat+Eggs+&+Cheese.jpg

१. शाकाहार: गाजर, तांबडा भोपळा, रताळे, हिरव्या पालेभाज्या, इ.
२. प्राणीजन्य आहार: यकृत, मासे, दूध, अंडे.

आता या दोन्ही प्रकारच्या स्त्रोतांमधील फरक पाहू. शाकाहारातून Carotene मिळते आणि शरीरात त्याचे ‘अ’ होते. ही प्रक्रिया होताना एक महत्वाचा बदल होतो. जर आपण Caroteneचे १० भाग खाल्ले तर शरीरात त्यापासून फक्त १ भाग Retinol (‘अ’) तयार होते. शुद्ध शाकाहारीनी हा मुद्दा ध्यानात घ्यावा. म्हणून त्या भाज्या भरपूर खाल्ल्या पाहिजेत. याउलट प्राणीजन्य आहार थेट Retinol पुरवतो.
आहारातून शोषलेल्या ‘अ’ चा बऱ्यापैकी साठा आपल्या यकृतात केला जातो. तिथून गरजेप्रमाणे ते सर्व शरीराला पुरवले जाते. त्यातील डोळ्याचा वाटा महत्वाचा आहे.
अलीकडे तेलासारख्या खाद्यांमध्ये कृत्रिम ‘अ’ घालून त्यांना ‘ संपन्न' केले जाते. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकातून ते सर्वांना मिळू शकते.

शरीरातील कार्य:
१. त्याचे सर्वात महत्वाचे कार्य आपल्या दृष्टीसंदर्भात आहे. दृष्टीपटलामध्ये Rhodopsin हे प्रथिन असते ज्यामध्ये ‘अ’चा समावेश असतो. प्रकाशकिरण या प्रथिनावर पडल्यावर अनेक रासायनिक क्रिया होतात. त्यातून आपल्या मेंदूला ‘दृष्टीसंदेश’ पाठवला जातो. निरोगी दृष्टीसाठी आपल्या दृष्टीपटलात Rhodopsin चा भरपूर साठा असावा लागतो.

२. आपल्या त्वचेवर आणि सर्व पोकळ इंद्रियांमध्ये एका पातळसर संरक्षक पेशींचे (epithelium) अस्तर असते. या सर्व पेशींना ‘अ मजबूत करते. या पेशी श्वसनमार्ग, मूत्रमार्ग, आतड्यांमध्ये आणि अन्यत्रही संरक्षक असतात. असे हे अखंड अस्तर आणि त्वचेवरील थर रोगजंतूना रोखण्याचे काम करतात.

३. सर्व पेशींमध्ये ‘अ’ सूक्ष्म पातळीवर काम करते. त्याद्वारे ते अनेक जनुकांच्या नियंत्रणात भाग घेते. परिणामी ते पेशींची वाढ आणि विकास या मूलभूत गोष्टींचे नियंत्रण करते.

४. त्याचा antioxidant हा अजून एक महत्वाचा गुणधर्म. पेशींमधील रासायनिक क्रियांतून free radicals प्रकारची अस्थिर रसायने तयार होतात. ती जर जास्त प्रमाणात साठू लागली तर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यातून कर्करोगादिंचा धोका संभवतो. पेशीतले antioxidant पदार्थ या घातक अस्थिर रसायनांचा नायनाट करतात. या कामी ‘अ’ च्या जोडीने ‘इ’ व ’क’ या जीवनसत्वांचे योगदान महत्वाचे आहे.

अभावाचा जागतिक प्रादुर्भाव:
जगातील ७५ देशांमध्ये हा मोठा आरोग्य-प्रश्न आहे. त्यातले बरेचसे देश दक्षिणपूर्व-आशियाई व आफ्रिकी आहेत. प्रौढांच्या तुलनेत मुलांत ‘अ’ चा यकृत-साठा बराच कमी असतो. त्यामुळे त्यांच्यात अभावाची लक्षणे लवकर दिसतात. आज जवळपास २५ कोटी मुले या अभावाची शिकार झाली आहेत. त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चिंताजनक आहे. त्यापैकी सुमारे चार लाख मुले दरवर्षी अंध होतात. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य कळेल.

आहारातील अभावाखेरीज आतड्यांच्या व स्वादुपिंडाच्या काही आजारांमध्ये ‘अ’ चे शोषण नीट न झाल्याने अभावाची लक्षणे दिसू शकतात.

