पापी कशी माणसे?

Submitted by निशिकांत on 17 October, 2018 - 00:48

पापी कशी माणसे?

( शार्दुल विक्रडीत वृत्तात माझी पहिलीच गजल. )

देव्हार्‍यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे
कर्ता तोच असेल अन् करविता, पापी कशी माणसे?

धर्मांधात जिहाद आज रुजला, कसली दया दावता?
फाशीवर चढवा लगेच नसता धरतील ते बाळसे

झाला खूप विकास आज पण का उपभोग्य वस्तूच ती?
स्त्रीसाठी जग ना कधी बदलले आहे जसेच्या तसे

होते कौतुक केवढे मुलांचे छोट्या कुटुंबामधे !
भावंडे इतकी मला! न झाले माझे कधी बारसे

का भ्यावे बघुनी विराट लाटा, फसवाच तो चेहरा
डोकाऊन बघा दिसेल शांती ह्रदयी नदीच्या असे

पुत्रांनी धनसंपदा हडपली सारे उडाले कुठे?
मेलो कालच, अंत्यकर्म करण्या आला कुणीही नसे

शोधाशोध सदैव खूप केली दिसले हिरे ना कुठे
मोठ्या ज्या विभुती वरून दिसल्या आतून ते कोळसे

थकलो मी हुडकून कोपराही लाचेविना भूतळी
देशाला लुटण्यास राज्यकर्ते घेवून बसले वसे

"निशिकांता" घर शोध माणसांचे, रस्त्यावरी माग घे
ते गेले जिथुनी तिथे गवसले का श्वापदांचे ठसे?

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव्हार्‍यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे<<<<<

काका, ओरिजिनल ओळ माझी आहे Happy

https://www.maayboli.com/node/38154

जरी मी तिथे तरही लिहिलेले असले तरी!

==========

ते गेले जिथुनी तिथे गवसले का श्वापदांचे ठसे?<<<<< व्वा

अनेक शेर आवडले

==========

एका गुरूच्या जागी दोन लघू वापरणे वेगळे व दोन लघुंच्या ठिकाणी एक गुरू वापरणे वेगळे Happy

बाकी गझलेतील भाष्य दणदणीत

मला वाटते गझल टाईप करताना तरही असे लिहायचे विसरले आहे. आपण बघताच की तरहीत मी आपला आदरपूर्वक उल्लेख करतो. येथे अनावधानाने चूक झालेली आहे. क्षमस्व बेफिकिरजी. आता नोंद करून घेतो मूळ गझलेत.
प्रतिसादासाठी आभार.