कादर खानः कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी!

Submitted by फारएण्ड on 3 January, 2019 - 08:07

हा माणूस गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भेटत होता. "बाप नंबरी बेटा दस नंबरी" तर आम्ही केवळ याच्या आणि शक्ती कपूरच्या केमिस्ट्रीकरता पाहिला होता. त्यातले ते फ्रॉड वाले २-३ सीन्स अत्यंत धमाल आहेत. माझे ऑल टाइम स्ट्रेसबस्टर्स!

गोट्या पोट्या मॅनपॉवर एजन्सी

नट बोल्ट सोडा बॉटल ओपनरवाला

जाली नोट छापनेकी मशीन

हे तिन्ही सीन्स मी असंख्य वेळा पाहिले आहेत. यातला विनोद काही फार ब्रिलियंट वगैरे नव्हे. पण सगळी मजा सादरीकरणात आहे. वेगवेगळे वेष, बेअरिंग आणि भाषेचा लहेजा घेउन कादर खान आणि शक्ती कपूर ने जी धमाल उडवली आहे त्याला तोड नाही. हे सीन्स पाहताना जाणवते की प्रत्येक वेळेस दोघेही त्या त्या भूमिकांमधे पूर्ण शिरले आहेत. ते बोलत नसतानाही त्यांचे हावभाव पाहा, त्या कॅरेक्टर्स च्या व्यक्तिमत्त्वात त्यांनी घातलेली भर पाहा - सगळेच खतरनाक आहे. विशेषतः कादर ने एकदा पारशी बावा, एकदा गुज्जू आणि एकदा मराठी हवालदार म्हणून धमाल उडवली आहे. हा गुज्जू अवतारात बोलत असताना मधेच शक्ती कपूर फोनची वायर कानात घालतो आणि त्यामुळे यांचा फ्रॉड उघडकीस येइल याची भीती वाटल्याने हळूच त्याला जेव्हा सांगतो, तेव्हा नॉर्मल हिंदीत सांगतो. ही अशी 'मेथड इन मॅडनेस' अनेकदा दिसते त्याच्या सीन्स मधे. ज्या प्रेक्षकवर्गाकरता हे सीन्स लिहीले जातात त्यांना पांचट कॉमेडी आवडते असे गृहीत धरल्याने असे न्युआन्सेस लक्षात ठेवले जात नाहीत असे आपण अनेक हिंदी व विशेषतः मराठी चित्रपटात पाहतो. त्यामानाने कादर खान च्या सीन्स मधे ते पाळलेले लगेच जाणवतात.

कादर खानचे गेल्या दोन दशकांत असे अनेक सीन्स/स्किट्स आहेत. चालबाज मधे शक्ती कपूरला लुटतानाचा एक सीन असो, नाहीतर हीरो नं १ मधला तो सासरा, किंवा कोणत्यातरी चित्रपटात कायम फोटोतून आपल्या मुलाशी बोलणारा - असे अनेक अचाट आणि अतर्क्य कॉमेडी रोल्स त्याने केले. आधी ८०ज मधे जितेंद्रच्या चित्रपटांमधून कॉमेडी व्हिलन नावाचा प्रकार जबरी होता त्याचा, आणि नंतर गोविंदाच्या "नं १" टाइप चित्रपटांतील सासरा किंवा इतर तसेच रोल्सही.

पण एकूणच लहानपणीपासून जे पिक्चर पाहिलेत त्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कादर खान सतत असेच. कधी स्वतः केलेले काम तर अनेकदा चित्रपटाचे संवाद.

८० च्या दशकातील सुरूवातीच्या चित्रपटात व्हिलन म्हणून तो तसा सरधोपट होता, नंतर कॉमिक व्हिलन झाला. पण मला सर्वात आवडला तो थोडा नंतर आलेल्या 'अंगार' मधला जहाँगीर खानचा रोल. कदाचित त्याचे मूळ अफगाण व्यक्तिमत्त्व हा रोल साकारताना नैसर्गिकरीत्या पुढे आले असावे. बाकीही रोल्स इतके आहेत की आता पटकन आठवतही नाहीत. ८० आणि ९० च्या दशकात त्याने इतके विविध रोल्स केले आहेत की कादर खान चित्रपटात नाही अशीच उदाहरणे कमी असतील.

