सिम्बा: शिट्ट्या टाळ्या मिळवणारा रोहित शेट्टीचा 'पैसा वसूल' सिंघमपट (स्पॉइलर नाही)

Submitted by अतुल. on 30 December, 2018 - 01:44

पूर्वी अमिताभ चे चित्रपट असायचे. त्यात सगळे असायचे. विनोद, त्वेष, कारुण्य, क्रोध, प्रेम वगैरे वगैरे. साचेबद्ध कथानकाच्या मुशीत ह्या सगळ्यांची भट्टी जिथे छान जमते तिथे प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि तुडुंब प्रतिसाद ठरलेला आहे. शुक्रवारी रिलीज झालेला रोहित शेट्टीच्या "सिंघम"सेरीज मधला पुढचा चित्रपट "सिम्बा" हा ह्याच पठडीतला आहे. म्हणून प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.

चित्रपट हसवतो का?
- खळाळून हसवणारे संवाद आणि दृश्ये भरभरून आहेत.

चित्रपट रडवतो का?
- अनेक प्रसंग आहेत. डोळ्याच्या कडा पाणावतात. चित्रपटगृह गहिवरून गेलेलं असते.

प्रेक्षकाला त्वेषाने स्फुरण चढते का?
- नायक आहे. खलनायक आहे. त्यांच्यातील संघर्षाचे अतिशय प्रभावी चित्रण आहे. त्यामुळे त्वेषाने पडणाऱ्या प्रेक्षकांच्या शिट्ट्या अनेक वर्षांनी ऐकायला मिळाल्या.

म्हणजे मसाला तोच जुना "अमिताभ"काळातला असला तरी रोहित शेट्टीने भट्टी खूप म्हणजे खूपच मस्त जमवली आहे. याचे अर्थात श्रेय अभिनेत्यां बरोबरच त्या सगळ्या टीमला जाते.

रणवीर सिंहने त्याच्या बिनधास्त बेधडक शैलीत नायकाच्या भूमिकेला पूर्ण न्याय मिळवून दिला आहे. मला स्वत:ला रणवीर सिंह चे पात्र संजय दत्त साठी लिहिले असावे असे सातत्याने वाटत होते. त्याच शैलीतले संवाद तशीच लकब तीच शब्दफेक. पाहताना अनेकदा संजय दत्तच्या भूमिका आठवतात.

सिद्धार्थ जाधवला खूपच वाव दिलेला आहे आणि त्याने सुद्धा षट्कारांवर षट्कार मारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशा भूमिकांना 'टायमिंग' साधने खूप महत्वाचे आणि ह्या कसलेल्या अभिनेत्याने ते लीलया साधले आहे.

वैदेही परशुरामी: अत्यंत गोड व गुणी अभिनेत्री. आपण तर बुवा "डॉ. घाणेकर" पाहतानाच हिचा पंखा झालोय. पण "घाणेकर" नंतर तिला इतक्या लगेच ते सुद्धा हिंदी मध्ये पाहायला मिळेल अशी कल्पनाच केली नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी तिचे पडद्यावरचे दर्शन हा सुखद धक्काच होता. "सिम्बा"मध्ये तिची भूमिका अर्ध्या सिनेमापर्यंतच असली तरी कथानकाला निर्णायकी वळण देण्याचे काम त्या पात्राचे आहे. पूर्ण चित्रपटाला कलाटणी देणारी भूमिका. वैदेहीने त्या भूमिकेचे सोने केले आहे. वादच नाही.

सोनू सूद: सिंघम च्या जयकांत शिक्रे (प्रकाश राज) सारखा धडकी भरवणारा आणि पडदा भरून टाकणारा दरारा उत्पन्न करणारा खलनायक नसला तरी सोनू सूदने त्याच्या परीने उत्तम भूमिका साकारली आहे म्हणावे लागेल. अर्थात हा खलनायक अजून खूप प्रभावी होऊ शकला असता.

आशुतोष राणा: पूर्वी पाताळयंत्री खलनायक करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या अभिनेत्याने सिम्बा मध्ये एकदम हटके भूमिका साकारली आहे. "हा आशुतोष राणाच ना?" असे विचारावे वाटले इतका वेगळा तो दिसतो. किंबहुना ती भूमिकाच तशी आहे. पण आशुतोषने लाजवाब साकारलीय. काही प्रसंगी तर इतका सदगदित करून टाकतो हा अभिनेता कि बास्स. मान गये.

