लसूण

Submitted by जव्हेरगंज on 15 January, 2018 - 12:41

आपुन पद्या. जग आपल्याला पद्या म्हणतं. का म्हणतं? WE DONT NO.

आपल्याला ल्ह्यायला भौतेक जमणार नाय. आपुन निसता हिंडतो. सायबाला फोन करुन "सायेब कामधंदा कसा काय चाललाय?" म्हणून इचारतो. आपुन सायबाचे फेवरेट. आपल्याशिवाय लाईन चालणारंच नाय. आपल्याला मशनीतलं सगळं जमतं. नुसतं चालवतंच नाय. नट बोल्ट खोलून मेंटेनस बी ठेवतो.
दुपारी आपण कन्वेयरच्या साईडला झोपतो. सायेब काय बोलत नाय. आपण सायबाचे फेवरेट.

चार दिवस सुट्टी मारायची तर आपुन आठ दिवस मारतो. तवा सायेब बोंबलतं. आपुन ऐकूण घेतो. पण आपण सायबाचे फेवरेटंच.

आपण गँगचे लीडर. पोरांना काय दुखलं खुपलं, आपण निस्तारतो.

सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली. आपण पेश्शल खादी वापरतो. दत्ताच्या देवळात जाऊन नामाटी वढली. सकाळी सातच्या आत कंपनीत हाजर.

मशीन पुसली. सायेब आलं. सायबाला म्हणलं, सायेब पगारवाढ द्या. सायेब म्हणला बघतो. म्हणलं मग बघ.

मशनीवर जॉब आणलं. वळीनं लावलं. शेटींग केलं आणि बसलो मारत. पुडी काढली. मळून खाल्ली. छावीला चार म्यासेज टाकले.
आपली येक छावीपण हाय. आजून तिला कधी बघितलं बी न्हाय. पण आपुन रातरात बोलतो. कधी म्हणते मंबईला हाय. कधी नाशिक. तर कधी तिकडं पार कोल्हापुरची. अशा लय झाल्यात पर ही लय दिवस टिकून हाय.
आपण चायना मोबाईल कानाला लाऊन पोरांना जाळत बसतो. आपलाबी ब्यालन्स लय जळतो. एकदा मीटर लागलं की आपण गायछापला महाग.
दिवसभर काम केलं.
संध्याकाळी सायबाला म्हणलं, सायेब बाय बाय,
मग सायेब बी म्हणलं, बाय बाय रे भावा.

रात्री उशिरा आपण चौकात जातो. वश्या आणि सोम्या आपल्या बरोबर आसतात. मोबाईलची रिंगटोन वाजवत पुलावर बसलो. छावीनं मिसकॉल द्यायला सुरु केलं. मग आकड हाणत माणसात जाऊन "पुना करतू, आता जरा बीजी हाय" म्हणून फोन कट केला. सोम्या 'परत चलै' म्हणून बोंबलंत होता. मग त्येचाच 'गोवा' खाऊन पिचकाऱ्या मारत बसलो. वश्या आपला शेपटासारखा जाईल तिकडं मागं असतो. फिरत फिरत मग जेवण करुन रात्री अकरा बाराला रुमवर गेलो. मग छावीसंगं बोलत दोन वाजोस्तोर टेरेसवर. कधी कधी तर रात रात जागून तसाच कंपनीत जातो.

सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली. पेश्शल खादी. दत्ताच्या देवळात नामाटी. सातच्या आत कंपनीत हाजर.

मशीन पुसली. सायेब आलं. सायबाला म्हणलं, सायेब पगारवाढ?
सायेब म्हणला, बघतो.
आता सहा महिनं होत आलं. कसला बघतूय पुच्चीचा.

आपण गँगचे लीडर. बाळ्याला म्हणलं, 'याक्वा'ला जा. आपल्या वळखीवर. तिकडं पर डे जास्त हाईत.
पण बाळ्या गेला नाय. शम्नं सालं.

तंबाखू काढली. छावीला चार म्यासेज टाकले. सुपरवायझरला म्हणलं, कंत्राट दुसरीकडं लावा. परवडत न्हाय. तो म्हणला, आता हितंच आय घालायची. तिकडं जाऊन कुणाकुणाचं XXXXX.

सुपरवायजर हांडगा आहे.

सायबानं मला सकाळी सकाळी झाडास्नी पाणी द्यायचं काम लावलं. नळी घीऊन सगळी कंपनी पालथी घातली. हे येगळं काम होतं. म्हणलं हे बरंय. पण दस्तुरखुद्द पद्माकरला हे आसलं बुळगांड काम देऊन सायबानं बरं न्हाय केलं. म्हणलं त्येजायचा पुच्चा. आपल्याला हे कामंच नगं. मग घोगऱ्याला फोन लावला. घोगऱ्या आपला मेन कंत्राटदार. म्हणलं, घोगरे सायेब. आपुन 'ठिस्को'त जातो. हितं काय परवडत न्हाय. बुलून बघा तितल्या एच्चारला.
घोगऱ्या म्हणला, येवढा सीझन काढ. मग तुला आपल्या मेन हाफीसला घेतो. फुल एसीतलं काम.

म्हणलं हेज्याबी आयचा पुच्चा. गेलं चार वर्षे हेच ऐकतोय.

दुपारी पोरं जमवली. म्हणलं उद्या कुणीबी कामावर यायचं न्हाय. कुणी दिसलं तर गेटवरंच कापून टाकतो. पगारवाढ करुनंच घ्यायची. पोरंबी उसाळली. जंगी संप करायचा ठरवून टाकला.

मग बार भरुन सायबाकडं गेलो. म्हणलं, सायेब जेवण झालं का?
सायेब म्हणाला, मस्त मस्त.
मग आपणबी कॉलर टाईट करुन तिथून सटाकलो.

