कांदिसा - ३

Submitted by किरणुद्दीन on 22 October, 2018 - 07:41

मिलिटरी हॉस्पिटल म्हणजे आर्मीचे वैद्यकीय युनिट.
इथल्या लोकांसाठी वरदान.

गेटवर मी एण्ट्री करायसाठी रजिस्टर ओढले तर चिरपरिचित आवाज आला.
" रहने दो. मत लिखो नाम. आप हमारे गेस्ट हो "

आत सुभेदार मेजर यादव बसले होते.
मला पाहून बाहेर आले. वार्धक्याकडे झुकलेल्या यादवांचे बोलणे अगदी खणखणीत होते. पांढ-या केसांचा मान म्हणून सवयीने पाया पडलो.
मला उठवत म्हणाले "बैठो जीप मे. अंदर जाने की जरूरत नही है. घुमके आयेंगे "

मला कर्नल साहेबांना भेटायचे होते.
यादव म्हणाले " कर्नल साहब नही है. हमारे साथ भी रहा करो "
मग नाईलाज झाला. मन मोडवत नव्हते.

यादव गुंफाला निघाले होते.
डिस्कीटला तीन चार वेळा डीएम कडे जाणे झाले होते. पण गुंफाचा मुहूर्त लागला नव्हता. आज अचानक ध्यानी मनी नसताना गुंफाकडे जाणे होत होते. गुंफा हा उच्चार आर्मीवाल्यांनी प्रचलित केला होता.

मी जीपमधे बसेपर्यंत ड्रायव्हरला घाई झालेली. खटाखट गिअर टाकत जीप गुंफाकडे रवाना झाली. वळणावळणाचा एक जीप जाईल एव्हढा रस्ता. तो ही खलसरकडे तोंड केल्यावर उजव्या हाताच्या पर्वतरांगेला खेटून. रस्त्याला सोबत नदीचं पात्र करत होतं.

सॅण्ड ड्युनला विदेशी पर्यटक सायकलवर फिरत होते. डिस्कीट जवळ आलं तसे लद्दाखी लोक पाठीवर घरासाठी लागणा-या लाकडाचे खांब पाठीवर घेऊन वर चढत येताना दिसले. त्यातल्या त्यात स्त्रिया जास्त कष्टाळू.

आम्ही डिस्कीटच्या बोर्डजवळ उतरलो.

गुंफा ..

आज उत्सवामुळे गजबजलेला होता परीसर. एरव्ही चिटपाखरूही दिसत नाही.
लदाखी तर होतेच. विदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय होती. भारतातून आलेले देखील अनेक लोक होते. केशरी चीवर घेतलेले असंख्य भिक्खू गर्दीत दिसत होते.

सात मजली गुंफा डोंगरात कुणी बनवली असेल ते असेल. एकेकाळी हे साम्राज्य होते. इथल्या सम्राटाचा हा राजवाडा होता. लडाखी ही वेगळीच संस्कृती. आज पंचम लामाचे आगमन होणार होते. गाववाल्यांची रीघ लागली होती गुंफाकडे.

दलाई लामांच्या खालोखाल पंचम लामा हे अत्यंत महत्वाचे धर्मगुरू आहेत. यांची भ्रमंती तिबेट, तैवान, लडाख अशी असते. चीन मधे मात्र ते आता फारसे जात नाहीत. लामांपासून चीन सरकार सावध असते.

जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला वाट काढत जावे तसे आम्ही चाललो होतो. एक तर ऒक्सिजन विरळ. त्यातून चढण.
मला धाप लागली. एसएम साहेब टणाटण चढत होते. माझी अवस्था पाहून टोमणे मारण्याचा मोह त्यांना आवरला नाही.

"दारू न पीने का अंजाम है यंग मॆन. हमको देखो. बाल सफेद हो गये"

मी कसानुसा हसलो.
गुंफा मधे मूर्त्या आहेत. तिथपर्यंत जाण्याचे त्राण राहीले नव्हते. मी एसएम साहेबांना जाऊन या असे खुणावले. त्यांच्या आग्रहाला अजिबात दाद दिली नाही.

बराच वेळ झाला बसून.
रस्त्याच्या कडेला पिवळे झेंडे लावले होते. काही दगडही होते. ज्यावर स्थानिक भाषेत काही तरी लिहीलेले होते.

माझ्या नजरेला एक विचित्र दगड पडला. असा दगड इथल्या मंदीरात कधीच पाहण्यात आला नव्हता.

यावर एक चित्र होते. अस्पष्ट झालेले.

मानवी आकृती होती ?
कि कुठले जनावर ?

नीट समजत नव्हते.

हा इथे कसा ?

चित्र पाहतानाच हे अनमोल किंमतीचे आहे या अर्थाच्या घंटा मेंदूत किणकिणायला लागल्या होत्या.

*********************************************************

इथपर्यंत वाचून संध्या थांबली.

श्रीधरच्या चेह-यावर कुतूहल आणि आठ्याही होत्या.
कुजबुजत्या आवाजात निरर्थक असं तो बोलून गेला

"इथपर्यंत खटकण्य़ासारखं काहीच नाही, नाही का ?"
"हम्म"
" पण मग आपल्याला कसं समजणार पुढे असे अघटीत कसे घडले त्याबद्दल ?"

" जल्लाप्पा पोहोचल्याशिवाय काही उलगडा होईल असे वाटत नाही "
" चंदीगढला पोहोचला ना जल्लाप्पा ?"
" काही समजत नाही. दोन वेळा त्याला मिलिटरी पोलीस ने पकडून पुन्हा युनिटच्या हवाली केले होते "
" मग ?"
" तिथून तो बाय रोड सटकला असा मेसेज आला आहे "
" म्हणजे ?"
" लेट्स वेट अ‍ॅण्ड वॉच "

स्नेहलने जाण्याआधी तिला दिलेली साखरपुड्याची अंगठी आताही तिच्या बोटात होती. काय काय स्वप्ने पाहिलेली होती.

या वेळी लडाख वरून आल्यावर ते दोघे लग्न करणार होते.
तो तिच्यासाठी चिनी पद्धतीचा महाल बनवणार होता.

पण जे झाले ते सर्व अकल्पित असेच होते.

आत्यंतिक काळजीच्या ओझ्याखाली दु:ख दबून जावे तसे तिचे अश्रू गोठले होते.
आता फक्त छडा लावणे हेच तिच्या आयुष्याचे ध्येय बनले होते.

( क्रमशः )

Group content visibility: 
Use group defaults