पण बच्चन फॅन्स करता त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे बच्चन च्या इमेजला त्याने सर्वसामान्यांना आपला वाटेल असे 'पॅकेज' केले. १९७७ सालची सिच्युएशन पाहा. अमिताभ प्रचंड लोकप्रिय झाला होता, अँग्री यंग मॅन म्हणून. तोपर्यंत दीवार आणि शोले रिलीज होउन दोन वर्षे झाली होती. हे दोन चित्रपट, आणि त्याचबरोबर आनंद, नमक हराम, अभिमान आणि कभी कभी अशा चित्रपटांमधून अमिताभची एक सतत धुमसणारा, कमी बोलणारा, रागीट अशी प्रतिमा निर्माण झालेली होती. अपवाद दोनच - बॉम्बे टू गोवा आणि चुपके चुपके. या दोन्हीत त्याने विनोदी रोल्स केले असले तरी ते ट्रेण्डसेटर्स झाले नाहीत. बॉम्बे टू गोवा मधला अमिताभ त्याचे मॅनरिजम्स नंतर ओळखीचे झाल्याने थोडा उशीराच गाजला असावा, तो चित्रपट लागला तेव्हा मेहमूदच जास्त छाप पाडून गेला असेल असा माझा अंदाज आहे. तसेच चुपके चुपके मधला अमिताभ धमाल असला, तरी ती हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटातील व्हाइट कॉलर कॉमेडी. अमिताभच्या 'मास इमेज' मधे पुढे फारशी दिसली नाही.

अशा वेळेस मनमोहन देसाईं आणि कादर खान यांनी ती अँग्री प्रतिमा पूर्ण बदलवणारा "अँथनी" निर्माण केला, आणि त्यानंतर लगेच कादर खानने प्रकाश मेहरा करता "सिकंदर" लिहीला. या दोन्ही रोल्स नी अमिताभ आम जनतेत पोहोचला. दीवार, जंजीर, त्रिशूल, शोले हे त्याला सुपरस्टार करायला पुरेसे होते, पण अ‍ॅंथनी आणि सिकंदर ची मजा वेगळीच होती. तुम्हाला सलीम जावेदचा "विजय" भेटला तर तो काहीतरी शार्प डॉयलॉग रागाने मारून तेथून निघून जाईल, पण अँथनी किंवा सिकंदर तुमच्याशी गपा मारतील, ते ही बम्बैय्या हिंदीत. अमिताभला सर्वसामान्य पब्लिककरता अ‍ॅप्रोचेबल करण्याचे काम कादर खानच्या कॅरेक्टर्सनी केले. ती त्याची माझ्या दृष्टीने सर्वात मोठी कामगिरी आहे.

कादर खानची एक मुलाखत बघितली होती. अमर अकबर अँथनी च्या वेळेस हे तिन्ही लोक कसे काम करत वगैरे बद्दल. मजेदार आहे एकदम. तसेच नंतर अजून एका मुलाखतीत त्याच्यात आणि अमिताभमधे कसा दुरावा आला ते ही त्याने सांगितले आहे. अमिताभचे त्याबाबतीत मत काय आहे कल्पना नाही, पण कादर खान ने जे सांगितले ते तसेही विश्वासार्ह वाटते. या दोन्ही क्लिप्स यू ट्यूबवर आहेत.

अमिताभचे अनेक लोकप्रिय संवाद त्याने लिहीले आहेत. गेल्या एक दोन दिवसांत त्यातले बरेचसे चुकीचेच (म्हणजे विशेष खास नसलेले) पेपर्स मधे आलेत. मला सर्वात आवडणारा सीन म्हणजे मुकद्दर का सिकंदर मधला कब्रस्तानातील संवाद - जेव्हा तेथील "फकीर" कादर खान ज्यु अमिताभ व त्याच्या बहिणीला समजावतो. ज्यांनी मुकद्दर का सिकंदर थिएटर मधे पाहिलेला आहे त्यांना हा सीन पुढे सरकतो तसे थिएटर मधे कल्ला वाढू लागतो, शिट्ट्या आणि अनेकदा नाण्यांचे आवाजही - ते सगळे लक्षात असेल. मी पुण्यात "मंगला" मधे अनेकदा अनुभवले आहे. अमिताभच्या असंख्य "एण्ट्रीज" पैकी ही माझी सर्वात आवडती आहेच पण एण्ट्रीच्या आधी ज्यु अमिताभला कादर खान ने जे सांगितले आहे त्याचे सादरीकरणही भन्नाट आहे. आधी ती दोन लहान मुले रडत असताना तो येतो आणि शांत गंभीर आवाजात त्यांची समजूत काढायला सुरूवात करतो. "मौत पे किसकी रस्तगारी है, आज इनकी तो कल हमारी बारी है". तेथून पुढे संगीतामधे "क्रेसेण्डो" म्हणतात तसा त्या डॉयलॉग्ज मधला जोर वाढत जातो आणि मग मोठ्या अमिताभची मोटरसायकलवरून एण्ट्री होते. हा "लीड अप" कादर खाने ने सुंदर लिहीला आहे आणि तितकाच जोरदार सादरही केला आहे. त्याची इथली संवादफेक जबरदस्त जमली आहे.

