दारूची भलामण

Submitted by विजयाग्रज on 30 August, 2018 - 03:37

सोशल मिडियावरची नुकतीच एक पोस्ट वाचनात आली. एका प्रसिद्ध डॉक्टरांच्या नावे व त्यांच्या हवाल्याने व्हायरल झालेली. सदर पोस्टमध्ये दारू पिणे आरोग्याला कसे हितकारक ते सांगून दारूमुळे शरीराची पंचकर्मासारखी शुध्दीक्रिया होते व शरीरातील टाकावू पदार्थ कसे बाहेर टाकले जातात असे सांगून दारूची भलामण केलेली आहे.
दारू पिणारा जो एक वर्ग आहे तो तिचे केवळ चांगले परिणाम आहेत म्हणून पीत असतो असे म्हणणे म्हणजे मात्र सत्याचा अपलाप होईल. तिचे बरे वाईट काही परिणाम असतील तर असोत पण ती पिण्यामागची कारणे खरेतर वेगळीच आहेत. सोशल ड्रिंकींग हे उच्चभ्रू समाजात मान्यता पावलेले असले तरी सर्वसाधारण समजानुसार उघड दारू पिण्याला एक प्रकारचा सामाजिक अयब आहे. त्यामुळेच भारतात दारू पिणा-यांपेक्षा दारू न पिणा-यांची संख्या अधिक आहे. (एका अहवालानुसार 2010 मध्ये लोकसंख्येच्या सुमारे 30 टक्के अल्कोहोल पिणारे लोक भारतात होते व त्यापैकी 11 टक्के लोक मध्यम ते जास्त प्रमाणात दारूचे सेवन करणारे होते.)

जगात स्वत:वर नियंत्रण असलेले व चार भिंतीच्या आत बसून
दारू पिणारे कितीही असतील तरी प्रत्यक्ष सामाजिक नुकसान असे फारसे होत नाही. पण दारू पिऊन रस्त्यावर येणारी अनियंत्रित संख्या जितकी वाढेल तितके सामाजिक नुकसान जास्त होण्याची शक्यता बळावते. म्हणून दारूची भलामण नको एवढाच मतितार्थ. याबाबतीत स्वत:वर नियंत्रण असलेले काही सन्माननीय अपवाद वगळता दारूच्या आहारी जाऊन स्वत:ची व कुटुंबाची फरफट व धुळधाण करणारे कित्येक मला माहीती आहेत. दारूची सामाजिक प्रतिष्ठा जितकी वाढेल तितका प्रगल्भ आपला समाज नसेल तर दारूचे सामाजिक दुष्परिणाम अघिकच वाढणार. दारू ज्यांना आवडते त्यांनी ती खुशाल प्यावी.पण खाजगीत. तिचे सार्वजनिक गुणगान कशासाठी? ती कदाचित त्यांच्यासाठी वैयक्तिककित्या वाईट किंवा नुकसानकारक असेलच असे नाही. पण दारू पिणा-यांची जितकी संख्या वाढेल त्यातील स्वत:वर कंट्रोल नसणारे समाजाला नुकसान करू शकतात.

