शोध आणि बोध

Submitted by शिवाजी उमाजी on 9 December, 2018 - 12:41

शोध आणि बोध

आपण सगळे तिर्थाटन करतो, यात्रा करतो त्या दरम्यान मंदिरात जातो, का बरं जातो आपण? कारण परंपरेने काही धार्मिक गोष्टी आपल्याला वारश्यात प्राप्त झालेल्या आहेत, कधी त्याचे पालन करायचे म्हणून तर कधी श्रद्धा म्हणून, पण त्या त्या ठिकाणी खरोखरच परमेश्वर आपल्याला दिसतो, भेटतो का? यावर माझ्यामते उत्तर नाही असेच आहे... कारण परमेश्वर हा तुमच्या आमच्या ह्रदयात वसलेला आहे, अशाच काहीशा भावना गीतकार वंदना विटणकर यांनी आपल्या गीतातून व्यक्त केल्या आहेत... “शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी, नांदतो देव हा, आपुल्या अंतरी”

परमेश्वर हा आपल्या प्रेमळ स्नेहमयी आचरणातुन, व्यवहारातुन, परोपकारातून तुम्हाला आणि इतरांना दिसतो, जाणवतो... पंचमहाभुतांच्या प्रेरणेतून आपण जीवंत असल्या कारणाने मी स्वतः परमेश्वराला पुढील प्रमाणे शोधायचा प्रयत्न करतो... योग्य अयोग्य काय हे नाही समजत तरीही...या भावना चुकीच्या नाहीत असं म्हणावे लागेल.

दया क्षमा भाव । मना चित्ती धरी । वसे जो अंतरी । रत्नगर्भे  ।।१।। 
जगता असावा । निर्मळ स्वभाव । पारदर्शी भाव । जळा परी ।।२।। 
प्रयत्ने रहावे । उध्दाराया तमा । येवो जन्म कामा । कवि जैसा ।।३।। 
अदृष्य रूपात । तारतो सर्वांस । अहर्निश श्वास । देतो प्राण ।।४।।  
ह्रदयी जपावी । वात्सल्य करूणा । जसा नेत्री पान्हा । गो मातेच्या ।।५।।
वृक्षाचीये ठायी । जैसा सेवा धर्म । आचरावे कर्म । सर्वां प्रती ।।६।।

कुणी मानो अथवा न मानो परंतु निराकार, निर्गुण अशा सर्वव्यापक परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध अशा पाच कर्मेंद्रियां द्वारे जाणवत असतं आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं सहावं ईंद्रीय जे मन आहे असे आपण मानतो ते या सर्वांना कबूल करून मान्यता देते किंबहुना पुढील श्लोकात म्हटल्या प्रमाणे...

"ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।" (श्रीमद् भगवद्गीता १५:०७)

परमेश्वराचे अस्तित्व या सर्व ईंद्रीयांना स्वतः पर्यायाने प्रकृतीकडे आकर्षित करून घेत असते. मग अस्तिक नास्तिकतेचा प्रश्नच उद्भवत नाही कारण अणु रेणूने बनलेल्या शरीरात जोवर श्वास अर्थात जीव आहे, तोवर या सर्व गोष्टी तुमच्या आमच्या पासून वेगळ्या होऊच शकत नाहीत या न त्या प्रकारे प्रकृतिशी, निसर्गाशी मर्त्य जीवाला जुळवून घ्यावेच लागणार, भले कुणी मान्य करा अथवा न करो. इथे प्रश्न भावणाऱ्या, आकलन होणाऱ्या जाणीवांचा आहे, आणि नेहमी आपण म्हणतोच की त्याच्या इच्छे विरुद्ध झाडाचे पान सुद्धा हलत नाही, सर्व कर्ताकरविता तोच आहे.