अँथनी आणि सिकंदर हे अमिताभचे माझ्यातरी टॉप ५ मधले रोल्स आहेत. सलीम जावेद च्या कॅरेक्टर्स मधे सहसा न दिसणारी एक "warmth" कादर खान ने लिहीलेल्या अमिताभच्या कॅरेक्टर्स मधे दिसते. "मकान ऊंचा बनाने से इन्सान ऊंचा थोडे ही ना हो जाता है" हा वरकरणी (तेव्हाही) चीजी वाटेल असा संवाद, पण त्यानंतर पुढे अमिताभ बोलतो ते ऐकले तर लक्षात येते की ते सिकंदर च्या कॅरेक्टरशी कन्सिस्टंट आहे. अ‍ॅंथनीला ही मिश्किल्/गमत्या करून कादर खान ने अमिताभच्या कॅरेक्टर्स मधे विनोद आणला - पुढे जवळजवळ सर्व चित्रपटांत इतर लेखक/दिग्दर्शकांनीही त्याचे अनुकरण केले. सलीम जावेद चा "विजय" बहुतांश विनोद ड्राय ह्यूमर टाइपचे करतो - चेहरा गंभीर ठेवून "मारलेले" पंचेस असत ते. पण कादर खानचा अमिताभ मुळातच कॉमिक होता. हा कॉमिक अँगल इतका झाला की नंतर अमिताभने कॉमिक साइड किक च्या पात्राची गरजच ठेवली नाही असे लोक म्हणत. पुढे परवरिश, सुहाग, देशप्रेमी, सत्ते पे सत्ता, याराना सारख्या अनेक चित्रपटांतून त्याच फॉर्मचे कॅरेक्टर त्याने अमिताभकरता लिहीले.

चित्रपटाच्या दर्जाप्रमाणे चांगले किंवा टुकार लेखन त्याला सहज जमत असे. "शराबी" मधे अमिताभचे शेर फेमस झाले होते. काही चांगले शेर आहेत पण अनेक टुकार असल्याने जास्त फेमस आहेत. "शराबी को शराबी नही, तो क्या जुआरी कहोगे? गेहूँ को गेहूँ नही, तो क्या जवारी कहोगे", किंवा "जिगर का दर्द ऊपर से कहीं मालूम होता है, के जिगर का दर्द ऊपर से नही मालूम होता" सारखे. पण कादर खान ने ते तसे लिहीण्याचे कारण चित्रपटात आहे. अमिताभ प्रेमात पडायच्या आधी तो दर्द त्याने अनुभवलेला नसतो त्यामुळे त्याला शेर मारायची अफाट हौस हसूनही ते जमत नसतात. त्यामुळे पहिल्या भागात त्याचे सगळे शेर टुकार आहेत. ओमप्रकाश त्याला त्याबद्दल सतत सांगत असतो, तुझे शेर "घटिया" आहेत म्हणून. मात्र नंतर जयाप्रदाला भेटल्यावर पुढे तो बोलतो ते संवाद कादर खान ने बदलले आहेत.

वरकरणी साधे किरकोळ व अनेकदा टुकार वाटणार्‍या त्याच्या अनेक कॅरेक्टर्सच्या मागे बराच विचार असे, तो ते बरेच सीन पुन्हा पहिल्यावर लक्षात येत असे. बम्बैय्या संवाद ही त्याची खासियत होती. हिंदी चित्रपटातले टॉप ४-५ बम्बैय्या कॅरेक्टर्स बघितली तर आमिरच्या रंगीलामधल्या मुन्ना आणि मनोज वाजपेयीच्या भिकू म्हात्रे च्या बरेच आधी अमिताभचा "अँथनी" आणि अमजद खानचा "दिलावर" ही दोन जबरदस्त उदाहरणे. ही दोन्ही कादर खानने लिहीलेली आहेत.

