पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २८. कोहरा (१९६४)

Submitted by स्वप्ना_राज on 16 December, 2018 - 13:10

kohraa1.jpg

‘गुमनाम', ’बीस साल बाद' हे गोल्डन एरामधले रहस्यमय चित्रपट पाहिल्यावर त्याच मालिकेतला 'कोहरा' पाहणं क्रमप्राप्तच. पण अडचण ही की युट्युबवर पूर्ण चित्रपटाची जी एकच लिंक दिसत होती त्यात चित्रपट मधूनच सुरु झालेला दिसत होता. थोडी शोधाशोध केल्यावर २४ मिनिटांचा आणखी एक भाग मिळाला ज्यात सुरुवातीपासून चित्रपट होता. तेव्हा आधी हा भाग पाहावा आणि मग उरलेला चित्रपट असं ठरवलं. शेवटी हा 'घाटेका सौदा' ठरला पण त्याबद्दल नंतर. आधी थोडी माहिती चित्रपटासंबंधी.....

दिग्दर्शक बिरेन नाग हा खरं तर 'साहब बीबी और गुलाम', 'सीआयडी' आणि 'तेरे घरके सामने' ह्या चित्रपटांचा कला दिग्दर्शक. १९६२ साली आलेला 'बीस साल बाद' हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. तो हिट झाल्यानंतर आला तो कोहरा. ह्या चित्रपटासाठी व्ही. शांताराम ह्यांच्या राजकमल कलामंदिरमध्ये खास उभारलेला शुभ्रधवल महाल पाहायला हिंदी चित्रपटसृष्टीतले नामचीन निर्माते आणि दिग्दर्शक त्याकाळी आवर्जून परळला ड्राईव्ह करून येत असत असं विश्वजितने एका मुलाखतीत सांगितल्याचा उल्लेख नेटवर आढळतो. Daphne du Maurier ने लिहिलेल्या १९३८ च्या ज्या Rebecca कादंबरीवर १९४० मध्ये हिचकॉकने त्याच नावाचा चित्रपट काढला होता त्याच कादंबरीवर ‘कोहरा' सुध्दा बेतलेला आहे. कसा ते आता पाहू.....

कथेची नायिका राजेश्वरी ही अनाथ. आईवडिलांच्या मृत्यूनंतर गावातल्या रायसाहेब या एका श्रीमंत व्यक्तीकडे वाढलेली. रायसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आपल्या वेड्या मुलाशी, शेखरशी, राजेश्वरीचं लग्न लावून द्यायचा बेत करते. राजेश्वरीला अर्थातच हे लग्न पसंत नसतं. पण ती अनाथ आणि गरीब असल्याने विरोध करायचा प्रश्नच नसतो. ह्यातून स्वत:ची सुटका करून घ्यायला ती कड्यावरून उडी मारून जीव द्यायला जाते. तेव्हा तिथे तिला दिसतो कुमार अमित सिंग. तोही जणू तिच्यासारखाच कड्यावर उभा राहून जीवनाचा अंत करायचा विचार करत असतो. हा अमित शेखरला ओळखतो हे तो पुढे एकदा त्यांच्या घरी येतो तेव्हा तिला कळतं. दोघांच्या भेटी वाढतात. त्याच्या बोलण्यातून तिला कळतं की तो कुठल्याश्या संस्थानाचा राजा आहे. त्याच्या पत्नीचा म्हणजे पूनमचा समुद्रात नाव उलटून झालेल्या अपघातात मृत्यू झालेला असतो. अर्थात तिचा मृतदेह अद्याप मिळालेला नसतो. राजेश्वरी आणि अमितच्या भेटीगाठी होऊ लागतात. हळूहळू दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागतो आणि एके दिवशी अमित तिला मागणी घालतो. एव्हढा प्रतिष्ठीत श्रीमंत तरुण आपणहून आपल्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त करतोय हे पाहून राजेश्वरी हरखून जाते आणि होकार देते.