आजवर अनेक संत महंतानी परमेश्वराला अनेक रुपात शोधायचा प्रयत्न केला, कुणाला तो मळ्यात, मातीत जाणवला, कुणाला साक्षात्कार झाला संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज आपल्या अभंगातून त्या परमेश्वराला निसर्गात केवळ शोधतच नाहीत तर त्याला आपला नातलग, सगा सोयरा मानतानां म्हणतात... 'वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें'... थोडक्यात काय तर प्रत्येक संतांनी आप आपले व्यवसाय करताना त्या परमेश्वराची सेवा करीत आहे असे समजून त्याचा शोध घेत राहिले आणि त्यातून आध्यात्मिक साहित्याचा अनमोल असा अपार ठेवा आपल्याला मिळाला. आधुनिक काळातील कवींनी पण अनेक पद्धतीने त्याला शोधायचा प्रयत्न केला आहे त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे गीतकार सूर्यकांत खांडेकरांना पडलेला प्रश्न, ते विचारतात...

"त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का?"

कीती साधा परंतु अंतर्मुख व्हायला लावणारा प्रश्न आहे नाही? आणि अशाच लहान लहान प्रश्नांमधून त्याच्या अस्तित्वाचे गूढ हळूहळू उलगडत जाते, जसे फुलांची एक एक पाकळी उलगडत जावी आणि शेवटी केसरमंडल दिसावे, फुल तर तसे नश्वर आहे, परंतु सुगंध रुपाने ते कायम आपल्या स्मरणात राहते. इथे परमेश्वर तसा दृश्य नाही, तो निर्गुण निराकार आहे आणि म्हणूनच त्याचा अंतीम शोध लागत नाही त्यामुळेच कदाचित त्याला शोधता शोधता कविवर्य मंगेश पाडगावकर लोकांना विचारतात...

“कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी,
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी” असा विचार करीत असतांना त्यांची ईश्वरा बद्दलची आसक्ती कमी होत नाही, त्याची आळवणी करताना ते पुढे म्हणतात ...

“तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे,
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे” अशा प्रकारे प्रत्येकजण त्या निर्गुण निराकार परमेश्वराला शोधत असतो, कुणी आपल्या कृतीतून, कर्मातून प्रत्येकाची आपआपल्या धर्मानुसार, परंपरेनुसार पद्धत वेगळी मात्र ध्येय एकच.

प्रत्येकाच्या धार्मिक भावना व्यक्तिगत, वेगवेगळ्या असणार हे नक्की तरीही तीचे अंतिम स्थान, ध्येय एकच असणार जे शांतीकडे, मोक्षाकडे घेऊन जाते. आज आत्म उन्नती सोबत स्माजोन्न्तीचा विचार होणे काळाची जरज आहे, आणि हीच गोष्ट जवळपास सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांच्या लक्षात आली असावी आणि त्या साठी “आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसायदान हे” असे म्हणत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी त्या परमेश्वराकडे असे सर्वश्रेष्ठ दान मागून महान कार्य केले, ज्याला कशाचीच उपमा देता येणे शक्य नाही. यातून समाजाने योग्य बोध घेणे गरजेचे आहे एकोप्याने राहून परस्परांच्या, समाजाच्या, विश्वाच्या कल्याणासाठी, हितासाठी झटायला हवे आहे. शेवटी सर्व धर्माचे तेच तर ब्रीद आहे, तरीसुद्धा हल्ली समाजात, जाती जातीमध्ये विसंवाद, असहकार दिसतो, असंतोष दिसतो जो तसा कुणाच्याही हिताचा नाही याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा, तसा सर्वांना बोध होवो हीच त्या परमेश्वराकडे नम्र प्रार्थना.

©शिवाजी सांगळे,
मोबाईल +९१ ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t31394/new/#new

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

यातून समाजाने योग्य बोध घेणे गरजेचे आहे एकोप्याने राहून परस्परांच्या, समाजाच्या, विश्वाच्या कल्याणासाठी, हितासाठी झटायला हवे आहे. शेवटी सर्व धर्माचे तेच तर ब्रीद आहे, तरीसुद्धा हल्ली समाजात, जाती जातीमध्ये विसंवाद, असहकार दिसतो, असंतोष दिसतो जो तसा कुणाच्याही हिताचा नाही याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा, तसा सर्वांना बोध होवो हीच त्या परमेश्वराकडे नम्र प्रार्थना. >>> आमेन... अशी सद्बुद्धी सगळ्यांना मिळो.