"ते गेले नाहीत. ते त्यांच्या विचारांच्या/कलाकृतींच्या माध्यमातून आपल्यामधे आहेत" वगैरे वाक्ये आपण अनेक लोक थोरामोठ्यांबद्दल वापरताना आपण वाचतो. पण कादर खानच्या बाबतीत ते शब्दशः खरे आहे. आनंद मधे शेवटी अमिताभ रडत असताना बाजूला सुरू असलेल्या टेप मधून पुन्हा "बाबूमोशाय" ऐकू येते तसेच टीव्हीवर चॅनेल सर्फिंग करताना सुद्धा कोठेतरी नक्कीच कादर खान ने लिहीलेले किंवा स्वतःच सादर केलेले एखादे टाइमपास विनोदी वाक्य आपल्या कानावर आत्ता सुध्दा लगेच पडेल, आणि पुढेही येत राहील.

नाहीतर मग शक्ती कपूर/गोविंदा बरोबरच्या त्याच्या क्लिप्स पाहा, मनोरंजनाची गॅरण्टी!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलय...
कादर खान ह्याना श्रद्धांजली

कोणत्यातरी चित्रपटात कायम फोटोतून आपल्या मुलाशी बोलणारा >>>
यात त्यांचा डबल रोल होता..
घर हो तो ऐसा...

भावपूर्ण श्रद्धांजली __/\__

कादर खानच्या भूमिका आणि लिखाणाचा खूपच सुंदर आढावा आहे. दुर्दैवाने त्यांच्या बाबत बऱ्याच गोष्टी आता ते गेल्यावर कळताहेत. तुम्ही लेख तर खूपच छान लिहिला आहे. त्यांच्या बऱ्याच विनोदी भूमिका आठवताहेत. मी विनोदी सिनेमा कधीच पहात नाही, पण त्यांच्या ज्या काही भूमिका पहिल्या त्यांनी स्माइल तर नक्कीच आलं होतं. ती उल्लेख केलेली वडिलांच्या फोटोशी बोलणारी भूमिका विशेष आठवते.
एका गुणी कलाकाराला श्रद्धांजली ! नुकतंच त्यांचा भूतकाळ आणि धडपडीतून मोठं होणं, whatsapp वर वाचायला मिळालं. Truly inspiring :Thumbs up:

फा, चांगलं लिहिलं आहेस. मी अमिताभचे बरेचसे पिक्चर पाहिलेले नाहीत. वरच्या लिंक्स ओपन करुन पाहिल्यावर डायलॉग्ज वगैरे इतके चिजी वाटतायत की आता बघणं शक्य नाही.

लेख खूप आवडलाय.कादरखान चे गोविंदा चित्रपटातले पात्र आवडले नाही.पण हे मात्र सारखं जाणवत राहिलं की या पात्राची पिक्चर मधली जागा कोणीच भरू शकत नाही.ती एक मोठी जागा आहे.

फारएण्डा, मस्त लिहीलयस! खूप दिवसांनी तुझा 'नविन' लेख वाचला (बरेच वेळा तुझे जुने लेख वाचले जातात). तू दिलेल्या लिंक्स फॉलो करत करत लेख वाचल्यामुळे जास्त भावला. कादरखान चं अमिताभ च्या करियर मधलं स्थान खूप नेमकेपणे मांडलयस.

फारेंड, लेख खूप आवडला. कादरखानचा बघितलेला पहिला पिक्चर,'अल्ला मेहेरबान तो गधा पेहेलवान'. भयानक अनुभव होता तो. मैत्रीणींबरोबर कॉमेंट्स करत कसाबसा पाहीला. त्यांच्याबद्दलची बरीच माहिती आत्ता कळतेय. तकदीरवाला मात्र खूप आवडतो.

सुंदर लेख! आवडला!
मुझसे शादी करोगी हा त्यांचा शेवटचा चित्रपट! त्याही रोलमध्ये त्यांनी छाप पाडली होती.

अमोल, चांगलं लिहिलं आहेस.

प्रतिसादांतून आणखी सिन्सवर पोस्टी/लिंक्स आल्या तर मजा वाचायला/बघायला मजा येईल.

