अनंत वाचाळ बरळती बरळ!

Submitted by अँड. हरिदास on 28 December, 2017 - 22:36

अनंत वाचाळ बरळती बरळ!

राज्यघटनेने सर्व भारतीयांना मूलभूत हाक्काद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. मात्र या स्वातंत्र्याचा गैरवापर करून द्वेषमूलक विधाने करणाऱ्या उठवळ नेत्यांची संख्या गेल्या काही दिवसापासून वाढते आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक नीतिनियम, सामाजिक आदर, परंपरा, नीतिमूल्यांची निर्लज्जपणे होळी करणे नव्हे, हे या बेलगाम वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांच्या लक्षातच येत नाही. पक्षाच्या किंव्हा सत्तेच्या एकाद्या पदाची माळ गळ्यात पडली कि ही मंडळी बोंबा ठोकायला मोकळी होतात. काहीवेळा पक्षही अश्या वाचाळवीरांना आवर घालण्याऐवजी त्यांचे समर्थन करतो. त्यामुळे यांची हिम्मत अजूनच वाढते आणि त्यांच्या सुटलेल्या जिभा सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार करून जातात. आपण काय बोलतोयं, त्याचा समाजमनावर काय परिणाम होईल, याची या बोलभांडाना किंचितही तमा राहत नाही. ' उचलली जीभ कि लावली टाळूला' या उक्तीनुसार हातात माईक पडला कि ही मंडळी बेफाम सुटतात. मग, त्यांचे बोलणे 'बरळणे' कधी होते..ते त्यांच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. चंद्रपूरचे खासदार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि कर्नाटकमधील उत्तर कन्नडाचे खासदार, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांची वक्तव्ये याचीच साक्ष देतात.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्सच्या उदघाटनासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आलेले होते. यावेळी दोन प्रमुख डॉक्टर अधिकृत रजेवर गेले होते. याचा राग येऊन अहिर संतप्त झाले. मी येणार हे माहित असतानाही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात ? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी नक्षलवादी संघटनेत सामील व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असं जाहीर वक्तव्य त्यांनी केले. आपण जनतेने निवडून दिलेला खासदार असून केंद्रात राज्यमंत्रिपदावर असतानाही डॉक्टरांची अनुपस्थतीत राहण्याची हिम्मत कशी होते ? अशी विचारणा अहिर यांना करायची होती. अर्थात, आपल्या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसतील तर मंत्र्याने त्याची नोंद घेणे आणि त्याचा जाब विचारणे, यात काहीच चूक नाही. परंतु जाब विचारण्याची एक पद्धत असते. अनुपस्थतीत राहिले म्हणून त्यांना नक्षलवादी होण्याचा सल्ला देत गोळ्या घालण्याची भाषा निश्चितच मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही.. असली भाषा नुसती शोभत नाही, तर यातून त्यांचे विचारही स्पष्ट होतात. डॉक्टरांचा लोकशाहीवरील विश्वास विचारणाऱ्या अहिर यांची गोळ्या घालण्याची भाषा कितपत लोकशाहीला अनुसरून आहे, असा प्रश्न याठिकाणी उपस्थतीत होऊ शकतो. सरकारी अधिकारी जसा जनतेचा नोकर आहे तसेच आपणही जनतेचे सेवक आहोत, याचा विसर मंत्री महोदयांना पडला असावा आणि पदाची गुर्मी त्यांच्या डोक्यात गेली असावी! म्हणून त्यांनी हुकूमशहासारखी गोळ्या घालण्यासाची भाषा केली असावी. बरं अहिर यांच्या वक्तव्यावरून गोंधळ उडाला असताना प्रधान सेवकानेही यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही, हीही नवलाचीच बाब!

बेताल वक्तव्य करण्याची जणू काही स्पर्धा लागली असल्याचे समजून केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला. या मंत्रीमहोदयांनी तर अहिर यांच्यापुढे एक पाऊल टाकत ‘भाजप सत्तेवर आला आहे तो घटना बदलण्यासाठीच. आम्ही ती लवकरच बदलू. सेक्युलर असणे, हे माय-बाप नसल्यासारखे असते.’ अशा अर्थाची वक्तव्य करत गोंधळ उडवून दिला. धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यापेक्षा धर्म आणि जातीच्या आधारावरच लोकांनी आपली ओळख निर्माण करावी, असा धर्मांध सल्ला त्यांनी देऊन टाकला. हेगडे यांना 'सेक्युलर' शब्दाची एलर्जी आहे, हे लक्षात येते. तसेही गेल्या काही दिवसापासून अनेकांना याची ऍलर्जी झाली आहे. पण धर्मनिरपेक्ष व्यक्तीला आईबाप नसतात, हा जावईशोध त्यांनी कसा लावला? काळानुसार घटनेत दुरुस्ती करण्यात यावी, यासाठीच घटनादुरुस्तीची तरतूद घटनाकारांनी घटनेतच करून ठेवली आहे. वेळोवेळी जनकल्याणासाठी त्यात दुरुस्तीही करण्यात आली आहे.पण दुरुस्तीची भाषा न करता ‘भाजप सत्तेवर आला आहे तो घटना बदलण्यासाठीच..' या वक्तव्याकरून हेगडे यांचा रोख आणि मानसिकता समोर येते.