सारा-अली-खानची (सैफ-अलीची कन्या) भूमिका नायकाच्या प्रेयसीची असली तरी कथानकाच्या दृष्टीने तिला मर्यादित वाव आहे. पण जे आहे ते तिने बरे साकारले आहे.

चित्रपट शेवटपर्यंत पहा. म्हणजे शेवटची नामावली संपेपर्यंत. आणि एखाद्या चित्रपटात शेवटच्या तीन मिनिटात सुद्धा दोन वेळा खच्चून टाळ्या आणि शिट्ट्या कशा पडू शकतात ते अनुभवा Happy इतर भूमिकांमध्ये अमरीत सिंघ, सौरभ गोखले, विजय पाटकर, अश्विनी कळसेकर, गणेश यादव, अशोक समर्थ तसेच इतर अनेक कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. खलनायकाच्या वकिलाची भूमिका पाहताना वारंवार अमरीश पुरी आठवत होते. अर्थात इतका अतिप्रभावी अभिनेता सिम्बा मधल्या 'त्या' भूमिकेला बोजड झाला असता. तरीदेखील जो वकील आहे तो भूमिकेच्या मानाने थोडा मिळमिळीतच वाटतो.

बाकी, संगीत आणि सिनेमॅटोग्राफी बाबत सुद्धा प्रश्नच नाही. "रोहित शेट्टी" पठडीतल्या चित्रपटांच्या परंपरेतले थिरकायला लावणारे संगीत आहे.

एकंदर "सिम्बा" सहकुटुंब विकांताला बघायला अजिबात हरकत नाही. जुनाच मसाला असला तरी स्वयंपाक इतका छान झालाय कि अगदी मस्त मन भरून मेजवानी मिळते Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हिंदी चित्रपट, तेपण थेटरमधे जाऊन फारसे बघत नाही पण तुम्ही लिहिले छान आहे.

सिंघम मस्तच होता. मलातर दबंगपेक्षा जास्त आवडलेला. रोहित शेट्टीची गोलमाल चित्रपटमाळदेखील आवडलेली. त्यातल्यात्यात चेन्नई एक्सप्रेच फारसा आवडला नव्हता.

वैदेही कशी दिसते हे आताच गुगलून पाहिले. छान आहे, मराठी वाटत नाही :-P.

सिनेमाबद्दल थोडक्यात सांगायची मस्त शैली. आपण मित्रांमधे एकमेकांना सांगतो अगदी तसंच. शिवाय कुठलाही स्पॉयलर नाही त्यामुळे ताजवा टिकून राहील. आवडलं बुवा.

हे परीक्षण नाही तर चित्रपट बघा रे असं सुचवल्यासारखे वाटतेय ... आणि एक्चुअली हे वाचून मलाही बघावासा वाटतोय Happy

रोहीत शेट्टी तोच ज्याचा पहिला गोलमाल आवडला. मग त्याची सिरीज बनवून माती केली.
चेन्नई एक्स्प्रेस अफाट होता, पण त्याच शाहरूखसोबत दिलवाले बनवून चिखल केला.
सिंघमही तसाच चे.ए. सारखाच पुन्हा पुन्हा बघायला मजा येतो पण आता सिंबा मध्ये काय करतोय याचे अंमळ टेंशनच होते...
तुमच्या परीक्षणाने ते टेंशन दूर केले Happy

मला सगळे गोलमाल आवडले, अमोल पालेकर वाला पण.
सिमबा पण मला आवडला, टेम्पर मी पहिला नाहीय. डब सौठेंडियन चित्रपट आवडत नाहीत बघायला.

शा.खा.च्या झिरोवर पैसे वाया घालवण्यापेक्षा, रणवीरचा सिंबा कितीतरी सरस आहे.
डीसीपीच्या भुमिकेत अजय देवगणची एंट्री तर लाजवाब आहे. थियटरमध्ये फक्त शिट्ट्या व टाळ्याच टाळ्या !

धन्यवाद सर्वांना Happy

>> हे परीक्षण नाही तर चित्रपट बघा रे असं सुचवल्यासारखे वाटतेय
Lol