लग्नानंतर राजेश्वरी नवऱ्यासोबत त्याच्या आलिशान हवेलीत येते खरी पण इथे तिच्यापुढे भलतंच काही वाढून ठेवलेलं असतं. पूनमच्या लग्नात तिच्यासोबत आलेली तिची दाईमा अजून हवेलीत आपला हुकुम चालवत असते. त्यात आल्या आल्या राज्याच्या काही कामासाठी अमितला बाहेरगावी जावं लागतं. आणि राजेश्वरी आयतीच दाईमाच्या हाती सापडते. पूनम किती श्रीमंत घराण्यातली होती, किती उच्चशिक्षित होती, किती सुंदर होती, लोकांत कशी प्रसिध्द होती ह्याचे गोडवे ती सतत राजेश्वरीपुढे गाऊ लागते. घरच्या नोकरचाकरांकडून सुध्दा कधीकधी आधीच्या मालकिणीचा उल्लेख येऊ लागतो. पूनमच्या मानाने रूप, शिक्षण, सामाजिक दर्जा ह्यात काहीशी डावी असलेली असलेली राजेश्वरी ह्या सगळ्या गोष्टींनी कानकोंडली होत जाते. पूनम राहत होती तो हवेलीचा भाग दाईमाने ती जिवंत असताना जसा होता तसाच अजूनही ठेवलेला असतो. राजेश्वरीला तो पहायची खूप इच्छा असते पण 'तिथे कधीकधी पूनम अजूनही आहे' असा भास होतो असं दाईमाने म्हटल्यावर ती तो बेत रद्द करते. बाहेरच्या लोकांत मिसळायची फारशी सवय तिला नसते पण अमित घरी नसताना हवेलीत येणाऱ्या लोकांना तिला भेटावंच लागतं, कधीकधी त्यांनी आयोजित केलेल्या समारंभांना जावं लागतं. तिथेही अपरिहार्यपणे तिची पूनमशी तुलना होत राहते. अमितच्या सतत बाहेर राहण्याने एकटं राहावं लागलेली राजेश्वरी ह्या आयुष्याला कंटाळून जाते.

kohraa2.jpg

तश्यात एके दिवशी कोणालाही भेटायची तिची अजिबात इच्छा नसताना हवेलीत काही लोक येतात. त्यांना टाळायला ती हवेलीच्या दुसरया भागात जाण्यासाठी निघते पण अनवधानाने नेमकी पूनम जिथे राहत असते त्याच भागात येऊन पोचते. पूनमच्या आवडत्या शुभ्र रंगात सजवलेला तो महाल, तिथली आपोआप हलणारी आरामखुर्ची, अचानक उघडणारी खिडकी, कोणी नसताना चालू होणारा शॉवर, पिलो कव्हर्स-बेडशीटस सगळ्यावर असलेलं P हे अक्षर हे सगळं पाहून तिलाही पूनम तिथे वावरत असल्याचं जाणवू लागतं. विलक्षण भेदरून ती तिथून निघून येते. सर्व हवेलीभर जाणवत असलेलं पूनमचं अस्त्तित्व तिच्यासाठी दशांगुळे भरून उरतं. कल्पनेतून उतरून प्रत्यक्षात येऊ पाहतं.

हवेलीत लावण्यासाठी दाईमाने आणलेली पूनमची तसबीर राजेश्वरीच्या हातून पडून फुटते तेव्हा मात्र अमित दाईमावर भडकतो. दुखावली गेलेली दाईमा हवेलीच्या सर्व कारभारातून आपलं लक्ष काढून घेते. पण अचानक अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या पेलायची ना राजेश्वरीची कुवत असते ना तितका आत्मविश्वास. तिला दाईमाच्या नाकदुऱ्या काढाव्याच लागतात. पूनमच्या लाडक्या कुत्र्याला आणायला म्हणून का होईना पण राजेश्वरी समुद्रकिनाऱ्यावरच्या बंगल्यात गेली होती हे कळताच अमितचं पित्त खवळतं. आपली बाहेरख्याली पत्नी त्या बंगल्याचा उपयोग आपल्या मित्रांना भेटण्यासाठी करायची हे तो तिला सांगतो. पण अश्या छोट्या छोट्या प्रसंगांतून अमित आणि राजेश्वरी दोघांत अंतर पडू लागतं. दाईमा आगीत तेल ओतायचं काम करते. आधीच न्यूनगंडाने पछाडलेली राजेश्वरी नवऱ्याचं आपल्यावर प्रेम नाही, आपल्याशी लग्न केल्याचा त्याला पश्चात्ताप तर होत नाहीये ना ह्या नव्या भयाने ग्रस्त होते. हळूहळू तिचं मानसिक संतुलन ढळू लागतं.

आणि नेमकं तेव्हाच पूनमच्या गायब होण्याच्या घटनेपासून हरवलेली अमितची कार एका दलदलीत सापडते. त्यात एक मानवी सांगाडा मिळतो. तो कोणाचा आहे हे सिद्ध व्हायच्या आधीच कमल राय हा पूनमचा मित्र अमितनेच पूनमचा खून केला आहे अशी तक्रार पोलिसांकडे करतो. अमित तो खून केल्याची कबुली राजेश्वरीजवळ देतो आणि तिच्या पायांखालची जमीन सरकते.

पूनमचा खून कोणी केलेला असतो? अमितने? कमलने? का बंगल्याबाहेर सदोदित दारूच्या नशेत पडून राहणाऱ्या रमेशने? पूनमचा आत्मा अजूनही हवेलीत फिरत असतो? का हे सगळे राजेश्वरीच्या मनाचे खेळ असतात? आयुष्यभर ती ज्या सुखाच्या शोधात असते ते सुख राजेश्वरीच्या हाती लागतं का तिला हुलकावणी देतं? तिच्या आयुष्याला व्यापून उरलेलं धुकं विरतं का अजून गडद होतं? काय होतो अमित आणि राजेश्वरीच्या कहाणीचा शेवट?

लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कथानकावर (कदाचित प्रेक्षकांना त्यातल्या त्यात कमी धक्का बसावा म्हणून!) बरेच भारतीय संस्कार केल्याने त्याची अवस्था 'ना घरका ना घाटका' अशी झालेली आहे. त्यामुळे काळाचा विचार करता कथा उपरी वाटते. युट्युबवरून डाऊनलोड केलेल्या चित्रपटात बराच भाग कापला होता म्हणून असेल कदाचित पण चित्रपटाची मांडणी खूप विस्कळीत वाटते. त्यामुळे मूळ कथानकातला थरार एकदमच पातळ झाल्यासारखा वाटतो. ‘Rebecca’ वर बेतलेला हिंदी चित्रपट म्हणून किंवा गोल्डन एरामध्ये जे काही मोजके रहस्यमय चित्रपट झाले त्यातला एक म्हणून पाहायचा असल्यास (ह्यापुढला लेख अजिबात न वाचता) पाहू शकता. नपेक्षा सरळ हिचकॉककाकांचा चित्रपट पाहून टरकावं हे उत्तम. Happy

फोटो पाहून हे लक्षात आलं असेलच की जहागीरदार, ठाकूर, जमीनदार ह्या भूमिका करण्याची महान परंपरा विश्वजितने ह्याही चित्रपटात कायम राखली आहे. इथे तो नायक कुमार अमितच्या भूमिकेत दिसतो. कपाळावर विचित्रपणे आलेली बट आणि ढेकूणछाप मिशी असल्या अवतारात त्याला मूळ कादंबरीतल्या Maxim de Winter चा देशी अवतार म्हणून स्वीकारणं भयानक जड जातं. वहिदासोबतच्या प्रेमाच्या दृश्यात तर त्या बटीमुळे तो प्रचंड विनोदी दिसतो. त्यात ह्या व्यक्तिरेखेला चढवलेला भारतीय साज अजिबात सूट झालेला नसल्यामुळे ती पटत नाही. एक तर पूनमची लग्नाआधीच अफेअर्स होती का लग्न झाल्यावर तिने 'विबासं' ठेवायला सुरुवात केली ते चित्रपटात स्पष्ट होत नाही. एखाद्या संस्थानाचा राजा लग्न करण्याआधी होणाऱ्या बायकोची काहीही चौकशी करणार नाही हे शक्य वाटत नाही. आणि लग्न झाल्यावर तिचं वागणं पटत नसेल तर घटस्फोटाचा मार्ग खुला असताना तिचा खून करून तो आपल्या पायांवर धोंडा का पाडून घेईल? कारण त्यांची एकंदरीत जीवनशैली पाहता 'घटस्फोट घेणे' म्हणजे जगबुडी वगैरे काही समज असेल असंही जाणवत नाही, बरं 'पूरखोंकी/खानदानकी इज्जत' वगैरे काढायला त्याचे आई-वडीलही हयात दाखवलेले नाहीत. विश्वजितवर आणखी बरंच काही लिहिता येईल. तूर्तास इतकं पुरे. Happy

kohra3.jpg

पण कुमार अमित ही ह्या चित्रपटाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा नव्हे. ती आहे राजेश्वरी. आणि ही भूमिका वहिदा रहमानने त्यातल्या सर्व छटांसह नेहमीच्या सहजतेने रंगवलेली आहे. आपलं एका मनोरुग्णाशी लग्न ठरतंय ह्या बातमीने हताश झालेली गरीब तरुणी, कुमारच्या सहवासात फुललेली प्रियतमा, स्वप्नातला राजकुमार भासावा अश्या तरुणाशी लग्न झालेली नववधू, बुद्धी-सौंदर्य-संस्कार ह्या बाबतीत आपण कमी पडतोय ह्या न्यूनगंडाने व्याकूळ झालेली, आलिशान हवेलीत आता जिवंत नसलेली आपली सवत अजून वावरतेय ह्या भीतीने गोठलेली आणि नवऱ्याचं प्रेम हरपून बसण्याच्या कल्पनेनेच धास्तावलेली स्त्री तिने अचूक उभी केली आहे. राजेश्वरीचं background लक्षात घेता तिचं हवेलीतलं वैभव पाहून आलेलं भांबावलेपण आपण समजू शकतो. पण तरीही मला राजेश्वरीबद्दल अजिबात सहानुभूती वाटली नाही. ज्या सहजतेने ती दाईमासमोर नांगी टाकते ते पाहून जाम चिडचिड झाली. अमितच्या हातून पूनमचा खून झालेला नसतो हे जरी खरं असलं तरी त्याने तिच्यावर गोळी झाडलेली असते एव्हढंच नव्हे तर आपला गुन्हा दडवायला तिचा मृतदेह घालून गाडी दलदलीत ढकलून दिलेली असते हेही तितकंच खरं. मग अश्या नवर्‍याकडे ती का परत जाते?