अभावाचे परिणाम:
१. दृष्टीवरील दुष्परिणाम सर्वात महत्वाचे. रोगाच्या सुरवातीस जेव्हा Rhodopsinचा साठा कमी होऊ लागतो तसे रुग्णास अंधुक प्रकाशात कमी दिसते. पुढे रातांधळेपणा होतो. या स्थितीतच ‘अ’ चे उपचार सुरु करायचे असतात. जर दुर्लक्ष केले तर मग दृष्टी हळूहळू अधू होत जाते. त्याचबरोबर डोळ्यातील अस्तराचा ऱ्हास होऊन डोळा कोरडा पडतो. याही स्थितीत दुर्लक्ष केल्यास डोळ्याची अवस्था खराब होत शेवटी पूर्ण अंधत्व येते.
अभावाच्या सुरवातीस जर डोळ्यांची तपासणी तज्ञाने केली तर त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण ठिपके (Bitot spots) दिसू शकतात.

२. त्वचेवरील परिणाम : ती कोरडी पडते. जाड, लालसर व खवले पडल्यासारखी दिसते आणि खूप खाजते.

३. जंतूसंसर्ग : रक्तक्षय आणि दुबळ्या प्रतिकारशक्तीमुळे शरीरात जंतू सहज शिरतात आणि विविध दाह होतात.

उपचार:

अभावाची लक्षणे दिसू लागताच त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार चालू करावेत. त्यासाठी ‘अ ’च्या गोळ्या मिळतात. गंभीर रुग्णांमध्ये इंजेक्शनचा पर्याय वापरला जातो.
रोगप्रतिबंध:
आपल्या देशातील बालकांना शालेयपूर्व वयात रोगप्रतिबंधक म्हणून ‘अ’ चे मोठे डोस देण्याची पद्धत अवलंबली जाते.

‘अ’ चे उपचार नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. अनावश्यक जास्त डोस घेतल्यास त्याचे यकृत, मेंदू व त्वचेवर दुष्परिणाम होतात.
* * *

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली माहिती, धन्यवाद.

नावडत्या भाज्या शिजवून, वाटून रोजच्या पोळ्यांच्या कणकेत मिसळायच्या. गाजर, लाल भोपळा, दुध्या हे अ‍ॅक्टर्स आलटून पालटून या नाटकात घेते मी. Happy
थालिपिठांत कुठल्याही भाज्या किसून घालता येतात.
फोडणीत हिरव्या मिरच्या घालून त्यावर गाजराचा कीस परतायचा. त्यात दाण्याचं कूट, ओलं खोबरं, चवीप्रमाणे मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालायचा. आधणाचं झाकण ठेवून वाफेवर कीस शिजवायचा. अगदी मेण करायचं नाही. नंतर वरून कोथिंबीर घालायची. सुंदर लागते अशी पचडी!

उकडलेले गाजर ब्रोकोली आणि किंचित कांदा आणि मिरपूड घालून सूप भारी बनते.
कुमार, उत्तम माहिती.हे सर्व साठवून ठेवणार आहे कायम वाचायला.

सर्व नवीन प्रतिसदकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार ! छान सहभाग.

* मुलांना पपई देतो. अगदी आवडीने खातात. या फळाचे इतरही खूप फायदे आहेत. >>> पपई ही जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतरही अनेक घटकांनी समृद्ध आहे. इतिहासात कोलंबसाने तिचे वर्णन 'देवदूतांचे फळ' असे केले आहे !

* सुंदर लागते अशी पचडी! >>> लै भारी, माझीही पसंद.

* मिरपूड घालून सूप भारी बनते. >>> या थंडीत तोंडाला पाणी सुटले ब्वा ! लवकरच करण्यात येईल.

दाण्याचं कूट, ओलं खोबरं, चवीप्रमाणे मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालायचा. आधणाचं झाकण ठेवून वाफेवर कीस शिजवायचा. सुंदर लागते अशी पचडी!>>>स्वाती , धन्यवाद. करून पाहिन

उकडलेले गाजर ब्रोकोली आणि किंचित कांदा आणि मिरपूड घालून सूप भारी बनते. >>>>> प्लिज ही रेसिपी लिही ना. घरात भरपूर ब्रोकोली आहे, थंडीमुळे गाजर पण असतंच. माझी सूप्स जाम बंडल आणि बोअर होतात, जरा दुसऱ्याच्या टिप्स वापरून काही टेस्टी झालं तर पहाते.

त्यापैकी सुमारे चार लाख मुले दरवर्षी अंध होतात. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य कळेल.>>>>>
खूप वाईट वाटले हे वाचून.
यात भारताची काय परिस्थिती आहे ?

@ साद,

दरवर्षी आशियात अडीच लाख मुलांना असे अंधत्व येते. त्यापैकी ५२००० भारतातली असतात.
त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी महत्वाची असते.

माहितीपूर्ण लेख धन्यवाद.
तमिळ लोक गाजराचे बारीक बारीक तुकडे करुन तेलात सुक्या लाल मिरच्या आणि उडीद डाळीची फोडणी घालून भाजी करतात. भाजी झाली की वर नारळाचा चव पसरवतात. ती भाजी छानच लागते. ही भाजी खूप वेळ गाजराला पाणी सुटेतोवर नाही शिजवायची.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.