मस्त लेख farend.. माझा सगळ्यात आवडता कादर खान यांचा रोल दुल्हेराजा मधला आहे. अगदी गाण्यातही इतकी धमाल उडवून दिली आहे त्यांनी कि कितीदा बघितलं तरी कंटाळा येत नाही. गोविंदा आणि कादर खान ऑल टाइम फेवरीट जोडी आहे.

कादर खान चा सर्वात जबरदस्त वाटलेला रोल हम मधला होता. त्यात अंगाला सतत खाज सुटून त्यावर शायरी करणारा एव्हधा जबरदस्त उतरला होता. कादर खान च्या एकंदर मुलाखती वाचल्यावर तो एक विचारी नि sensitive कलाकार होता हे जाणवते. प्रकाश मेहरा नि मनमोहन देसाई च्या जाण्यानंतर त्याने अशी भट्टी जमणारे उरले नाहीत म्हणून ब्रेक घेतला होता. साबु सिद्दिक मधे कादर खान Engineering चा प्राध्यापक होता, गोविंदा बरोबरच्या नं. १ सिरी ज मध तो फक्त गोविंदा नि त्याचे संवाद लिहित असे वगैरे माहिती थक्क करून टाकणारी आहे. अमिताभ शी आलेले वितुष्ट कादर खान पुरते तरी 'अमिताभला सर न बोलण्यावरून आले होते' असे त्याने सांगितलेले.

मस्त लिहिलाय लेख!
फार अमिताभमय झालाय. पण तेही चांगलेच. कारण माझ्यासाठी हे नवीनच होते. म्हणजे संवादलेखक म्हणून कादरखानची कामगिरी काय किती याची कल्पना नव्हती. ही तर अचाट निघाली.

कादरखान शक्तीकपूर जोडी तर मराठीतल्या सराफ लक्ष्याईतकी जवळची वाटते.

तो फोटोतला बाप पिक्चर घर हो तो ऐसा. धमाल पिक्चर होता. आणि कादरखान त्या चित्रपटामुळेच आवडायला लागला.

सिरीअस कॉमेडी व्हिलन सारे करून झाले त्या माणसाचे. देवाने देखणा चेहरा दिला असता तर हिरोंनाही टक्कर दिली असती. हिंदी बॉलीवूडी चित्रपट प्रेक्षकांच्या इमोशनची नेमकी नस पकडणारा अभिनय जमायचा त्याला.

छान लिहिलंय फा.
अमिताभ बरोबरचे काही... आणि बरेचसे गोविंदा/ शक्ती कपूर बरोबरचे रोल आठवतात कादर खान म्हटलं की. संवाद लेखन कुठे कुठे आहे ते शोधतो.. आणि वरच्या क्लिप्स बघतो. त्यांची बोलण्याची स्टाईल आणि हावभाव फार भारी होते.
श्रद्धांजली

सुंदर लेख !

फादर खान साहेबांना श्रद्धांजली.. __/\__

छानच लिहिलंय.

मला कादरखान कधी खूप ग्रेट वगैरे वाटला नाही. शक्तीकपूर, डेव्हिड धवन, पद्मालय फिल्म्स (जितेंद्र-जया प्रदा-श्रीदेवी सिनेमे) यात तो वाहवत गेला, असं माझं मत. त्यात त्याचं खरं टॅलेन्ट १०० टक्के समोर आलंच नाही.

पण हा लेख मात्र आवडला.

कादर खानचा यूनिक आवाज हा त्याचे आणखी एक खास वैशिष्ट्य. बेनाम सिनेमात संपूर्ण सिनेमात खलनायकासाठी केवळ कादर खानचा आवाजच ऐकू येत असतो. खलनायक थेट शेवटच्या वीसेक मिनीटांमध्ये पडद्यावर दिसतो. या दमदार आवाजामागचा खलनायक मात्र तुपट चेहर्‍याचा आणि तितक्याच तुपट आवाजाच प्रेम चोप्रा आहे हे पाहून प्रेक्षकांना धक्काच बसत असणार.

छान लिहिलंय.
नवीनच गोष्टी माहित झाल्या.
कादर खानना श्रद्धांजली.
कादर खान आणी गोविंदा ही द्वयी असलेले पिच्चर पाहिलेत आणि आवडलेत.
जुदाई, हिरो नं १, दुल्हे राजा मधे त्यांचं काम आवडलंय.