kohra4.jpg

मूळ कादंबरीमधली हाउसकीपर Mrs Danvers ची भूमिका इथे ललिता पवार ह्यांनी केली आहे. आणि त्यात त्या अगदी चपखल बसल्या आहेत. पूनमवर मनापासून प्रेम करणारी, हातात जपमाळ घेऊन 'नारायण, नारायण' चा जप करणारी, हवेलीचा कारभार एकहाती सांभाळणारी, मोजक्या शब्दांतून राजेश्वरीचा पाणउतारा करणारी, वरवर चांगुलपणाचा आव आणून तिच्या आत्मविश्वासाला जाणीवपूर्वक तडे देणारी - थोडक्यात सांगायचं तर 'न बोलून शहाणी' असलेली दाईमा त्यांच्याशिवाय दुसरी कोणी उभी करू शकलंच नसतं असं वाटतं. ह्या व्यक्तिरेखेचं भारतीयीकारण बऱ्यापैकी जमलंय. ‘वो बदचलन हो गयी तो मुझे ऐसा लगा के मै बदचलन हो गयी' हे त्यांच्या तोंडचं वाक्य आपल्याला पटतं ते ह्याचमुळे. तरी ह्यात एक छोटीशी का होईना उणीव राहिलेय. ज्या पोरीला आपण लहानपणापासून लाडाकोडांत वाढवलं तिला स्वत:च्या हाताने विष देऊन संपवणारी करारी दाईमा शेवटी आपला गुन्हा कबूल करण्यामागचं कारण सांगते तेव्हा तिच्या वागण्यातला हा बदल अचानक झाल्यासारखा वाटतो. तिला राजेश्वरीबद्दल काही सहानुभूती वाटतेय असं त्याआधी तिच्या वागण्यातून अजिबात जाणवत नाही.

kohra5.jpg

चित्रपटातली तिसरी महत्त्वाची स्त्रीव्यक्तिरेखा पूनमची - पूर्ण चित्रपटभर तिचा चेहेरा आपल्याला दिसतच नसला तरी तिचं अस्तित्व राजेश्वरीसोबत आपल्यालाही जाणवत राहतं. चित्रपटाची श्रेयनामावली पाहायला न मिळाल्यामुळे तिचं काम करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव त्यात होतं की नाही ते मला कळलं नाही. पण विश्वजितच्या एका मुलाखतीत अनेक वर्षानंतर त्या नावाचा उलगडा झाल्याचं नमूद आहे. ह्या अँग्लो-इंडियन नटीचं नाव थेल्मा होतं. विकिवर सुध्दा तेच नाव आहे.

बाकी काही भूमिकांत 'बीस साल बाद' मधले अनेक कलाकार दिसतात उदा. मदन पूरी (कमल राय), मनमोहन कृष्ण (कमलचे वकील) आणि असित सेन (अमितची गाडी ज्याला दलदलीत दिसते तो गोवर्धन). त्याशिवाय तरुण बोस (रमेश), सुजित कुमार (अमितचा मित्र रंजन), अभी भट्टाचार्य (अमितचे वकील) आणि रायसाहेबांच्या पत्नीच्या भूमिकेत चक्क शौकत आझमीही दिसतात.

ह्या चित्रपटातली सर्वच गाणी सुरेख आणि सुरेल आहेत. असणारच! कैफी आझमींची लिरिक्स, हेमंत कुमारचं संगीत (चित्रपटाची निर्मितीसुध्दा त्यांचीच) आणि आवाज लता मंगेशकर-हेमंत कुमार. राह बनी खुद मंझील, ओ बेकरार दिल, झूम झूम ढलती रात (हे गाणं चित्रपटात दोन वेळा येतं) आणि ये नयन डरे डरे सगळीच्या सगळी माझ्या ऑल-टाईम हिटलिस्टमध्ये आहेत. पैकी 'ओ बेकरार दिल' आणि 'झूम झूम ढलती रात' चं एक व्हर्जन युट्युबवरून डाउनलोड केलेल्या पहिल्या भागात नव्हतं म्हणून तो शेवटी 'घाटेका सौदा' ठरला असं म्हटलं. 'ये नयन डरे डरे' च्या शुटींगच्या वेळची एक मजेदार आठवण विश्वजितने त्याच्या मुलाखतीत सांगितली आहे. हे गाणं महाबळेश्वरच्या वळणावळणाच्या रस्त्यांवर शूट केलं गेलं तेव्हा विश्वजित-वहिदाच्या कारच्या मागच्या कारमधून सिनेमाटोग्राफर मार्शल ब्रेगान्झा येत होते. त्यांनी कॅमेरा उलटा धरून घेतलेल्या शॉटचं तेव्हा बरंच अप्रूप होतं म्हणे. मला मात्र २०१८ मध्ये तो उलटा शॉट पाहताना फिल्म खराब झालेय का काय अशी शंका आली. कालाय तस्मै नम:. दुसरं काय!