"अनंत वाचाळ बरळती बरळ..त्या कैसा दयाळ पावे हरी" संत ज्ञानेश्वर माउलींनी हरिपाठातून बेताल बडबड करणाऱयांना आवर घालण्याचा सल्ला दिला आहे.''शब्द संभालके बोलिये, शब्द के हात ना पाव.. एक शब्द करे औषधी. एक शब्द करे घाव..'' या कवितेच्या ओळीतून कवींनी शब्दांचं माहात्म्य वर्णन केलं आहे. आपण शब्द मृदू वापरतो की कठोर, यावरून तो शब्द औषधीचे काम करतो की घावाचे, हे ठरत असते. शस्त्राने केलेली जखम लवकर भरून येते, पण शब्दाने केलेली जखम भरून येण्यास दीर्घ कालावधी लागतो किंबहुना ती अनेकदा भरूनही येत नाही, त्यामुळे शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. हे उपदेश आता वाचून-एकूण, घासून-घासून गुळगुळीत झालेत. पण आजकाल लोकांना ही केवळ पुस्तकातील वाक्य वाटू लागली आहे. राजकारण्यांनमध्ये तर बेताल बोलण्याचा जसा काही साथीचा रोग आला आहे. हा रोग कोण्या एका पक्षापुरता मर्यादित राहिला नाही तर सर्वच पक्षांमध्ये याची लागण झालेली दिसून येते. काँग्रेस, भाजपा, सपा सर्वच पक्षात विनाकारण वाचाळता करणारे रोगी दिसून येतात. आणि, ज्यांच्याकडून यावर उपाययोजना करण्याची अपेक्षा केली जाते तेसुद्धा पाहून न पाहल्यासारखेच, एकूण न ऐकल्यासारखे करत आहेत.. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अँड. हरिदास,
तुमचे बहुतेक लेख गुलमोहर - ललितलेखन या ग्रूपमधे योग्य नसून राजकारण- भारतात किंवा चालू घडामोडी - भारतात या ग्रूपमधे प्रकाशित करणे योग्य होईल.

शस्त्राने केलेली जखम लवकर भरून येते, पण शब्दाने केलेली जखम भरून येण्यास दीर्घ कालावधी लागतो किंबहुना ती अनेकदा भरूनही येत नाही, त्यामुळे शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. हे उपदेश आता वाचून-एकूण, घासून-घासून गुळगुळीत झालेत. पण आजकाल लोकांना ही केवळ पुस्तकातील वाक्य वाटू लागली आहे. >> +१११११११११११११११११११११११११
अगदी खरे आहे.... 'शब्द म्हणजे दुधारी तलवार' हे मला खूपच पटते.
आता लोकसभा निवडणुकांची भाषणबाजी सुरू झाली की ही बेताल वक्तव्ये दिवसला चार आणि त्यावर मिडियामध्ये तासाला आठ अशा चर्चा घडून येतील.

एवढा अभ्यासू आणि संयत लेख ईथल्या वाचकांकडून कसा मिस झाला.. हे नवलच.

आम्ही वाचला होता, पण ज्या विषयाबद्दल माहिती नाही त्या विषयावर बोलणे बरोबर नाही.
आता असतात इथे काही लोक, कुठल्याहि लेखावर आपले मत देत बसतात, नि कुणाला ते आवडले नाही की भांडायला तयार! फार मजा करतात असले लोक.
पण हा विषय गंभीर दिसतो आहे. वाचक कसे का असेना!

या देशाची हीच शोकांतिका आहे. जे साधे वैद्यही नाहीत ते येथे मंत्री होऊन तज्ञ लोकांना शिकवतात आणि नको त्याविषयात नाक खुपसुन आपले ज्ञान प्रगट करतात यालाच लोकशाही म्हणतात.

आजच्या नेत्यांनी आदरणीय स्व. अटलजी स्व.इंदिरा जी वा त्या काळातील कुठल्याही नेत्यांच्या संसदेतील वा जाहीर सभांमधिल भाषणे ऐकावित.म्हणजे कसे आणि काय बोलावे हे त्यांना कळेल.