मस्त जमलाय लेख!
मला स्वतःला आवडलेला रोल म्हणजे बोल राधा बोल मधला जुगनू! त्याला संध्याकळी सहा वाजल्यानंतर काहीच दिसत नाही, म्हणजे तो रातांधळा असतो. अशा माणसाचं नाव जुगनू( काजवा) हाच एक मोठा विनोद होता आणि कादर खानने तो सुण्दर उभा केला होता. ( क्लायमॅक्समधे त्याला सहा वाजून गेले तरी दिसू लागतं, पण ऐकू येणं बंद होतं :-ड)

>> चांगला माहितीपूर्ण लेख
+१११

>> कादर खानची एक मुलाखत बघितली होती. अमर अकबर अँथनी च्या वेळेस हे तिन्ही लोक कसे काम करत वगैरे बद्दल. मजेदार आहे एकदम.

https://www.youtube.com/watch?v=EeLy9PFTRe4

>> माझा सगळ्यात आवडता कादर खान यांचा रोल दुल्हेराजा मधला आहे. अगदी गाण्यातही इतकी धमाल उडवून दिली आहे त्यांनी कि कितीदा बघितलं तरी कंटाळा येत नाही. गोविंदा आणि कादर खान ऑल टाइम फेवरीट जोडी आहे.

तंतोतंत सहमत. त्यातल्या त्यात तो सीन गोविंदा-रवीना गडबडीने लग्न करत असतात आणि कादर खान त्यांचे लग्न थांबवायला येतो. भन्नाट. हसून हसून डोळ्यात पाणी येते. दुल्हे राजा तसेच इतर गोविंदा-कादर खान-जॉनी लीवर त्रिकुट असलेले चित्रपट माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहेत.

https://www.youtube.com/watch?v=C2LSCN2e84g

मागच्या काही वर्षांत कादर खान यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियामध्ये अनेकदा पसरल्या होत्या. त्यामुळेच "दु:खद घटना" ह्या धाग्यावर कादर खान यांचे निधन झाल्याच्या पोस्ट नंतर "अफवा आहे ना?" अशा अर्थाची आलेली पोष्ट वाचून पट्कन डोळ्यात पाणी आले. कारण यावेळी ती अफवा नव्हती. ज्यांचा अभिनय/कला पाहत पाहत लहानाचे मोठे झालो असे एकेक कलाकार निघून चालले आहेत हि जाणीव फार यातनामय आहे. एका प्रतिभावंत महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

फार सुंदर लिहिले आहे!
मुकासि, लावारिस सारखे संवाद आता कितीही चिझी वाटले तरी ते त्या पात्राची भाषाच बोलत होते. मुकासि मध्ये रेखा आणि विनोद खन्नाचाही एक सणसणीत संवादप्रसंग आहे.
अमिताभच्या विनोदी रुपाबद्दल अगदी अचूक लिहिले आहेस, सत्ते पे सत्ता मधला 'खुशी की घबराहट' हा तर ऑल टाइम फेव!

मौत से किसको रास्तागारी है? मौत से कौन बच सकता है? आज उनकी तो कल हमारी बारी है. पर मेरी एक बात याद रखना, इस फ़कीर की बात ध्यान रखना ये ज़िन्दगी में बहुत काम आएगी कि अगर सुख में मुस्कुराते हो तो दुःख में कहकहा लगाओ. क्योंकि जिन्दा हैं वो लोग जो मौत से टकराते हैं, पर मुर्दों से बद्तर हैं वो लोग जो मौत से घबराते हैं.सुख तो बेवफा है चंद दिनों के लिए है, तवायफ की तरह आता है दुनिया को बहलाता है, दिल को बहलाता है और चला जाता है. मगर दुःख तो हमेशा साथी है. एक बार आता है तो कभी लौट कर नहीं जाता है. इसलिए सुख को ठोकर मार, दुःख को गले लगा, तकदीर तेरे क़दमों में होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा.

सुंदर लेख.
कादर खान आनि गोंविदा ची दुल्हेराजा मधली जुगलबंदी कायम आवडते.ह्याच चित्रपटातल कव्वाली टाईप गाण्यामधे(कहअँ राजा भोज, कहाअँ गंगु तेली) दोघांनी धमाल केलली आहे.व्हिलन पेक्षा कादर खान कॉमेडी रोल मधे जास्त आवडतो.

एका प्रतिभावंत महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली _/\_>> +१

Pages