चित्रपटात खटकणारया काही गोष्टींबाबत आधीच लिहिलं आहे. कोर्ट अमितची निर्दोष मुक्तता करतं तेही पटलं नाही कारण त्याच्या हातून गुन्हा घडलेला असतोच. अमित आणि राजेश्वरी हवेलीत परत जातात तेव्हा राजेश्वरी 'बहोत कुछ बदल गया है' असं म्हणते त्याचा अर्थ तिचं आणि अमितचं नातं पूर्वीसारखं राहिलं नाही असा घ्यायचा का ते स्पष्ट कळत नाही. कारण त्यानंतर ती 'दाईमा आप अमर है' असला तद्दन फिल्मी डायलॉग टाकते.

हे सगळं मान्य करूनही असं म्हणेन की ज्यांना रहस्यमय चित्रपटांची आवड आहे त्यांना जागीच खिळवून ठेवणाऱ्या काही गोष्टी ह्या चित्रपटात नक्कीच आहेत. आपल्या मृत मालकिणीच्या स्मृती जपणारा शुभ्रधवल महाल, समुद्रकिनाऱ्यावरचा दुरावस्थेतला गूढ बंगला, कुमार अमितच्या आलिशान हवेलीतल्या सजवलेल्या प्रचंड खोल्या, त्यातून सैरावैरा धावत सुटलेली घामाघूम राजेश्वरी आणि तिचा पाठलाग करणारे पूनमच्या गाण्याचे सूर:

जिसको कोई समझे ना, बात ना वो दोहरा
मेरा तेरा जीवन क्या, छाया हुआ कोहरा
मेरा तेरा जीवन क्या.....
किसने सुनी कभी दिलकी बात
झूम झूम ढलती रात

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना, परिचय आवडला. युट्यूबवर नाही मिळाला, तरी गाणी ऐकायला मिळतीलच. ती तरी ऐकते.

आहाहा!! नेहमीप्रमाणेच उत्तम.
या तुझ्या ६० च्या भयपटांबद्दल वाचताना आणि ते चाळताना
जाल नावचा एक चित्रपट हाताला लागला. भयंकरपट होता.
तोच तो विश्वजीत ती आगाऊ अभिनय करणारी सिन्हांची माली
अशाच चित्रपटांसाठी राखून ठेवलेले तरूण बोस, सुजित कुमार.
अतिशय कंटाळा आला.
एकच चांगली आणि अतिशय अभावानेच आढळणारी गोष्ट म्हणजे ग्रे शेडच्या भुमिकेत सिल्कच्या नाईट गाऊन मध्ये फिरणारी निरूपा रॉय

स्वप्ना किती सुंदर लिहितेस गं तु Happy
मला तुझी हि सिरिज फार फार आवडते. मी एकही मिस केलं नाहिये वाचायचं.
आता प्लिज पुढचा सिनेमा तेरे घर के सामने घे.. मी पाहिला आहे.
मजेशिर आणि हलका फुलका आहे एकदम.

मला तर वाटते जुन्या सिनेमांत कथानकांपेक्षा (काही अंशी नायकपण ठोकळे असूनही) गाण्यांवर जास्त भर असायचा आणि त्यावर सिनेमे चालायचे. उदा. प्रदिप कुमार्/भारत भूषण इ. ठोकळे कलाकार निव्वळ रफिने आवाज दिला म्हणून तरून गेले चित्रपट सृष्टीत. जुन्यापैकी उत्कंठावर्धक, सुदृढ कथानक, उत्तम अभिनय, उत्तम संगित, उत्तम दिग्दर्शन असलेला एक चित्रपट मला आठवतोय तो म्हणजे तिसरी मंझिल.

छान लिहलं आहे.
कोहरा बघितला आहे. बरा होता. खूप सिन अगदी तसेच्यातसे कॉपी केलेत रबेका किंवा सायकोमधून...

धन्यवाद लोक्स! मलाही मजा येतेय हे पिक्चर्स पाहून त्यावर लिहायला Happy

अनया, https://www.youtube.com/watch?v=VYlrRWiM38g ह्या लिंकवर सुरुवातीपासूनचा चित्रपट मिळेल.....साधारण २४ मिनिटांचा भाग आहे. https://www.youtube.com/watch?v=T-2nGDiGgqw वर बाकीचा चित्रपट आहे.

गुगु, क्या कह रहे हो? सिल्कच्या नाईट गाऊन मधे फिरणारी निरुपा रॉय? ह्या बाईला मी सदोदित पांढर्‍या फाटक्या साडीतच पाहिलंय. हा चिमित्कार बघायला तरी हा पिक्चर पहायला हवा Proud सुजीत कुमारला कोहरात अक्षरशः पाच मिनिटांचा रोल आहे. तरी अ‍ॅक्टींग बरी करायचा तो.

दक्षिणा, तेरे घर के सामने आहेच लिस्टवर. पण सध्या आधी डाऊनलोड केलेले पिक्चर्स पाहतेय.