दारूपेक्षा साखरेमुळे जास्त लोक मरतात व साखरेवर बंदी नाही घातली जात हे उदाहरण मात्र समर्पक वाटत नाही. दारूचा समावेश मज्जासंस्थेवर अंमल गाजविणा-या पदार्थात होतो. व दारूमुळे शरीरावरचा कंट्रोल कमी होतो हे सिद्ध झालेले शास्त्रीय सत्य होय. केवळ साखरेमुळे लोक मरतात असा अपसमज करून घ्यायचे कारण नाही. मधुमेह होण्यास साखर खाणे हे कारणीभूत नाही तर बैठ्या स्वरूपाच्या कामामुळे व व्यायामाच्या अभावामुळे जीवनशैलीतील बदलामुळे स्वादुपिंडाच्या कार्यातील अडथळा हे आहे. मरणारांची संख्या विचारात घेतली तर कुठल्या ना कुठल्या आजाराने माणूस इहलोकातून जातो किंवा म्हातारे होऊनही मरतोच. दारू पीत पीत 97 वर्षे जगलेल्या खुशवंतसिंगांचे उदाहरण दिले जाते . पण किती जण दारू पिल्याने खुशवंतसिंगांसारखे नव्वदीपार होतात?
खरे तर दारू भलेही योग्य त्या प्रमाणात घेणे कुणाच्या वैयक्तिक आरोग्याला चांगली असेल तरीही तिच्यामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम मात्र भयावह आहेत. ज्याला प्रमाणात प्यायची आहे व ज्यांना ती प्यायला आवडते त्यांना त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नसेल तर प्यायला कुणाची हरकत असायचे मुळीच कारण नाही. जसे आपण आपणास आवडणारे अन्न आपण आपल्या मर्जीने सेवन करतो तसेच हीदेखील बाब आहे.परंतु दारू चांगली अशी तिची भलामण करण्याचे प्रतिकूल सामाजिक परिणाम होऊ शकतात आणि ते मात्र भविष्यातील पिढीसाठी निश्चित चांगलेच असतील अशी खात्री देता येत नाही. कारण सामाजिक बंधने जितकी सैल होत जातील तितके अनिर्बंधरित्या पिणे वाढू शकते. दारू पिऊन वाहन चालविण्याच्या घटनांवर अंकुश यावा म्हणून सध्याचे कायदे अधिक कडक करण्याचे प्रस्तावित आहे त्याचा सुयोग्य परिणाम व्हायचा असेल तर सर्वसाधारणत: दारू पिण्याचे फायदे कमी व तोटे जास्त या सूत्राची समाजात जाणीव होणे आवश्यक आहे. दारू चांगली असे म्हणण्यात तसेच दारूची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात गोण्यात दारूचा खप वाढून दारू तयार करणा-या कंपन्यांचा फायदा आहे. दारू वैयक्तिकरित्या पिण्यात व खाजगीत दारू चांगली म्हणण्यात कुणाचे फारसे मोठे नुकसान नाही पण पिण्यातली सामाजिक प्रतिष्ठा वाढणे मात्र समाजाच्या दृष्टीने हितावह होणार नाही .सवय लावण्याबाबत दारूची ख्याती आहे. तिचा स्वभावच आहे तो. फार कमी लोक तिच्यावर काबू करू शकतात. असे सन्माननीय अपवाद वगळता प्रत्येकाचा पिण्यावरील ताबादेखील सारखाच असेल असे नाही. त्यामुळे दारू चांगली असे उघडपणे समाजमनावर बिंबणे काहीसे जोखमीचे आहे.
खाजगी गाडी घेऊन पार्टीला जाताना त्या गाडीचा चालक दारू न पिणारा असणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. अशा कोणत्याही वर्गातील लोकांना दारू आपलीशी वाटेल अशी तिची स्तुती व्हायला नको अशी अपेक्षा. वारूणी भलेही कुणा चांगली वाटत असेल पण ती प्रत्येकासाठी नाही. त्यामुळे ही बाब वैयक्तिक ठेवली तर अधिक चांगले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदी बरोबर लिहिले आहे, पण लक्षात कोण घेतो Sad
अती तेथे माती, हे माहित असुनदेखील अनेक लोकांना स्वतःची मातीच करून घ्यायची हौस जास्त असते.

लेख पटला पण दारूची भलामण करून त्याचा खप वाढेल ही भिती अनाठायी आहे. जाहिरात करा अगर नको, दारूच्या खपावर कोणताही परिणाम होणार नाही.

दारू पिणारे कितीही असतील तरी प्रत्यक्ष सामाजिक नुकसान असे फारसे होत नाही. पण दारू पिऊन रस्त्यावर येणारी अनियंत्रित संख्या जितकी वाढेल तितके सामाजिक नुकसान जास्त होण्याची शक्यता बळावते. >> हे पटले नाही. चार भिंतित दारू पिऊन कुटुंबाला मारहाण करणारे यात धरले नाहित का? आणि अश्या लोकांमुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडत नाही का? Uhoh

सवय लावण्याबाबत दारूची ख्याती आहे. तिचा स्वभावच आहे तो. फार कमी लोक तिच्यावर काबू करू शकतात. >> या वाक्याला माझी सहमती नाही. मी वर्षानुवर्षे प्रमाणात दारू पिणारे पाहिले आहेत. हे व्यक्तिसापेक्ष आहे अर्थात.

अखेर काय तर तुम्हीच लिहिले आहे की साखर आणि दारू दोन्ही माणसं मारतेच आणि कोणतीही गोष्ट अती म्हणजे वाईटच. वाचनही कितीही चांगले असले तरिही २४ तास एखादा वाचनच करत बसला तर ते ही घातक.
त्यामुळे प्रत्येकाला आपले बरे वाईट कळते असे धरून चालायला हरकत नाही. आणि ज्याने त्याने आपल्यासाठी काय योग्य काय नाही याचा विचार करून वागावे आणि तसे वर्तन अंगिकारावे.
मग कुणा डॉक्टरने दारू चांगली हे वैयक्तिक मत जाहिर केले तर त्याला दोष देण्यात काय हाशिल?

xddx.jpg
↑लेख टाकण्याची भारतीय प्रमाणवेळ

xdx.jpg
↑ आत्ताचा सदस्यकालावधी

↓ह्या पोस्टची भारतीय प्रमाणवेळ. Bw