या चर्चेत अनेकांनी गाजराबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. त्यासंबंधी अनेक चविष्ट पाककृती आपण लिहिल्यात याचा आनंद वाटतो. गाजराबद्दल एक शब्दसमूह मला अन्य संस्थळावर समजला. तो आता लिहितो.

खुशीची गाजरे” =
काहीही न करता बसल्या ठिकाणी स्वर्गसुखाचा हव्यास धरणे.

रच्याकने .….
आपण सगळे खरीखुरी गाजरे खाऊन आपल्या डोळ्यांना खुशीत ठेवूया !

खुशीची गाजरे” >>>>

डॉक्टर, यात जरी व्हिटॅमिन नसले तरी कधीकधी खावीशी वाटतात हो ☺️
धन्यवाद, पुभाप्र

डॉ . माझा मुलगा १४ वर्षाचा आहे . त्याला retinitis pigmentosa हा डोळ्यांचा आजार ४ वर्षापूर्वी detect झाला . यावर सध्या तरी काही इलाज नाही असे कळले आहे . नियमीत eye checkup करतो . या व्यतीरीक्त अ जीवनसत्वाशी संबधीत काही माहीती किंवा उपाय, tips सुचवू शकाल का?
तूमचे लेख नेहमीच मार्गदर्शन पर व उपयूक्त असतात
धन्यवाद

वीणा , धन्यवाद.
retinitis pigmentosa हा आनुवंशिक आजार आहे. त्यात विशिष्ट पेशींचा नाश होतो. त्याचे अनेक प्रकार असतात. त्यातील काही प्रकारांत अ जीवनसत्वाचे मोठे डोस दिल्यास आजाराची प्रक्रिया कमी होऊ शकते. त्यासाठी
तुमच्या नेत्रतज्ञाचा सल्ला महत्वाचा आहे.

प्रखर प्रकाशा पासून काळजी घ्यावी.
हल्ली कृत्रिम दृष्टीची यंत्रे, अनेक संगणकीय प्रोग्रॅम असे आधुनिक उपचार आहेत. त्याची माहिती तुमचे डॉ देतीलच.

माझ्या शुभेच्छा !

आम्ही रोज पोहे/उपमा/थालिपीठ/काही भाज्या यात गाजर किसून घालतो.
यात गाजर शिजवण्याचा फायदा मिळू शकेल का?
गाजराची कोशिंबीर वर फोडणी घालून खाल्ली जाते. आणि गाजराची भाजी क्वचितच करतो.

मोहिनी
चांगली सवय आहे तुमची.
होय, कच्चे गाजर आणि शिजवलेले गाजर यात एक फरक पडतो.
गाजरामध्ये कॅरोटीन हे रंगद्रव्य आहे. ते शरीरात गेल्यानंतर त्याचे अ जीवनसत्वात रूपांतर होते. गाजर शिजवून खाल्ल असता हे रूपांतर होण्यास अधिक मदत होते
फोडणीतील तेलाचे प्रमाण मर्यादित ठेवलेले चांगले.

आमच्याकडेही तुमच्या प्रमाणेच आहे !
गाजर अधिक कांदा ही कोशिंबीर आम्हाला खूप आवडते. तसेच पराठा किंवा थालीपीठ मध्ये आम्ही ते आवडीने घालतो.
भाजी विशेष पसंत नसते. शिजलेल्याची चव तशी उदास असते.
मुगडाळी च्या खिचडीत अधून मधून घालायचे म्हणजे एक वेगळा स्वाद येतो. आणि खिचडी बरोबर ते तसे चालून जाते Happy

हो कुमार सर.मुगडाळीच्या खिचडीतही छान लागते गाजर.
आणि आम्ही गाजराच्या भाजीत मूगडाळ घालतो.

नेहेमीची गाजराची भाजी बऱ्याचदा कंटाळवाणी वाटते. गाजर बारीक चिरून थोडे शिजवून घ्यायचे आणि त्यावर तेलात चिरलेला लसूण आणि भरपूर चिली फ्लेक्स अशी फोडणी घालायची वरून आणि मीठ. हवे तर इटालियन हर्ब्ज मिक्स पण घालता येईल. छान लागते सलाड म्हणून खायला.

गाजराच्या चकत्या करायच्या, तेलावर चिरलेला लसूण, तिखट, चीली फ्लेक्स घालून परातायच्या. मीठ आणि साखर घालून caramalise होवू द्यायचे. तिखट + गोड caramaled गाजर हे चव छान लागते.