कोहरातली गाणी मस्त आहेत. वहिदा सुंदर दिसते. पण चित्रपट अजिबात आवडत नाही. रेबेकाचे भारतीयीकरण करण्याच्या नादात स्टोरी गंडली आहे. शेवट बदलून टाकला आहे एकदम. डायव्होर्स घेण्याच्या बाबतीत मूळ पुस्तकातही उल्लेख नाही. तो प्रश्न मलाही पुस्तक वाचताना पडला होता. त्यात रेबेका नवर्‍याला लग्नाच्या रात्रीच आपण किती बदफैली आहोत, आपली किती अफेअर्स आहेत ते गर्वाने रंगवून सांगते, पण नवरा निमूटपणे ऐकून घेतो, आपल्या प्रतिष्ठेला, इभ्रतीला धक्का लागेल म्हणून घटस्फोटाचा विचार करत नाही, बायकोची प्रकरणं सहन करतो. ते तसंच कोहरामधे आहे. पण इथे ती भारतातली राणी दाखवली आहे तर तिच्या वर्तणुकीवर लोकांचंही बारीक लक्ष असणार, ती खुलेआम दर रात्री नवरा नसताना प्रियकराला भेटायला जाते, दारू पिते, ते पटत नाही.

छान लिहिले आहे. हा चित्रपट लहानपणी बघितला होता तेव्हा भीती वगैरे वाटली होती. काही वर्षापूर्वी पुन्हा पहायला सुरुवात केली आणि अर्ध्यातच सोडून दिला. मांडणी विस्कळीत वाटली. युट्यूबवर काही दृष्ये कापली असावीत.

चित्रपटातली तिसरी महत्त्वाची स्त्रीव्यक्तिरेखा पूनमची - पूर्ण चित्रपटभर तिचा चेहेरा आपल्याला दिसतच नसला तरी तिचं अस्तित्व राजेश्वरीसोबत आपल्यालाही जाणवत राहतं. चित्रपटाची श्रेयनामावली पाहायला न मिळाल्यामुळे तिचं काम करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव त्यात होतं की नाही ते मला कळलं नाही. पण विश्वजितच्या एका मुलाखतीत अनेक वर्षानंतर त्या नावाचा उलगडा झाल्याचं नमूद आहे. ह्या अँग्लो-इंडियन नटीचं नाव थेल्मा होतं. विकिवर सुध्दा तेच नाव आहे. >>>>>>> ह्या माहितीबद्दल धन्स स्वप्ना. मला आधी ती शशिकला वाटलेली आवाजावरुन आणि हातान्वरुन.

ऍना करेनिना कादंबरीचे विकीपान वाचताना खालील परिच्छेद दिसले. यावरून त्याकाळातल्या घटस्फोटाबद्दल थोडीफार कल्पना येईल..
रबेका बरीच नवीन आहे ऍनापेक्षा पण कहाणी कोणत्या काळात घडते माहित नाही.

When Anna and Vronsky continue seeing each other, Karenin consults with a lawyer about obtaining a
divorce. During the time period, a divorce in Russia could only be requested by the innocent party in an affair and required either that the guilty party confessed—which would ruin Anna's position in society and bar her from remarrying in the Orthodox Church—or that the guilty party be discovered in the act of adultery. Karenin forces Anna to hand over some of Vronsky's love letters, which the lawyer deems insufficient as proof of the affair. Stiva and Dolly argue against Karenin's drive for a divorce

===
Stiva visits Karenin to seek his commendation for a new post. During the visit, Stiva asks Karenin to grant Anna a divorce (which would require him to confess to a non-existent affair), but Karenin's decisions are now governed by a French " clairvoyant " recommended by Lidia Ivanovna. The clairvoyant apparently had a vision in his sleep during Stiva's visit and gives Karenin a cryptic message that he interprets in a way such that he must decline the request for divorce.

स्वप्ना, खूप सुरेख लिहिले आहेस ग. कोहरा दु द वर पाहिलेला पण अजिबात कळला नाही व त्यामुळे आवडला नाही. पण तू लिहिलेले परिक्षण लै भारी आहे. आवडले.

जुन्या हिंदी चित्रपटात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या जात. हिरोचे लग्न झाले असल्यास त्याची बायको बदचलन हवीच म्हणजे याने बाहेर विबासं सुरू केले तरी हा जबाबदार नाही. तेच हीरॉईनवर दुर्दैवाने वाममार्गास लागण्याचे प्रसंग आले तर तिने मात्र शेवटी मरायला हवेच. अन्यथा तिला मुक्ती नाही. विवाहित हिरो असलेले चित्रपट हाताच्या बोटावर मोजता येतील इतके कमी असले तरी स्वतःची कसलीही चूक नसताना वाममार्गाला लागलेल्या हिरोईनी शेवटच्या रीळात हिरोचा हात कुणा दुसरीच्या हातात देऊन रडत रडत डोळे मिटतानाचे भरपूर चित्रपट आहेत.