छावीला फोन लावला. जनरेटरच्या बाजूला टेकून निवांत बोलत बसलो. तिकडून एच.आर. येताना दिसला. लांबूनच उभ्या उभ्या माझा फोटो काढला. आणि निघून गेला.
दस्तुरखुद्द पद्माकरचा फोटो? म्हणलं बघतोच याला. एखादा रॉड बीड दिसतोय का बघितलं. मग तावातंच हॉफिसमधे गेलो. एच.आर.म्हणला, "हिकडे रे, हिकडे ये तू, उद्यापस्नं कामावर फोन आणायचा न्हाय. न्हायतर जप्त करीन"
म्हणलं, सायेब घरचा फोन हुता.
तो म्हणला, आता आमाला XXXX शिकवू नको.

संध्याकाळी रुमवर गेलो. चौकात भटकलो. रिंगटोन वाजवत फिरत फिरत टेरेसवर. मग छावीला फोन. शेवटी झोपलो.

सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली. पेश्शल खादी. दत्ताच्या देवळात नामाटी. सातच्या आत कंपनीच्या गेटवर हाजर.

सगळी पोरं आलती. म्हणलं, कुणीबी आत जायचं न्हाय. गेटवर बसायचं.
पोरं म्हणली, आता नगं. बघू नंतर. कडकी चालूय.

म्हणलं ह्यांनाच गरंज न्हाय तर आपण आपली कशाला घासा. ह्यांच्याबी XXX XX.

मग कंपनीत गेलो. मशीन पुसली. जॉब आणलं. वळीनं लावलं. शेटींग केलं. मारत बसलो. पुडी काढली. मळून खाल्ली. छावीला चार म्यासेज धाडून दिले.

मग सायेब आलं. सायबाला म्हणलं, गुड मॉर्निंग.
सायेब म्हणला, व्हेरी गुड मॉर्निंग.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅरेक्टर्स मस्त उभी करता तुम्ही! अगदी डोळ्यासमोर येतात.
२ गोष्टी कळल्या नाहीत. एक म्हणजे कथेचे नाव लसूण का? आणि दुसरे सुरुवातीला पद्याचे म्हणणे "WE DONT NO." चुकीचे असले तरी इंग्रजी ? (त्या कॅरेक्टर ला.)

कॅरेक्टर्स मस्त उभी करता तुम्ही! अगदी डोळ्यासमोर येतात.>>>>>अगदी अगदी
पण मलाही लसणीचा संदर्भ लागला नाही .कथा अगदी २-३वेळा वाचून पण..

आवडलं.
(शीर्षकाचा संदर्भ मात्र लागला नाही.)

बर्‍याच दिवसांनी आलात ! जबरा जमली आहे..
लसूण चा संदर्भ समजला , पण उघडपणे नाही लिहिता येणार Happy
एकच खटकलं.. ह्या रावडी पद्माकरला 'दस्तुरखुद्द ' वगैरे अवघड शब्द माहित असण्याची शक्यता कमी वाटते !
बाकी झकास !

लसूण = slang for female genital/vagina. साहेबाला शिवी देताना याचाच अस्सल मराठी अवतार वापरला आहे.

===
मस्त ओ जव्हेरभाऊ!

कथा आवडली.

लसूण चा दुसरा अर्थ नव्हता माहिती.

कथा आवडली.>> +१
लसूण चा दुसरा अर्थ नव्हता माहिती.>> मलापन..

नाही आवडली . शिव्या खटकल्या, त्यामुळे कदाचित. >> मेकॅनिकल कम्पनीत काम करणारीने सांगितलं कि तिथे 'अशीच' भाषा असते Lol

लसूणचा अर्थ मलापण माहित नव्हता. हीच कथा मिपावर पूर्वी वाचली होती तेव्हा तिथल्या प्रतिसादमधून कळाला.

शिव्या खटकल्या >> Uhoh
ज्यांना शिव्या खटकल्या त्यांनी फक्त शिव्याच वाचलेल्या दिसतायत Lol
शिव्या आपल्या जागी आणि कथा आपल्या जागी. कथेची गरज म्हणून सिनेमात शय्यागृहातली किंवा चुंबनदृश्ये टाकतात तसंच आहे हे. त्यावरच लक्ष केंद्रित न करता वाचकानेपुढे निघावे.

छान लिहिलयं

मेकॅनिकल कम्पनीत काम करणारीने सांगितलं कि तिथे 'अशीच' भाषा असते >>> Uhoh नॉट नेसेसरी

मेकेनिकल पेक्षा सिविल याबाबतीत भारी असतात ! ज्या सिविल ईंजिनीअरला शिव्या देता येत नाही त्याची बावळटत गिणती होते. सगळीकडेच नाही पण आमच्या कॉलेजात व्हायची Happy

अवांतर - त्या लसूणला पुरुषांच्या बाजूने एक शब्द जोडून एक जोडशब्दही बनतो. ज्याचा वापर वगैरे वगैरे या अर्थाने होतो.

ऋनम्या करेक्ट! मलाही तोच अर्थ वाटला शीर्षकाचा.> +१
मलाही शीर्षकाचा तोच अर्थ वाटला. स्पष्ट लिहु शकत नाही म्हणुन अर्धंच लिहिलंय असं वाटलं.

Submitted by विद्या भुतकर on 17 January, 2018 - 15:52
ऋनम्या करेक्ट! मलाही तोच अर्थ वाटला शीर्षकाचा.> +१
मलाही शीर्षकाचा तोच अर्थ वाटला. स्पष्ट लिहु शकत नाही म्हणुन अर्धंच लिहिलंय असं वाटलं.
+११

मस्त..