हा काही पाककृती बाफ नाही. पण आत्ता वाचताना एकदम या आमच्या घरी नेहेमी केल्या जाणाऱ्या गाजराच्या पाककृती आठवल्या.

नेहेमीची गाजराची भाजी बऱ्याचदा कंटाळवाणी वाटते. गाजर बारीक चिरून थोडे शिजवून घ्यायचे आणि त्यावर तेलात चिरलेला लसूण आणि भरपूर चिली फ्लेक्स अशी फोडणी घालायची वरून आणि मीठ. हवे तर इटालियन हर्ब्ज मिक्स पण घालता येईल. छान लागते सलाड म्हणून खायला.

गाजराच्या चकत्या करायच्या, तेलावर चिरलेला लसूण, तिखट, चीली फ्लेक्स घालून परातायच्या. मीठ आणि साखर घालून caramalise होवू द्यायचे. तिखट + गोड caramaled गाजर हे चव छान लागते.

हा काही पाककृती बाफ नाही. पण आत्ता वाचताना एकदम या आमच्या घरी नेहेमी केल्या जाणाऱ्या गाजराच्या पाककृती आठवल्या.

वा !
म्हणजे तेलात चिरलेला लसूण हे चव आणण्याचे गमक आहे तर...
बघूया एकदा.

डॉ. कुमार, एक शंका आहे.
आमच्या पॅथोलाॅजी लॅबच्या sugar रिपोर्टवर एक खास टीप दिलेली असते- जास्त शर्करा असल्यास उकडलेले गाजर खाऊ नये, त्याने साखर वाढते. कच्चे गाजर खावे.
याबद्दल तुमचे मार्गदर्शन हवे आहे.

कोणती ही फळ,कोणती ही भाजी,
ज्या मध्ये A जीवनसत्व आहे आणि त्याचे कमी जास्त प्रमाण आहे .ते बघून ती भाजी फळ आहारात असतील तर A जीवनसत्व शरीरास मिळेल .
हे किती सत्य आहे?.
प्रतेक फळं,प्रतेक भाजी ह्या मध्य A जीवनसत्व असले तरी ते संयुग रुपात असणार एकटे नसणार .
मग प्रतेक संयुगे वेगळी असणार हे सरळ आहे.
ह्याचा अर्थ पण सरळ आहे A जीवनसत्व फळं भाज्यात आहे म्हणजे ते शरीर वापरू शकेल जर sanyugat विविध घटकांचे गुणधर्म वेगळे असले तर?
एक उदाहरण
Gajrat असणारे A जीवन satv आणि बाकी दुसऱ्या कोणत्या भाजी मध्ये असणार A जीवन सत्व.
शरीर एकच प्रकारे शोषून घेईल .
हे अशक्य आहे

*१. जास्त शर्करा असल्यास उकडलेले गाजर खाऊ नये, त्याने साखर वाढ >>>>>

भाज्या कच्च्या स्वरूपात आणि उकडलेल्या खाण्यातून ग्लायसेमिक इंडेक्स वर कसा परिणाम होतो ते पाहू.
गाजर, बीट, बटाटा यांच्यामध्ये मुख्यतः स्टार्च हे कर्बोदक आहे. स्टार्च जसाच्या तसा पचनसंस्थेत स्वीकारला जात नाही. त्याचे पहिले ग्लुकोज मध्ये रूपांतर करावे लागते. जेव्हा आपण भाज्या शिजवतो /उकडतो तेव्हा त्या विघटनाची प्रक्रिया सुलभ होते.

सर्वसाधारणपणे असे आहे :
कच्च्या भाज्यांमधून शरीराला मिळणारा ग्लुकोज हा कमी प्रमाणात राहतो. तेच ती भाजी उकडली असता मिळणाऱ्या ग्लुकोजचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते.
बटाट्याच्या बाबतीमध्ये हे अगदी निर्विवाद सिद्ध झाले आहे. परंतु गाजराच्या बाबतीत उलट सुलट संदर्भ वाचायला मिळतात. इथे आहारतज्ञाचे मत घेतलेले बरे.

दुसरा मुद्दा.
एखाद्या अन्नपदार्थच्या इंडेक्स बाबत सुटा विचार करण्यापेक्षा एकत्रित आहारातील त्याचे प्रमाण पाहणे महत्त्वाचे आहे. आपल्या जेवणात पोळी, भात, वरण, भाजी आणि कोशिंबीर असे विविध घटक आहेत.
त्यातील गाजराची टक्केवारी पहिली बघावी लागेल. ती एकूण आहाराच्या प्रमाणात किरकोळ असेल तर मग फारसा विचार करायची गरज नाही. पण जेवणात पोळी भात वर्ज्य करून गाजर हाच मुख्य पदार्थ ठेवणार असू तर मग जरा व्यवस्थित गणित मांडावे लागेल !

Pages