हिरोच्या नावाला कसलाही ठपका लावायचा नाही ह्या सूत्राला अनुसरून मूळ कथानक बदलावे लागले व ते बदलताना मारलेल्या कोलांटउड्यांमुळे चित्रपट बिघडला.

गाणी मात्र अफलातून. निर्माता हेमंतकुमारपेक्षा संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार वरचढ ठरला.

स्वप्ना, छान लिहिलंय.
चित्रपट बघण्याची शक्यता नाहीच, पण लिहिलेलं वाचूनच चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला.

During the time period, a divorce in Russia could only be requested by the innocent party in an affair and required either that the guilty party confessed—which would ruin Anna's position in society and bar her from remarrying in the Orthodox Church। >>>>> this is applicable today too. My friend is not permitted by church to remarry. ती आता न घरकी न घाटकी होऊन 2 वर्षे विचित्र परिस्थितीत अडकून बसली आहे.

स्वप्ना, रिबेका पाहिल्यावर कोहरा कसासाच वाटला होता, पण गाणी अतिशय सुंदर. तू खूप छान लिहिलं आहेस.

चीकू बरोबर....मलाही तसंच वाटलं होतं.

सुलू_८२.....मला ती 'बिन बादल बरसात' मध्ये ती नटी होती ना निशी म्हणून ती वाटत होती इतकी वर्षं...

अ‍ॅमी, अ‍ॅना कॅरेनिना वाचली होती मी काही वर्षांपूर्वी.....आवडली नव्हती फारशी.

मीरा....चर्चची अ‍ॅबॉर्शन, घटस्फोट ह्याबद्दलची मतं मला कधीच समजली नाहीत. Sad माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नव्हे. असो. हे सगळ्या धर्मांत थोडंफार आहेच.

साधना....संगीतकार हेमंतकुमार दिग्दर्शक हेमंतकुमारपेक्षा उजवा ठरला हे मत १००% पटलं अगदी. 'देख कबिरा रोया' अ‍ॅड केला लिस्टमध्ये. आता ही लिस्ट साधारण मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत चालली आहे Proud

चित्रपटातली आणखी एक न पटलेली गोष्ट म्हणजे पूनमचं मदन पुरीसोबत अफेअर असतं. विश्वजीत नको हे ठी़क आहे. पण म्हणून एकदम मदन पुरी काय? कैच्या कै. मग सुजीत कुमार काय वाईट होता? Uhoh तसंच पूनमची डेड बॉडी मिळालेली नसताना तो राजेश्वरीशी लग्न कसा करू शकतो तेही कळलं नाही.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार!!!

> this is applicable today too. My friend is not permitted by church to remarry. ती आता न घरकी न घाटकी होऊन 2 वर्षे विचित्र परिस्थितीत अडकून बसली आहे. > कुठे भारतात? कायदेशीर घटस्फोट घेतला असेल तर रजिस्टर हापिसात जाऊन लग्न करता येईल असे वाटते. चर्च काय, कशी अडवणूक करणार?
पण घटस्फोट घेणं हेच अजूनही बऱ्यापैकी टॅबू आहे हे मान्य.

===
> तसंच पूनमची डेड बॉडी मिळालेली नसताना तो राजेश्वरीशी लग्न कसा करू शकतो तेही कळलं नाही. > हरवलेला मनुष्य ७ वर्ष सापडला नाही तर मृत घोषित करतात.

===
> अॅना कॅरेनिना वाचली होती मी काही वर्षांपूर्वी.....आवडली नव्हती फारशी. > काय आवडलं नाही?

this is applicable today too. My friend is not permitted by church to remarry>>>

माझ्या एका कलीगलाही हा त्रास झाला. तिचे काही जेनुईन इसयुज होते त्यामुळे घटस्फोट हवा होता. कायद्याने घटस्फोट झाला पण तिला चर्चमधून सुदधा हवा होता. नाहीतर दुसरे लग्न चर्चमध्ये स्वीकारले जाणार नाही ना. तिची केस पोपपर्यंत जाऊन तिला शेवटी घटस्फोट मिळाला. यात 5 वर्षे गेली. तिने नंतर एका हिंदूशी लग्न केले, दोन्ही धर्माच्या पद्धतीनुसार. पण हिंदूशी लग्न करण्याआधी तिला मुलांना ख्रिस्ती करेन अशी शपथ चर्चमध्ये घ्यावी लागली.

मला माहित असलेल्या केस मध्ये हे असे घडले. रोजचा संपर्क असल्याने रोज चर्चा व्हायची त्यामुळे कळले. बाकी यावरून पूर्ण ख्रिस्ती धर्माबद्दल जनरलायझेसन करता येणार नाही/नसावे.

कुठे भारतात? कायदेशीर घटस्फोट घेतला असेल तर रजिस्टर हापिसात जाऊन लग्न करता येईल असे वाटते. चर्च काय, कशी अडवणूक करणार? >>>>> स्वप्ना सॉरी, तुझा धागा भरकटतो आहे, पण या प्रश्नाला उत्तर द्यावस वाटतं आहे.

अँमी, मी भारत - पुण्यमधल्या उदाहरणाबद्दल बोलते आहे. चर्चला वाटतं आहे की नवरा बायकोने समेट करावा, वेगळं होऊ नये. हां कायदेशीर रित्या वेगळं होता येईल, लग्न पण करता येईल, पण मग चर्च तिच्यावर (kind of) बहिष्कार टाकेल. जसं की तिच्या मुलाचं कम्युनियन होणं, चर्चच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणं, फादरची ब्लेसिंगज, प्रायव्हेट प्रेअर्स इ इ गोष्टी चर्च करायला नकार देईल. आपण कदाचित म्हणू गेले उडत, पण ख्रिसचन्स जेवढे मॉडर्न pretend करतात तेवढे धर्माच्या बाबतीत ते कर्मठ असतात. चर्चने तुम्हाला / कुटुंबियांना नाकारणं ही गोष्ट त्यांना सहनच होत नाही. माझी मैत्रीण तरी याच सिच्युएशन मध्ये वाईट अडकली आहे.

अ‍ॅमी, हो, हरवलेल्या व्यक्तीबाबतचा तो कायदा माहित आहे. अर्थात ह्या चित्रपटात मध्ये किती काळ गेलाय हे निदान मला तरी कळलं नाही. म्हणून ते ऑड वाटलं.

अ‍ॅना कॅरेनिना बद्दल पुन्हा कधीतरी. आता इथे लिहीत नाही. तसंही पुस्तक वाचून खूप वर्षं झाली आहेत. सगळं डिटेलमध्ये आठवणं आता कठिण आहे.

मग त्या मानाने हिंदू लोक डायव्होर्स च्या बाबतीत खूपच ओपन आहेत म्हणायचे!
कुणाही डिव्होर्सी ला मंदिरात प्रवेश नाही , काही धार्मिक कार्य करायचे नाही .... असे नसते....

हिंदू मध्ये द्विभार्या प्रतिबंधक कायदा यायच्या आधी एकापेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न करायला मान्यता असल्यामुळे नवऱ्याच्या बाजूने घटस्फोट तितकेसे गांभीर्याने घेतले गेले नाहीत. आणि स्त्रिया स्वतंत्र नसल्यामुळे त्यांना कितीही हवा असला तरी घटस्फोट घेऊन त्या जाणार कुठे? त्यामुळे घटस्फोट ह्या विषय जुन्या समाजात नसेल बहुधा. आता परिस्थिती बद्दललीय.

मग त्या मानाने हिंदू लोक डायव्होर्स च्या बाबतीत खूपच ओपन आहेत म्हणायचे! कुणाही डिव्होर्सी ला मंदिरात प्रवेश नाही , काही धार्मिक कार्य करायचे नाही .... असे नसते....

>>>

ख्रिस्ती , मुस्लिम व इतर धर्म जे धर्म म्हणून स्थापन केले गेले त्या सगळ्यांचे सेट रुल्स आहेत. आयुष्ये चर्च, मशिदी, सिनेगॉगला बांधलेली असतात. जन्मानंतर धर्म प्रवेश, मृत्यूनंतर दफन वगैरे सगळीकडे धर्माचा डोक्यावर हात लागतोच. म्हणून माझी कलीग धडपड करत राहिली चर्चमधून घटस्फोट मिळवण्यासाठी. तिची उमेदीची वर्षे यात फुकट गेली. पहिले लग्न 23 साव्या वर्षी झाले, 1 महिना नवऱ्याबरोबर राहून माहेरी आली. 35 साव्या वर्षी दुसरे लग्न झाले, ट्रीटमेंट घेऊन जुळी मुले झाली.

थोडी फार हीच स्टोरी वापरून दिनो मोरीयचा एक सिनेमा येऊन गेला .

त्यात दाइमाच्या ऐवजी तरुण केअर टेकर आहे , ती खुनी असते.

अनामिका

https://youtu.be/2-eww7BI8Q0

कोहरा बघितला. ट्विस्ट ओळखता आला नाही.
चित्रपट बरा वाटला, पण यूट्युब वरील दोन्ही प्रिंट्स खराब आहेत.

मग त्या मानाने हिंदू लोक डायव्होर्स च्या बाबतीत खूपच ओपन आहेत म्हणायचे!
कुणाही डिव्होर्सी ला मंदिरात प्रवेश नाही , काही धार्मिक कार्य करायचे नाही .... असे नसते....

हिंदुंमधे घटस्फोट हा option च नसावा बहुधा! मुलगी मुळात दानच केली जाते. मग तो नवर्याच्या मालकीचा उपयुक्त पशू. नवरा वागवेल तसे वागवून घेत गपगुमान रहायचे. आणि पुरुषांसाठी polygamy ची आणि बायकोला 'टाकून ' देण्याची सोय होती.

घटस्फोट ही बरीच अलिकडची सुधारणा असावी.

Pages